दे तेल पेलो.
छोटुश्शा देशातल्या इटुकल्या समाजात झालेला चित्रपट.
महाराष्ट्र ३ लाख चौकिमी आहे. पोर्टो रिको हा देश ३ हजार चारशे किमी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १३.७ कोटी; पोर्टो रिकोची लोकसंख्या आहे ३ लाख २ हजार. पोर्टो रिकोत २०२३ साली १४ फिल्म झाल्या, २०२४ साली ७ फिल्म झाल्या. २०२५ साली किती फिल्म झाल्या तो आकडा मिळत नाही पण जितक्या कितक्या फिल्म झाल्या असतील त्यातली ‘दे तेल पेलो’ गोव्यातल्या महोत्सवात दाखवली गेली.
‘दे तेल पेलो’ चं मराठीतलं स्वैर भाषांतर होईल खाण तशी माती.
नात आणि आजोबा यातल्या नात्यावर चित्रपट आधारलेला आहे.
नात इरीन. तिच्या आईला तिच्या पित्यानं खूप मारलंय. ती जखमी बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमधे आहे. साताठ वर्षाच्या इरीनचा ताबा मॅन्युअल या तिच्या आजोबाकडं, आईच्या वडिलांकडं आहे.
जबर धक्का बसलेली इरीन गोठलीय, बोलत नाही, शाळेत रमत नाही. मॅन्युअल तिला वाढवतो, तिची काळजी घेतो, तिला खुलवायचा प्रयत्न करतो. जमत नाही.
एका क्षणी मॅन्युअल तिला गोष्ट सांगत असताना ती खुलते, तिची आणि मॅन्युअलची गट्टी जमते. नेमक्या त्याच वेळेच्या आसपास मॅन्युअलला अलझायमरचा त्रास सुरु होतो. आता नात आजोबाची काळजी घेऊ लागते. अलझायमर झाल्यानं नातीचा ताबा मॅन्युअलला सोडावा लागतो, मॅन्युअलला घर सोडावं लागतं, परावलंबींसाठी असलेल्या संस्थेत रहायला जावं लागतं. तिथे चित्रपट संपतो.
सरळ रेषेतली गोष्ट आहे. काहीही गुंतागुंत नाही. सरळ आहे पण तरलही आहे. प्रेक्षकाला हलवून सोडते.
चित्रपट शांत आहे. पार्श्वसंगीत अगदी हळुवार आपल्या कानावर पडत जातं. दिक्दर्शकानं दणका देणारे क्षण पटकथेत घेतलेले नाहीत. मुलीवर झालेला आघात, नातीवर झालेले परिणाम नाट्यमय रीतीनं घेता आले असते. दिक्दर्शकानं ते टाळले आहेत. नात शाळेत जाते, घरात वावरते, नदीच्या किनारी खेळते. आजोबा नातीची वेणी फणी करतो, तिला आग्रह करून भरवतो, तिची शाळेची पिशवी भरून देतो, तिला शाळेत सोडतो. आजोबा घरातली सगळी कामं करतो, स्वयंपाक करतो. यात काहीही नाट्यमय नाही, सारं कसं अगदी साधं आणि घरगुती.
तरीही चित्रपट पहाववतो, उठून जावंसं वाटत नाही. प्रेक्षकाला एक सूक्ष्म उत्कंठा रहाते, या मुलीचं काय होणार आणि कसं होणार? आई तर बरी होण्याची शक्यता नाही, म्हातारा आजोबा किती दिवस पुरणार? गोठलेली नात अभ्यास करत नाही, खेळत नाही. काय होणार तिचं? असं प्रेक्षकाच्या मनात येत येत चित्रपट पुढं सरकतो.
आजोबा वयाला अनुसरून संथ. उड्या मारतोय, जोरजोरात काही करतोय असं शक्य नाही. त्याच्या संथ हालचालीत एक प्रेम असतं, एक काळजी असते. हळूहळू आजोबाला विस्मरण सुरु होतं. आजोबाला विस्मरण होतय हे कळल्यावर नात त्याची काळजी करू लागते, त्याला वेळेवर औषध घ्यायला लावते, वेळेवर जेऊ घालते.
नातीचा आजोबा होतो, आजोबाची नात होते.
आजोबा झालेल्या जोझ गोमेझनं आजोबा चेहऱ्यावरच्या सूक्ष्म छटांनी दाखवलाय. चेहऱ्यावर इतक्या घड्या सुरकुत्या आहेत की त्यातून त्याच्या भावना प्रकट होणं फारच मुश्कील. ते जोझनं घडवलंय.चेहरा जवळून दिसतो तेव्हां अगदी पुसट पुसट त्याची भावावस्था कळू लागते. तो विसरतोय, तरी तळात कुठं तरी काळजी आहे. काळजी आहे पण काही करता येत नाही.
सुमारे पावणेदोन तास अशी संथ थीम पहायला लावणं हे सोपं काम नाही. चित्रपट पहाताना प्रेक्षकाला आतल्या आत हलायला होतं. आपलंही कधी तरी असंच होणार आहे. कधी तरी आपलीही नातवंडं असतील, आपल्यालाही वेगानं पसरत चाललेल्या डिमेंशिया-अलझायमरला तोंड द्यावं लागणार आहे. आपलंही असंच होईल? प्रेक्षक स्वतःला कधी आजोबात पहातो, कधी नातीत पहातो.
दिक्दर्शकाला हे जमलं देखण्या चित्रणामुळं. घर, परिसर, नदी, तलाव, चेहरा, साऱ्या गोष्टी संथपणे प्रेक्षकाला गुंतवून ठेवतात. मॅन्युअलच्या घरातले अंतर्गत तपशील, डिटेलिंग, कला दिक्दर्शन, प्रेक्षकाला गुंतवून ठेवतं.
चित्रपट साधा आहे. त्यात काहीही थरारक नाही. पण नात आजोबातल्या नात्याची वीण प्रेक्षकाला बांधून ठेवते.चित्रपट ग्रेट नाही, असाधारण नाही, पण गोड आहे, पहावासा वाटतो. चित्रपट संदेश देत नाही, तरीही पहावासा वाटतो.
इव्हान ऑर्टिझनं दिक्दर्शन केलंय. इव्हान प्रशिक्षित कलाकार आहे. त्याचं प्रशिक्षण छायाचित्रणातलं आहे, तो सिनेमॅटोग्राफर म्हणून वाढला. इव्हाननं या चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय, पटकथा लिहिलीय, संकलनही केलंय. पिंड छायाचित्रकाराचा असल्यानं त्यानं चित्रपटाकडं कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहिलंय. शेवटी दिक्दर्शकाचा पिंडच चित्रपट घडवत असतो.
इव्हान आणि आजोबाची भूमिका केलेले जोझ; दोघंही महोत्सवात दिसले, प्रेक्षकांत मिसळले. त्यांचा वावर मनोरंजक होता, नाट्यमय नव्हता. चित्रपट कलाकारांभोवती एक वलय बरेच वेळा असतं, वलय आणि फॅन्सचं वर्तुळ. दोघंही परदेशी असल्यानं आणि हॉलिवूड कलाकारांप्रमाणे स्टार नसल्यानं चार चौघांसारखे वावरत होते.
पडद्यावर दिसलेला मॅन्युअल तो हाच काय असा प्रश्न पडावा इतका जोझ गोमेझ वेगळा वाटला. याच माणसाचा चेहरा आपण क्लोज अपमधे पाहिला, तो तर वेगळा होता असंच वाटून गेलं.जोझ म्हाताराच आहे त्यामुळं कदाचित म्हाताऱ्याची भूमिका त्याला सहजपणे वठवता आली असावी.
इव्हाननं आधी केलेल्या चित्रपटातली प्रमुख पात्रं पोर्टो रिकन होती, त्यानी वियेत नाम युद्धात घेतलेला भाग हा चित्रपटाचा विषय होता. विषय वेगळा, इव्हानचं चित्रीकरण, अमेरिकेत त्या चित्रपटाची वाखाणणी झाली झाली.
छोटुस्सा देश. इटुकली पिटुकली फिल्म इंडस्ट्री. तिथं असा बरा चित्रपट होतो.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग, niludamle.com