चर्च चाललं
चर्च निघालं
स्वीडनमधे किरूना किरका (Kiruna Kyrka) या गावात १९१२ साली एक लुथेरन चर्च बांधलं होतं. लाकडी बांधकाम. चर्चमधे २००० पाईप्सची प्रचंड ऑर्गन आहे. हे चर्च पाच किमी अंतरावर हलवण्यात आलय.
चर्चचं वजन ६६७ टन आहे. काँक्रीटच्या पायावर ते उभारलेलं आहे. पायापासून वरचं स्ट्रक्चर वेगळे करण्यात आलंय. वरची इमारत वेगळी केल्यानंतर पाया व इमारत यांच्यामधे निर्माण झालेल्या स्पेसमधे उभ्या आडव्या पोलादी तुळयांची चौकट तयार करून त्यावर इमारत ठेवण्यात आली. इमारत खालच्या तुळयांसकट उचलून अनेक चाकांच्या ट्रकवर ठेवण्यात आली.
भलामोठा ट्रक सरकू शकेल इतक्या रुंदीचे रस्ते बांधण्यात आले. तासाला अर्धा किमी या वेगानं आता चर्च निघालं. दोन दिवसात ते नियोजित ठिकाणी पोचलं,
गोगलगाय एका तासात ५० मीटर जाते. चर्च तासाला ५०० मीटर चाललं.
२०१२ साली गावापासून काही अंतरावर एक खाण प्रकल्प सुरु झाल्यानं चर्च हलवावं लागलं. जमिनीखाली खणण्यामुळं सभोवतालच्या जमिनीला धक्के बसतात, जमिनीवरची बांधकामं खिळखिळी होतात.
चर्च हलवण्याला ५ कोटी डॉलर खर्च होणार आहेत.
चर्च हलवणं सोपं आहे. लाकडी चर्च एक प्रकारे सलग, इंटिग्रेटेड आहे.
इजिप्तमधे प्राचीन बांधकामं उचलायचा प्रश्न आला तेव्हां तंत्रज्ञांची कसोटी होती. दगडी बांधकामं होती. हज्जारो वेगवेगळ्या आकाराचे दगड, विटा एकमेकाला जोडून बांधकाम उभं राहिलं होतं. छप्पराची रचना अनेक तुकड्यांना एकत्र करून केलेली होती. बांधकाम उचलण्याचा प्रयत्न केला की ते मोडणार होतं. बांधकाम पायापासून वेगळं करणंही अशक्य होतं.
तंत्रज्ञांनी मार्ग काढला. बांधकामातली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक कमान व इतर घटकांना क्रमांक देण्यात आले, त्यांची जागा निश्चित करण्यात आली. चित्रपटात शॉट्स घेतात, अनेक शॉटचा मिळून एक सीन तयार होतो, अनेक सीन एकमेकाला जोडून चित्रपट तयार होतो. शॉट, सीन यांचं नियोजनपूर्वक संकलन केलं की चित्रपट तयार होतं. नेमकं तेच इजिप्तमधल्या प्राचीन इमारतींच्या बाबतीत करण्यात आलं. दगड विटा सुट्या केल्या आणि नंतर त्या पुन्हा जुळवल्या.
स्वीडिश चर्चमधे इमारतींच्या खिडक्या,दारं,तुळया,फरशी, छत, भिंती सुट्या करून पुन्हा एकत्र करण्याचं तंत्र वापरावं लागलं नाही कारण पूर्ण इमारत अखंड उचलणं शक्य झालं.
ग्रीस, सीरिया,इराक इत्यादी ठिकाणी चार पाच हजार वर्षं जुन्या इमारती आहेत, त्या ठीकठाक करणं, हलवणं याचा विचार चाललाय.
अमेरिकेत, न्यू यॉर्कमधे, अमेरिकेचे नेते वॉशिंग्टन यांचा भव्य पुतळा होता. समुद्र किनाऱ्याच्या जवळ. पुतळा उभारला तेव्हां त्या जागेच्या आसपास खूप मोकळी जागा होती. न्यू यॉर्क तेव्हां मोठं शहर झालेलं नव्हतं, एका गावांचा समूह होता.
एकविसावं शतक उजाडलं. न्यू यॉर्क कायच्या काय मोठं झालं. पुतळा उभा होता त्या परिसरात बँका, कॉर्पोरेन्स, फायनान्स कंपन्या इत्यादींची ऑफिसं आली. जागेची किमत वाढत गेली. एकेक चौरस फूट जागाही हज्जारो डॉलरची झाली. पुतळा खूप जागा खात होता. पुतळा हटवून ती जागा एकाद्या श्रीमंत उद्योगाला दिली तर तो उद्योग तिथं करोडो डॉलर मिळवणार होता.
पैसा की संस्कृती? पैसा की इतिहास? पैसा की प्रतिकं? पुतळा की बँक? असे पेच उभे राहिले. हिंदी सिनेमात प्रेम की कर्तव्य असा पेच उभा करून पूर्ण चित्रपट त्याभोवती रंगवतात.
सरकारनं निर्णय घेतला की पुतळा हलवायचा. पुतळा दूरवर पण चांगल्या ऐसपैस जागी नेण्यात आला. नव्या जागी पुतळ्याच्या आसपास उत्तम उद्यान उभारण्यात आलं. मोकळी जागा कमर्शियल वापरासाठी वापरण्यात आली. पेपरात पाच पन्नास पत्रं आली, लेख छापून आले. पण तिथंच थांबलं. आंदोलन झालं नाही, गोळीबार झाले नाहीत.
वॉशिग्टनचा पुतळा किंवा लाल किल्ला किंवा दोन हजार वर्षांपूर्वीचं मंदीर हे मामले वांध्याचे असतात. फार भावना गुंतलेल्या असतात.
झाडाखाली एका दगडाला शेंदूर फासलेला असतो, त्या दगडाला एक आडोसा तयार केलेला असतो. या आडोशाला मंदीर असं म्हटलं जाऊ लागतं. साधा दगड देव होतो, त्यात भावना व श्रद्धा गुंततात.
रस्ता रुंद करायचा असतो. परिसरात नव्या इमारती बांधायच्या असतात. ते झाड आणि मंदीर आड येतं. बखेडा निर्माण होतो. त्या ठिकाणची लोकं कशी आहेत, राजकीय वातावरण काय आहे, तिथले पुढारी काय प्रतीचे आहेत यावर त्या झाडमंदिराचं भवितव्य अवलंबून असतं. प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. निवडणुकीत ते प्रकरण वापरलं जाऊ शकतं.
किरुना गावात खाण प्रकल्प सुरु झाल्यावर आंदोलन उभं राहिलं.लोक गाव सोडायला तयार नव्हते. त्यांनी नव्या जागी जाण्याचे पैसे मागितले. सरकारनं ते दिले. नवं गाव चांगलं करा अशी मागणी झाली. सरकारनं तीही मान्य केली.
किरूना गावाच्या परिसरात चांगलं जंगल होतं, त्यात सांबरं खूप होती. सांबरांच्या भोवती एक अर्थव्यवस्था, एक पर्यावरण व्यवस्था तयार झाली होती. ती व्यवस्था विस्कळीत होणार होती, मोडणार होती. सरकारनं पर्यायी व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं.
खाणीमुळं मिळणारं उत्पन्न येवढं असणार की घरं, जंगल, चर्च इत्यादी सर्व नव्यानं उभं करण्यासाठी लागणारा दोन तीन अब्ज डॉलरचा खर्च परवडेल. तो हिशोब मांडूनच सारा खटाटोप सुरु झाला.
काळ पुढं सरकतोय. माणसांच्या गरजा बदलत आहेत, गरजा वाढत आहेत. जुनं जाणार, बदलणार. नवं जग तयार होणार.
नवं जग उभं राहिल्यावर लोक सुखी समाधानी होतील?
।।