टायलरनं चार्लीला कां मारलं?
चार्ली कर्क (३१) चा खून झाला. अमेरिकेतल्या युटा युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना टायलर रॉबिन्सन (२२) यानं त्याच्यावर १५० मीटर अंतरावरून गोळी घातली.
चार्ली क्लार्क एका सधन ख्रिस्ती घरात वाढला. राजकारणाच्या हिशोबात त्याचं घर रिपब्लिकन विचाराचं होतं. शिकागोत शिकला. कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून राजकारणात पडला. टर्निंग पॉइंट युएसए ही संघटना त्यानं स्थापली. ट्रंप यांचा समर्थक होता. ट्रंप यांच्या मोहिमेसाठी पैसे आणि कार्यकर्ते तो गोळा करत असे. कडवट ख्रिस्ती, समलिंगी-लिंगबदल यांचा कट्टर विरोधक, अमेरिका ख्रिस्ती व्हावा असं मत, ख्रिस्तेतरांचा द्वेष. प्रक्षोभक भाषणं करत असे.
टायलर रॉबिन्सन युटामधे एका सधन ख्रिस्ती घरात वाढला. रॉबिन्सन कुटुंबही रिपब्लिकन पक्षाचं होतं. अमेरिकेत आपला राजकीय पक्ष कोणता आहे ते जाहीर करून रजिस्टर करण्याची पद्दत आहे.
टायलरनं खून केला, घरी परतला. नंतर त्याच्या सवंगडी (पार्टनर) त्याच्याशी इंटरनेटवर बोलत होता. टायलरचं वर्णन नेटवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या पार्टनरनं त्याला विचारलं -अरे तो खून केलेला माणूस तूच नव्हतास ना?.
टायलर म्हणाला तुझ्या कीबोर्डच्या खाली मी चिठ्ठी ठेवलीय ती वाच. त्या चिठ्ठीत टायलरनं लिहिलं होतं ‘कर्कचं अती झालंय. तो गे आणि लिंगबदल्यांबद्दलचा अती द्वेष करतोय. हे आता पुरे झालं. मला त्याला मारण्याची संधी मिळतेय, मी ती संधी घेणार आहे (त्याला मारणार आहे.)’
टायलरचा सवंगडी गे होता, त्याचे आणि टायलरचे ‘रोमँटिक’ संबंध होते.
टायलरचं वर्णन इंटरनेटवर पाहिल्यावर आईनं त्याला फोन केला ‘ खुनी तुझ्यासारखाच दिसतोय, तूच तर नाहीस ना?’
टायलरनं खून केल्याचं कबूल केलं आणि आत्महत्या करावीशी वाटतेय असं म्हणाला.
आई म्हणाली आत्महत्या करू नकोस. तू पोलिसांना समर्पण कर. आई वडिलांनी आग्रह केल्यानंतर टायलर पोलिसांना शरण गेला.
मधल्या काळात एफबीआयचे संचालक कॅश (आकाशचं संक्षिप्त रूप) पटेल यांनी पत्रकबाजी करून खुन्याच्या शोधासाठी एफबीआयनं केवढे केवढे प्रयत्न केले याची जाहिरातबाजी केली.
बातमी जाहीर झाल्यावर प्रेसिडेंट ट्रंप यांनी कर्कचं कौतुक केलं, कर्कचे मारेकरी डावे अतिरेकी आहेत असं जाहीर केलं आणि राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला, अमेरिकेचे झेंडे अर्ध्यावर उतरवले. कर्क हा कुठंही निवडून आलेला नव्हता, कोणत्याही अर्थानं राष्ट्रीय व्यक्ती नव्हता. तो केवळ ट्रंप यांचा समर्थक असल्यानं त्याला अर्धा झेंडा मिळाला.
टायलर शरण गेल्यापासून तर हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत अनेक वेळा टायलरची जबानी पोलिसांनी घेतली. टायलरचं पूर्व चरित्र पोलिसांनी खणून काढलं. जबान्या आणि पूर्व चरित्र यात कुठंही तो ‘डावा’ असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. ‘कर्क याच्या द्वेषपूर्ण वर्तनाचा राग आला म्हणून मी त्याला मारलं’ येवढंच टायलर म्हणत राहिला आहे.
अमेरिकेत समाजवादी पक्ष नाही,समाजवादी शिबीरं होत नाहीत, समाजवादी विचारवंत वगैरे नाहीत. समाजवादी अशा कोणत्याही संघटना अमेरिकेत नाहीत. तशा कोणत्याही संघटनेचा टायलरशी संबंध नव्हता. मार्क्स, समाजवाद याबद्दल टायलरला काहीही माहित नव्हतं. मग तो डावा कसा?
टायलर पूर्णतया ख्रिस्ती होता, ख्रिस्ती विचारात वाढला होता. त्याची आई पोलिसांना म्हणाली की गेल्या वर्षभरात टायलर ‘डावा’ झाला होता. डावा म्हणजे काय? ते त्याच्या आईला सांगता येत नाही.
डावेपणाची व्याख्या काय?
१९४० च्या दशकात अमेरिकेत मॅकार्थिझम पसरला होता. डावे, कम्युनिष्ट हे मॅकॅर्थीचं लक्ष्य होतं. डावे किंवा कम्युनिष्ट म्हणजे कोण? हॉलिवूडमधे कोणत्याही सिनेमात श्रमीक,कामगार,हक्क मागणं असे शब्द आले की त्या सिनेमावर बंदी येई, पटकथेत ते शब्द आले की दिक्दर्शक ती पटकथा नाकारत असत. खूप दिक्दर्शक,नट, पटकथाकार इत्यादीना कामगार हा शब्द वापरल्याबद्दल अटक झाली, त्यांच्यावर चित्रपट सृष्टीनं बहिष्कार घातला. रोमन हॉलिडेची पटकथा लिहिणारा लेखक तुरुंगात होता, दुसऱ्याच्या नावानं त्याला पटकथा प्रसिद्ध करावी लागली होती.
आपल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी त्याच्यावर डावा असा शिक्का मारला जात असे. अगदी हेच नंतर निक्सन यांनी केलं. वॉटरगेट घोटाळा बाहेर पडल्यावर पेपर आणि जनता त्यांच्यावर तुटून पडली. तेव्हां विरोध करणारे डावे आहेत असं निक्सन म्हणत राहिले. शेवटी निक्सन यांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी दबाव आणून प्रेसिडेंटपदाचा राजीनामा द्यायला लावला होता.
चर्चमधे वादळ आहे. जन्मानं ख्रिस्ती असले तरी समलिंगीना कसं सामावून घ्यायचं ते चर्चला कळत नाहीये. चर्च दुभंगलेलं आहे. चर्चमधली मारामारी ट्रंप इत्यादी राजकीय लोक राजकारणात आणत आहेत. निवडून येण्यासाठी ते या मुद्द्याचा वापर करतात. अमेरिकेत माणसाला बदनाम करायचं असलं की त्याच्यावर डावेपणाचा आरोप करणं ही फॅशन आहे, ती कर्कच्या खुनाच्या निमित्तानं ट्रंपवादी वापरत आहेत.
वरील वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांना त्यांचे पेपर ट्रंप यांच्या दबावावरून नोकरीतून काढत आहेत. वरील मत मांडणारे पेपर आणि पत्रकारांवर ट्रंप खटले भरत आहेत.
खून हा गुन्हाच होय. मग तो कोणीही कुणाचाही करो. गोळ्या चॉकलेटं दुकानदाराच्या बरणीत असतात तशा बंदुका अमेरिकेत मिळतात. अमेरिकेत १०० माणसांत १२० बंदुका आहेत. टायलरनं कर्कला मारणं चूकच आहे. त्याची शिक्षा त्याला होईल, व्हायला हवी.
पण त्यातून ट्रंप यांच्या राजकीय उद्योगांचं समर्थन होऊ शकत नाही. टायलरनं कर्कला मारलं म्हणून ट्रंपना निवडून द्या असं म्हणणं ॲबसर्ड, चुकीचं आणि घातक आहे.
।।