वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

  वाईन ग्लास,नग्न पुतळे
इराणनं आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततेसाठीच असेल असं मान्य केलं आणि युनोला आपल्या कार्यक्रमावर लक्ष ठेवायला परवानगी दिली. युनोनं इराणवर लादलेले निर्बंध मागं घेतले. व्यापार, तंत्रज्ञान, वित्तपुरवठा आणि उर्जा या चारही बाबतीत जगाशी व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य इराणला मिळालं. काही वर्षं अडकून पडलेले व्यवहार व अनेक देशांशी गोठलेले संबंध सुधारण्यासाठी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी जगाच्या दौऱ्यावर बाहेर पडले.
पहिला दौरा युरोपचा.
युरोपीय देशांनी इराणमधे पैसे गुंतवावेत, इराणला तंत्रज्ञान द्यावं आणि इराणकडून तेल घ्यावं हे मुख्य उद्देश. पैसा. धंदा.
सुरवात झाली इटालीपासून.
इटाली इराणकडून तेल घेणार आहे. इराण इटालीकडून पोलाद, यंत्र सामग्री घेणार आहे. इटाली-इराणमधे सुमारे १८ अब्ज डॉलरचे करार झाले.
 रुहानी रोममधे यायच्या आधी इटालीनं रोममधले नग्न पुतळे झाकले. पुतळ्यांवर खोके घातले. कां तर रुहानी यांना नग्न पुतळे पहाववणार नाहीत. बिचारे रुहानी. इस्लामी. कुराणात नग्न कसले आलेत पुतळेच उभारायला परवानगी नाही.  नग्नता, स्त्रीचं शरीर दिसणं म्हणजे पुरुषाच्या कामुकतेला चिथावणी असते 
असं कुराणाचं मत आहे.
खरं म्हणजे वर्षानुवर्षं कठोर तपस्या केल्यानंतर नग्न पुतळ्यांचा रुहानींवर काहीच परिणाम होणार नव्हता. हव्वे तेवढे नग्न पुतळे समोर आणा, माझ्या वागण्यात आणि विचारात फरक पडणार नाही असं रुहानी यांनी म्हणायला हरकत नव्हती.
माणसाच्या शरीरीचं सौष्ठव व्यक्त करणारी चित्रं, पुतळे आणि शिल्पं निर्मिती हे युरोपीय संस्कृतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्यं आहे. हे सांस्कृतीक वैशिष्ट्यं इटालीनं धर्माशी जोडलं नाही. धर्म आणि संस्कृती एकमेकांपासून वेगळी ठेवली. भारतात असंख्य मंदिरात आणि गुंफांमधे शिल्प आणि चित्रांत शरीर सौष्ठव आणि कामक्रीडा दिसतात. इस्लाम आणि इस्लामी संस्कृती यांची स्थिती या बाबतीत बरोबर वेगळ्या टोकाची दिसते.
रुहानी यांच्याशी सांस्कृतीक भांडण उकरून काढून स्वतःचा आर्थिक तोटा करायची इटालीची इच्छा नसावी. मेडिची घराण्याकडं गडगंज पैसा होता म्हणून त्यांनी 
लिओनार्दो दा विंची, बोटिसेल्ली,
मायकेल अँजेलो यांना नग्न पुतळे करण्यासाठी
(इतर वेगळ्या कलाकृतींसह)  सढळ हातानं मदत केली होती. सध्या 
परिस्थिती वाईट असल्यानं आधी आर्थिक स्थिती सुधारायची मग संस्कृती वगैरेच्या बाता करायच्या असा निर्णय इटालियन सरकारनं घेतला असावा.
इटालीशी करार झाल्यावर रुहानी फ्रान्समधे गेले. इराण फ्रान्सला तेल पुरवणार आहे. बदल्यात फ्रान्स इराकला विमानं, कार, शेती औजारं, रसायनं इत्यादी गोष्टी देणार आहे. दोन देश ३७ करार करून देवाण घेवाण साधणार आहेत.
इराण आणि फ्रान्समधले संबंध कधी प्रेम कधी द्वेष अशा रुपाचे आहेत. इराणमधे नागरिकांना स्वातंत्र्य नाही, मतभेद असणाऱ्या नागरिकांना 
ठार मारलं जातं, तुरुंगात टाकलं जातं, त्यांचा छळ केला जातो असा आरोप फ्रेंच पुढारी आणि राजकीय पक्ष सतत करत असतात.  परंतू सीरियामधे मात्र आयसिस या दहशतवादी सुन्नी संघटनेवर बाँब वर्षाव करून इराण या शिया देशाला सुखी करत आहे.
संबंध कसेही असोत आज घडीला दोन्ही देशांना आपापली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोस्ती करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच तर रुहानी पॅरिसला रवाना झाले.
परंतू इटालियन लोकांनी रुहानींच्या इस्लामी धर्म आणि संस्कृतीपुढं 
नमतं घेतलं तसं करायला फ्रान्सनं नकार दिला.
अध्यक्ष रुहानी आणि अध्यक्षं ओलाँ यांच्यातल्या वाटाघाटीमधे एक अधिकृत खाना, मेजवानी ठरली होती. यजमान फ्रेंच सरकारनं मेजवानीचा मेनू पाठवला. त्यात वाईन होती. कारण फ्रेंच माणसं दुपारच्या (किंवा कोणत्याही) जेवणाबरोबर वाईन घेतात. तो त्यांच्या संस्कृतीचा एक अटळ भाग आहे.
रुहानीचं पित्तं खवळलं असावं. त्यांनी कळवलं की ते जिथं असतील तिथं वाईन असता कामा नये.
 वाईन या देखण्या, चविष्ट आणि आनंददायक द्रव्याला ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीत मानाचं स्थान आहे. ख्रिस्त हा जादूगार होता हे सिद्ध करण्यासाठी त्याची एक गोष्ट सांगितली जाते. त्या गोष्टीत त्यानं पाण्याचं रुपांतर दारूत केलं असं सांगितलं जातं. (मद्यार्क तयार करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडं तेव्हांपासूनच होतं असं मात्र ख्रिस्ती लोक सांगत नाहीत) संध्याकाळी घेतली तर वाईन ‘ चढते ’ आणि दुपारी जेवणाबरोबर घेतली तर मात्र ती तरतरी आणते ही फ्रेंचाची भावना रसायनशास्त्रात सिद्ध होत नाही. ते काहीही असो, फ्रेंच माणसं जमेल तेव्हां वाईन घेत असतात हाच त्याचा अर्थ.
आली पंचाईत. फ्रेंच सरकारनं आपली संस्कृती गुंडाळून कपाटात ठेवायला नकार दिला. वाईन देणारच आणि वाईन नको असेल तर अध्यक्ष रुहानी यांच्याबरोबरची चर्चा न्याहरीवर घ्यायची तयारी फ्रेंच सरकारनं दाखवली.
आता इराणची पंचाईत आली. मेजवानी नावाची भारदस्त बडदास्त सोडून न्याहरी या फालतू गोष्टीवर बोळवण करणं म्हणजे अपमान आहे असं इराणला वाटलं. त्यांनी न्याहरीही नको असं सांगितलं. वाईन नको आणि हलाल मांसही कोणत्याही खान्यात देऊ नका असं इराणनं कळवलं.
मेजवानी रद्द आणि न्याहरीही रद्द. बहुदा कटिंग चहा पिताना अध्यक्षांनी चर्चा केल्या असाव्यात.
हट्ट. आम्ही अमूक एका प्रकारेच वागणार.

मागं एकदा स्वीडिश राजदूत इराणचे अध्यक्ष अहमदिनेजाद यांच्यासमोर पायावर पाय ठेवून बसले. राजशिष्टाचारात असं पायावर पाय ठेवून बसणं हा अपमान समजला जातो. स्वीडिश राजदूताकडून हे अनवधानानं घडलं. पण अहमदिनेजाद यांना राग आला. एका बैठकीत ते मुद्दाम त्या राजदूतासमोर पायावर पाय ठेवून बसले.
राजशिष्टाचार हे एक अवघड प्रकरण असतं. भेटीसाठी आलेल्या पाहुण्याचा मान राखावा लागतो, त्याची आवड निवड पहावी लागते.  ती आवड निवड आपल्या संस्कृतीत बसो वा न बसो. भारतीय पंतप्रधान जेव्हां अमेरिकेत, युरोपात जातात तेव्हां त्या वेळी दिल्या जाणाऱ्या खान्यात दारू नसते, फळांचा रस असतो. खरं म्हणजे दारूला  भारतीय संस्कृतीत मज्जाव नाही.  महात्मा गांधींच्या प्रभावामुळं भारतात दारू बदनाम झाली, दारूला राजशिष्टाचारातून कटाप करण्यात आलं. भारतातही परदेशातले पाहुणे येतात त्यावेळी टेबलावर दारू नसते.
इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी देशात जेव्हां मुस्लीमेतर लोक जातात तेव्हां तिथल्या प्रथेनुसार डोक्यावर रुमाल वगैरे ठेवतात. स्त्रिया   डोक्यावर स्कार्फ घेतात. (नशीब पूर्ण बुरखा घ्यायला लावत नाहीत). भारतात देवळात जाताना, काही लोकांच्या घरात जाताना, जोडे बाहेरू ठेवून जावं लागतं.
  एकदा पंजाबच्या राज्यपालांनी देशभरच्या सेवाभावी संघटना आणि पत्रकारांना खान्यासाठी बोलावलं. अधिकृत आमंत्रण देऊन. संध्याकाळी.
मंडळी जमली असताना  घंटा घणाणली आणि जाहीर करण्यात आलं ‘ बार उघडा करण्यात आला आहे, पाहुण्यांनी ड्रिंक घ्यायला यावं.’  मंडळी अचंब्यात. राज्यपाल आणि दारू पाजणार म्हणजे काय. कारणही तसंच होतं. राज्यपाल होते निवृत्त लेफ्टनंट जनरल. सैन्यात दारु हा अविभाज्य घटक असतो. गांधीजींचा देश वाचवणारी सैन्यातली माणसं दारु पितात.  बरोब्बर एक तास बार उघडा होता. एक तास झाल्यावर पुन्हा सैनिकी शिस्तीत घंटा वाजली. ‘ जेवणाची वेळ झाली आहे, ग्लासं खाली ठेवा, जेवणाच्या टेबलावर बसा.’
सैनाधिकाऱ्यानं गवगवा न करता अनधिकृतरीत्या व्यावहारिक वाट शोधली होती.
 असो.
ते काहीही असो. (कदाचित कटिंग चहावर) दोघानी ३७ आर्थिक करारांवर सह्या मात्र केल्या.
००  

5 thoughts on “वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

  1. उत्तम लेख. इतिहासकाळात राजे लोकांच्या भेटी होत होत्या. त्यावेळी राजशिष्टाचार पाळावे लागले असतील याचे कुणी संशोधन केल्यास ते रोचक होईल.
    मंगेश नाबर

  2. चांगला लेख आहे. लोक दारूसाठी काय काय करतात, आणि हे लोक काय करताहेत ?! फारच संवेदनशील विषय आहे. तुमचे अभिनंदन.

  3. मंगेश, इतिहासकाळात राजे लोक यथेच्छ मद्यपान करीतच, पण उत्तम मदिरा हा पाहुणचाराचा भाग होताच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *