ट्रंपशाही झिडकारणारा ब्राझीलचा अध्यक्ष

ट्रंपशाही झिडकारणारा ब्राझीलचा अध्यक्ष

 ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रंप यांच्यात सध्या जाहीर झकाझकी चाललीय. ट्रंप दादागिरी करत आहेत आणि दा सिल्वा जाहीरपणे ट्रंपांना झिडकारत आहेत, ट्रंपांवर टीका करत आहेत. युरोपसह जगभरचे पुढारी ट्रंप यांना चुचकारत असताना दा सिल्वा सभ्य भाषेत ट्रंप यांच्या दादागिरीला नकार देत आहेत.

ट्रंपनी ब्राझीलवर ५० टक्के जकात लादली. 

जकात लादल्यावर ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा म्हणाले ‘ जकात आर्थिक कारणांसाठी लादलेली नाही, राजकीय कारणांसाठी लादलेली आहे. जकात लादल्याचे परिणाम आहेत. काही उत्पादनं ब्राझीलमधे महाग होतील, ब्राझिली जनतेला त्रास सहन करावा लागेल. काही उत्पादनं अमेरिकेत महाग होतील, त्याचा त्रास अमेरिकन नागरिकाना सहन करावा लागेल. इलाजच नसेल तर आम्ही सहन करू. समाजात असं कधी कधी घडत असतं, प्रत्येक समाजाला अशा संकटाना तोंड द्यावं लागतं. आम्हीही या संकटाला तोंड द्यायला तयार आहोत. ट्रंपनी जकात लादली म्हणजे आम्ही घाबरलो आहोत असं मुळीच नाही. आम्ही मुकाबला करून पण ट्रंप यांची दादागिरी सहन करणार नाही.आमच्या अर्थव्यवस्थेत काही बदल करावे लागतील. आम्हाला नव्या बाजारपेठा  शोधाव्या लागतील. ते आम्ही करत राहू. पण ट्रंपना वाटत असेल की त्यांच्या हडेलहप्पीसमोर आम्ही मान तुकवू, तर ते कदापी शक्य नाही.’

पत्रकारानं दा सिल्वा यांना विचारलं की त्यांनी ट्रंपशी संपर्क साधला? वाट काढण्याचा प्रयत्न केला?

त्यावर दा सिल्वांनी पत्रकारांना साद्यंत हकीकत सांगितली. ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि शेतीमंत्री यांनी अमेरिकेत जाऊन १० बैठका घेतल्या, अमेरिकन मंत्र्यांशी वाटाघाटी केल्या. खुद्द ट्रंप यांची मुलाखत मागितली, २० वेळा त्यांना फोन लावला. ट्रंपनी मुलाखतीला नकार दिला, फोन घेतला नाही. दा सिल्वा यांनी एक सविस्तर अधिकृत पत्र ट्रंप यांना पाठवलं व त्यात जकातीच्या प्रश्नावरची आपली बाजू मांडली, अमेरिकेला पुनर्विचाराची विनंती केली.

दा सिल्वा यांचं म्हणणं होतं की जकात किंवा आर्थिक निर्बंध हे प्रश्न वाटाघाटीनं सोडवायचे असतात, वाटाघाटी करण्यात त्यांना अजिबात कोणताही गंड नाही. ब्राझीलचं अमेरिकेशी वैर नाही, ब्राझीलला अमेरिका किंवा जगातल्या कुठल्याही देशाशी सलोख्याचे व्यापारी संबंध ठेवायचे आहेत. ट्रंप यांच्याशी वाटाघाटी करणं यात कमीपणा मानायचं काहीच कारण नाही, तो अगदी नॉर्मल राजकीय व्यवहार असेल. सरते शेवटी ब्राझीलला जगातून स्वस्तातला माल हवा आहे आणि ब्राझीलला आपला माल जगात विकायचा आहे. हा काही भावनांचा प्रश्न नाही.

गंमत अशी की अनेक आठवडे संपर्क करूनही अमेरिकन सरकारनं किंवा ट्रपनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. एके दिवशी अचानक ट्रंप यांच्या खाजगी वेबपोर्टलवर ट्रूथ सोशलवर ट्रंपनी ५० टक्के जकात लावल्याचं जाहीर केलं. ब्राझीलच्या प्रश्नावर अमेरिकन सरकार, व्हाईट हाऊस, अमेरिकन संसद इत्यादी कुठंही चर्चाविनिमय झाला नाही. ट्रंपनी खाजगीत निर्णय घेतला, खाजगी प्लॅटफॉर्मवर जाहीर केला. अमेरिकन सरकारचा एक स्वतंत्र प्रसिद्धी विभाग असतो, व्हाईट हाऊसमधेही एक जनसंवाद विभाग असतो. ती अधिकृत माध्यमं ट्रंपच्या निर्णयाबाबत अंधारातच राहिली.

मुद्दा सुरु झाला तो ट्रंपनी ब्राझीलवर लावलेल्या जकातीपासून. जकात कां लावली? आर्थिक कारणासाठी नाही. ब्राझीलमधून येणाऱ्या उत्पादनांचा परिणाम अमेरिकेवर होतो म्हणून जकात लावली नाही. तर ब्राझीलचे माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांच्यावर ब्राझीलमधे खटला चालला आहे या मुद्द्यावरून. 

दा सिल्वा २०२३ साली अध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी बोल्सेनारो यांचा पराभव केला. बोल्सेनारो यांनी पराभव स्वीकारला नाही, सैन्याला बंडासाठी आवाहन केलं, दा सिल्वा यांचं सरकार उलथवून लावा असं पोलिस व सैन्याला सांगितलं. बोल्सेनारो मेक्सिकोत आणि नंतर अमेरिकेत पळून गेले. तिथून त्यानी आपल्या भक्ताना चिथावलं आणि ब्राझीलचं पार्लमेंट व सुप्रीम कोर्टावर हल्ला करायला लावलं. उपयोग झाला नाही. शेवटी अमेरिकेचा व्हिजाही संपल्यावर ते ब्राझीलमधे परतले. तिथं त्यांच्यावर राज्यघटना उलथवण्याच्या आरोपावरून खटला सुरु झाला.

  वकीलांची फौज सर्वोच्च न्यायालयात बोल्सेनारो यांची बाजू मांडत आहे. कोर्टातलं कामकाज, बोल्सेनारो यांच्या मुलाखती, बोल्सेनारो यांच्या समर्थकांच्या मुलाखती पेपरातून प्रसिद्ध होत आहेत. सारं काही कायद्यातल्या तरतुदीनुसार चाललं आहे.

असं असताना ट्रंप म्हणतात की ब्राझीलमधली लोकशाही बोगस आहे, ब्राझीलचं सरकार आणि कोर्ट बोल्सेनारो यांच्याशी सूडभावनेनं वागून खोटा खटला लढवत  आहे. या मुद्द्यावर ट्रंपनी ब्राझीलच्या न्यायाधिशांवर निर्बंध लादले आहेत.  याच मुद्द्यावर ट्रंप यानी ब्राझीलमधल्या मालावर ५० टक्के जकात लादली आहे.

ट्रंप यांचं दुःख समजण्यासारखं आहे. २०२० साली ट्रंप यांचा पराभव झाला आणि ज्यो बायडन अध्यक्षपदी निवडून आले होते. तेव्हां ट्रंपनी गुंड आणि भक्तांना संसदेवर हल्ला करायला प्रवृत्त केलं होतं. न्यायालय आणि राज्य सरकारांनी बायडन यांची निवडणुक  रद्दबातल करून ट्रंप यांना अध्यक्ष घोषित करावं असं ट्रंप म्हणत होते. अमेरिकेतली लोकशाही बोगस आहे, गुन्हेगारानी स्टेट ताब्यात घेतलंय असं ट्रंप म्हणत होते. उपयोग झाला नाही, बायडन अध्यक्ष झाले, चार वर्ष त्यांनी सरकार चालवलं. जनतेनं २४ साली ट्रंपना निवडून दिलं तेव्हां मात्र अमेरिकेची लोकशाही ग्रेट आहे असं म्हणत ट्रंप सत्ता उपभोगू लागले.

ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा येवढंच म्हणाले ‘राजे डोनल्ड ट्रंप ब्राझीलचं सार्वभौमत्वच खतम करू पहात आहेत. आम्ही ते कदापी मान्य करणार नाही.

।।

Comments are closed.