चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग
चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग
बियॉन बोर्गचं ‘हार्टबिट्स’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय.
बियॅान बोर्ग आठवतोय?
टेनिस पर्वताचं एव्हरेस्ट शिखर. ओळीनं सहा वेळा विंबल्डन जिंकला. ओळीनं सहा वेळा फ्रेंच ओपन जिंकला. जगातले सर्व चषक जिंकले. करियरच्या टॅापला असतांना वयाच्या २५ व्या वर्षी, १९८१ साली, बोर्गनं टेनिस सोडलं.
सोडलं म्हणजे सोडलंच.
कंटाळला होता. घराच्या किंवा हॉटेलच्या बाहेर पडला की पत्रकार, फोटोग्राफरचा गराडा पडे. सतत पाच पन्नास वह्या सहीसाठी समोर असत. जणू जगाच्या गॅलरीत ठेवलेलं पेंटिंग. पेंटिंगला कधी खाजगी आयुष्य नसतं. कायम लोकांच्या नजरेत. नको ते टेनिस असं म्हणून निवृत्त झाला.
वडील आणि मित्र म्हणाले असं नको करूस. मॅकेन्रो हा बोर्गचा प्रतिस्पर्धी. कोर्टावर जीवघेणा संघर्ष, कोर्टाबाहेर जिवाभावाचा दोस्त, हितचिंतक. तोही कळवळला, नको रे खेळ सोडू, खेळ हा तुझा प्राण आहे, असं म्हणाला.
खेळ सोडला तर पुढं काय करायचं याचा विचार बोर्गनं केला नव्हता. एक गोष्ट डोक्यात घेतली की तीच करायची. कधीही तोल न जाऊ देणारा, कधीही भावनेच्या आहारी न जाणारा. कधीही मोहाला बळी न पडणारा. टेनीसचा मोह सोडला. टेनीसचं प्रेम विसरला. थंडपणे टेनिस सोडलं.
एक पोकळी झाली. ड्रगमधे अडकला. ड्रग काम करेनासं वाटलं की अल्कोहोल. आलटून पालटून ड्रग आणि अल्कोहोल. पार्ट्या. मैत्रिणी. लग्न, नवं लग्न. बोर्ग स्वत:ला शोधत होता.बोर्गनं त्याची परिचित जमीन सोडली होती, नव्या जमिनीत रुळत नव्हता.
एकदा घरातच बेशुद्ध झाला.
एकदा रात्री भरपूर ड्रग झालं, दुसऱ्या दिशी मॅच खेळायला गेला.सोबत वडील होते.कोर्टावर कोसळला, बेशुद्ध पडला. अॅंब्युलन्स वेळेवर आल्यानं हॅास्पिटलमधे वेळेवर पोचला. शुद्धीवर आला तेव्हां शरीरात जागोजागी नळ्या खुपसलेल्या होत्या. डॅाक्टर म्हणाला,मरणाच्या दारातून परत आलास. समोर हताश वडील होते.
नव्या रुपातला बोर्ग मी नाहीच हे बोर्गला समजलं. या नव्या बोर्गमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं उपचार घेतले, पुनर्वसन केंद्रात जाऊन राहिला.
त्याला कळलं. खेळ आणि खेळातली माणसं हेच आपलं जग आहे. बोर्ग पुन्हा खेळायला लागला. आता त्याचं तारूण्य संपलेलं होतं. पूर्वीसारखं तो विंबल्डन खेळू शकत नव्हता. आता जिकण्यासाठी खेळायचं नाही, खेळातली गंमत अनुभवण्यासाठी खेळायचंय अशी खूणगाठ बांधून तो खेळू लागला. तरूण खेळाडूंसोर पराभव होत असे. ६-२, ६-२, ६-३ असा दणदणीत पराभव होत असे. पण बोर्ग खुष होता.
बोर्गच्या आयुष्यातली ही वळणं पेपरात आली नाहीत. बातमीदारांना ती सापडली नाहीत की बातमीदारांनी तीबोर्गच्या प्रेमाखातर लपवून ठेवली ते कळायला मार्ग नाही. एकदाचएका पेपरानं ड्रगची बातमी दिली. बोर्गनं बदनामीचा खटला भरला. बोर्गला ६ हजार डॅालरची भरपाई मिळाली. बोर्ग गेली ४६ वर्षं चुप होता. जगाला, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना, खेळाडूना वाटे की बोर्गनं लिहावं. बोर्गनं दाद दिली नाही.
दोन वर्षांपूर्वी बोर्गमधे प्रोस्टेट कॅन्सर सापडला. कॅन्सर गंभीर होता. शस्त्रक्रिया झाली. बोर्ग ठीक झाला. बोर्ग म्हणाला ‘माझ्या रक्तात कॅन्सरचा जंतू आहे, सध्या झोपलाय, केव्हां जागा होईल ते सांगता येत नाही.चिंता कशाला करायची?’ बोर्ग व्यायाम करतो, अनेक मैल चालतो, जणू त्याला उद्या विंबल्डन खेळायचंय.
बोर्ग म्हणतो ‘मला एकदा सारं सांगून टाकावंसं वाटलं. मी इतकी वर्ष माझ्या पाठुंगळीवर माझ्या गुन्हे आणि चक्रम जगण्याचं ओझं वहात होतो. सारं काही मनात होतं. आता आत्मचरित्र लिहून ते ओझं मी उतरवतो आहे.’
बोर्ग सांगतो ‘मी वरून शांत होतो.पण माझ्या आतमधे धगधगता ज्वालामुखी असे. तो नियंत्रित करायला मी शिकलो. त्यामुळंच मला यश मिळालं.’
लहानपणी बोर्ग फार ज्वालाग्राही आणि तापट होता. हरला,मनासारखा खेळ झाला नाही की तो कोर्टावर आदळापट करत असे. एकदा त्यानं इतका धिंगाणा घातला की त्याला सहा महिने कोर्टावर पाय ठेवायला बंदी होती.वडिलांनी समजावलं, भावना आटोक्यात ठेव म्हणाले.
‘आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत. राग, लोभ, ईर्षा, जिंकण्याची दुर्दम्य इच्छा, सारं काही दाबून ठेवायचं. लक्ष द्यायचं ते येऊ घातलेल्या चेंडुकडं. तो चेंडू खेळायचाय. तो झाला की दुसरा चेंडू खेळायचाय.’ बोर्गच्या मनावर ठसलं. बोर्ग कोर्टावर परतला. मॅच खेळला. जिंकला. तिथून तो जिंकू लागला.
एक मॅच मॅकेन्रोबरोबर होती. मॅकेन्रो धिंगाणा घालत असे. ओरडत असे. रॅकेट फेकत असे. भांडत असे. कारण समोरचा बोर्ग बर्फासारखा थंड असे. बोर्गला आईस बर्ग म्हणत. बोर्ग जितका थंड तितका मॅकेन्रो तापलेला. शत्रु असल्यागत स्पर्धा होती. एक सेट संपल्यावर बोर्ग मॅकेन्रोला म्हणाला ‘असं नको करूस. खेळावर लक्ष दे.’ मॅकेन्रो जिंकला.
नंतर मॅकेन्रो आणि बोर्गमधे अनेक मॅचेस झाल्या.कधी हा जिंके, कधी तो जिंके. दोघांची घट्ट मैत्री झाली.
बोर्गच्या हातून खूप चुका झाल्या. पैसे मिळवण्यासाठी कंपनी काढली. ती डुबली. ड्रगमधे गेला, बाहेर आला, पुन्हा ड्रगमधे गेला. मैत्री जुळली. मैत्री तुटली. नवी मैत्री….एका क्षणी त्याला वाटलं की मनातली सारी खंतखदखद बाहेर टाकावी, मोकळं व्हावं. त्यानं पत्नीला विचारलं ‘आत्मचरित्र करायचंय. लिहीशील?’ पत्नीनं विचारलं ‘तू काय सांगणारेस’. बोर्ग म्हणाला ‘सगळं’.
हार्टबिट्स तयार झालं.
नेव्हर गिव अप. कधीही माघार घ्यायची नाही. लढत रहायचं. खळगे लागतात, उंचवट्यांवर अडखळायला होतं. हरायचं नाही. पुढं सरकत रहायचं.
अजूनही बोर्गनं लढाई सोडलेली नाही. पुढल्या चेंडूची वाट तो पहातोय. तो चेंडू केव्हां येईल ते बोर्गला माहित नाहीये. पण त्याची फिकीर बोर्ग कशाला करेल?
।।