ट्रंप ‘फ’वाली शिवी हासडतात तेव्हां..
ट्रंपनी कॅमेऱ्यासमोर ‘फ’वाली शिवी हासडली.
ट्रंप युरोपच्या दौऱ्यावर निघाले असताना विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठलं. ‘२१ तारखेला इराणवर बाँब टाकल्यावर तुम्ही म्हणालात की इराण इसरायल युद्ध थांबलंय. तसं झालेलं दिसत नाहीये. तुमची प्रतिक्रिया सांगा.’
ट्रंप सुटले. इसरायलला ‘फ’वाली शिवी हासडली. इराण आणि इसरायलना कळत नाहीये की ते काय करतातेत असं येशू ख्रिस्ताच्या स्टाईलनं बोलले, विमानाच्या शिडीकडं रवाना झाले.
इराणनं अणुशस्त्राला आवश्यक दर्जाचं युरेनियम तयार करणं थांबवावं या विषयावर अमेरिका- इराण चालल्या होत्या. नेतान्याहूना वाटाघाटी नको होत्या, लढाई करायची होती. ट्रंपना डील करायचा होता. वाटाघाटी चालल्या असताना इस्रायलनं परस्पर लढाई सुरु केली.
ट्रंप आतून धुमसले. त्यांच्या वतीनं उपाध्यक्ष व्हान्स म्हणाले की लढाई इस्रायलची आहे, आमचा संबंध नाही.
इराणवर हल्ला करायचा की नाही यावर ट्रंपच्या मनात खळबळ होती. सीआयएनं सांगितलं होतं की इराणची अण्वस्त्र तयारी प्राथमिक अवस्थेत आहे, अण्वस्त्रं तयार करायला अजून वेळ लागेल. तिकडं नेतान्याहू तर अण्वस्त्रं आहेत असं म्हणून हल्ला करून हीरो झाले.
ट्रंपनी जाहीर केलं की आपण विचार करत आहोत, काही दिवसातच इराणवर हल्ला करायचा की नाही ते ठरवू. इसरायलचे हल्ले तीव्र होत गेल्यावर हळूच ट्रंप म्हणाले की इराणविरोधातल्या लढाईत आपणही इस्रायलसोबत आहोत, ही ‘आमची ‘ लढाई आहे.
जीसातच्या बैठकीसाठी कॅनडात गेले असताना तिथंच त्यानी ठरवलं की हल्ला करायचा. बैठक सोडून तातडीनं अमेरिकेत परतले. मोजक्या लष्करी अधिकाऱ्यानाच फक्त हल्ल्याची कल्पना होती.
२१ जूनला पहाटे मिसुरीहून बीटू विमानांचा ताफा निघाला. त्यात फसवी विमानं आणि हवेतच विमानांमधे तेल भरणारी विमानंही होती. १८ तास प्रवास करून विमानं इराणच्या फोर्डो केंद्राकडं पोचली, बाँब टाकले, पुन्हा अठरा तास प्रवास करत मंडळी अमेरिकेत परतली. नॉन स्टॉप ३६ तासांची मोहीम.
या हल्ल्याची पूर्वसूचना इराणला होती? अनेक ट्रकभरून फोर्डोवरून बरंच सामान बाहेर नेलं गेलं, माणसंही गेली. त्यामुळं झालेला हल्ला प्रभावी नव्हता. पेंटागॉननं तसा निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष ट्रंपना मान्य नाही.
फोर्डोवर हल्ला झाल्याचं जाहीर करून ट्रंप नेतान्याहूंशी फोनवर बोलले. लढाई बंद करा. कतारच्या अल थानीना ट्रंपनी निरोप दिला की त्यांनी इराणला कळवावं आणि लढाई संपल्याचं इराणनं जाहीर करावं. ही खटपट पूर्ण झाल्यावर ट्रंपनी परस्पर जाहीर करून टाकलं की इराण-इस्रायलनं लढाई कायमची थांबवली आहे.
लढाई थांबली नव्हती.
इसरायलनं फोर्डोवर हल्ला केला. फोर्डोवर आधीच हल्ला करून अमेरिकेनं जाहीर केलं होतं की फोर्डोचा सुपडा साफ झाला आहे. लढाई संपवल्याचं श्रेय ट्रंप घेत होते, ते नेतान्याहून मंजूर नव्हतं, आपण अजूनही लढाईत आहोत हे त्यांनी फोर्डोवर हल्ला करून दाखवलं.
तिकडं इराणनं अमेरिकेला कळवून टाकलं अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युतर देणं हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपण इराक आणि कतारमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करणार आहोत. सांगून मोकळे.
अमेरिकेनं कतारमधल्या तळावरचे १० हजार सैनिक आणि विमानं हलवून इतर ठिकाणी नेली. तळ रिकामा केला. रिकाम्या तळावर इराणनं २० मिसाईल फेकली. त्यातलं एकच मिसाईल अमेरिकेनं इराणच्या समाधानासाठी पडू दिलं, बाकीची मिसाईल हवेतच नष्ट केली. हल्ला करून प्रत्युत्तर दिल्याचं समाधान इराणला आणि इराणचा हल्ला परतवला याच समाधान अमेरिकेला. ट्रंपनी इराणचे पूर्वसूचना देऊन हल्ला केल्याबद्दल जाहीर आभार मानले.
लढाई बंद केल्याचं श्रेय इराण आणि इसरायलनं ट्रंपना दिलं नाही. त्यामुळंच ट्रंप भडकले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी ‘फ’वाली शिवी हासडली.
इसरायलला युद्ध हवंय. ट्रंपना युद्ध नकोय असं नाही. त्यांना श्रेय हवंय, हीरो व्हायचंय. हीरो व्हायचा त्यांचा मार्ग आहे डील करण्याचा. धमकी द्यायची, नंतर डील करायचा.
सगळ्या जगावर जकात बसवली. देश हादरले. वाटाघाटी करू म्हणायला लागले. जकात ९० दिवसांसाठी स्थगित केली. देशांचे प्रमुख ‘आपलं ढुंगण चाटायला लागलेत’ यातच त्यांना समाधान होतं. चीनवर भरमसाठ जकात लावली. चीननं प्रतिकार केला. जकात आणखी वाढवली. माध्यमांत शाब्दिक लढाई झाली. शेवटी अमेरिका आणि चीन यांच्यात वाटाघाटी झाल्या. जकात कमी झाली. आणखी काही दिवसांनी जकात आणखी कमी होईल.
युक्रेन युद्धाबाबत पुतीन यांची बाजू घेतली, पुतीन आपले बेस्ट फ्रेंड आहेत म्हणाले. आपल्या सांगण्यानुसार पुतीन युक्रेनमधलं युद्ध थांबवणार आहेत असं म्हणाले. पुतीननी युद्ध सुरु ठेवलं. ट्रंप पुतीनवर भडकले. आर्थिक निर्बंध वाढवण्याची घोषणा केली.
झेलेन्सकींना व्हाईट हाऊसमधे बोलावून कॅमेऱ्यासमोर त्यांचा अपमान केला. युद्धाला झेलेन्सकीच जबाबदार आहेत असं म्हणाले. नंतर रोममधे झेलेन्सकीला भेटले, युक्रेनला दिली जाणारी मदत सुरु राहील असं म्हणाले. झेलेन्सकी आता आपलं म्हणणं मान्य करणार आहेत असं म्हणाले. पण पुतीन आडमुठेपणा करायला तयार नसल्यानं शरण जायला झेलेन्सकीनी नकार दिला. ट्रंप भडकले. दोघेही नालायक आहेत असं म्हणून मोकळे झाले.
निवडून आल्यावर नेतान्याहू हा त्यांना भेटणारा पहिला नेता होता. व्हाईट हाऊसमधे पत्रकार परिषद व्हायची होती. ट्रंपचं गाझाबाबत काय धोरण आहे ते त्यावेळी कळणार होतं. पत्रकारांसमोर ट्रंपनी गाझाचं एक रिव्हियेरा, रम्य स्थळ तयार करण्याचा आपला प्लान असल्याचं सांगितलं. मनातल्या मनात नेतान्याहूनी कपाळाला हात लावला.
याला नवं नॉर्मल म्हणायचं. ट्रंप असेस्तोवर राजकारण असंच चालायचंय. कुठल्या क्षणी त्यांच्या मनात काय असेल आणि त्यांचं धोरण काय असेल हे कोणीही सांगू शकत नाही.
।।