अली खामेनींचा खून होणार?
(टीप. इस्रायल-इराण युद्धातली स्थिती दर काही तासांनी बदलत आहे. मजकुरावरची शाई वाळते न वाळते तोवर स्थिती बदललेली असते.)
(दि. १८ जून)
इस्रायलनं इराणमधल्या सेंट्रीफ्यूज इमारतीवर हल्ला केला. सेंट्रीफ्यूज जमिनीखाली खोलवर होतं. खूप शक्तीशाली बाँब इस्रायलनं वापरला.
इराणनं तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमवर रॉकेटं सोडली, अनेक इमारती उध्वस्थ केल्या.
विमानं, क्षेपणास्त्रं, दोन्ही देशात खोलवर पोचलीत. याचा अर्थ विमानं,क्षेपणास्त्रं इत्यादी वाटेतच अडवणं, वाटेतच ती नष्ट करणं या दोन्ही गोष्टी दोन्ही देशाना पुरेशा जमत नाहीयेत. याचाच अर्थ इस्रायल इराण युद्धात खूप हानी होतेय, खूप माणसं मरताहेत. विश्वास ठेवावा असा आकडा मिळणं शक्य दिसत नाही.
।।
युद्ध कां सुरु झालं?
इराणकडील अण्वस्त्र तयारीची चौकशी आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संघटना करत होती. इराण माहिती देत नाहीये असा त्या संघटनेचा आरोप होता. समांतर पातळीवर इराणनं अण्वस्त्र तयार करणं थांबवावं हा मुद्दा घेऊन अमेरिका आणि इराणमधे वाटाघाटी चालल्या होत्या. वाटाघाटीच्या सहा फेऱ्या झाल्या तरी निर्णय होत नव्हता.
इस्रायलचं ठाम मत होतं की इराणनं अण्वस्त्राची तयारी पूर्ण केली असून कुठल्याही क्षणी इराण अण्वस्त्राचा वापर करेल. त्या स्थितीत इस्रायलचं अस्तित्वच संपण्याचा धोका होता. तसं इस्रायलचं म्हणणं होतं. त्यामुळं वाटाघाटी अनिर्णित स्थितीत असताना इस्रायलनं इराणवर हल्ला केला.
अमेरिकेतल्या चारपेक्षा अधिक इंटेलिजन्स संस्थांचं म्हणणं होतं की इराणकडं अण्वस्त्रं नाहीत, इराणला अण्वस्त्रं तयार करायला किमान दोन वर्षं तरी लागतील. अमेरिकेच्या सीआयएनंही इराणकडं अण्वस्त्रं नाहीत, तयार होण्याची शक्यता नाही असा रिपोर्ट दिला होता. ट्रंपनी आपल्या खास विश्वासातली व्यक्ती म्हणून तुलसी गॅबर्ड यांना इंटेलिजन्स प्रमुख नेमलं होतं, म्हणजे इंटेलिजन्स खात्याची मंत्री नेमलं होतं. गॅबर्डनंही इराणकडं अण्वस्त्रं नसल्याचा निर्वाळा दिला.
ट्रंप त्यांच्या शैलीत म्हणाले ‘गॅबर्ड काय म्हणतात तिकडं मी लक्ष देत नाही. इराणकडं अण्वस्त्रं आहेत हे मला माहीत आहे. मी माझ्या पद्धतीनं कारवाई करणारच.’
ट्रंपनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक कँप डेविड या रिसॉर्टवर बोलावली. तुलसी गॅबर्डना बैठकीला बोलावलं नाही. ट्रंप कँप डेविडमधे बसून होते. तिकडं व्हाईट हाऊसमधे शुकशुकाट होता. सामान्यतः जेव्हां हादरवणारी घटना घडते तेव्हां व्हाईट हाऊसमधे सिच्युएशन रूम सिद्ध होते.तिथं मंत्रीमंडळ, सर्वोच्च लष्करी अधिकारी गोळा होतात. तसला प्रकार ट्रंप यांच्या राज्यात घडत नाही. ट्रंप यांच्याभोवती माणसं गोळा होतात, ट्रंपचा कल माणसं पहातात आणि त्यांना हवे तेच निर्णय योग्य आहेत असं सांगतात.
मंत्रीमंडळातले सदस्य साशंक होते. अमेरिकेनं या युद्धात पडावं की नाही या बद्दल त्यांना शंका होती. अमेरिकन लोकांना युद्ध नकोय, अमेरिकन सैनिकांची प्रेतं प्लास्टिक बॅगमधून अमेरिकेत यायला नकोयत. तेव्हां जरा सांभाळून असावं असा सूर मंत्रीमंडळातल्या काहीनी लावला. पण ट्रंप चढ्या स्वरात बोलू लागले. इराणला धडा शिकवलाच पाहिजे, त्यासाठी कितीही किमत मोजावी असा पवित्रा त्यांनी घेतला. मंत्रीमंडळातल्या लोकांनी मान हलवली, सर तुम्ही म्हणता तेच योग्य आहे असं सांगितलं.
ट्रंप मोठी लढाई करू इच्छित नाहीत. त्यांची निवडणूक घोषणा आहे ‘अमेरिका प्रथम. अमेरिका परदेशात युद्धात पडणार नाही’. दुसरं म्हणजे ट्रंप हा डील करणारा माणूस आहे. इराणबरोबर डील करायचा त्यांचा विचार आहे. युद्धाची धमकी द्यायची आणि डीलवर सही करायला इराणला भाग पाडायचं असा त्यांचा विचार आहे.
पण नेतान्याहूंना युद्ध करायचंच होतं. इस्रायलमधे लाखो लोक रस्त्यावर येऊन नेतान्याहूना जाब विचारत होते. हमासनं हल्ला केला, हमासनं नेलेले ओलीस अजून परत आलेले नाहीत, नेतान्याहू अपेशी ठरलेले आहेत असं लोक रस्त्यावर येऊन म्हणत होते. साताठ पक्षांनी मिळून तयार केलेलं सरकार अस्थिर झालं होतं. अशा स्थितीत इराणविरोधात युद्ध उचकवणं येवढाच मार्ग त्यांच्यासमोर होता. इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे ही बकवास बात होती. इराणबरोबरचे तणाव जुनेच आहेत; इस्रायलनं लेबनॉन आणि येमेनमधल्या इराणी हस्तकांचा बंदोबस्त केल्यानंतर इराणचा धोका कमी झाला होता. अशा स्थितीत नवं युद्ध काढणं बरोबर नाही असं इस्रायलमधले लष्करी अधिकारी आणि पुढारी म्हणत होते. लढाई खरं म्हणजे नेतान्याहूंच्या अस्तित्वाची होती.
नेतान्याहूनी ट्रंपना सांगून टाकलं. अमेरिकेच्या निर्णयाची वाट आपण पहाणार नाही. अमेरिकेनं मदत केली नाही तर आपण एकट्यानं लढाई पुकारणार आहोत असं नेतन्याहू म्हणाले. ट्रंप, नेतान्याहू यांच्यातली चर्चा फार गरम असे, ट्रंप शिवीगाळ करत असत. पण नेतान्याहू बधले नाहीत.
आता निर्णय ट्रंपच्या अंगणात येउन पडलाय. इस्रायलच्या बाजूनं युद्धात उतरायचं की नाही? इराणनं धमकी दिलीय की अमेरिका युद्धात पडली तर इराण अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले करेल. इराणची लष्करी क्षमता अमेरिकेपेक्षा किती तरी पटीनं कमी आहे. पण इराणनं हल्ले चढवले तर अमेरिकेचं नुकसान होणं अटळ आहे. अमेरिकन सैनिकांच्या शवपेट्या अमेरिकेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं ट्रंप यांच्या मनात गोंधळ आहे.
नेतान्याहू म्हणताहेत की ते इराणचं प्रचंड नुकसान करणार आहेत पण तूर्तास इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना मारणार नाहीत. नेतान्याहू असंही म्हणालेत की खामेनी कुठं आहेत ते त्याना नीट माहीत आहे. इराणमधलं सरकार नेतान्याहूना पाडायचं आहे.
तिकडं ट्रंपही म्हणालेत की तूर्तास खामेनी यांना मारण्याचा बेत आम्ही आखलेला नाही.
गोष्टी आता या थराला गेल्या आहेत.
।।