किंचाळी क्लब

किंचाळी क्लब

किंचाळी क्लब, किंचाळी चळवळ 

लंडनच्या हाईड पार्कमधे दुपारचे तीन वाजत होते. दोन बायका आल्या. दोन तीन पुरुष आले. आणखी बायका आणि पुरुष आले. तीनच्या ठोक्याला सर्व जण किंचाळू लागली. पोटाच्या तळातून आवाज काढत होती, आकाशाला भेदायला निघालाय असा ऊंच स्वर. आवाज पूर्ण लागावा म्हणून कमरेत वाकून ताठ होत होत किंचाळत. 

जेमतेम मिनीटभर.किंचाळ्या थांबल्या, सर्व जण हसू लागले. पोट धरधरून हसू लागले.

पार्कमधे फिरायला आलेल्या लोकांना काय चाललंय ते कळेना. किंचाळतात काय, हसतात काय. लोकांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. पुढे सरकले.

क्लबात जमलेल्या प्रत्येकाकडं सेलफोन होता. सर्वांनी टिकटॉक करून नेटवर टाकलं. टिकटॉक व्हायरल झालं.

आता पेवच फुटलंय. अमेरिकेत, ब्रीटनमधे, युरोपात, किंचाळी क्लब स्थापन झालेत. काही क्षण एकत्र यायचं. किंचाळायचं, आपापल्या कामाला परतायचं. ‘किंचाळण्याआधी भरपूर पाणी पिऊन घ्या. पूर्ण ताकदीनिशी किंचाळा. चक्कर आली तर थोडंसं थांबा, किंचाळी पूर्ण करा.’ हे किंचाळीचं शास्त्र आहे. 

एक विद्यार्थिनी होती. अभ्यासाचं, परिक्षेचं खूप टेंशन असे. टेंशन असह्य झालं की तिला किंचाळावंसं वाटे.  ‘किंचाळले तर आईवडील घाबरतील. शेजारी घाबरून काय झालंय असं विचारू लागतील. कुणी तरी फोन करून पोलिसांना खबर करेल. स्त्रीवर अत्याचार  होतोय असं समजून पोलीसांच्या गाड्या वाँववाँव करत येतील. नकोच ते.’  किंचाळी टिकटॉक तिनं पाहिला, हाईड पार्कमधे दाखल झाली. 

क्लबाची फी नाही. इतके लाख आजीव मेंबरशिप, तितके हजार महिन्याची फी, एका दिवसासाठी   इतके रुपये, असली भानगड नाही. क्लबात मॅनेजमेंट कमिटी नाही, आपसातल्या मारामाऱ्या नाहीत. कॉर्पोरेट मेंबरशीप नाही. क्लबला इमारत नाही. काहीही नाही. बस, भरपूर पाणी पिऊन या, किंचाळा, घरी जा. बस.

एक तरुण मुलगी आणि तिची आई, दोघीही किंचाळ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. घरी भांडत्या तर घरच्या लोकांची पंचाईत झाली असती. पार्कात येऊन किंचाळून घेतलं, मोकळ्या झाल्या. घरी गेल्या की मोकळेपणानं वावरायला मोकळ्या.  

हाईड पार्कमधे किंचाळायला कोणाची परवानगी लागत नाही, त्यावर जीएसटी लागत नाही. एक खोका बगलेत मारून हाईड पार्कमधे जा. खोका जमिनीवर ठेवून त्यावर उभे रहा. बोलायला सुरवात करा. काहीही बोला, कोणाही बद्दल बोला. बंधन नाही. पाच पन्नास लोक गोळा होतात. ऐकतात. निघून जातात. 

तुमच्यापासून पन्नास फुटावर आणखी एक माणूस उभ्या उभ्या बोंबलत असतो. सरकारच्या नावानं ठणाणा करत असतो. एक कोंडाळं त्याचं बोलणं ऐकत गंभीरपणे उभं असतं. त्यातला एकादा ‘ काय चूत्या आहे’असं म्हणत, हसत हसत, त्या कोंडाळ्यातून निघतो, दुसऱ्या  कोंडाळ्याकडं सरकतो.

सोळाव्या शतकात कुण्या ब्रिटीश राजानं उभ्या केलेल्या या विस्तीर्ण मैदानात एके काळी उमराव लोक ड्युएल (द्वंद्व युद्ध) करायला येत.  कुठल्या तरी मुद्दयावर वाद झालेला असतो. निर्णय कसा करायचा?  तलवारी घेऊन हाईड पार्कमधे जायचं. लढायचं. जो मरेल किंवा जखमी होऊन लढाई सोडेल, तो हरला.

श्रीमंत माणसांकडं पैसे असतात. निवडणूक लढवतात. विधानसभेत जातात. तिथं बोंबलत बसतात, आपापली खाजगी भांडणं काढून एकमेकावर चिखल उडवतात. ही करमणूक  पेपरात येते, टीव्हीवर दिसते, सामान्य माणसाला एक छदामही न खर्च करता करमणूक मिळते.  धनिक आणि फाटके अशा दोघांचीही सोय. मोफत करमणूक.

कोणाला आपली दुःखं आणि व्यथा व्यक्त करण्यासाठी कविता करावी लागते. ती छापावी लागते. कविता संग्रह कोणी विकत घेत नाही, वाचत नाही. तो माणूस आणखी दुःखी होतो, आणखी कविता करतो.

कोण कादंबरी लिहितो, कोण नाटक लिहितो. कोणाची खाज जास्त भारी असते; कलाकार आणि पैसे गोळा करण्याची क्षमता असते. तो माणूस आपली व्यथा सिनेमा काढून व्यक्त करतो. तेवढं पुरेसं वाटलं नाही की तो कधीकधी आत्मचरित्र लिहितो.

जाच्याकडं रिसोर्सेस नाहीत त्यानं आपलं दुःखं, व्यथा  कशा व्यक्त करायच्या?

मुंबईतली एक घटना. अगदी घडलेली, फार लोकांनी पाहिलेली. बोरी बंदर स्टेशनाचा चौक होता. संध्याकाळची पाच साडेपाचची वेळ होती. रस्ते खचाखच भरलेले होते. वाहनं हॉर्न वाजवत होती. कार कुंथत  कुंथत संथ गतीनं सरकत होत्या.

अचानक रस्त्याच्या मधोमधे एक तरूण तरुणी आले. समोरा समोर उभे राहिले, भांडू लागले.  प्रेमातलं प्रकरण असावं. मुलानं दगा दिला असावा, मुलगी इरेस पेटली असावी, तिच्या आयुष्याचा प्रश्न असावा. ती किंचाळत तरूणासमोर उभी होती. तावातावानं बोलत होती. तरूणाला काही तरी सांगत होती. तरूण तिला दूर सारून निघून जायचा प्रयत्न करत होता. ती त्याला अडवून उभा करत होती. 

आसपास इतका कोलाहल होता की ती काय बोलतेय ते कळत नव्हतं, आकांत दिसत होता.

वाहतूक थांबली. पुढेमागे आणि बाजूच्या कार थांबल्या. बसेस थांबल्या. कार, बसमधले प्रवासी खिडक्यांतून वाकून हे नाट्य पहात होते. तीनचार मिनिटांचा मामला  असेल. पहाणारी माणसं अवाक झाली असावीत. त्या मुलीला कसं सांगणार की बाई ग तुझं म्हणणं खरंही असेल पण घरी जाऊन भांडा नाही तर पलिकडच्या रेस्तराँमधे जा. कोणाही प्रवाशानं कारमधून उतरून त्यांना समजावलं नाही. पोलीस दूरवरून पहात होता, तोही  थक्क, गप्प. 

शेवटी दोघांमधे काय ठरलं ते कळायला मार्ग नाही. दोघं जण कारच्या रांगांमधून  वाट काढत रस्ता ओलांडून नाहिसे झाले.

वाहतूक आणि लोकांचं जगणं सुरु झालं.

काही वर्षांपूर्वी हास्य क्लब निर्माण झाले होते.

आता किंचाळी क्लब.

।।

निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com  या  वेबसाईटवर जावे.

Comments are closed.