Browsed by
Category: Uncategorized

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

लोकशाहीचा ताबा  सोशल मिडियानं घेतल्यासारखं दिसतय. अमेरिका,जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन  हे देश त्यांच्या सार्वजनिक जीवनात  सोशल मिडियानं घातलेल्या गोधळानं चिंतीत झालेत.

२०१६ ची अमेरिकेची  अध्यक्षीय निवडणुक.

प्रचार मोहिमेत भाषणं करकरून, तर कधी सर्दीमुळं हिलरी क्लिंटनचा घसा बसला होता. त्या खोकत होत्या. कधी काळी कुठल्या तरी कारणासाठी क्लिंटन तपासणीसाठी डॉक्टरांकडं गेल्या होत्या. डॉक्टरकडं जाणं आणि खोकल्याची दृश्यं या दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या घटना एकत्र जोडून क्लिंटन  गंभीर आजारी आहेत, त्यांना मत देणं धोक्याचं आहे असा संदेश सोशल मिडियात ट्रंप मोहिमेनं पसरवला.

काळा माणूस गोळीबार करताना दाखवला. कपड्यांवरून मुसलमान आहे असं लक्षात यावं असा माणूस जाळपोळ करताना दाखवला. या चित्रांचे संदर्भ स्पष्ट न करता   ओबामानी कुठं नेऊन ठेवलाय अमेरिका अशा अर्थाचं उपशीर्षक दिलं.

असे अनेकानेक मुद्दे इंटरनेट, टीव्ही आणि सेल फोनवरून लोकांवर कोसळवण्यात आले. धूर येतोय त्या अर्थी नक्कीच कुठं तरी आग लागलीय अशा बातम्या   फॉक्स न्यूज या वाहिनीनं  केल्या आणि ट्रोलभैरव गोळा करून वाहिनीवर चर्चा घडवून आणल्या. अशी दृश्यं, जाहिराती आणि चर्चा दिवसाला  ५० ते ६० हजार इतक्या संख्येनं सोशल मिडियानं लोकांच्या डोक्यात घुसवल्या. कधी गंभीर आरोप, कधी संशय निर्माण करणं, कधी विनोदानं आणि थट्टेत बदनामी सुचवणं अशा अनेक रुपांमधे.

ट्रंप मोहिमेनं आणखी एक केलं.  जाहिरातीचा मारा करून लोकांच्या मनावर ठसवलं की बुद्दिमान माणसं, इंटलेक्चुअल,  बोगस असतात, ते नुसते शब्दांचे खेळ करून लोकांचा बुद्धीभ्रम करत असतात, ट्रंप म्हणतात तेच खरं.

क्लिंटन, ओबामा यांच्या विरोधात ट्रोलिंग करताना रशियन कंपन्यांनी दिलेली माहिती वापरली गेली. रशियानं पुढारी, पक्ष, कॉर्पोरेशन्स, डॉक्टर, विश्वशाळा इत्यादी ठिकाणच्या कंप्यूटरमधून माहिती चोरली, त्या माहितीला विकृत रूप दिलं, संदर्भ सोडून ती माहिती वापरली आणि ट्रंप प्रचारकांना पुरवली.

ट्रंप मोजक्या शब्दांचे एकतरफी आरोप करणारे ट्विट्स करत. ना त्यातल्या मजकुराचं स्पष्टीकरण, ना त्या आरोपांचे आधार. ट्विटोबा ट्रंप यांचा एकतरफी अल्पाक्षरी मारा. या ट्वीट्सचे असंख्य रीट्वीट्स.

असाच प्रचार रशियानं फ्रान्समधे केला.फ्रेंच अध्यक्षपदाची प्रचार मोहिम संपली. मतदान करेपर्यंत कोणीही उमेदवार जाहीरपणे कोणतंही वक्तव्य करू शकत नाही असा काळ सुरु झाला. नेमक्या त्या वेळी फ्रेंच माध्यमात एक बातमी रशियानं पेरली, व्हायरल केली. उमेदवार मॅक्रॉन यांचं एक बेकायदा खातं एका परदेशी बँकेत आहे आणि त्यात त्यांनी गोळा केलेली खूप बेकायदा संपत्ती साठवलेली आहे. गोची अशी की मॅक्रॉन काही बोलू शकत नव्हते. मत कोणाला द्यायचं ते नक्की न ठरलेल्या, मॅक्रॉनबद्दल शंका असलेल्या मतदारांवर या आयत्या वेळच्या माहितीचा परिणाम झाला.

जर्मनीच्या २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी इराक-सीरियामधून आलेल्या अरब स्थलांतरितांचा प्रश्न चर्चेत होता. मर्केल या स्थलांतरीतांना थारा देऊन जर्मनीचं नुकसान करत आहेत असं अनेक जर्मनांना वाटत होतं. रशियन ट्रोलरनी विविध ठिकाणच्या हिंसांची चित्रं संदर्भ सोडून मॉर्फ केली आणि बाहेरून आलेले सीरियन-मुसलमान जर्मनीत हिंसा माजवत आहेत असं माध्यमांत पेरलं.  बाहेरची मंडळी जर्मन संस्कृती  नष्ट करत आहेत, जर्मनीची सुरक्षितता  धोक्यात आली आहे असं सांगणाऱ्या क्लिप्स माध्यमांत पेरण्यात आल्या. गावोगाव इराकी-सीरीयन मंडळी गोंधळ घालत आहेत आणि मर्केल यांचं सरकार तिकडं डोळेझाक करत आहे असे संदेश पसरवण्यात आले. मर्केल यांची खूप मतं गेली, परद्वेषी उजव्या टोकाच्या पक्षाला खूप मतं आणि संसदेतल्या जागा मिळाल्या.

अमेरिकन माणूस दिवसातून २४०० वेळा   सेलफोनला स्पर्श करतो. माणसं काम करत असताना, प्रवासात, बाथरूममधे, डॉक्टरच्या बाकावर, हॉस्पिटलमधे, सेक्स आटोपल्यावर निर्माण होणाऱ्या काही सेकंदांच्या उसंतीत, शाळा कॉलेजच्या वर्गात, फेसबुक, व्हॉट्सएपवर असतात. इलाजच नाही म्हणून झोपतात. इलाजच नाही म्हणून तेवढ्यापुरती पोटापाण्याची कामं करतात.

अमेरिकन माणसांचा अटेंशन स्पॅन कमी झालाय. पुस्तकं वाचणं, गंभीर चर्चा करणं,  संदर्भ यासाठी त्यांच्याकडं वेळ नाहीये. टीव्हीवरचा प्रचार पाहून माणसं मतं तयार करतात.

मुबारक नालायक होते,भ्रष्ट होते हे तर खरंच.  लोकांचा तसा अनुभव असल्यानं सोशल मीडियातल्या माहितीमुळं  लोक रस्त्यावर गोळा झाले. त्यांनी मुबारकना सत्तेतून घालवलं.  मुबारक यांना घालवल्यावर येणारं सरकार कसं असेल, पर्यायी धोरणं कशी असतील, सरकार आणि अर्थव्यवस्था कशी चालेल याचा विचार रस्त्यावर गोळा झालेल्या लोकांनी केला नव्हता.  सोशल मिडियातले चार ओळींचे संदेश येवढंच ज्ञान त्या लोकांकडं होतं. वाचन, विचार, चर्चा, भावना दूर सारून निर्णय इत्यादी गोष्टींची सवय इजिप्तमधल्या लोकांमधे शिल्लक नव्हती.  हटाव या भावनात्मक आणि त्या वेळी योग्य असलेल्या मागणीभोवती करोडो लोक गोळा झाले. यथावकाश आंदोलन विरलं आणि मुबारक व त्यांचे लष्करी साथीदार पुन्हा सत्तापन्न झाले.

सोशल मिडिया अटळ आहे. सोशल मिडियाच्या मर्यादा आहेत. लोकांना गोळा करणं,  उत्तेजित करणं या माध्यमाला जमतं.   लोकांना विचार करायला लावणं या माध्यमातून शक्य होत नाही. समतोल, सर्व बाजूनी विचार करण्यासाठी इतर रुपाची माध्यमं वापरायला हवीत. सोशल मिडियात एकादी बातमी पसरली तर ती खरी आहे की खोटी, तिचा तपशील आणि संदर्भ तपासण्याची सोय आणि सवय असायला हवी. त्यासाठी समाजात गंभीर विचार करणारी वर्तमानपत्रं, नियतकालिकं, गंभीर वाहिन्या असायला हव्यात. अशी जोड मिळाली तरच सोशल मिडियाचा उथळपणा घातक होत नाही. अन्यथा अविचारी, दुष्ट, अज्ञानी, विकृत, स्वार्थानं प्रेरित, केवळ मौजमजा करणारी इत्यादी माणसं या माध्यमांचा वापर करू शकतात, करतात.

राजकीय पक्ष  सोशल मिडियाचा वापर करून लोकांना भुलवतात, भरकटवतात आणि स्वार्थ साधतात; विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता, इतरांचा आदर, इतरांसोबत नांदणं ही लोकशाहीची मूळ वैशिष्ट्यं  पायदळी तुडवतात, समाजाला समजावणं आणि शिकवणं याकडं  दुर्लक्ष करतात.

भारतात इंटरनेटचा वापर मर्यादित आहे. कंप्यूटर आणि लॅपटॉपचा उपयोग करणारी माणसं मर्यादित आहेत. अलीकडं सेल फोननं लोकांच्या नजरेचा आणि मेंदूचा ताबा घेतला आहे. सेलफोनचा वापर कामासाठी कमी,  रंजन-आंबटशोक यासाठी जास्त होतो. निवडणुकीत या वर्तणुकीचा वापर करून संदेशांचा प्रसार केला जातो. जाहीर सभा आणि अफवा हे माध्यम भारतात विकृत प्रचारासाठी वापरलं जातं. या दोन्ही पद्धतीनं लोकांमधे भ्रम पसरवला जातो. सरकार कोसळवण्यासाठी किंवा आणण्यासाठी संदर्भहीन, खोटे संदेश वारेमाप पसरवणं ही पद्धत लोकांचं लक्ष वेधून त्यांना मतदानापर्यंत गुंग ठेवण्भायासाठी भारतात वापरली जाते.

विचार करण्याइतपत वेळ बहुसंख्य सामान्य माणसांना नाही. तशी सवय भारतीय समाजात विकसित झालेली नाही.

२०१४ सालची निवडणुक केवळ एका माणसाभोवती फिरवण्यात आली, मोंदींभोवती. तिकडे ट्रंप इकडे मोदी. कार्यक्रम, व्यवस्थात्मक तरतुदी इत्यादी चर्चा नाही. एक माणूस.  देशातल्या सर्व प्रश्नांवर मोदी हे एकच उत्तर आहे असं प्रचंड पैसा वापरून लोकांच्या मनावर ठसवण्यात आलं.  गुजरातची आर्थिक घडी मोदींच्या कारकीर्दीत बसली होती, गुजरातची स्थिती इतर काही राज्यांच्या तुलनेत चांगली होती,   इतर काही  राज्यांच्या तुलनेत ती कमीही होती. सामाजिक कल्याण या कसोटीवर गुजरात बरंच मागं होतं. परंतू  मोदी आणि गुजरात म्हणजे काही तरी अद्भुत घडलंय अशा  प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला. भाजप विरोधक मुसलमानांचं लांगूलचालन करतात, हिंदूवर अन्याय करतात, देशद्रोही आहेत असा प्रचार झाला. मोदींच्या प्रचार मोहिमेत अनंत गोष्टी संदर्भहीन होत्या, उथळ होत्या, चुनावी जुमले होते. भाजप, काँग्रेस या पक्षांचे कार्यक्रम, त्यांच्या संघटना, त्याचे विचार, त्यांचा इतिहास, इत्यादी गोष्टीं प्रचार मोहिमेत चर्चिल्या गेल्या नाहीत. सारा मामला बहुतांशी मनोरंजनात्मक, भावनात्मक होता.

लोक काँग्रेसला कंटाळले होते, लोकांना बदल हवा होता. या वास्तवाशी मोदी प्रचाराची जोडी जमली.

१९७७ च्या निवडणुकीत जयप्रकाश नारायण आणि विरोधकांनी काँग्रेस विरोधाचा  धुरळा उडवला होता. जनता पक्ष धड अस्तित्वातही नव्हता त्यामुळं तो  लोकांचं भलं कसं करणार आहे ते कळायला मार्ग नव्हता. पण लोकांना काँग्रेसची सत्ता नको होती. जनता पक्ष म्हणजे काय याचा विचार न करता लोकांनी जनता पक्षाला भरघोस मतं दिली. त्यानंतर काय झालं तो आता इतिहास झाला आहे.

मोदी यांच्या कारकीर्दीचं मूल्यमापन व्हायला वेळ लागेल. मोंदींची कारकीर्द काँग्रेसपेक्षा काही मुद्द्यांवर चांगली ठरेलही. ट्रंपनी राज्यावर आल्यावर काहीही म्हणजे काहीही केलं नाही, फक्त ट्वीट्स केले. तरीही अमेरिकेची अर्थव्यवस्था ठीक चाललीय, कारण अमेरिकेतली अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे चालते. नोटबंदी आणि जीएसटी हे वादग्रस्त उद्योग होऊनही वर्षभरानं भारताची अर्थव्यवस्था सावरेल, स्वतंत्र कारणांसाठी.

पण मुद्दा तो नाही. जगाची बदललेली स्थिती, नवं तंत्रज्ञान, सोशल मिडियाची शक्ती, माणसांची समतोल विचारांची क्षमता क्षीण होणं, बहुसंख्य लोकांनी फार विचार न करता निर्णय घेणं  हा मुद्दा आहे. समाजात झालेल्या या बदलांमुळं लोकशाहीचा पैस आकुंचित होतोय हा मुद्दा आहे.

माणसांना दररोजच्या जगण्याच्या धबडग्यात गुंतलेले असल्यानं  विचार करायला, अभ्यास करायला वेळ मिळत नाही. ही स्थिती १९४७ साली , १९७७ साली होती,  २०१७ सालीही आहे. माध्यमात झालेल्या क्रांतीकारक आणि प्रभावी बदलामुळं  विचारांच्या भानगडीत न पडणारी माणसं उथळ  प्रचारानं प्रभावित होऊन समाज घडवणाऱ्या प्रक्रियांमधे भाग घेत आहेत ही स्थिती चिंताजनक आहे.

।।

 

एका राजपुत्राचं लग्न

एका राजपुत्राचं लग्न

राजपुत्र हॅरीचा क्रमांक आहे पाच. जेव्हां केव्हां सिंहासन मोकळं होईल तेव्हां आधी राजपुत्र चार्ल्सचा (हॅरीचा पिता) क्रमांक पहिला. कारण ते राणीचे सर्वात मोठे पुत्र. त्यांच्यानंतर त्यांचे मोठे पुत्र विल्यम्स (हॅरीचा मोठा भाऊ) यांचा नंबर. त्यानंतर विल्यम्स यांच्या मुलाचा (हॅरीचा पुतण्या) नंबर. विल्यम्सना एक मुलगीही (हॅरीची पुतणी) आहे. तिचाही राणी म्हणून नंबर लागू शकतो, पण आधी क्रमांक तिच्या भावाचा कारण ब्रिटीश परंपरेनुसार आधी अधिकार पुरुषाचा व नंतर स्त्रीचा.त्यानंतर पाचवा क्रमांक आहे राजपुत्र हॅरी याचा. विल्यम्स यांची पत्नी सध्या गरोदर आहे, बाळंत झाल्यानंतर त्यांना आणखी एक मूल होईल.  त्याचा नंबर पाचवा झाला की हॅरीचा नंबर सहावा होईल. ब्रीटनला  परंपरा आवडतात.

तर अशा हॅरीचं लग्न ठरलंय, म्हणजे त्यानंच ठरवलंय. लग्न ठरवण्याची राजघराण्याची परंपरा अशी की राणी सोयरीक ठरवते. म्हणजे तोलामोलाची एकाद्या देशाची राजकन्या राणी शोधतात. सध्या ब्रुनेई आणि जॉर्डनमधे राजेशाही आहे. पण तिथले राजे मुसलमान आहेत. आफ्रिकेत काही राजे आहेत, पण ते काळे आहेत. रहाता रहातो स्पेन किवा न्यू झीलंडचा राजा. म्हणजे निवड करायला अगदीच कमी वाव.  पण अलीकडं भानगड अशी आहे की राजपुत्र राणीला, राजाला विचारतच नाहीत. ते आपल्या प्रिय व्यक्तीला निवडतात.  राजपुत्र कोणातरी मुलीच्या प्रेमात आहेत, तशी कुणकुण त्यांना लागलेली असते. पण राजपुत्र एकदम जाहीर करून टाकतात की अमूक एक मुलगी निवडलीय. हॅरीनंही तेच केलं. कॅलिफोर्नियातल्या एका आफ्रिकन लोकांच्या वस्तीतल्या, टोळी हिंसेसासाठी प्रसिद्ध असलेल्या उपनगरातल्या एका मुलीशी आपण लग्न करणार आहोत असं हॅरीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. एक मोठी दृश्य मुलाखत त्यानं दिली. परस्पर. राणी एजिझाबेथ, राजपुत्र चार्ल्स यांनी आनंद व्यक्त केला. बस. तेवढंच त्यांच्या हाती होतं.

वधू आहे मेगन मर्कल. तिची आई आफ्रिकन आणि वडील गोरे फ्रेंच. मेगन आफ्रिकन दिसते. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि आई गोरी अमेरिकन. ओबामा काळे दिसतात. मेगन टीव्ही मालिकांत अभिनय करते. मेगन तिच्या आईसोबत रहाते, तिच्या वडिलांचा घटस्फोट झाल्यापासून. खुद्द मेगनचाही एक घटस्फोट झाला आहे. मेगन चार पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी बोटस्वानामधे गेली असताना तिची हॅरीशी भेट झाली आणि दोघांनी डेटिंग सुरु केलं.

आधीच ब्रीटन, त्यातून राजघराणं, त्यामुळं पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीचं स्थान आणि पायरी पाहून त्या व्यक्तीशी कसं वागायचं ते ठरवलं जातं. वरच्या पायरीवरच्या माणसाकडं आदरानं पाहिलं जातं, अर्धी पायरी खाली असलेलीही व्यक्ती असली तर खडुस तोडांनं तिच्याकडं पाहिलं जातं. पायरीनुसार पद आणि किताब.वधू राजघराण्यातली तर नाहीच, उलट अगदीच सामान्य घराण्यातली काळी मुलगी आहे. ती चर्च ऑफ इंग्लंडची सदस्य नाही. ती तोलामोची असती तर तिला प्रिन्सेस म्हणजे राजकन्या असा किताब मिळाला असता. तिला बहुदा कुठली तरी डचेस करण्यात येईल पण रॉयल हायनेस असं संबोधलं जाईल.

हॅरीचे वडील राजपुत्र चार्ल्स यांनी डायनाशी लग्न केलं होतं. राजपुत्र चार्ल्सचे कॅमिला पार्कर या अमेरिकन स्त्रीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं डायनाशी त्यांनी तणावातच संसार केला.

हॅरीची आज्जी म्हणजे राणी एलिझाबेथही खरं म्हणजे राणी होण्यातली नव्हती. तिचा काका हा राजाचा मोठा मुलगा असल्यानं राजे होणार होते.  त्यांना एका घटस्फोट होऊ घातलेल्या ब्रिटीश नसलेल्या स्त्रीशी लग्न करायचं होतं. तत्कालीन राजघराणं, लोकसभा, सरकार, चर्च ऑफ इंग्लंड यांच्या मते ते परंपरेत बसत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या डोक्यावरचा राजमुकूट काढून घेण्यात आला आणि तो एलिझाबेथच्या वडिलांच्या डोक्यावर ठेवण्यात आला. एलिझाबेथना भाऊ नसल्यानं त्या राणी झाल्या.

एलिझाबेथचं वैवाहिक जीवन तणावाचंच होतं. कारण त्यांचे पती फिलिप्स माउंटबॅटन ( भारताचे शेवटले व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटन होते, ते वेगळे)  तोलामोलाच्या राजघराण्यातले नव्हते, त्यांचे पूर्वज ब्रिटीश नव्हते. आपल्याला नवरा म्हणून वावरता येत नाही राणीचा प्रजाजन म्हणून वावरावं लागतं ही खंत एलिझाबेथचे पती सतत बाळगत आले आहेत.

हॅरी १२ वर्षाचे असताना डायनांचा अपघाती मृत्यू झाला. वडील चार्ल्स आणि आई डायनांच्या संबंधांवर जाहीर चर्चा झाल्या. राजघराण्यानं त्या साऱ्यावर पांघरूण घातलं तरी सगळ्या गोष्टी समाजासमोर आल्या. आज्जी, वडील यांच्या संसारातले तणाव हॅरीनं पाहिले असल्यानं त्याचं बालपण कोळपलं होतं.

ओठ घट्ट दाबून जगायचं ही राजघराण्याची परंपरा असल्यानं हॅरी गप्प होता, आतून धुमसत होता. जितकं जमेल तितकं तो बकिंगहॅम राजवाड्यापासून दूर रहात असे. दारूच्या नशेत स्वतःला बुडवत असे. राजपुत्र असूनही तो पायलट झाला आणि सामान्य सैनिकाप्रमाणं अफगाणिस्तानातल्या लढाईत उतरला.

एलिझाबेथचे पती म्हणजे हॅरीचे आजोबा यांना पायलट व्हायचं होतं. पण विमान उडवतांना अपघात होऊ शकतो या कारणास्तव ब्रिटीश सरकारनं, पंतप्रधान चर्चिल यांनी पायलट होण्याला कडक विरोध केला. त्यावरून एलिझाबेथ आणि पती यांच्यात प्रचंड तणाव होते आणि ते राजघराण्यातली माणसं पहात होती. एलिझाबेथ यांची बहीण, राजकन्या अँन याही परंपरा झुगारून एका सामान्य हवाई दलातल्या घटस्फोटित अधिकाऱ्याबरोबर संबंध ठेवून होत्या.

डायना आणि तिची दोन्ही मुलं यांच्यात फार जिव्हाळा होता. पोरांचा बापावर रागच होता.  आईच्या अपघाती मृत्यूतून मुलं सावरली नाहीत. मोठा विल्यम त्या मानानं सावरला. त्यानं राजघराण्याचा चेहरा सांभाळला आणि हॅरीला सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरीला मानसीक उपचार करून घेण्यासाठी त्यानं राजी केलं. त्याचा बोभाटा झाला. राजपुत्र आणि मनोरोगी म्हणजे वृत्तपत्रांना प्रचंड खाऊ. हॅरीचा एक खापर खापर पणजोबा राजा  मनोरोगी झाला होता. राणी, राजपुत्र यांना सत्ता हवी होती, त्या साठमारीचा परिणाम म्हणून राजा मनोरोगी झाला होता.

राजा असो की राजपुत्र. शेवटी ती माणसंच तर असतात. आपल्या आईला बापानं वाईट वागवलं हा सल हॅरीला दूर करता आला नाही. लग्नात वधूच्या बोटात घालण्यासाठी तयार केलेल्या अंगठीमधे हॅरीनं डायनाच्या दागिन्यातले हिरे वापरले आहेत. आपली आई सदैव आपल्यासोबत असावी असं वाटलं म्हणून ते हिरे अंगठीत घातलेत असं त्यानं पत्रकार परिषदेत त्यानं सांगून. बापाची नव्हे, आईची आठवण.

वधू मेगन मर्कल ही थेट सामान्य कर्तृत्ववान स्त्री आहे. संघर्ष करत करत तिनं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. माध्यमांतले जाणकार तिच्या सूट या मालिकेतल्या भूमिकेचं कौतुक करतात. आपल्याला आवडलेल्या एका माणसाशी आपण लग्न करतोय अशा अगदीच मानवी मनस्थितीत त्या आहेत, त्यांना नवल वाटतंय, आनंद होतोय. हॅरीपेक्षा आपण तीन वर्षानी मोठे आहोत याचं त्यांना काही वाटत नाही. प्रेमात पडल्यावर कसलं वय अन् कसलं काय.

मेगन रीतसर आपल्या आजेसासूला भेटायला लंडनला गेली. राणी एलिझाबेथची पहिली भेट झाली तेव्हां राणीसोबत दोन कॉर्गी कुत्री होती. राणीची फार आवडती, राणीसोबत सतत वावरणारी. ही कुत्री फार तिखट आहेत. परकी कोणी आलं की भूंकून, अंगावर धावून हैराण करतात. हॅरीशी त्यांची कधीच दोस्ती होऊ शकलेली नाही. पण मेगनशी मात्र त्या दोघांची दोस्ती झाली, दोघंही मेगनच्या भोवती घोटाळत राहिले. एलिझाबेथ आतून सुखावल्या असतील. कदाचित.

एलिझाबेथ ९१ वर्षाच्या आहेत. १९५२ पासून त्यांनी राजवाडा आणि ब्रिटीश समाज अनुभवला आहे. आई, काका, काकू, आज्जी, बहीण, पंतप्रधान, नोकरशाही यांच्यातले तणाव एलिझाबेथनी अगदी बालपणात असल्यापासून अनुभवले आहेत. एलिझाबेथ यांचं व्यक्तिगत जीवन स्वच्छ आणि संथ आहे पण त्यांचा सभोवताल मात्र गढूळ आहे. राजघराण्यात एकेकाळी एक “ कुरूप, काळी “ राणी आली होती आणि त्यातून काय घोटाळे झाले होते हे एलिझाबेथना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं आहे. एकेकाळी   राजाआजोबाच्या राजाआजोबाच्या राजाआजोबानं  एका लंडनमधल्या अभिनेत्रीशी शरीरसंबंध ठेवले होते,  त्यातून मुलंही झाली होती हा इतिहासही एलिझाबेथच्या शिक्षकानं त्यांना सांगितला आहे.

हे सारं डोळ्यासमोर तरळत असताना हॅरी त्याच्या अमेरिकन काळ्या पत्नीला घेऊन समोर बसला होता. एलिझाबेथना काय वाटलं असेल? आज्जीबद्दल हॅरीला ममत्व आहे की नाही? एलिझाबेथनी कधीही कशाचीही वाच्यता केली नाही. चर्चिल आणि एलिझाबेथ यांच्यात संघर्ष असतानाही त्या कधी बोलल्या नाहीत. त्यामुळं हॅरी आणि त्याचं लग्न या बद्दल काय वाटतंय ते एलिझाबेथ बोलणार नाहीत. पण एक नक्की घडलं असेल  ते सॉलिड हृद्य आणि नाट्यमय असणार.

तर असा हॅरी, त्याची मैत्रीण मेगन,  मे महिन्यात लग्न करणार आहेत. कधी काळी फोटोग्राफीचा शोध लागला तेव्हां तत्कालीन  राजानं लग्नप्रसंगाचे फोटो काढले होते आणि त्यात त्या काळाच्या फॅशननुसार राणीनं राजाच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला होता. त्यावर ब्रिटीश माणसं आणि राजघराणं जाम खवळलं होतं. आता हॅरी आणि मेगन एकमेकाच्या कंबरेभोवती हात लपेटून फिरतांना काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. पण आता जनता खवळलेली नाही. जनतेला मजा येतेय. जनतेला हा राजपुत्र आपल्यातला वाटतोय. तो पोरकटपणे वागला, त्यानं दारू पिऊन धमाल  उडवली हे लोकांना माहित असलं तरीही हॅरीबद्दल जनतेला आपलेपणा वाटतोय. लोक त्याला समजून घेताहेत. लोकांना तो आपल्यातला वाटतोय.

राजघराणं असावं की नाही, थाटामाटात लग्न करावं की नाही यावर विचारवंत मंडळी   चर्चा घुसळत आहेत.   ब्रिटीश जनता म्हणतेय की सध्याच्या बिकट आर्थिक राजकीय स्थितीत राजपुत्राचं लगीन हा एक छान विरंगुळा आहे. कम ऑन, लेट अस एंजॉय असं ब्रिटीश माणसं म्हणत आहेत.

।।

 

दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया हा एक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

चित्रपटात क्रियाकर्म करणाऱ्या दोन ब्राह्मणांमधली स्पर्धा असं एक कथानक आहे.  क्रियाकर्म करणारे ब्राह्मण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळतात असं आणखी एक कथानक आहे. कर्मकांडं, कर्मकांडांचा फोलपणा, अन्याय,त्याचं धर्माशी असलेलं नातं हे तिसरं कथानक. भान्या नामक एक खटाटोपी मुलगा हे चौथं कथानक. नाना धंदे करून हा मुलगा पैसे कमवतो, तो वात्रट असतो, तो त्याच्या वागण्यानं वरील चारही तीन्ही उपकथानकांमधल्या दोषांवर बोट ठेवतो.

दिग्दर्शकाला चार अत्यंत नाट्यमय घटक एकत्र आणून त्यातून एक सलग जैविक कथानक तयार करणं जमलेलं नाही. चित्रपटातलं प्रत्येक उपकथानक एकेक स्वतंत्र चित्रपट व्हावा इतकं सणसणीत आहे.

२०१६ साली मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चिली या देशातून आलेली स्पॅनिश भाषेतली फिल्म प्रदर्शित झाली.  पाच सहा पादरी, एक स्त्री धर्मोपदेश एका घरात कोंबलेले असतात. त्यांनी गुन्हे केलेले असतात. बोभाटा होऊ नये म्हणून या गुन्हेगारांना चर्चनं दूरवरच्या एका घरात ठेवलेलं असतं. ही माणसं उघडी पडू नयेत म्हणून त्यांना दिवसाढवळ्या बाहेर पडायला परवानगी नसते. सूर्य उगवायच्या आधी आणि सूर्य मावळल्यानंतर वावरायचं.  घटना घराच्या चार भिंतीतच घडतात. थरारक प्रसंगांना अगदीच कमी वाव. बरचसं कथानक संवादांमधून आकार घेतं.  लहानपणी बलात्काराचा बळी झालेला एक मध्यम वयीन माणूस घराच्या बाहेर येऊन किंचाळत न्याय मागत असतो. प्रेक्षक हादरतो.

क्लब या चित्रपटातलं प्रत्येक माणूस आणि त्याचे गुन्हे हे एकेक स्वतंत्र कथानक होतं. अत्यंत नाट्यमय.  चर्च हे आणखी एक महाकथानक. तेही नाट्यमय. अनेक तुकडे. दिद्गदर्शकानं कौशल्यानं त्या घटकांमधून एक सलग कथानक तयार केलं. चांगली पटकथा होती म्हणून ते जमलं.

चांगली पटकथा कशी असावी याचा फॉर्म्युला नसतो. चांगली पटकथा आणि दिद्गर्शन या गोष्टी सिनेशाळेत शिकून घडत नसतात. पण जमलेला सिनेमा पटकन कळतो. क्लब हा सिनेमा पटकन कळला, प्रेक्षकावर ठसला. दशक्रिया तसा ठसत नाही.

जे कथेचं तेच पात्रांचं. दोन किरवंत ब्राह्मण. एक सावकार. नदीवर प्रेताची राख गाळून पैसे मिळवणारा मुलगा. डोकी भादरणारा न्हावी. बटबटीत जाड स्ट्रोक्सनी काढलेली चित्रं. ही माणसं, त्यांची घरं,त्यांचे व्यवहार तुटक तुटक रीतीनं दिसतात, ती माणसं समजत नाहीत. त्यांच्या घरांचे तपशील पडद्यावर दिसत नाही. भांडी हवीत, ही घ्या भांडी. कोरी करकरीत. भाकऱ्या हव्यात, ही घ्या चूल आणि तवा. दारू पिण्यासाठी जागा हवी. हे घ्या टेबल आणि बाक. दारूच्या दुकानाच्या पाटीवर कुठल्याही दुकानाच्या पाटीवर असतो तसा  रजिस्ट्रेशन नंबर नाही.  सराफाचं दुकान हवंय. हे घ्या एक कपाट आणि त्यात ठेवलेले चार दागिने. गावात एक मयत झालंय, ही घ्या तिरडी आणि भेकणारी चार माणसं. कायम दारु पिऊन पडणारा एक माणूस अचानक छान पेटी वाजवतांना दिसतो. एक दुसरा दारुडा अचानक तबला वाजवू लागतो. त्याचे खांदे हलवणं आणि ताल याचा  संबंध नसतो.एका किरवंताबरोबर एक बाऊन्सर असतो. टीशर्ट, पायजमा. तो लोकांना मारायचा उद्योग करत असतो. थेट बाहुबली किवा सलमान सारखा. पैठणात हा माणूस कसा आला. अशानं  चित्रपट उभा रहात नाही.

चित्रपट गंभीर आहे की विनोदाच्या अंगानं गंभीर गोष्टी मांडणारा आहे? दशक्रिया चित्रपटात यजमानांना बोलावणं, त्यांच्याशी होणारा संवाद, ब्राह्मणांमधले आपसातले संवाद अशी कित्येक दृश्यं प्रेक्षागृहात हशा पिकवतात. पण त्या दृश्याचं पार्श्वसंगित मात्रं प्रचंड गंभीर आणि दुःखपोषक. चित्रपटाची हाताळणी घोटाळ्यात टाकते.

पैठणच्या खेड्यातली माणसं गंभीर तात्विक विवेचन केल्यासारखं बोलतात. छोटा भान्याही.

चित्रपटात गाणं असायलाच हवं हे कोणी ठरवलं? कधी काळी तो एक फॉर्म्युला होता. अजूनही भारतीय चित्रपटात गाणी असावीत असं जनता म्हणते.  गाण्याला योग्य  जागा हवी आणि गाणी पहाण्याऐकण्यासारखी हवीत. तेंडुलकरांच्या घाशीराममधे एका रांगेत उभे राहून ब्राह्मण गाणं म्हणतात. एक तर ते नाटक होतं. दुसरं म्हणजे नाटकाचा बाज असा होता की त्यात संगीत आणि नृत्याचे नाना प्रकार अंगभूत होते. गाणी, गाणारे, नाचणारे, कोरियोग्राफी, सारं काही कसलेलं होतं. दशक्रियेतला घाटावरचा नाच सिनेमातला नव्हता,  दर्जाला कमी पडला. गाण्यातल्या  प्रेक्षकांतले लोक शाळेत शारीरीक शिक्षणाच्या वर्गासारखे रांगा करून कां बसतात? शिस्तीत  एकाच प्रकारे डोलून नाचात कां भाग घेतात?

चित्रपटातली प्रमुख पात्रं चित्रपट, टीव्ही या क्षेत्रात वावरणारी आहेत. ती काम उरकल्यागत अभिनय करतात. भारतीय सिनेमात अनंत नट नट्या स्वतःचा एक साचा घेऊन वावरत असतात, त्यांच्या प्रसिद्धपणाला  दिद्गर्शक शरण गेलेला असतो. बरेच वेळा अमिताभ बच्चन हा दांडगा नट कॅमेऱ्यासमोर आला की दिद्गर्शक भारावतो, बच्चन यांना त्यांच्या मनास वाटेल ते करायला परवानगी देतो.  पण पिकू आणि पिंक या चित्रपटातल्या बच्चन यांच्या भूमिका पहा. दिद्गर्शकाला नटाकडून काय काढून घ्यायचंय ते बरोब्बर माहित होतं. त्यानं बच्चनांच्या अभिनय कौशल्याला आपल्या डोक्यातल्या पात्रासासारखं वागायचं वळण लावलं.

अलिकडं चित्रपटात अगदी दहा पंधरा सेकंदासाठी दिसणारं पात्रंही नीट वठवणारे कलाकार निवडले जातात. दशक्रियामधे कलाकार निवडतांना काळजी घ्यायला हवी होती.

नाटक या कलाप्रकाराच्या अंगभूत मर्यादांमुळं हालचाली रेखीव करणं, संवाद वरच्या पट्टीत फेकणं इत्यादी गोष्टी आवश्यक ठरतात. सिनेमात कॅमेरा असतो, मायक्रोफोन असतो, नाटकाच्या मर्यादा सिनेमावर नसतात. दशक्रिया  पहाताना आपण नाटक पहातोय असा भास अनेक वेळा होतो. मराठी चित्रपटांबाबत ते नेहमीच घडतांना दिसतं. मराठी चित्रपट आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांत नाटकांचा प्रभाव दिसतो, त्यांना अजून चित्रपट माध्यम पुरेसं समजलेलं नाही असं वाटतं. पात्रं कॅमेऱ्यात पाहून बोलतात, वावरतात. संवादफेकही वरच्या आवाजात, नाटकातल्यासारखी असते.दशक्रियामधे माणसं कॅमेऱ्याला सामोरं जात रांगेत उभी रहातात.

जगात कोणतीही गोष्ट एका सरळ रेषेत नसते, अनेक दिशा, अनेक रेषा, अनेक पदर असतात. ते पदर, त्या रेषा यांतून एक जैविक कथन गुंफावं लागतं. ते फार कष्टाचं असतं. अनंत गुंते एकादा कवी एकाच शब्दात किंवा एकाच ओळीत आणतो तेव्हां कवीला कित्येक महिने-वर्षं त्यावर खर्च करावी लागत असतात. अरूण कोलटकर यांच्या असंख्य कविता एकादा शब्द पक्का न झाल्यानं अप्रकाशित राहिल्या. सिनेमात तर शेकडो दृश्यं, शेकडो सेकंदांची दृश्यं, शेकडो सेकंदांचे संवाद आणि ध्वनी गुंफायचे असतात. दहा सेकंदांचं दृश्य पुढे मागं झालं, अनावश्यक ठरलं, कळलं नाही तरी घोटाळा होतो. दशक्रिया चित्रपट अधिक घट्ट विणला जायला हवा होता. पात्रं आणि घटना ढिगासारखी एकत्र केल्यागत वाटतात.

दशक्रियाच्या कथानकात दणदणीत चित्रपटाची क्षमता आहे, अधिक चांगला चित्रपट त्यातून होऊ शकला असता.

चित्रपटावर जातीच्या मुद्द्यावर वाद चाललाय. सैराट एक चांगला चित्रपट आहे. त्यावरही विनाकारण जातीच्या मुद्द्यावर चर्चा झाली.वाद घालणारी माणसं जाणकार दिसत नाहीत, टाईमपास दिसतात. माध्यमं आणि राजकीय पुढारीही नको त्या गोष्टीसाठी या वादात पडतात. दिद्गर्शकानं त्याच्या परीनं चित्रपट हाताळला आहे. दिग्दर्शकाला काही म्हणायचं आहे. ते भले त्याला जमलं नसेल पण  ते म्हणण्याचा त्याचा अधिकार शाबूत ठेवायला हवा. झुंडशाही होता कामा नये.

कला आणि निर्मिती हे राजकारण आणि झुंडींचे प्रांत नव्हेत.

या निमित्तानं चांगले चित्रपट, चांगली निर्मिती कशी असले यावर विचार विनिमय व्हायला हवा. लोकांनी भरपूर चित्रपट पहायला हवेत, मोकळेणानं, मोकळेपणानं आस्वाद घ्यायला हवा. या प्रक्रीयेतून चांगले सिनेमे, चांगल्या कलाकृती घडतील.

दशक्रिया  आवडला नसेल तर कारणं सांगत तसं म्हणायला हवं. त्यात सुधारणा व्हाव्याशा वाटल्या तर तेही सांगायला हवं. तो  आवडला असेल तर तेही  प्रामाणिकपणे (जाहिरातबाजीचा भाग म्हणून किंवा भाबड्याभोळसटपणानं नव्हे) सांगायला हवं.

त्यासाठी अर्थातच दशक्रिया पहायलाही हवा.

।।

 

 

 

 

 

 

 

दुर्गा, न्यूड, धर्म, सामान्य माणसं इत्यादी इत्यादी

दुर्गा, न्यूड, धर्म, सामान्य माणसं इत्यादी इत्यादी

khupach chaan uttar dilat ,hya ashya mansanni he desh tyanna surkshit vatat nasel tar desh sodun jave, vyakti swatantrya mhanje ekach dharmavar tika karne mhanje tumhi saral saral tyaa dharmacha anadar kartay, himmat asel tar itar dharma baddal hi kahi liha te nahi honar tumchyat , dr. baba saheb ambedkar he hindu kivva bramhan virodhi navhate. pan aaj kahi tumchya sarkhe mathe firu ahet je fakt hindu dharmchi cheshta karta , hya varun tumcha hindu dwesh disun yetoy . mag aata kay ” nilu damle BABA “je sagtil to hindu dharm ka . he maz dukkh mi vyakt kel .

संतोष घाणेकर.

।।

मी सांगतो तोच हिंदू धर्म असं मी म्हणत नाही. तसंच इतरांनीही म्हणू नये. विशेषतः राजकारणी लोकांनी. मुसलमान म्हणतात की त्यांच्या धर्माबद्दल कोणी बोलवायचं नाही, ते मात्र इतर धर्मांबद्दल बोलणार. हिंदू म्हणतात की हिंदू नसलेल्यांनी किंवा विशिष्ट गटाचा हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांनी सोडता इतरांनी हिंदू धर्माबद्दल बोलायचं नाही, ते मात्र इतर धर्माबद्दल बोलणार.मी कोण आणि मी कशासाठी जगतो या प्रश्नानं धर्माची सुरवात होत असते. हे प्रश्न विचारून धर्माची सुरवात होते आणि ते प्रश्न विचारायला बंदी घालून धर्म संपतो.धार्मिक, धर्मप्रेमी, धर्मवीर, धर्मद्वेष्टा इत्यादी लेबलं फार स्वस्त आहेत, बाजारात ती जवळजवळ फुकटच मिळतात. विचारवंत, बुद्धीजीवी इत्यादी लेबलंही बाजारात आहेत. तीही खूप दुकानांत मिळतात. लेबलांचाच वापर करायचं ठरवलं तोटा नाहीये.

निळू दामले

।।

‘भाजप’ पक्ष्याच्या कामगिरीवर ८८% जनता खूष असल्याची बातमी कालच लोकसत्ता दैनिकात वाचनात आली व ते सर्वेक्षण अमेरिकेतील अर्थव्यवस्था विभागातील एका प्रतिष्टीत कंपनीने केले आहे. भारतात न्यायव्यवस्था पोलिसांकडून राबवण्यात येते (म्हणजे आक्षेपार्ह प्रकरणाबद्दल दंड, शिक्षा, चूकभूल इत्यादी ते ठरवतात). ज्यांना हे पसंत नाही, त्यांनी “देश सोडून इतरत्र जावे”, असे रोखठोक उत्तर सामान्य प्रजेपासून देशाचे राष्ट्रपती ऐकवत असतात. मनोहर पर्रीकर त्यांच्या लहानपणीच (वय १०-१२) स्वतःच्या बंधूंच्यासमवेत ‘आक्षेपार्ह सिनिमे’ (प्रौढांसाठीचे) आईच्या नकळत सिनेगृहात पाहत असतांना त्यांच्या शेजाऱयांनीच पकडले होते -असे अभिमानाने विद्यार्थ्यांपुढील भाषणात ऐकवतात (तीन दिवसांपूर्वी लोकसत्तेतच बातमी) आणि आज मात्र लोकांच्या भावना दुखावू नयेत -म्हणून ‘न्यूड’ सारख्या चित्रपटास गोव्यातील चित्रपट महोत्सवात बंदी केलेली असल्याचे सांगतात (अपूर्ण असल्याचे कारण देऊन). अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे याच मालिकेत मोडतात -लोकांना पसंत आहे आणि जगभर निळूभाऊंसारख्या आठ-दहा टक्के विचारवंतांना कुणीही जुमानत नाही. भारतात विरोधकांचे मोर्चे निघतील, उपोषणे सुध्दा घडतील परंतु पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे आहे. निर्णय घेणे प्रजेकडे नसते व तो सत्ताधारी (आणि पोलीस घेतात) व त्यांना प्रजेनेच निवडून आणलेले आहे. आपण आपले जेवणखाण आणि डोक्यावरील छप्पर सुरक्षित आहे नां -त्याची खात्री करून गप्प बसावे. एरवी लेख चिंतन करण्यासाठी लग्नातील पंक्तीत ‘मिष्टान्न’ असल्यासारखे समजावे.

हेमंत कुलकर्णी

।।

विचारवंतांना जनता जुमानत नाही असं नसतं. विचारवंत जे सांगतात ते लोकांना अडचणीचं वाटतं ते जुमानायला लोकं तयार नसतात. जेव्हां विचारवंत लोकरहाटीवर शिक्का मारतात तेव्हां लोकं खुष असतात. सामान्यतः लोकांना संथपणे नौकानयन करायचं असतं. समुद्रात खळबळ झाली, वारं वेगानं वाहिलं तर बोटीतली माणसं अस्वस्थ होतात. समुद्र खवळलाय, नीटपणे सुकाणू धरा, समुद्रप्रवाह आणी वाऱ्याच्या वेगाकडं लक्ष द्या इत्यादी अभ्यास करण्यासारख्या गोष्टी सांगितल्या की बोटीतले लोक वैतागतात. कोणी तरी एकादा महापुरुष, एकादा संत, एकादा पिता, एकादा देव, एकादा अवतार, एकादा मंत्र, एकादं स्तोत्र, एकादी आरती इत्यादीमुळं जर चिंता आणि अडचणी दूर होताहेत असं वाटलं तर लोक त्यावर आपली मान टेकवतात आणि आपलं जीवन जगायला लागतात. भारतातली माणसं स्वच्छता पाळायला अजिबात तयार नसतात. भारतीय माणसाला कायदा पाळायला अजिबात आवडत नाही. भारतीय माणसं कर भरतांना कष्टी होतात. विज्ञानाचा अभ्यास करून आणि बाजाराचे टक्केटोणपे शिकून उत्पादन करायला ना उद्योगी तयार असतो ना शेतकरी. एकादा नेहरू, एकादा शास्त्री, एकादी इंदिरा गांधी, एकादा जयप्रकाश नारायण, एकादा वाजपेयी, एकादा मोदी त्यांचे मनोरथ स्वतःला सायास न देता पुर्ण करणार असेल तर भारतीय जनता खुषच. वेळोवेळी वरील त्रात्यांना जनतेनं ८८ टक्के पसंती नेहमीच दिली आहे. वरील त्राते होऊन गेले, भारत आणि गंगा कमालाची अशुद्ध शिल्लक उरते.

निळू दामले

।।

 

दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

” दुर्गा ” ही फिल्म गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवायला केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यानं नकार कां द्यावा? तसा नकार देण्याचा अधिकार त्या खात्याला असावा काय?

फिल्ममधलं एक मुख्य पात्र दुर्गा आहे. दुर्गा आणि तिच्या सोबत असणारा कबीर  रात्री रेलवे स्टेशनकडं जाण्यासाठी एका व्हॅनमधे लिफ्ट घेतात. तिथून कथानक सुरू होतं. गाडीत असलेले पुरुष, नंतर मधे येणारे पोलीस पुरुष दुर्गाला कसं वागवतात याचं चित्रण चित्रपटात आहे.

व्हॅनमधली माणसं दुर्गाकडं एक सेक्सवस्तू आहे अशा रीतीनं पहात होती. त्यावरून चित्रपटाचं शीर्षक सेक्सी दुर्गा असं ठेवण्यात आलं होतं. वाद नकोत म्हणून दिद्गर्शकानं नावातला सेक्सी हा शब्द काढला आणि निव्वळ दुर्गा येवढंच नाव ठेवून चित्रपट सादर केला.

चित्रपटभर दुर्गेला कसा त्रास दिला जातो ते दिग्दर्शकानं थरारक रीतीनं दाखवलं आहे. चित्रपटाचं कलामूल्य अनेक समीक्षकांनी वाखाणलं आहे.

चित्रपटात एका दृश्यात केरळमधील गरुडन थोक्कम या   धार्मिक विधीचंही चित्रण केलं आहे.या विधीत देवी कालीसमोर पुरुष स्वतःच्या अंगात घुसवलेल्या हूकनं वाहनं खेचतात. पुरुष स्त्रीसाठी स्वतःला कसे क्लेष करून घेतात आणि पुरुष स्त्रीला कसं क्लेष देतात अशा दोन्ही गोष्टी  दिद्गर्शकानं दाखवल्यात.

” दुर्गा ” ला  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वात  पुरस्कार मिळालेत.

कुणी माणसांनी म्हणे सेक्सी दुर्गा या नावाला आक्षेप घेतला होता. त्यांच्या  हिंदू भावना दुखावतात असं त्या संख्येनं आणि वकुबानं किरकोळ माणसांचं मत होतं.  सोशल मीडियात काहींनी लिहिलं की कलाकार नेहमीच अशा रीतीनं हिंदू देवदेवतांची टिंगल करतात, अवहेलना करतात,  चित्रपट तर दाखवला जाताच कामा नये पण फिल्म काढणाऱ्यांना झोडलं पाहिजे.

गेली काही वर्षं सोशल मीडियामधे ” हिंदुत्वाचं ” निशाण आणि शस्त्र हाती घेतलेली माणसं वावरत आहेत. चित्रकार हुसेन यांची प्रदर्शनं या मंडळींनी बंद पाडली. महाश्वेता देवींच्या कादंबरीवर यांचे आक्षेप होते. महाश्वेता देवींच्या कथानकातल्या द्रौपदी या पात्रावर  त्यांचा आक्षेप होता. अशा किती तरी गोष्टी.या लोकांना त्यांना  नसलेल्या सर्व गोष्टी पुस्तकांतून, इतिहासातून खोडून काढायच्या आहेत.

लोकांनी वाढदिवशी मेणबत्ती लावावी की पणती पेटवावी हेही ही माणसं  सांगत आहेत. ही माणसं लोकांची अभिरुची घडवण्याच्या, दुरुस्त करण्याच्या खटपटीत आहेत. सरकार या माणसांचं आहे. म्हणूनच गोवा महोत्सवातला न्यूड हा सिनेमाही माहिती-प्रसारण खात्यानं अमान्य केलाय. न्यूड या सिनेमात चित्रकारांना नग्नावस्थेत पोज देणाऱ्या स्त्रीची कहाणी आहे. नग्नता म्हणे या लोकांना त्यांच्या संस्कृतीच्या विपरीत वाटते.  ओदिशामधे किंवा मध्य प्रदेशातल्या मंदिरांत कित्येक शतकांपासून नग्न शिल्पं आहेत, संभोग चितारले आहेत. देव संभोगात रममाण दाखवले आहेत. रामायणात नग्नतेची दृश्यं चितारलेली आहेत.  तो काळ वेगळा होता, कदाचित त्या काळातल्या लोकांची अभिरुची बिघडली होती  असं म्हणून वरील नग्नतेला नाकारायला ही मंडळी सिद्ध झाली आहेत. संधी मिळाली तर तीही शिल्पं तोडली जातील किंवा झाकली जातील.

ही माणसं संख्येनं कमी आहेत. त्यांना तर्काशी, विचारशक्तीशी देणं घेणं नाही. ती माणसं भावना आणि श्रद्धांचा अतिरेक करतात, दोन्ही मानवी वैशिष्ट्यं ही माणसं संदर्भ सोडून आणि तोल सोडून व्यक्त करतात.  सामान्यतः समाज या मंडळींकडं दुर्लक्ष करतो.

अशा मंडळींवर कारवाई करून त्यांना थांबवण्याऐवजी सत्ताधारी त्यांना प्रोत्साहन देतात. अभिरुची, धर्म, संस्कृती या गोष्टी सत्ताधारींना संस्काराची बाब वाटत नसून मतं मिळण्याचं साधन वाटतंय. संस्कृतीचे अयोग्य अर्थ लावून हिंदू नसलेल्या लोकांना सत्ताधारी घाबरवत आहेत.

सलमान रश्दी यांच्या सेटॅनिक व्हर्सेस या कादंबरीवर खोमेनी यांनी फतवा काढला होता. फतवा काढणारे आणि दंगल करणारे यांनी कादंबरी वाचली नव्हती. वाचली असती तर ती एक कादंबरी होती, ते साहित्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं असतं. कादंबरीबद्दलची  मतं  भाषणं, पुस्तकं यातून मांडणं सोडून माणसं दंगलीवर उतरली.  कादंबरीवर बंदी घाला असं म्हणणाऱ्यांना समजावून किंवा दमात घेऊन त्यांना रोखायला  सत्ताधारी राजीव गांधी तयार झाले नाहीत. मुसलमान प्रजा ही माणसं नसून निवडणुकीतली मतं आहेत या भावनेनं राजीव  गांधींनी कादंबरीवर बंदी घातली.

एकाद्या धर्मातल्या पवित्र गोष्टीबद्दल काही वावगं प्रसिद्ध झालं तर लोकांच्या भावना खवळतात.  दंगली घडू नयेत, अशांतता माजू नये, समाजाचं नुकसान होऊ नये, सुव्यवस्था टिकावी यासाठी सरकारला पावलं उचलावी लागतात. पण ती पावलं उचलणं आणि बंदी घालणं या दोन गोष्टी सारख्याच नाहीत हे सरकारला आणि समाजाला कळायला हवं.

साहित्य, विधी,सिनेमा इत्यादी कशावरूनही माणसं दंगल करू लागली तर त्यांना दंगल करू न देणं, दंगल केलीच तर कडक कारवाई करणं हा त्यावरचा उपाय असतो.  आताचं सरकार  आणखीनच विचित्र आहे. ते अशांतता माजवणाऱ्यांना अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे प्रोत्सान देतं.

मुळात पुस्तकं, नाटकं, सिनेमा हा विषय सरकारच्या अखत्यारीत असता कामा नये. समाजाचा गाडा (आर्थिक इत्यादी) नीट चालवणं हे सरकारचं काम असतं. समाजाची सांस्कृतीक पातळी उंचावणं, समाजाची अभिरुची विकसित करणं इत्यादी कामं सरकारची नसतातच मुळी. अलीकडं तर लक्षात आलंय की लोकशाहीत सरकारं ज्या रीतीनं निवडून येतात ते पहाता साधारणपणं संस्कृती,विचार, कला इत्यादी गोष्टी कशाशी खातात ते माहित नसणारीच फार माणसं निवडून येतात. सामान्यतः पैसे जमा करणं, जाती-धर्माचा विचार करून व पैशाचा वापर करून बहुमत मिळवणं, नंतर सत्ता टिकवणं येवढाच धंदा राजकारणातली मंडळी करत असतात. त्यांना वाचन, लिखाण, विचार इत्यादी गोष्टी करायला वेळ नसतो. त्यांची वाढही त्या वातावरणात झालेली नसते. त्यामुळं संस्कृती कला इत्यादी बाबी सरकारवर सोपवणं अत्यंत धोक्याचं असतं.

नाटक, सिनेमा, पुस्तक कसं असावं याचा निर्णय समाजानं करायचा असतो. त्या क्षेत्रात वावरणाऱ्या कलाकारांनी त्यावर निर्णय घ्यायचा असतो. यासाठी त्या विषयांच्या स्वायत्त संस्था असायला हव्यात. संस्थेला समजा इमारत लागत असेल, संस्था चालवायला चार पैसे लागत असतील तर ते सरकारनं द्यायला हरकत नाही पण त्या पलीकडं नोकरशाही आणि राजकीय पक्षाची माणसं त्यात अजिबात असता कामा नयेत.

अभिरुजी, संस्कृती या गोष्टी सरकारकडं नसाव्यात, समाजाकडं असाव्यात.

लोकांनी काय खावं, काय प्यावं. लोकांनी कोणते कपडे घालावेत आणि काय वाचावं. लोकांनी उपासना कशी करावी. भाषा कशी असावी. इत्यादी गोष्टी अभिरूची या सदरात मोडतात. कलावंत निर्मिती करतात, समाज आस्वाद घेतो. या व्यवहारामधून समाजात अभिरूची, परंपरा, संस्कृती घडते.  सत्तेनं दूर राहून मदत करणं अपेक्षित  असतं. सयाजीराव गायकवाड कलाकार, खेळाडू, अभ्यासक यांना भरपूर मदत करत, त्यांनी कसं पळावं, कोणता खेळ कसा करावा आणि त्यांनी काय वाचावं, कशावर संशोधन करावं ते सयाजीराव सांगत नव्हते.

हिंदूमधे माणसांना देवांची, देवतांची नावं दिली जातात. ऐतिहासिक पुरुष, नद्यांचीही नावं दिली जातात. मुसलमानांना नावामधे महंमद हे नाव जोडलं जाणं पवित्र वाटतं. नावं देवांची, प्रेषितांची, नद्यांची, इतिहास पुरुषांची. पण शेवटी  माणसं ही माणसंच असतात. ती गुणी असतात,ती अवगुणी असतात. ती शिक्षकही असतात आणि बलात्कारीही असतात. ती वैज्ञानिक असतात आणि खुनीही असतात. माणसं फार गुंत्याची असतात.

अडचण अशी की कथा, कादंबरी, चित्रपट, नाटक यातल्या पात्रांची नावं काय असावीत. कुठलंही नाव ठेवलं तरी कोणाची तरी भावना दुखावते. मग कथानकं असतील तरी कशी?

अ या माणसानं ब या स्त्रीवर बलात्कार केला असं लिहायचं? क या माणसानं खून केले आणि ड हा माणूस स्मगलर आहे असं लिहायचं?  या घटना अबकडई नावाच्या देशात इसवी सन चार हजार मधे घडल्या असं लिहायचं? समाजात वावगं काहीच घडत नाही, समाजातला प्रत्येक माणूस  सतत सत्कृत्यच करत जगत असतो असं दाखवायचं?

सेक्स. माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग. मुलंही त्यामुळं होतात आणि माणसाला त्यामुळं आंनंदही मिळतो. म्हणे की पुर्वी पुराणपुरुषांना सेक्स न करता मुलं होत होती. कोणाला म्हणे सूर्यापासून मुलं झाली. कोणाला म्हणे नुसत्या कल्पनेनं मुलं झाली. मजा आहे. कल्पना छान आहे. परंतू त्या काळातली मंडळी भरपूर सेक्स करत होती हेही नोंदलं गेलेलं आहे. अनेक पुरातन ग्रंथात भरपूर मद्य प्राशन आणि मुक्त सेक्सची वर्णनं आहेत.

पुल देशपांडे यांनी एक गंमत लिहिलीय. स्त्री पुरुष संबंधाला एका पुढाऱ्याचा विरोध असतो. पुलं लिहितात की राम आणि सीता  असे वेगळे उल्लेख करायचे, ते पती पत्नी होते असं लिहायचं नाही असं संकट त्यातून तयार झालं.

नवअभिरुचीवाल्यांचं म्हणणं जर सर्वांनी मान्य केलं तर साहित्य,नाटकं, चित्रपट कसे असतील याची कल्पनाच केलेली बरी.

कोणतं सरकार आहे आणि कोणता मंत्री आहे हा विषय नाही. सांप्रतचं सरकार, सत्ताधारी पक्ष आणि मंत्री हास्यास्पद आहेत हा स्वतंत्र विषय झाला. तो मुख्य मुद्दा नाही.

समाजाची अभिरुची ठरवणं आणि घडवणं हे सरकारचं काम नाही. सत्ता आणि राजकीय पक्ष, नोकरशहा यांना समाजाची अभिरुची आणि संस्कृती घडवण्यापासून शक्य तितकं  ठेवलं पाहिजे असा मुद्दा आहे.

।।

 

 

थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

Henry David Thoreu, A life. Laura Walls.  

हेन्री डेविड थोरो १८१७ ते १८६१ अशी ४४ वर्षं थोरो जगले. त्या काळात औद्योगीकरणानं जोर धरला होता आणि उद्योग शहरं उभारण्याच्या नादात जंगलं नाहिशी होई लागली होती. वर्णद्वेष आणि गुलामी हे अमेरिकन जीवनाला लागलेले रोग उफाळून आले होते, राज्यांतली आपसातली मारामारी सुरु झाली होती. एका मध्यम वर्गी कुटुंबात वाढलेल्या थोरो यांनी प्राप्त परिस्थिती नाकारून एक नवी वाट जगाला दाखवली.  निसर्गस्नेही जीवन, साधं जीवन, सार्वजनिक नैतिकता, सत्याग्रह, सविनय कायदे भंग या गोष्टी सांगितल्या, स्वतः आचरणात आणल्या. महात्मा गांधी आणि मार्टीन लूथर किंग यांनी  थोरो यांना जाहीररीत्या आपलं गुरु मानलं.

थोरो आणि गांधी यांनी एक व्यापक जीवनदृष्टी सांगितली. किंग यांचं जीवन आणि  विचार वर्णद्वेष आणि शांततामय संघर्ष या विषयांभोवती फिरले. भारतात गांधींना संदर्भहीन-कालबाह्य मानणं आणि भविष्यवेधी आणि कालसुसंगत ठरवणं असे परस्पर विसंगत विचार वारंवार उफाळून येत असतात. अमेरिकेत थोरो यांच्या जन्मद्वीशताब्दीच्या निमित्तानं आणि अमेरिकेतल्या सांप्रतच्या परिस्थीतीमुळं थोरोंची आठवण पुन्हा काढली जातेय. स्पेनपासून फुटून निघण्याची भाषा करणाऱ्या कॅटलोनियन आंदोलकांनी आपण गांधींच्या मार्गानं आंदोलन करणार आहोत असं वारंवार म्हटलं हेही लक्षात घेण्यासारखं आहे.

Henry David Thoreu, A life हे लॉरा वॉल्स यांचं ताजं पुस्तक वाचतांना पटकन मनात येतं की आज थोरो जिवंत असते तर त्यांनी पर्यावरणाचा नाश करणाऱ्या, वंशद्वेष्ट्या ट्रंप यांच्या विरोधात सत्याग्रहाचं अस्त्र उगारलं असतं, चळवळ सुरु केली असती.

निसर्गप्रेम, साधी रहाणी, कर द्यायला नकार देणं, सविनय कायदेभंग हे थोरोंचे विचार त्यांच्या काळातही वादग्रस्त ठरले होते. जेम्स रसेल, जॉन अपडाईक, कॅथ्रीन शुल्झ यांनी  थोरोंना अव्यवहारी, गर्विष्ठ, अहंमन्य, उद्धट, ठरवलं.थोरोंनी  अमेरिकेत प्रस्थापित असलेल्या व्यवस्थेवरच जगायचं आणि त्याच व्यवस्थेचा विरोधात आपण आहोत असं म्हणायचं यात दुटप्पीपणा आहे असं तत्कालीन टीकाकार म्हणत.

थोरोंचा जीवनपट वॉल्स यांनी पुस्तकात मांडला आहे. थोरोंचं बालपण. हार्वर्डमधे जाणं.इंजिनियर होणं. काही काळ इंजिनियर म्हणून काम करणं. इमर्सनच्या विचारांनी प्रभावित होऊन कॉनकॉर्ड या आपल्या गावाच्या वेशीवर असलेल्या वॉल्डन या ठिकाणी एका जलाशयाच्या काठावर, जंगलात जाऊन रहाणं. तिथं निसर्गाचा अभ्यास करणं. सरकारच्या अनैतिक वागण्याविरोधात सत्याग्रह करून एक दिवस तुरुंगात काढणं. निसर्गप्रेमी जीवनशैलीचा आग्रह सांगणारी भाषणं करणं आणि चळवळ चालवणं. टीबीची बाधा होऊन वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मरणं.

थोरोनी लिहिलेल्या  जर्नलमधील नोंदी (निसर्ग, जगण्याविषयीचे विचार आणि प्रतिक्रिया)  खूप तपशिलासह लेखिकेनं लिहिल्या आहेत. दिवसभरात मनात आलेले विचार, केलेली कामं, केलेली निरीक्षणं इत्यादी गोष्टी थोरो कागदावर पेन्सिलीनं लिहीत. नंतर त्या टिपणावरच्या प्रतिक्रिया  मार्जिनमधे लिहून काढत. नंतर शाईनं या नोंदी पक्क्या करत. वनस्पतींची वाढ, फुलांचा जन्म आणि फळणं यांच्या दररोज घेतलेल्या नोंदीवर आधारीत पुस्तकं थोरोंनी लिहिली.

थोरोंचे टीकाकार म्हणत की थोरो वेळोवेळी गावातल्या आपल्या घरी जात, तिथं जेवण करत, तिथं त्यांचे कपडे त्यांची आई धुवून देत असे. लेखिका अशा नोंदींची दखल घेते, नर्म विनोदातून. ” कोणाही अमेरिकन पुरुष लेखकाच्या वाट्याला  आपल्या प्रिय माणसांसोबत जेवण घेण्याबद्दल किंवा आपले कपडे स्वच्छ करून घेण्याबद्दल इतकी अपकीर्ती सहन करावी लागली नसेल.”

थोरो साध्या रहाणीचे पुरस्कर्ते होते. घरं बांधण्याचा उद्योग अमेरिकेत सुरु झाला होता यावर थोरोंचा राग होता. माणसाला झोपायला एका शवपेटीयेवढीच जागा लागत असताना माणूस विनाकारण घर नामक मोठा खोका कां बांधतो असा प्रश्ण त्यांनी विचारला. घराला पडदे इत्यादी लावणं म्हणजे चैन आहे असं त्यांना वाटे. जंगल हेच घर, त्या  घराला ना खिडक्या, ना दारं.  स्वस्त आणि मोकळा ढाकळा मामला असं ते जंगल ऊर्फ घराचं वर्णन करत. अशा थोरोंनी लहान कां होईना पण घर कां बाधलं या टीकाकारांच्या प्रश्णाला उत्तर म्हणून ”  लेखक-विचारवंताला  चिंतन करण्यासाठी, लिहिण्यासाठी एकांत लागतो, स्वतंत्र  घर लागतं ” हा इमर्सननं दिलेला सल्ला वाचकांसमोर ठेवतात.

अनेक ठिकाणी विसंगती मांडल्यावर  लेखिका ” अरे, हे तर मला माहितच नव्हतं.. अरेच्चा मी तर अशा रीतीनं विचारही केला नव्हता..” अशा प्रतिक्रिया नोंदतात.

निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनाचा आग्रह थोरोंनी धरला. ते शाकाहारी व निर्व्यसनी होते. सरकारच्या अनैतिक वागण्याचा निषेध म्हणून त्यांनी कर भरायला नकार दिला, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सविनय कायदेभंग, सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला.

जगाला चिंतित करणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आज अमेरिकेत आहेत. प्रदूषण करणारा वायू सर्वात जास्त मात्रेनं अमेरिका पर्यावरणात लोटत आहे.धनाढ्य अमेरिकेत विषमता आहे. भरपूर अन्न उपलब्ध असूनही अमेरिकेत अतीपोषण आणि कुपोषणानं फार लोक रोगी झालेत. खूप माणसं औषधोपचारापासून वंचित आहेत. बाजारात अमाप वस्तू असूनही दुःखी आणि हताश असलेली माणसं आत्महत्या करत आहेत.उत्तम शिक्षण व्यवस्था आहे तरीही शिक्षण न घेता येणारे आणि पोकळ शिक्षण देणाऱ्या संस्थांचे बळी  झालेले खूप लोक आहेत.

मार्क ग्रीफ या निबंधकाराचं अगेन्स्ट एवरीथिंग हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. ग्रीफ यांनी या पुस्तकात अमेरिकेच्या सध्याच्या अवस्थेबद्दल निबंध लिहिले आहेत. बाजारव्यवस्थेनं अमेरिकेचा ताबा कशा रीतीनं घेतला आहे याची चर्चा या पुस्तकात आहे. माणसानं काय खावं, कसा व्यायाम करावा, कोणतं संगित ऐकावं, सेक्सविषयक माणसाचं जगणं इत्यादी गोष्टी माणूस स्वतः ठरवू शकत नाही, बाजार वरील गोष्टी ठरवतो याकडं ग्रीफ लक्ष वेधतात. सभोवतालच्या वस्तुमय जगण्यानं चक्रावलेले ग्रीफ पुस्तकाच्या शेवटच्या निबंधात थोरोची आठवण काढतात. ग्रीफ १९७५ साली जन्मले आणि थोरो ज्या विश्वशाळेत शिकले त्याच हारवर्डमधून ग्रीफ यांनी पीएचडी घेतली.

गेल्या पाचेक वर्षाच्या काळात ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आणि ब्लॅक लाईव्ज मॅटर ही मोठ्ठी आंदोलनं अमेरिकेत होऊन गेली. ब्लॅक लाईव्ज मॅटर या आंदोलनात काळ्यांनी  अमेरिका अजूनही वर्षद्वेष्टी आहे हे वास्तव चव्हाट्यावर आणलं. बहुदा त्या आंदोलनाला आलेली गोऱ्या वर्णवादींची प्रतिक्रिया म्हणूनच वर्णद्वेष करणारेही रस्त्यावर आले आणि त्यांनी संघटितरीत्या ट्रंप यांना निवडून दिलं. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या आंदोलनात अमेरिकेची अर्थव्यवस्था समाजातल्या एक टक्के लोकांनी बळकावली आहे असं सांगितलं. २००७ सालची मंदी ही एक टक्का लोकांनी ९९ टक्के लोकांवर लादलेली गरीबी आणि विषमता आहे असं या आंदोलनाच्या निमित्तानं अमेरिकेतल्या विचारी लोकांनी लिहिलं.

वरील दोन आंदोलनांचा अनुभव घेतलेल्या मार्क ग्रीफना २०११ साली सध्याच्या चिंताजनक परिस्थितीत थोरोची आठवण काढावी असं वाटतं. अगेन्स्ट एवरीथिंग या पुस्तकातला वर उल्लेख केलेला निबंध त्यांनी २०११ साली लिहिला आणि २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात गुंफला.

औद्योगीक क्रांती, बाजारव्यवस्था, कंप्यूटर आणि इंटरनेट, जागतिकीकरण या घटनांनी २१व्या शतकातला समाज कायच्या कायच बदलला आहे. पर्यावरणचा नाश आणि नैसर्गिक ऊर्जा नाहिशी होणं या दोन गोष्टी माणसाला भयभीत करून टाकत आहेत. मानवी समाजाचं अस्तित्वच नाहिसं होणार की काय अशी भीती भेडसावू लागली आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि ज्ञान उपलब्ध होणं आणि वापरता येणं यामुळं माणसाचं जीवन अधिक सुखकर होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण नाशाचे तोटे लक्षात आल्यानंतर माणूस रिसायकलिंग, नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्याकडं वळला आहे. अतिरेकाचे तोटेही माणसाच्या लक्षात आले आहेत.

वस्तूच वापरू नका, उद्योगच बंद करा, निसर्गाला पूर्णपणे शरण जा असा विचार असं आज कोणी म्हणत नाही. परंतू उपभोगाचा नव्यानं विचार करावा असं माणसाला वाटू लागलं आहे. हव्यास आणि गरजा यातली सीमारेषा ठरवणं कठीण आहे. प्रत्येक काळात ही रेषा पुढं मागं होत असते, व्हायला हवी. थोरो आणि गांधीजी गरज-हव्यास रेषेचा विचार करा असं सांगतात.

थोरोंच्या विचारांना आचाराचा पाया होता.  स्वतः साधे राहून ते समाजाला साधेपणाचा संदेश देत होते. स्वतः निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहून त्यांनी पर्यावरण सांभाळायचा संदेश दिला. बोलणं तसंच चालणं.

समाजाचा तोल गेलाय असं थोरो सांगतात. प्रत्येक काळात माणसानं आपापल्या काळाची तपासणी करावी असं त्यांचं म्हणणं असतं. वस्तूंचा वापर जरूर करा पण वस्तूरूप जगू नका असा थोरोच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आपण दररोज उठून जे जे करतो ते ते नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे याचा विचार करायला थोरो प्रवृत्त करतात.

म्हणूनच वॉल्सना त्यांचं चरित्र पुन्हा एकदा लिहावंसं वाटतं.

।।

 

 

 

 

स्पॅनिश फुटीरता- उपद्व्यापी पुढाऱ्यांची घातक खेळी

स्पॅनिश फुटीरता- उपद्व्यापी पुढाऱ्यांची घातक खेळी

कॅटेलोनिया या प्रांताला स्पेनमधून फुटायचं आहे. कॅटेलोनिया या राज्याच्या बार्सेलोना या राजधानीत एक जनमत घेण्यात आलं. त्यात ४३ टक्के लोकांनी भाग घेतला आणि त्यातल्या ९० टक्के लोकानी स्पेनमधून फुटायचा निर्णय घेतला. त्या नुसार बाहेर पडू इच्छिणाऱ्यांनी  कॅटोलोनियाच्या विधीमंडळात ठराव करून स्वतंत्र होण्याचा निर्णय जाहीर केला.

                       कॅटेलोनियाचे फुटीर पुईजदेमाँट

स्पेन या देशाला कॅटेलोनियानं फुटणं मंजूर नाही. फुटण्याचा विचार आणि ठराव हा स्पेनच्या राज्यघटनेनुसार देशद्रोह आहे असं स्पेनच्या संसदेचं आणि अध्यक्षांचं म्हणणं आहे. स्पेनच्या अध्यक्षांनी कॅटेलोनियाच्या फुटीरवादी पुढाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावलाय. या आरोपाखाली त्या पुढाऱ्यांना ३० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

स्पेननं डिसेंबर महिन्यात चाचणी निवडणुक जाहीर केली आहे. कॅटेलोनियाचे पुढारी तुरुंगवासातून सुटका करण्यासाठी युरोपीयन युनियनच्या राजधानीत, बेल्जियममधे पोचले आहेत. निवडणुकीत भाग घ्यायची त्यांची तयारी दिसत नाहीये. एका निवडणुकीत आपण आधीच तसा निर्णय घेतलाय असं त्यांचं म्हणणं आहे. स्पेनचं म्हणणं आहे की आधीची चाचणी बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्दतीनं झाली होती.

राहोय हे स्पेनचे अध्यक्ष आहेत आणि पुईजदेमाँट हे कॅटेलोनिया प्रांताचे अध्यक्ष आहेत.

कॅटेलोनिया फुटणं ही कल्पना युरोप, अमेरिका, ब्रीटन इत्यादी कोणालाही मंजूर नाहीये. देश फुटणं सर्वांनाच महागात पडणार आहे.

कॅटेलोनियानं फुटून निघण्याचा प्रयत्न करणं या घटनेला इतर समांतर घटनाही आहेत. स्कॉटलंडला ब्रीटनच्या बाहेर पडायचंय, सिसिली-कॉर्सिका यांना इटालीमधून बाहेर पडायचंय, बास्क या प्रांताला स्पेनमधून फुटायचं आहे.

हा प्रकार तरी काय आहे?

प्रदेश कां फुटतात? अतीशय वाईट स्थितीला तोंड द्यावं लागण्याला  कारण केंद्रीय सत्ता आहे अशी परिस्थिती असेल तर प्रांत फुटून निघतात. पाकिस्ताननं पूर्व पाकिस्तानवर अनन्वीत अत्याचार केले होते. पूर्व पाकिस्तानची बंगाली संस्कृती पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी संस्कृतीला नको होती, त्यांना पूर्व पाकिस्तान गुलामासारखा ठेवायचा होता. त्यातून पाकिस्तान फुटलं आणि बांगला देश स्थापन झाला. समजण्यासारखं आहे.

स्पेनची परिस्थिती तशी नाही. स्पेन आणि कॅटेलोनिया हे दोन्ही प्रदेश सुखात आहेत. तिथं बेकारी,उपासमार, गरीबी नाही. दोन्ही ठिकाणची माणसं सुखात आहेत, त्या ठिकाणच्या लोकांचं दरडोई उत्पन्न युरोपात बऱ्याच वरच्या पायरीवर आहे. तिथं कोणीही कोणावर अत्याचार करत नाहीये, कोणीही कोणाचं स्वातंत्र्य किंवा लोकशाही अधिकार हिरावून घेत नाहीये. मग ही काय भानगड?

                             स्पेनचे अध्यक्ष राहॉय

हे खरं आहे की स्पेनमधले विविध विभाग सांस्कृतीक आणि भाषिक दृष्ट्या एकमेकापेक्षा खूप वेगळे आहेत. स्पेनवर रोमन, ज्यू, ख्रिस्ती, इस्लामी धर्माची छाप आहे. दोनेक हजार वर्षाच्या काळात ठिकठिकाणी नाना प्रकारचे समाज गट तिथं एकमेकाशेजारी वावरत आले. कधी तणाव, कधी मैत्री असे त्यांचे संबंध राहिले. बाहेरून आक्रमणं होत राहिली, स्पेननं ती पचवली. विविध राजे आणि धर्म आपापले प्रभाव टाकत राहिले आणि त्या त्या प्रभावांचे समाजगट समाजात तयार होत गेले, टिकत गेले. साहित्य, भाषा, वास्तूकला, कमानकला, चित्रकला इत्यादी रुपात हे वैविध्य स्पेनमधे तयार झालं, टिकलं.

कॅटेलोनिया, बास्क, सेविल इत्यादी विभाग आपापल्या वैविध्याचे उपासक आहेत, आपापली वैशिष्ट्यं जपत असतात. त्यातून अर्थातच वेळोवेळी तणाव निर्माण होत असतात. परंतू या तणावातून वाट काढण्याची लोकशाही परंपराही स्पेनमधे जुनी आहे. ब्रीटनपेक्षाही जुनी आहे.

११८८ साली त्या वेळचा राजा नववा अल्फान्सो यानं बाहेरून होणाऱ्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आणि राज्यांतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी एक संसद भरवली होती. राज्यातले धार्मिक पुढारी, जमीनदार, उच्च कुलीन, शेतकरी, मध्यम वर्गीय इत्यादींना त्यांना एका सभेत बोलावून ‘ क्युरिया ‘ भरवला. ही जगातली पहिली लोकसभा होती. या लोकसभेत जमलेल्या लोकांनी राजाच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचा अधिकार मिळवला. नागरिकांना अधिकार मिळाले, स्वातंत्र्य मिळालं. महत्वाचे निर्णय घेताना जनतेला विचारलं पाहिजे अशी तरतूद करण्यात आली.

त्यानंतर स्पेनमधले निर्णय कायम लोकशाही पद्धतीनंच झाले अशातला भाग नाही. जनरल फ्रँकोनं स्पेनवर हुकूमशाही लादली. या हुकूमशाहीला स्पेनमधल्या लोकांचा विरोध होता, त्या पैकी कॅटेलोनियाचा विरोध हा अधिक संघटित होता. फ्रँकोनं लादलेल्या हुकूमशाहीनं माद्रीदची केंद्रीय सत्ता विरोधात कॅटेलोनियाची म्हणजे बार्सेलोनाची विभागीय सत्ता असं रूप घेतलं. स्पेनमधे यादवी झाली. या यादवीत जगातल्या इतर अनेक देशांनी भाग घेतला. यादवीतले मुद्दे हुकूमशाही, समाजवाद, लोकशाही असे होते.

१९७५ मधे स्पेनमधे नवी राज्यघटना तयार झाली. प्रांतांना खूप स्वायत्तता देण्यात आली. प्रांतांना स्वतःच्या लोकसभा देण्यात आल्या. एकूणात बरं चाललं होतं. परंतू कॅटेलोनिया, बास्क इत्यादी प्रांतातल्या लोकांचं सांस्कृतीक भांडण शिल्लक राहिलं. आपली भाषा आणि एकूण जगणंच वेगळं आहे अशी ठुसठुस त्यांच्यामधे शिल्लक राहिली. बास्क प्रांतात फुटून निघण्याची भाषा करत एक दहशतवादी गटही तयार झाला. परंतू कालांतरानं फुटीरतेची भाषा थंडावली, पण ठुसठुस शिल्लक राहिली. कॅटेलोनियातही तीच ठुसठुस शिल्लक आहे.

फूटबॉल आणि बुलफाईट या खेळांमधे या ठुसठुसीचं रूप प्रकट होतं. माद्रीद आणि बार्सेलोना या बलाढ्य आंतरराष्ट्रीय टीममधे जेव्हां मॅचेस होतात तेव्हां भारत पाकिस्तान मॅचसारखं वातावरण असतं. द्वेष उफाळून येतो. बुलफाईट हा खेळ आमचा नाही, तो एक क्रूर खेळ आहे असं म्हणत कॅटेलोनियानं त्या खेळावर बंदी घातली, त्या खेळमैदानांचं रूप मॉलमधे पालटून  टाकलं. या उलट माद्रीदमधे मात्र या खेळाला ऊत येत असतो. आर्किटेक्ट गावदी आणि चित्रकार पिकासो ही खरं म्हणजे स्पेनचीच नव्हे तर साऱ्या जगाची आदरस्थानं आहेत. परंतू माद्रीद त्यांच्या बद्दल प्रेम बाळगत नाही कारण गावदी हा कॅटेलोनियन आहे असं माद्रीदच्या  लोकांना वाटतं आणि पिकासोनं गर्निका हे चित्र काढून बास्कची बाजू घेतलीय असं काही लोकांना वाटतं.

केवळ राजकारणातून ही उचकाउचकी झालीय असं दिसतंय. राहोय आणि पुईजदेमाँट यांना सत्ता हवीय, अनेक पक्षांच्या संमिश्र सरकारांच्या राजकारणात त्यांना निरंकुश, पूर्ण  सत्ता मिळत नाहीये. म्हणूनच भावनात्मक प्रश्न उचकवून दोन्ही बाजू प्रश्न निर्माण करत आहेत, चिघळवत आहेत.

फुटीरतेची भाषा करणाऱ्या पुईजदेमाँटशी मतभेद असणारी फार माणसं कॅटेलोनियात आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवय पण वेगळ्या कारणासाठी. एक गट पर्यावरणवादी आहे. त्यांना प्लास्टिक बाद करायचंय, नैसर्गिक उर्जा साधनं वापरायची आहेत, नैसर्गिक गोष्टींचा पुनर्वापर, रिसायकलिंग, त्यांना हवं आहे. सौर ऊर्जेचा वापर ही मंडळी त्यांचं प्राबल्य असलेल्या नगरपालिकांत करत असतात. ही मंडळी म्हणतात की त्याना त्यांच्या विचारांनुसार राज्य चालवायचं आहे आणि गांधीजींच्या पद्धतीनं त्यांना त्यांची मतं मांडायची आहेत. गांधीजींची पद्धत असे शब्दही ते आंदोलनात वापरत असतात.

कॅटेलोनिया फूटू नये असं वाटणाऱ्यांतही वाटाघाटी आणि समजुतीनं प्रश्न सोडवावा, बळाचा आणि कायद्याचा वापर करू नये असं म्हणणारी फार माणसं माद्रीदमधे आहेत.

राहोय आणि पुईजदेमाँट यांची देहबोलीच विचित्र आहे. सूडानं पेटल्यागत ती माणसं बोलतात, वावरतात.

स्पेनमधे जे चाललंय त्याच्या वेगळ्या प्रती युरोपात आणि अमेरिकेत दिसत आहेत. आपल्या पेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांपासून दूर व्हायचं,त्यांच्याशी भाडणं उकरून काढायची खोड लोकांना लागतेय. आपल्याला होणाऱ्या खऱ्या किवा भ्रामक त्रासाला इतर माणसांना जबाबदार ठरवणं अशी एक पद्धत रूढ होतेय. त्या वाटेनं लोकांना उचकवता येतं, भावनेला आवाहन करता येतं, आपलं नेतृत्व प्रस्थापित करता येतं असं त्या समाजातल्या काही लोकांना वाटतं. (उदा. ल पेन आणि ट्रंप) माध्यमांची त्त्यांना या बाबतीत मदत होते. त्यातून हे अनावश्यक अनवस्था प्रसंग उभे रहात आहेत.

।।

 

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट या नावाची   व्हॅन गॉग या चित्रकारावरची एक फिल्म २०१७ च्या मामी उत्सवातलं एक मोठं आकर्षण ठरली.  व्हॅन गॉगनं त्याच्या  भावाला, थियोला, लिहिलेलं पत्रं घेऊन एक माणूस व्हॅन गॉगच्या गावात पोचतो. पत्रं पोचवत असतानाच तो व्हॅन गॉगच्या मृत्यू म्हणजे आत्महत्या होती की खून होता याचा शोध घेतो. या शोधावर ही ९० मिनिटांची फिल्म  Dorota Kobiela  या दिद्गर्शिकेनं तयार केलीय.

फिल्म रोटोस्कोपिंग एनिमेशन हे तंत्र वापरून केलीय.

रोटोस्कोपिंग या तंत्रात आधी फिल्म नेहमीच्या पद्धतीनं चित्रीत केली जाते. स्टुडियोत सेट लावून चित्रीकरण केलं जातं. नेहमीच्या फिल्ममधे सेटवर खूप बारीकसारीक तपशील चितारलेले असतात. रोटोस्कोपिंगसाठी वापरलेला सेट प्रतीकात्मक, सूचक अशा प्रकारचा असतो. पात्रांच्या हालचाली आणि कमीत कमी तपशीलाचं नेपथ्य येवढ्याच गोष्टी आवश्यक असतात.

फिल्म चित्रीत झाल्यानंतर प्रत्येक फ्रेमवर संस्कार केले जातात. पात्रांच्या हालचाली एका सेकंदाला किती फ्रेम वापरल्या जातात त्यानुसार ठरतात, व्यवहारात जशा दिसतात तशा हालचाली एनिमेशन फिल्ममधे दिसत नाही. फ्रेमवर केलेल्या संस्काराचे अनेक प्रकार असतात. संस्कार करणाऱ्या चित्रकाराच्या शैलीनुसार चित्र बदलतं. व्यंगचित्रकाराच्या रेखाटनाच्या, रेघांच्या शैलीनुसार जशी व्यंगचित्रातली पात्रं दिसतात तसंच एनिमेशन फिल्ममधल्या फ्रेममधली पात्रांच्या बाबतीत घडतं. लक्ष्मण, मारियो मिरांडा, उन्नी, शंकर, सरवटे या प्रत्येक चित्रकाराची पात्रं, माणसं, स्वतःची स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन कागदावर उतरतात. तसंच एनिमेशन फिल्मबाबत घडत असतं. संस्कार करणाऱ्याची दृष्टी आणि शैली महत्वाची.

लविंग विन्सेंटमधे प्रत्येक फ्रेम म्हणजे व्हॅन गॉगचं एकेक पेंटिंग असतं. एक दृश्य असतं व्हॅन गॉग शेतात बसून पेंटिंग करत असतो आणि चार टारगट मुलं त्याच्यावर दगडफेक करतात. व्हॅन गॉगचं पेंटिंग करतोय असं दृश्य सेटवर चित्रीत करण्यात आलं. चार मुलांकडून दगड मारत असल्याची एक्शन सेटवर स्वतंत्रपणे चित्रीत चित्रीत करण्यात आली. नंतर या दोन्ही दृश्यांमधली प्रत्येक फ्रेम  व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर चिकटवण्यात आली. फिल्म दिसते त्यावेळी वरील घटना व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या पार्श्वभूमीवर दिसते.

पूर्ण चित्रपट अशा रीतीनं तयार करण्यात आलाय.

चित्रपटाचं चित्रीकरण १४ दिवसांत सेटवर आटोपण्यात आलं. नंतर हे चित्रण पोलंडमधील डॅन्स्क या शहरामधे काम करणाऱ्या १२५  चित्रकारांकडं सोपवलं गेलं.त्यांनी ८५० कॅनव्हासेसवर व्हॅन गॉगच्या पेंटिंगच्या कॉपीज तयार केल्या आणि एकूण  ६५ हजार फ्रेममधे पार्श्वभूमी म्हणून चिकटवल्या. कधी व्हॅन गॉगचं पेंटिंग जसंच्या तसं वापरलं तर कधी त्यात थोडेसे बदल केले.

बाप रे. किती ती पेंटिंग्ज. इतकी सारी पेंटिंग्ज करायला ३ हजार लीटर रंग वापरावा लागला. एक अडचण होती. व्हॅन गॉगनं टर्पेंटाईन वापरून चित्रं केली होती. टर्पेंटाईन वापरलेला  रंग पटकन वाळत नाही. तैलचित्रात रंगाचा एक हात वाळल्यानंतर दुसरा द्यायचा असतो. त्यामुळं चित्रं तयार व्हायला खूप वेळ लागत असे. इतका वेळ चित्रपट निर्मात्यासमोर नव्हता. त्यांनी टर्पेंटाईन तेलाऐजी लवंगीचं तेल वापरलं. स्टुडियोत लवंगी तेलाचा घमघमाट असे. दात दुखू लागले की या तेलाचा बोळा दाताखाली धरा असं डॉक्टर सांगतात, त्यामुळं वेदना कमी होतात. चित्रपट करणारे लोकं बराच काळ वेदनारहित जगले असावेत.

सबंध चित्रपट प्रेक्षक व्हॅन गॉगची पेंटिंग पहात असतो. हा प्रयोग प्रेक्षकांना आवडला. युरोपात निवडक ठिकाणी ही फिल्म दाखवण्यात आली तेव्हां प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी फिल्मची खूपच वाखाणणी केली.

१९९० मधे अकिरा कुरोसावा या जपानी दिद्गर्शकानं  व्हॅन गॉगची पेंटिंग्ज या विषयावर  ड्रीम्स या नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती.  एक चित्रकार व्हॅन गॉगच्या चित्रांचं प्रदर्शन पाहून त्याला  भेटायला जातो हे कुरोसावाच्या शॉर्ट फिल्मचं कथानक आहे. चित्रकार फिरतांना थेट व्हॅन गॉगच्या चित्रातच शिरतो.त्याचा  सगळा प्रवास व्हॅन गॉगच्या चित्रांतून होतो. चित्रात शेत असतं, कुरोसावाचा माणूस त्या चित्रातल्या पायवाटेनं जातो. व्हॅन गॉगची बरीच मूळ चित्रं या चित्रपटात वापरली आहेत. व्हॅन गॉगची चित्रं ड्रीम्समधे जशी दिसतात तशी लविंग विन्सेंटमधे दिसत नाहीत.

२०१६ मधे टॉवर नावाची एक फीचर फिल्म कम डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. १९६६ मधे अमेरिकेत एक माणूस युनिवर्सिटीच्या टॉवरमधे मोक्याच्या जागी जाऊन खाली वावरणाऱ्या लोकांवर गोळीबार करतो. खूप माणसं मरतात. एक धाडसी माणूस शेवटी त्या खुन्याला मारतो. ही गाजलेली सत्य घटना टॉवरमधे चितारलेली आहे. त्यामधे रोटोस्कोपिंगचं तंत्रं अंशतः वापरलेलं आहे. काही प्रसंगात रोटोस्कोपिंग एनिमेशननं कार्टूनच्या धर्तीवरची चित्र वापरली आहेत.काही दृश्यं त्या काळातल्या नॉर्मल फिल्मची क्लिप्स अशा रूपात वापरली आहेत. काही चित्रं प्रत्यक्ष माणसांचं चित्रीकरण करून मुलाखतीच्या रुपात  दाखवली आहेत.

२०१६ मधे मामीमधे लिटल प्रिन्स नावाची ११६ मिनिटांची एनिमेशन फिल्म प्रदर्शित झाली होती. तीही गाजली होती.

चित्रपट निर्मितीत कंप्यूटर आणि चित्रीकरणाची, संपादनाची विविध नवी तंत्रं आल्यानंतर एनिमेशन हा चित्रपट प्रकार निर्माण झाला, चित्रपट पहाण्याची एक नवी दृष्टी विकसित झाली. एके काळी माणसं फक्त नाटकं पहात. नंतर चित्रपट पहाण्याची सवय झाली. नवी तंत्र आल्यावर कळसुत्री बाहुल्या, चिकणमातीच्या प्रतिमा वापरून चित्रपट तयार झाले. एनिमेशन हे आणखी नवं तंत्र. डिस्ने कंपनीनं केलेल्या एनिमेशन फिल्म आता लोकप्रिय झाल्या आहेत. जंगल बुक, अवतार ही काही खूप पाहिल्या गेलेल्या एनिमेशन फिल्मची उदाहरणं.

रोटोस्कोपी किंवा एकूणातच एनिमेशन हे नेहमीच्या चित्रपट तंत्रापेक्षा एक वेगळं तंत्रं आहे. नटनट्या घेऊन चित्रपट तयार करणं आणि एनिमेशन तंत्रानं चित्रपट तयार करणं या दोन्ही प्रकारात मेहनत सारखीच आहे.

अलीकडं रोटोस्कोपिंग न करताही केवळ एनिमेशन करून चित्रपट तयार करण्याकडं कल वाढत आहे. पात्रांना घेऊन चित्रीकरण करणं ही गोष्टच एनिमेशनमधून वगळली जाते. सर्व पात्रं कागदावर चितारली जातात. किंवा विविध सॉफ्टवेअर वापरून ती थ्रीडी किंवा टूडी पद्धतीनं चित्रीत केली जातात. सॉफ्टवेअर आता इतकी विकसित होत आहेत की माणूस जसा दिसतो जवळपास तसाच माणूस आता सॉफ्टवेअर तयार करतात. त्यामुळं नट, नट्या, एक्स्ट्रॉ अशी माणसं हाताळणं, स्टुडियो किंवा बाहेर चित्रीकरण करणं ही जिकिरीची आणि फार खर्चाची प्रक्रिया पूर्णपणे टळते.माणसं,त्यांच्या लहरी, त्यांची वेळापत्रकं इत्यादी गोष्टीच नाहिशा होतात. आभासी जगातली आभासी माणसं हाताळणं सोपं असतं. आभासी माणसं आणि पात्रं दिद्गर्शक आणि चित्रकार म्हणतो ते निमूट मान्य करत असतात. हे तंत्र जेव्हां पूर्ण विकसित होईल तेव्हां चित्रपट सृष्टी बदललेली असेल, आजचे फीचर चित्रपट इतिहासजमा झाले असतील.

लविंग विन्सेंट खूप कमी पैशात तयार झाला. तेही पैसे भरून निघाले नाहीत. बहुतांश प्रेक्षक असे प्रयोग पहायला तयार नसतात. अशा फिल्म कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रदर्शित करायला वितरक तयार नसतात. त्यामुळं एका फेस्टिवलकडून दुसऱ्या फेस्टीवलकडं अशी या चित्रपटांची वाटचाल होत असते.

रसिक, अभ्यासकांना मात्र हे चित्रपट म्हणजे मेजवानी असते.

।।

 

 

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

देवासारखा माणूस तयार होईल काय?

युवाल हरारी यांचं होमो डियस (Homo Deus) हे पुस्तक सध्या गाजतय. होमो डियस म्हणजे जवळ जवळ देव झालेला माणूस. देव म्हणजे पूर्ण व्यक्ती, पुर्ण निर्दोष व्यक्ती. एकेकाळी माकड असलेला माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जवळजवळ देव बनवला जातोय या विषयाभोवती हे पुस्तक फिरतं.

लेखक पृथ्वीचा  ४ अब्ज वर्षांचा जीवनप्रवास धुंडाळतो. आजचा माणूस घडण्याचा पहिला टप्पा ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाला. त्यावेळी  माणसाला बोधनाची, ज्ञान आणि समज घडवण्याची सोय मेंदूत झाली. ११ हजार वर्षांपूर्वी माणसानं शेती   सुरू केली शेती सुरु केली, जंगलं, मोठी जनावरं, उपयोगी नसलेली जनावरं-प्राणी मारायला सुरवात केली. पृथ्वी केवळ आपल्यासाठीच आहे असं मानव तिथून मानू लागला. त्याच्या या समजुतीवर जगभरातले आदिधर्म आणि नंतर ज्यू-ख्रिस्ती इत्यादी धर्म तयार झाले. हिंदू धर्म अपवाद होता, त्यानं प्राण्यांना मानवी जीवनाचा भाग मानलं. नंतर ५०० वर्षापूर्वी वैज्ञानिक क्रांती झाली, २५० वर्षांपुर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि ताजी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती ५० वर्षांपूर्वी झाली.

या प्रवासात पृथ्वीवर केवळ मानवच उरेल या दिशेनं माणूस वागला. त्यानं भूक, दुष्काळ, युद्ध यांच्यावर मात केली. मृत्यू हा माणूस आणि देवातला मुख्य फरक. माणूस आता आयुष्य लांबवत लांबवत पाचशे हजार वर्षांवर घेऊन जात आहे, माणसाला अमर करण्याच्या  खटपटीत लागला आहे. अमरच नव्हे तर शरीर, मेंदू या सगळ्या बाबत निर्दोष आणि परिपूर्ण माणूस तयार करण्याची खटपट माणूस करतोय.

दुष्काळ, उपासमार, रोग आणि युद्ध या गोष्टी माणसानं संपवल्या.पण आता युद्दात जेवढी माणसं मरत नाहीत तितकी रस्त्यावरच्या अपघातात मरतात, अती खाण्यानं आणि निकस खाण्यानं मरतात.मानसीक ताणामुळं आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय, जगातल्या मृत्यूत तो सगळ्यात मोठा आकडा आहे असं लेखक दाखवतो.

भावना हे माणसाचं वैशिष्ट्यं. पण भावना  म्हणजे  रासायनिक इलेक्ट्रिकल प्रेरणा आहेत याचा शोध माणसानं लावला आहे. या शोधाचा उपयोग करून रासायनिक आणि इलेक्ट्रिकल प्रेरणांची पद्धतशीर मांडणी करून एक नवा मेंदू माणूस तयार करतो, सेंद्रीय नव्हे, निरींद्रीय मेंदू. अलगोरिदम, म्हणजे पद्धतशीर निर्णय पायऱ्या चालण्याची क्षमता निरींद्रीय मेंदूत माणूस गुंफतोय.

लेखक निरींद्रीय मेंदू आणि माणसाचा मेंदू यातला फरक सांगतो. सध्या बाजारात एक नवी कार येऊ घातलीय. ती माणसाविना चालेल. रस्त्यावरून प्रवास करत असताना येणाऱ्या सर्व शक्यता आणि अडचणींचा विचार करणारा कंप्यूटर या कारमधे असेल. अपघात होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही आणि कारमधली माणसंही सुरक्षित रहातील अशा रीतीनं ही कार चालेल. रस्त्यात माणसं आली, खड्डा आला, मधेच एकादी कार किंवा जनावर आलं, पाऊस पडला, बर्फ पडला इत्यादी सर्व शक्यतांचा विचार या कारमधे झालेला असेल. लेखक विचारतो की ही कार म्हणजे माणूस असेल काय? कारमधला कंप्यूटर म्हणजे माणसाचा मेदू असेल काय? कारला भावना असतील काय?

निरींद्रीय आणि सेद्रीय मेंदूतला फरक असा की निरींद्रीय मेंदू नियम, अलगोरिदम पाळून चालतो. माणूस तसं करत नाही. एकादी गोष्ट घातक आहे असं सांगितली तरी तो ती करतो.   तर्क आणि उपदेश दोन्ही धाब्यावर बसवून चक्रम निर्णय घेणं, चुका करणं  हे माणसाचं वैशिष्ट्यं आहे.

                                        हरारी

पुस्तकाचा शेवटला आणि सर्वात मोठा धडा डेटा रिलिजन,  माहितीचा धर्म करणं या विषयावर आहे. जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे माहितीचा एक तुकडा, इन्फर्मेशन बिट असतो असं जगानं ठरवलं आहे. या माहितीचा वापर करून  देवमाणूस तयार करण्याचा खटाटोप होतोय. माहितीवर नियंत्रण ठेवून काही मोजके देवपुरुष तयार होतील त्यांच्या द्वारे कॉर्पोरेशन्स समाजावर ताबा मिळवतील. समाजाचे दोन भाग होतील. एका भागात तुमच्या आमच्यासारखी बावळट आणि बिनकामाची कामगार मंडळी असतील, जी भावना वगैरेत गुंतलेली सामान्य, कमी जगणारी, दीर्घायुष्य नसलेली, प्रोग्राम्ड मेंदू नसलेली माणसं असतील. ती बहुसंख्य असतील. दुसऱ्या भागात असतील प्रोग्राम्ड मेंदूची कारखान्यात तयार केलेली माणसं आणि त्यांचा ताबा ज्यांच्याकडं आहेत अशी माणसं. एक नवी विषमता जन्माला येईल असं लेखक सुचवतो.

लेखकानं मानववंश इतिहास, तंत्रज्ञान, विज्ञान, बाजार, उद्योग, धर्म, संस्कृती इत्यादी क्षेत्रांचा एक विस्तृत पण धावता आढावा घेऊन वर्तमान आणि भविष्याचं चित्रं पुस्तकात चितारलं आहे. असंच चित्र काही वर्षांपूर्वी रे कर्झवेल या माणसानंही काढलं होतं.यंत्रं आणि मानव यांचं एकीकरण होईल, माणूस चारशे ते एक हजार वर्षं जगेल असं कर्झवेल यांनी लिहिलं होतं. जेरेड डायमंड यांनी माणसाच्या वाटचालीचा मागोवा बंदूक, पोलाद आणि रोगजंतू या कसोक्यांवर घेणारं एक पुस्तक लिहिलं होतं. कर्झवेल किंवा हरारी ही माणसं एकाद्या क्षेत्रातली निष्णात आहेत आणि बाकीच्या क्षेत्रातली माहिती गोळा करून एक सम्यक चित्र उभारतात.

हे पुस्तक लेखकाच्या मते  तत्वचिंतनात्मक पुस्तक आहे. सुखाच्या शोधात, समाजाचं नियंत्रण करण्याच्या खटपटीत धर्म आणि अद्यात्म या दोन शाखा निर्माण झाल्या. लेखक म्हणतो की या दोनही शाखांचा उपयोग करून माणसानं संस्था, चौकटी निर्माण केल्या. बुद्धानं अद्यात्म सांगितलं, बुद्धाच्या अनुयायांनी त्याचा धर्म केला, यमनियम सांगितले. लेखक एका ठिकाणी झेनचं अवतरण देतो. झेन म्हणाला की वाटेत जर बुद्ध भेटला तर त्याला ठार करा. झेनला म्हणायचं असतं की रस्त्यात भेटणारा बुद्ध म्हणजे एक संस्थाच असेल.अद्यात्म हा व्यक्तीगत मुक्तीचा मार्ग असतो, ती सामुहीक संस्था वगैरे नाही असं झेन म्हणत होता. लेखक म्हणतो की धर्माची चौकट घालून वाट लावायची माणसाची सवय आजही जिवंत आहे, माणसानं  माहिती-माहिती तंत्रज्ञानाचा धर्म केलाय.

।।

हरारी यांनी डियसच्या आधी  सेपियन्स हे पुस्तक लिहिलं.

सेपियनमधे हरारी माणसाची तुलना वानराशी करतात.  ते म्हणतात आपण सुधारलेले किंवा बदललेले वानर आहोत.  सिंह आणि शार्कना जगण्यासाठी अधिकाधीक क्रूर व्हावं लागलं तसं वानरही म्हणजे आजचे वानर सभोवतालचं जग नष्ट करत चालले आहेत. बनाना रिपब्लिकमधे हुकूमशहा आपल्याला नको असलेली माणसं मारून टाकतो, त्या खटाटोपात बहुसंख्य समाजाला गरीब ठेवतो, समाजातली केळी आणि खनिजांसारखी संपत्ती निर्यात करून राज्य चालवत असतो. वानर आणि माणूस आज तेच करतोय असं हरारी सेपियन्स या पुस्तकात म्हणतात.

हरारी सेपियनबद्दल म्हणतात की ते पुस्तक म्हणजे माणसाचा इतिहास नाहीये, ते पुस्तक म्हणजे तत्वचिंतन आहे, फिलॉसफी आहे. माणसाच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्या पुस्तकात केला आहे.

” मानवतेचं भविष्य काही चिमूटभर लोकांच्या हातात असणं ही गोष्ट मला चिंतेची वाटते. .. स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. माणसाला स्वातंत्र्य दिलंत  की तो समाजात अधिकाधीक विषमता निर्माण करत जातो.”

सेपियन्स हे पुस्तक खूप गाजलं होतं याचं एक कारण ते पुस्तक बराक ओबामानी वाचून त्याची प्रशंसा केली होती. झकरबर्गनही त्या पुस्तकाचं वर्णन आजचं सर्वश्रेष्ठ पुस्तक असं केलं होतं. त्यामुळं हरारी हे एकदम प्रकाशात आले. सोशल मिडियात त्यांना ३.८ कोटी अनुयायी मिळाले आणि आज जगभरच्या विश्वशाळात आणि शहरात ते भाषणं करत फिरतात. त्यांच्या या कीर्तीमुळंच डियस या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती, डियसच्या लक्षावधी प्रती खपल्या. सीएनेन, बीबीसीवर त्यांच्या पुस्तकाची चर्चा झाली, यु ट्यूबनं त्यांची भाषणं प्रसृत केली,ती भाषणंही लाखो लोकांनी पाहिली.

स्टीवन हॉकिंग यांचं ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम या पुस्तकानं प्रसिद्धीच्या वेळी नॉन फिक्शन पुस्तकाच्या खपाचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आजही ते पुस्तक जोरात खपत असतं. गंमत म्हणजे हरारी यांच्या पुस्तकाचं नावही सेपियन्स ए ब्रीफ हिस्टरी ऑफ मॅनकाईंड असं आहे. हॉकिंगच्या पुस्तकाचा रेकॉर्ड ते किंवा नंतरचं पुस्तक मोडतंय का ते पहायचं.

एकूण मानवी इतिहासाचा धावता आढावा लेखकानं दोन्ही पुस्तकांत घेतला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, लोकशाही, आधुनिकता इत्यादी गोष्टी माणसानं विकसित केल्या असल्या तरी एकूणात माणूस निसर्गाचा नाश करण्याकडं, स्वनाशाकडं चालला आहे असं लेखक सुचवतो. पण हेही मान्य करतो की तसंच घडेल असं नाही.

अलिकडं पर्यावरणाचा विचार करणारे अनेक विचारवंत म्हणतात की जग आता विनाशाकडंच चाललं आहे, फक्त नेमका दिवस तेवढा माहित नाहीये. मागं वळताच येणार नाही अशा दिशेनं माणसानं वाटचाल केली आहे असं या विचारवंतांचं म्हणणं आहे. समजा माणसानं प्रजा वाढवणं बंद केलं, कार्बन हवेत सोडणं बंद केलं, घातक वायू उत्सर्जन बंद केलं, जैविक विविधता पुन्हा जागेवर आणण्याचा प्रयत्न केला तरीही आजवर केलेल्या चुकांमुळं जगरहाटीला जे वळण मिळालं आहे ते थांबणार नाही, फार तर परवाचं मरण तेरवावर टाकता येईल असं या काहीशा निराशावादी माणसांचं म्हणणं आहे.

हरारी निराशावादी नाहीत. परंतू कोंडी कशा रीतीनं फुटू शकेल याचा विचार हरारी मांडत नाहीत.

माणसाच्या मेंदूचा विकास झाला आणि माणूस प्रती जग निर्माण करू लागला. माणूस स्वतःचा देव होण्याच्या मागे लागला. विनाशाकडं जाण्याची शक्ती ज्या मेंदूनं माणसाला दिली तोच मेंदू अधिक समंजस, शहाणा होणारच नाही असं कां म्हणावं ? विनाश समोर दिसत असताना, विनाशाची कारणं दिसत असताना माणूस विनाश रोखण्याचा प्रयत्न करणारच नाही असं कां म्हणावं? १९४५ नंतर माणसानं अणुशस्त्रं वापरलेलं नाही. कदाचित असलेली अणुशस्त्रं नष्ट करणं, अणूचा वापर टाळणं याकडंही माणूस वळेल. सूर्य,वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा वेग यांचा वापर करून शुद्ध ऊर्जा माणूस वापरू शकेल.

युवाल हरारीनी मध्ययुगीन लष्करइतिहास या विषयावर पीएचडी केलीय. तोच विषय ते येरुसलेम विश्वशाळेत शिकवतात.

हरारे गे आहेत. हरारे शाकाहारी आहेत, प्राणी मारणं त्यांना मान्य नाही. हरारेनी पीएचडी करत असताना दोन महिने विपस्यना केली.

।।

Homo Deus. A Brief History of Tomorrow

Yuval Noah Harari

Vintage.

 

 

 

 

 

 

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल वैज्ञानिक आहेत. अनुभव घेणं, त्या अनुभवातून शक्यता लक्षात घेणं आणि त्या शक्यतांचा वापर करून पुढील निर्णय घेणं ही वैज्ञानिक कार्यपद्धती मर्केल यांच्या अंगी मुरली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात.  अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात. सभोवतालची परिस्थिती जशी असेल म्हणजे जसा अनुभव आला असेल त्यानुसार मर्केल धोरणं ठरवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा भाग त्यांना सत्तेचा खेळ करताना उपकारक ठरतो.

अँगेला मर्केल चवथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलर झाल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विभागीय निवडणुकांमधे त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाला (सीडीयु) बरीच कमी मतं पडली होती. त्यामुळं निवडणुक लढवायची की नाही अशा गोंधळात मर्केल होत्या. त्यांची शंका खरी होती कारण संसदेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची पंधरा ते वीस टक्के मतं कमी झाली आणि त्यांच्या सत्ताधारी संयुक्त मोर्चाचं बहुमतही गेलं.  हिटलरचा पाडाव झाल्यानंतर जर्मन संसदेत पहिल्यांदाच आल्टर्नेटिव फॉर जर्मनी या नाझीवादी पक्षानं १३ टक्के मतं आणि ८८ जागा मिळवून संसदेत प्रवेश केला.

युरोपीय समुदाय टिकवणं आणि सीरिया इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या स्थलांतरितांना भरपूर प्रमाणावर स्वीकारणं या दोन मुद्द्यांवर लोकमत अंगेला यांच्या विरोधात गेलं आहे. स्थलांतरितांवर जर्मनांचा राग दिसतो. पूर्व जर्मनीतल्या जर्मनांना त्यांचा विकास होत नाही आणि बाहेरुन आलेले मात्र सुखी होताहेत असं वाटतंय. बऱ्याच जर्मनांना युरोपीयन युनियनच्या नादी लागू नये आपला जर्मनी हाच देश बलवान करावा असं  वाटतंय.

लोकमताचा हा कल लक्षात घेऊन मर्केल यांनी स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण आणायची तयारी दाखवली आहे. सत्ता मिळाली खरी पण ती टिकवण्याचा प्रयत्न मर्केल यांनी सुरू केला आहे, विरोधकांना समजून घ्यायची तयारी त्यांनी दाखवलीय.

तीन कारकीर्दींमधे जर्मनीची अर्थव्यवस्था विकसित करणं आणि युरोपियन समुदाय संघटित करणं हे मर्केल यांच्या कारकीर्दीचं मुख्य सूत्र होतं. जर्मनीनं स्वतःचा खिसा मोकळा केला, त्याच बरोबर ग्रीस, इटाली इत्यादी देशांना आर्थिक शिस्त लावायचा प्रयत्न केला. हे धोरण कितपत यशस्वी झालं याबद्दल जर्मनी आणि युरोपमधे मतभेद आहेत. परंतू जर्मन अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत राहिली, बेरोजगारी खूप कमी झाली, इन्फ्लेशन खूप आटोक्यात राहिलं हे त्यांच्या कारकीर्दीचं यश आहे.

या निमित्तानं मर्केल यांचं  व्यकिमत्व समजायला मदत होते.

अँगेला मर्केल प्रेस कॉन्फरन्समधे उभ्या होत्या. बुटक्या. फिकट बेज रंगाचं  अनाकर्षक जॅकेट.  एक पांढरं हेलमेट घातलंय असं वाटणारे डोक्यावरचे केस. संथपणे, एकाच लयीत, आवाजाचे कोणतेही चढउतार न करता, एकाच सुरात मर्केल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या.  एकाच पट्टीत, एकाच सुरात बोलत होत्या, कंटाळवाणं. सामान्यपणे त्यांचं म्हणणं पाच दहा मिनिटं ऐकलं की प्रेक्षकांना झोप येते. पण पत्रकारांना झोप येऊन चालणार नसतं, त्यांना काही तरी निश्चित असं हवं असतं. हेच जर मर्केल संसदेत बोलत असत्या तर संसदेतली अर्धी बाकं रिकामी झाली असती.

‘ तुमची खूप मतं विरोधकांनी खाल्लीत, तुम्ही अल्पसंख्य आहात मग सरकार कसं स्थापन करणार’

‘ तुमचा सहकारी सोशल डेमॉक्रॅट पक्ष तुम्हाला सोडून गेलाय, आता तुम्ही कोणाला बरोबर घेणार?’

‘ ज्यांच्याशी तुमचं भांडण आहे असे ग्रीन्स आणि फ्री डेमॉक्रॅट्स यांच्याशी तुम्ही जुळवून घेणार काय?’

‘ सत्ता  मिळवण्यासाठी तुम्ही इतर विरोधी पक्षातली माणसं फोडणार काय?’

असे प्रश्न राजकारणी माणसाला विचलित करतात, त्यांचं विचलित होणं त्यांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या आणि त्रासावरून दिसतं.  राजकारणी चिडतात, उलट उत्तरं करतात, उत्तर द्यायला नकार देतात.

मर्केल एकदम शांत. कुठंही ठाम कमीटमेंट न देणारी निर्विकार  उत्तरं येतात. निर्विकार चेहरा.

दोनेक तास कॉन्फरन्स चालते. पत्रकारांना किंवा टीव्हीवर ही कॉन्फरन्स पहाणाऱ्यांना भविष्यात काय होणारे याचा काहीही पत्ता लागत नाही.

एका प्रश्नाला उत्तर देतांना मर्केल म्हणाल्या की २०१७ ची संसदेची निवडणूक लढवायची की नाही याबद्दल त्या साशंक होत्या. कारण आधी झालेल्या स्थानिक संसदांच्या निवडणुकीत त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅट पक्षानं मार खाल्ला होता. पर्यायी जर्मनी या टोकगामी परतिरस्कारी ग्लोबलायझेशनला विरोध करणाऱ्या पक्षाला भरपूर मतं मिळाली होती. स्थलांतरीतांच्या संकटामुळं लोकक्षोभ वाढला होता आणि मर्केल यांची लोकप्रियता घसरत चालली होती.

मर्केल यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर जर्मनीतले अभ्यासक तज्ञ प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण करत होते. पर्यायी जर्मनीवादी (नाझीवादीही) हा उजव्या टोकाचा आणि सोशल डेमॉक्रॅट हा डाव्या टोकाचा पक्ष वाढले होते. मर्केल यांचा मध्यमार्गी ख्रिश्चन डेमॉक्रॅट हा पक्ष लोकांच्या नजरेतून उतरला होता. जर्मनीमधे लोकशाहीच धोक्यात आली होती, पुन्हा एकदा समाजवाद किंवा नाझीवाद जर्मनीत फोफावण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परंतू मर्केल यांना या बदललेल्या वातावरणापेक्षा सत्ता टिकवून धरण्याची चिंता असावी. मर्केल नेहमी दाट धुक्यात कार चालवत असतात. समोर फक्त पाच फुटापर्यंतचंच दिसत असतं. त्या पलिकडं काय आहे याचा विचार करून कार चालवणं मूर्खपणाचं असतं. पहिले पाच फूट, नंतरचे पाच फूट, नंतरचे पाच फूट अशा रीतीनं त्यांची कार पुढं सरकरते. धुकं संपेपर्यंत.

मर्केल यांनी थेरटिकल केमेस्ट्रीत डॉक्टरेट केली आहे. प्रयोगाला सुरवात करताना रसायनं, मॉलिक्यूल्स वैज्ञानिकाला माहीत नसतात. प्रयोग करून  वैज्ञानिक निष्कर्ष काढतो. निष्कर्ष निघाल्यानंतरही भावनांत न गुंतता वैज्ञानिक सिद्ध झालेल्या गोष्टी अमलात आणण्याच्या मागं लागतो.  घटकांचं रासायनिक वागणं वैज्ञानिक कसोट्यांवर निरखायचं, त्यात विकार येऊ द्यायचे नाहीत, नंतर ज्या शक्यता दिसतात त्यावरून निर्णय घ्यायचा. नंतर तो निर्णय शेडी तुटो वा पारंबी मोडो या निर्धारानं अमलात आणायचा.  ही वैज्ञानिक शिस्त मर्केल यांच्या राजकारणातही दिसते. राजकारणात पडायचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांनी राजकारण, प्रशासन, अर्थकारण याचा अभ्यास केला आणि त्यातून निघालेले निष्कर्ष त्या अमलात आणत राहिल्या.

१९७७ साली मर्केल यांच्याशी अँगेला यांचं लग्न झालं. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की या माणसाशी आपलं जमणं शक्य नाही. १९८१ मधे त्या घटस्फोट देऊन मोकळ्या झाल्या.

१९९० साली त्या ख्रिश्चन डेमॉक्रॅट या पक्षात त्या दाखल झाल्या आणि लगोलग त्या संसदेतही दाखल झाल्या. निवडून आल्यावर त्यांनी आनंदोत्सव इवेंट वगैरे केला नाही, वाच्यता केली नाही. आपला आनंद किंवा दुःख सार्वजनिक करायची सवय त्याना नाही. गप्प रहाणं, शांतता, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक महत्वाचं अंग आहे, म्हटलं तर ते हत्यारही आहे.

मर्केल त्यांचं अनाकर्षक असणं, अनाकर्षक बोलणं, शांत रहाणं  तत्कालीन पक्षाध्यक्ष आणि चॅन्सेलर हेलमुट कोल यांना आवडलं, उपयोगी पडलं. पुढाऱ्यांना अशी गप्प बसणारी माणसं आवडतात कारण ती आपले प्रतिस्पर्धी नाहीत असं त्यांना वाटतं. कोल मर्केलना ‘ मुलगी ‘ म्हणत, काहीसं उपहासानं, काहीसं त्या निरुपद्रवी आहेत असं दाखवत.

कोलनी मर्केलना एक अगदीच फालतू खात्याचं मंत्री केले. त्या खात्याच्या सचीवालाही वाटायचं की मर्केल एक फालतू बाई असून आपल्यामुळंच ती मंत्रीपद सांभाळू शकते. मर्केलनी पद घेतलं आणि काही तासातच त्या सचीवाला हाकलून दिलं. आपल्याला पाहिजे ती, आपल्या विश्वासातली माणसं निवडली.

कोलना वाटत होतं की आपण मर्केलसारख्या मुलीला नेमून आपला एक निरुपद्रवी अनुयायी तयार केलाय. पण वेळ आल्यावर मर्केल यांनी मुसंडी मारली. एका वर्तमानपत्रात लेख लिहून जगाला सांगितलं की कोल हे संदर्भहीन झाले आहेत, आम्हीच पक्ष पुढे नेणार आहोत. या लेखानं खळबळ उडाली, कोल यांना पक्षानं नेतृत्वातून रिटायर केलं. मर्केल पक्षाच्या अध्यक्ष झाल्या, चॅन्सेलरपदाच्या सत्ताशिडीवरच्या शेवटल्या पायरीवर त्या पोचल्या.

पदावरून दूर झाल्यावर एका समारंभात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या पत्रकारानं कोलना मर्केलबद्दलचं मत विचारलं. कोल म्हणाले ” मीच मर्केलला निवडलं. मी माझा खुनी निवडला. मीच माझ्या अस्तनीत साप ठेवला.”

२००५ साली संसदेची निवडणुक झाली. तेव्हां  सोशलिस्ट श्रोडर जर्मनीचे चॅन्सेलर होते.  एका ‘ मुलीनं ‘ कोल यांना दूर केलं म्हणजे त्यांचा पक्षच बावळट होता असं श्रोडर यांना वाटत असे. आपण स्मार्ट आहोत, आपल्याला दूर सारून ‘ मुलगी ‘ चॅन्सेलर होऊच शकत नाही असं ते म्हणत असत. ते मर्केलचे उल्लेख नेहमीच उपहासानं करत असत. एका पत्रकार परिषदेत मर्केलनी हुशारीनं   श्रोडरना सांगून टाकलं की ‘ त्यांचा पक्ष आता मागं पडलेला असल्यानं जर्मन जनता आता त्यांना सहन करणार नाहीये.’ श्रोडर यांचा पक्ष आणि मर्केल यांचा पक्ष सत्तेत जरी सहकारी असले तरी आपसात त्यांच्यात चढाओढ होतीच. त्याचा फायदा मर्केलनी घेतला. श्रोडर यांना हाकलण्यासाठी मर्केल यांच्या पक्षानं ‘ निरुपद्रवी मुलीला ‘ पाठिंबा दिला.

मर्केल यांची खेळी यशस्वी ठरली.पक्षातल्या इतरांना दूर सारून मर्केल चॅन्सेलर झाल्या. श्रोडर या कसलेल्या राजकारणी माणसाला सत्तेनं अव्हेरलं.  जर्मनीतली पहिली महिला चॅन्सेलर. पूर्व जर्मनीतून आलेली. दोन लग्न झालेली. सावत्र मुलं असलेली. जर्मनीतल्या कंझर्वेटिव समाजात हे मुद्दे माणसाला सत्तेपासून दूर ठेवतात.

अमेरिकेचे जर्मनीतले राजदूत जॉन कोर्नब्लुम यांनी मर्केल यांना जवळून पाहिलं होतं. कॉर्नब्लुम म्हणतात ” तुम्ही त्यांना आडवे गेल्यात तर मेलात. राजकारणात किती तरी दांडगे पुरुष त्यांना आडवे गेले आणि राजकारणातून फेकले गेले. ”

२००४ साली मर्केल यांच्या साठाव्या वाढदिवशी कंझर्वेटिव पुढारी मायकेल ग्लॉसनी पेपरात लिहिलं ” मर्केल एक जातीवंत शिकारी आहे. शिकार नेमकी केव्हां गाठायची ते तिला चांगलं कळतं. जेव्हां कोंबडा कोंबडीचा पाठलाग करत असतो तेव्हां तो बेसावध असतो हे मर्केलला माहित आहे. नेमक्या त्या क्षणांची वाट पाहून ती शिकार करते.”

चॅन्सेलरपदाच्या तीन कार्यकाळात मर्केल यांनी अनेक भूमिका बदलल्या. एकदा समलिंगी संबंधांना विरोध केला आणि नंतर पाठिंबा दिला. अणूऊर्जेला पाठिंबा दिला, विरोध केला. स्थलांतरीत हे जर्मन संस्कृतीला धोकादायक आहेत असं म्हटलं आणि नंतर त्यांनाच स्वीकारणारे कायदे केले. वेळ पाहून त्या निर्णय घेतात. अंतिम ध्येय सत्तेत टिकणं हेच असतं. त्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्यात आहे.

शेवटी राजकारण हा सत्तेचा खेळ तर आहे. त्या खेळात त्या वाकबगार आहेत.

।।