कवट्या, हाडं…
शीर्षक सुचेना
इथे कवट्या मिळतील. ५०० पाउंडांपासून किमती आहेत.
इथे माणसांचे दात मिळतील. ८ पाऊंडांपासून किमती सुरु होतात.
इथे माणसाचा पूर्ण सांगाडा मिळेल. १००० पाऊंड किंमत पडेल.
माणसांच्या पायाची हाडं, मनगटाची हाडही इथे मिळतील.
बोटंही मिळतील.
इसेक्स (इंग्लंड) या शहरात ‘क्युरियॉसिटी फ्रॉम फिफ्थ कॉर्नर’ या एका दुकानाबाहेर वरील पाटी लावलेली आहे.
नाना प्रकारच्या कवट्या कपाटातल्या काचेमागं या दुकानात दिसतील. ओळखताही येणार नाहीत असे प्राण्यांचे हाडांचे सांगाडेही तिथं टेबलावर विकायला ठेवलेले दिसतील. म्युटेशन होऊन किंवा संकर होऊन मिश्र प्राणी तयार होतात, त्यांचे सांगाडे इथे तपशीलवार वर्णनासह ठेवलेले दिसतील.
टेबलावर एक काचेचं भांडं दिसेल. त्यात मॉर्फिनसारखं काही तरी द्रव्य आहे आणि त्यात मुठीच्या आकाराची दोन बाळं एकमेकाला चिकटलेली दिसतील. गर्भात ती एकमेकाला चिकटली होती, तशीच ती बाहेर आली.
एका वाडग्यात दात दिसतील.
माणसांचे अख्खे सापळे इथे भिंतिला टेकून उभे असलेले दिसतील.
हेन्री स्क्रॅग हा मालक दुकानात तुमचं स्वागत करेल. जटा झालेले केस. लांब अव्यवस्थित गुंता झालेली दाढी. कित्येक दिवस न धुतलेले कपडे. मळलेली, आकार हरवलेली बौलर हॅट.
दुकान एकोणिसाव्या शतकातलं आहे असं वाटतं, पण दुकान एकविसाव्या शतकातलंच आहे. गेल्या आठ दहा वर्षातलं.
हेन्री हा मुळात शेतकरी. एके दिवशी त्यानं वर्तमानपत्रात जाहिरात वाचली-कवट्या विकत मिळतील. हेन्रीनं मागणी नोंदवली. एके दिवशी दुपारी त्याच्या दारात एक खोका येऊन पडला. त्यात १२ कवट्या होत्या. भंकस म्हणून मागवलेल्या या कवट्यांचं करायचं काय? हेन्रीनं दुकान काढायचं ठरवलं.
ही त्याच्या व्यवसायाची सुरवात.
म्युझियमना सांगाडे हवे असतात. मेडिकल कॉलेजमधे ॲनाटॉमी शिकवण्यासाठी सांगाडे आणि हाडं हवी असतात. हेन्री ती पुरवू लागला. सांगाडे आणि हाडे तो विकत घेऊ लागला.
हेन्री सांगाडे विकतोय असं म्हटल्यावर लोक सांगाडे घेऊन येऊ लागलं. सांगाडे कुठून आणलेत याची चौकशी हेन्री करत नसे. बातम्या येऊ लागल्या की चर्चच्या प्रांगणातल्या कबरीतली प्रेतं नाहिशी होऊ लागलीत. एका चर्चमधे सांगाडे, कवट्या इत्यादी गोष्टी जपून ठेवल्या होत्या. दरोडेखोरांनी कवट्या आणि हाडं पळवली. पोलीस तपास करू लागले. पोलिस हेन्रीच्या दुकानात पोचले. हेन्रीचं म्हणणं होतं की नवी घरं बांधताना पायासाठी जमिनी खोदतात, त्यात सांगाडे सापडतात.
दोन गोष्टी समांतर घडू लागल्या होत्या. हेन्री कवट्या विकत होता आणि कवटी ही एक शोभेची वस्तू म्हणून कपाटात ठेवायची फॅशन सुरु झाली होती. वरून सर्व कवट्या सारख्याच दिसतात. पण प्रत्येक कवटी वेगळी असते. एकादी कवटी सुंदर स्त्रीची असू शकते, एकादी कवटी बलदंड माणसाची असू शकते. काय असेल ते असेल. माणसं दुकानात जाऊन चांगल्या आकाराचे आंबे निवडावेत तसं कवट्या निवडू लागले.
वस्तूंची किमत केव्हां वाढते? जेव्हां वस्तू दुर्मिळ असते, तिच्यात काही तरी विशेष वेगळेपण असतं. हेन्रीनं दुकानात एक कवटी ठेवली. त्या कवटीला एक मोठं भोक होतं. हेन्रीचं म्हणणं असं की हज्जारो वर्षांपूर्वी माणसानं एक वैद्यक शास्त्र विकसित केलं होतं. व्याधी दूर करण्यासाठी माणसाच्या कवटीला छिद्र पाडून आत औषधं सरकवत किंवा शस्त्रक्रिया करत. तसं त्यानं कुठं तरी वाचलं होतं. ही कवटी त्या काळातली होती असं हेन्रीचं म्हणणं.
त्या कवटीवर हेन्रीनं किमतीचं लेबल लावलं नाही. कवटीचा लिलाव होणार. कोणीतरी धनाढ्य माणूस ती कवटी पाच पंचवीस करोड देऊन विकत घेणार. पाच पन्नास करोड रुपये खर्च करून खरीदलेल्या पेंटिंगच्या शेजारी तो ही कवटी खुंटीवर टांगणार. येणाऱ्या जाणाऱ्याला कौतुकानं या कवटीचं वैशिष्ट्यं सांगणार. ही कवटी कोणी चोरू नये यासाठी कॅमेरा लावणार आणि चार दोन सशस्त्र पहारेकरी संरक्षणासाठी बसवणार.
हेन्रीकडं आणखी एक कवटी होती. या कवटीच्या डोळ्यांच्या खाचेत कवड्या होत्या आणि नाकाच्या पोकळीत धातुची वळी होती. हेन्रीचं म्हणणं असं की ही कवटी म्हणजे एका नायजेरियन जमातीत वापरली जाणारी हॅट आहे, फेटा किंवा टोपी आहे. त्या जमातीत कवड्या मौल्यवान आणि भाग्यवान मानल्या जातात, म्हणून त्या कवटीच्या खाचेत ठेवलेल्या आहेत; नायजेरियन जमातीतले प्रतिष्ठित लोक विशेष प्रसंगी, समारंभात ही कवटीहॅट वापरतात.
हेन्रीचा वेबसाईट आहे. त्यावर ही हॅट परवापरवा पर्यंत दिसत होती.तिचाही लिलाव होणार आहे. या हॅटचा एकूण सांस्कृतीक इतिहास पहाता धनाढ्यातले वरचढ धनाढ्य ही हॅट विकत घेतील. काही दिवसांनी गौतम अदानी ही हॅट घालून अनंत अंबानीच्या वनतारात नवीन हत्तीचं स्वागत करण्यासाठी जातील.
कबरीतून बाहेर काढलेल्या प्रेतांचे दात ही गोष्टही आता मौल्यवान झालीय. दातांची पेंडंट, दातांच्या माळांची फॅशन काही दिवसांनी सुरु होईल यात शंका नाही. क्लिओपात्राचे दात कोणाला तरी मिळतील, मेरिलिन मन्रोचे दात कोणी तरी हुडकून काढेल. निदान तसा दावा तरी करेल. मग काय विचारता. क्लिओपात्रा दंत गळेहार, किमत नऊशे करोड डॉलर वगैरे.
हेन्रीचं दुकान अगदीच झ्यांगड आहे. अमेरिकेत अनेक शहरांत हाडं, कवट्या विकणारी पॉश दुकानं उभी राहिलीत. करोडो डॉलरचा धंदा ही दुकानं करतात.
टक्कल पडलेला माणूस कंगवा विकत घेतो, तोंडाचं बोलकं झालेला माणूस टूथपेस्ट विकत घेतो, एस्किमो फ्रीज विकत घेतो, आंधळा चष्मा विकत घेतो.
वस्तूचं बाजारातलं मोल वाढवण्याची कला म्हणजे मार्केटिंग.
हा लेख लिहिला खरा. पण त्याला शीर्षक काय द्यावं ते सुचेना. वाचकांनीच शीर्षक सुचवावं.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर जावे.