इराणमधली अस्वस्थता
तेहरानमधील (इराणची राजधानी) चार विद्यापीठातले विद्यार्थी देशातल्या आर्थिक परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. इराणभरच्या विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. तेहरान,इशफाहान या शहरातले व्यापारी दुकानं बंद करून रस्त्यावर उतरले. वाढलेली महागाई असह्य झालीय असं एकूण लोकांचं मत दिसतंय.
मध्यम वर्गीय आणि गरीब इराणींच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. गेल्या वर्षभरातल्या महागाईत प्रथम चैनीच्या वस्तू खरेदी करणं बंद केलं, नंतर कपडे विकत घेणं थांबवलं, मग घराची भाडी थकवली, चटकदार खाणं संपवलं, आता दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही विकत घेणं बंद करायचं काय असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
काल परवाचं निमित्त होतं इराणी चलन घसरण्याचं. दोन दिवसात इराणी चलनाची किमत दुपटीनं घसरली. एक डॉलर १७४० रियाल होता तो परवा २९८८ रियाल झाला. इराणी लोकांना बाहेरच्या वस्तू खरेदी करणं आता परवडणार नाही. इराण तेलाच्या बाबतीत स्वतंत्र आहे पण बाकीच्या अनेक औद्योगीक वस्तू इराणला आयात कराव्या लागतात. त्या महाग होत आहेत.
दोन वर्षांपूर्वीही असंच आंदोलन झालं होतं, लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळचं कारण सांस्कृतीक होतं. जिना या स्त्रीनं इस्लामी धर्मवेड्यांनी ठरवलेले कपडे घातले नाहीत, केस नीट झाकले नाहीत या कारणास्तव इराणच्या सांस्कृतीक पोलिसांनी तिला अटक केली होती. तुरुंगात तिचा मृत्यू झाल्यानं स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या. इराणमधे एक जनरल पोलिस असतात आणि एक धार्मिक पोलिस असतात. इराणी माणूस धर्माचं पालन करतोय की नाही ( नमाज पढतो की नाही, स्त्रिया बुरखा घेतात की नाही इत्यादी) याची तपासणी सांस्कृतीक-धार्मिक पोलिस करतात. इराणची आर्थिक व्यवस्थाही धर्माचं पालन केलं नाही तर घसरते असं इराणी मुल्लांचं मत आहे.
जिनाच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनात स्त्रिया बुरखा न घालता रस्त्यावर आल्या, पोलिसांनी त्यांना तुलनेनं बरेपणानं वागवलं. तुलना खोमेनींच्या काळातल्या पोलिसांच्या वर्तनाशी.त्यांना गोळ्या घातल्या नाहीत. आता अनेक स्त्रिया बुरखा न घालता रस्त्यावर फिरतांना दिसतात, सरकार शिथील झालं आहे. परवाच्या आर्थिक असंतोषाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी अटका केलेल्या नाहीत, प्रेसिडेंट पेझेशक्यान यांनी आंदोलक विद्यार्थी व व्यापाऱ्यांना चर्चा करायला बोलावून घेतलं.
पेझेशक्यान पेशानं डॉक्टर आहेत, ते मुल्ला नाहीत. धर्मसंस्था हे त्यांचं बलस्थान नाही, धर्मपालन करणारा सेक्युलर माणूस हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे खोमेनींच्या काळात ज्या रीतीनं पोलिस वागत होते तसं वागायला पेझेशक्यान यांच्या काळात परवानगी नाही.
इराणमधे राजकारण आहेच. जिहादी लोक अजूनही सक्रीय आहेतच. त्यांनी प्रस्तुत आंदोलनं इस्लाम विरोधी आहेत असा प्रचार सुरु केला आहे. आंदोलकांना इस्रायलनं उचकवलं असून हा इराणची सत्ता हातात घेण्याचा इस्रायल-अमेरिकेचा प्रयत्न आहे असं त्या गटाचं म्हणणं आहे.
इराणची अर्थव्यवस्था बिकट आहे. इराणनं अण्वस्त्र करायला घेतल्यापासून इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष उद्बवला आहे. इराण अण्वस्त्र तयार करत असल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं इराणवर आर्थिक निर्बंध (सँक्शन्स) लादले, परिणामी इराणच्या निर्यातीवर परिणाम झाला, आयातही महाग झाली. इराणनं अण्वस्त्र निर्मिती करणार नाही असं सांगितल्यावर ते निर्बंध उठले. आता पुन्हा इराण अण्वस्त्रं तयार करत आहे असा आरोप ठेवून ट्रंप सरकारनं इराणवर पुन्हा निर्बंध लादले आहेत.
इस्रायलला इराणच्या अण्वस्त्रांची भीती वाटते. इस्रायल आणि इराण यांच्यातलं धार्मिक भांडण इतकं टोकाचं आहे की दोघंही एकमेकांना नष्ट करण्याच्या शपथा घेऊन बसले आहेत. अमेरिका आणि इस्रायल ही टोळी इस्रायलचा अणु कार्यक्रम नष्ट करण्याच्या खटपटीत असते. दोघानी मिळून इराणवर हल्ले करून इराणच्या अणुकार्यक्रमाच्या आस्थापनांची नासधूस केली आहे.
यात एक गंमत आहेच. अमेरिका, रशिया, फ्रान्स, भारत, पाकिस्तान इत्यादी लोकांकडं अण्वस्त्रं आहेत. कां तर त्यांना शत्रुला घाबरवण्यासाठी अण्वस्त्रं हवी आहेत. इस्रायलनंही गपचुप, बेकायदा पद्धतीनं अण्वस्त्रं केली आहेतच. या सर्वानी अण्वस्त्रं बाळगली तर चालतं पण इराणनं मात्र ती बाळगता कामा नयेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मुसलमानांनी ख्रिस्ती धर्म उधळून लावणं म्हणजे दुष्कृत्य, ख्रिस्ती लोकांनी इस्लाम उधळून लावणं हे पुण्यकृत्य; अशी मजा आहे.
अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांचा फटका इराणला बसला आहे. अमेरिकेशी वाटाघाटी करून इराण निर्बंघ दूर करण्याच्या प्रयत्नात सतत असतं. कधी ते जमतं कधी जमत नाही. ट्रंप हे देवाणघेवाण या तत्वानं चालणारे व्यापारी सत्तेत आल्यावर त्यांनी आपले दूत पाठवून इराणशी तोडपाणी करण्याचा प्रयत्न केला. इराणनं कमी संख्येनं अण्वस्त्रं करण्याचं मान्य केलं तर त्यांच्यावरचे निर्बंध कमी करता येतील असं ट्रंपच्या दूतांनी इराणला सांगितलं.
वाटाघाटी अंतिम टप्प्यावर आल्या असताना इस्रायलनं घोटाळा केला. ट्रंप आपल्याला अंधारात ठेवून इराणशी वाटाघाटी करतंय हे नेतान्याहूंना कळल्यावर त्यांनी ट्रंपना अंधारात ठेवून इराणवर हल्ले केले. इराणवरच्या हल्ल्याचं श्रेय नेतान्याहू घेताहेत याचा राग आल्यानं अमेरिकेनं इराणवर जबर हल्ला करून आपली ताकद दाखवली.
मध्य पूर्वेतलं राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचे फटके इराणला बसत आहेत. अमेरिकेनं या पूर्वी कधी इराणशी दोस्ती केली आहे,कधी दुश्मनी केलीय. सध्या दुश्मनीचा काळ आहे. याची किमत इराणी जनता मोजत आहे.
महागाई कमी करायची असेल,किमती कमी करायच्या असतील, रियाल सावरायचा असेल, तर त्यासाठी व्यापक राजकारणाचे ताणेबाणे इराणला सांभाळावे लागतील. पेझेशक्यान हे गरम डोक्याचे जिहादी नाहीत. पण इराणमधे अजूनही जिहादींचा प्रभाव असल्यानं पेझेशक्यान याना सांभाळून पावलं टाकावी लागतात. त्यांची तारेवरची कसरत किती यशस्वी होईल?
।।