निर्भय पत्रकार, निर्भय न्यायाधीश
ब्रीटनमधले पत्रकार आणि पेपर चांगली पत्रकारी करतात, घाबरत नाहीत, धमक्यांना भीक घालत नाहीत. श्रीमंत, लोकप्रीय, मातबर लोकांसमोर पत्रकार नांगी टाकत नाहीत. पेपर, पेपरचे मालक, संपादक, बातमीदारांच्या मागं उभे ठाकतात. सत्य जगासमोर मांडणं हे मुख्य काम सर्व मिळून पार पाडतात.
नोएल क्लार्क नावाचे एक कलाकार आहेत. ते टीव्ही, चित्रपट यांच्यासाठी लिहितात, दिक्दर्शन करतात, अभिनयही करतात. श्रीमंतही आहेत. त्यांच्यावर अनेको स्त्रियांनी गलिच्छ वर्तनाचा आरोप केला. खरं म्हणजे त्या स्त्रिया दबून होत्या, गार्डियन या पेपरनं त्यांच्या व्यथेला वाचा फोडली. २९ एप्रिल २०२१ रोजी गार्डियननं २० महिलांच्या मुलाखतीवर आधारीत वृत्तांत प्रसिद्ध केला. हा वृत्तांत प्रसिद्ध झाल्यावर आणखी ६ महिला पुढे आल्या आणि त्यांनीही नोएल क्लार्क यांनी केलेल्या दुर्वर्तनाच्या कहाण्या गार्डियनला सांगितल्या. गार्डियननं त्या छापल्या.
कहाण्या चित्रपटात शोभतील अशा होत्या. कारमधे स्त्रीच्या गुप्तांगाशी चाळे करणं आणि आपले पुरुषी अंग तिच्यासमोर उघडं करणं. चित्रपटात काम मिळवायला आलेल्या स्त्रीची नग्न मुलाखत घेणं आणि ती लोकांना दाखवणं. चित्रीकरणासाठी आलेल्या स्त्रियांशी बलात्कारी चाळे करणं, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणं, स्त्री सहकाऱ्यांशी अत्यंत घाण बोलणं. इत्यादी. २०११ पासून १० वर्षं हे प्रकार चालले होते, स्त्रिया सहन करत होत्या.
बातमीदार २६ स्त्रियांशी बोलले. चित्रपट टीव्ही व्यवसायातील १०० पेक्षा अधिक लोकांशी बोलून त्या व्यवसायात व्यवहार कशा प्रकारे होतात, क्लार्क यांचं वर्तन कसं होतं या गोष्टींची माहिती घेतली. संपादकांनी हा विषय हाताळायला परवानगी दिली. दोनतीन वर्ष या विषयावर काम केल्यानंतर पेपरात दोन लेख प्रसिद्ध झाले.
बोंब झाली. साहजिकच होतं.
ब्रिटीश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिविजन आर्ट्स या संघटनेनं (बाफ्टा) क्लार्कचा त्याच्या चित्रपट कामगिरीसाठी गौरव केला होता, त्याला पारितोषिक दिलं होतं. उदयोन्मुख कलाकारांना दिला जाणारा प्रतिष्ठित लॉरेन्स ऑलिविये पुरस्कार क्लार्कला मिळाला होता. इंडस्ट्रीमधे क्लार्कचं खूप नाव होतं. या माणसाबद्दल खूप वाईट गोष्टी कानावर येत असल्या तरीही त्याच्या प्रतिमेकडं पाहून गप्प बसायचं असं इंडस्ट्रीनं ठरवलं होतं. तशी प्रथाच असते मुळी. लोक असंही म्हणायचे की माणसात काही दुर्गुण असतीलही, त्याकडं दुर्लक्ष करायला हवं कारण तो मोठा कलाकार असतो. आणखी असं की नामांकित माणसाला हात लावायला लोक तयार नसतात, त्याला दुखवायला लोक तयार नसतात.
आपल्याकडं लोक म्हणतातच ना की चंद्रावरही डाग असतो. माणसावर डाग असणं हे जणू भूषणावह आहे, त्याच्यावर डाग आहेत याचाच अर्थ तो मोठा आहे असं माणसं बोलतात.
वृत्तपत्रानं सत्याकडं दुर्लक्ष करायचं कां? क्लार्कचं वर्तन अनैतिक होतं पण कायद्याच्या भाषेत बेकायदेशीरही होतं. तो एक भ्रष्टाचारही होता. राजकारणात अशा माणसांची ऊठबस फार असते. अलीकडं सर्वे दुर्गणाः राजकारणं आश्रयते असं म्हणायची वेळ आलीय. वृत्तपत्रांनी दुर्व्यवहार उघडे करायचे की नाहीत? दुर्व्यवहार कुजुबुजीतच ठेवायचे कां?
काही ब्रिटीश कंपन्या आपल्या कारखान्यातला विषारी गाळसाळ आफ्रिकेच्या किनाऱ्यावर टाकून द्यायचे. हे वर्तन बेकायदेशीर आणि अनैतिक असे. आफ्रिकन देशाच्या भ्रष्ट पुढाऱ्यांना पैसे देऊन हा व्यवहार ब्रिटीश कंपन्या उरकत असत. गार्डियननं अनेक महिने अभ्यास करून ते सारं जाहीर केलं. कंपन्या भडकल्या. ब्रिटीश सरकार म्हणाले की गार्डियनचं वर्तन ब्रिटीश अर्थव्यवस्थेला मारक असल्यानं देशद्रोहाचं आहे. गार्डियननं आरोप झेलले, प्रकरणाचा पाठपुरावा केला. शेवटी सरकार आणि कंपन्यांचे दात पडले.
क्लार्कच्या वर्तनावर लेख प्रसिद्ध झाल्यावर क्लार्कनं गार्डियन आणि बातमीदारांवर बदनामीचा खटला भरला. करोडो पाउंडांची बदनामी झाली होती असं त्याचं म्हणणं. गार्डियननं खटला लढवला. महिलांनी कोर्टासमोर येऊन साक्षी दिल्या. कोणीही घाबरलं नाही. मार्चमधे सुरु झालेला खटला ऑगस्ट महिन्यात संपला. ब्रिटीश कोर्टाचीही कमाल आहे. खटले पटापट संपवतात. न्यायाधीश धनिकांची बाजू घेत नाहीत.
कोर्टानं बदनामीचा दावा फेटाळला. गार्डियननं दिलेल्या बातम्या खऱ्या आहेत असं म्हटलं. बातमीत उल्लेख केलेल्या महिला कोर्टात पोचल्यावर बातमीचं खरेपण आपोआप सिद्ध झालं. वकीलांनी महिला आणि बातमीदार दोघांच्याही फार कडक उलट तपासण्या केल्या. उलट तपासणी करताना खूपच व्यक्तिगत प्रश्न विचारले. दोघांचं चारित्र्य डागाळलेलं आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. एका महिला बातमीदाराची उलटतपासणी तीन दिवस चालली. तिला तो काळ फार तणावांचा सामना करावा लागला. संपादकही महिला आहेत. त्या दररोज कोर्टात हजर रहात. त्यांनी बातमीदाराला धीर दिला.
कोर्टानं नोंदलं की वृत्तांत ‘रंगवलेला नव्हता’, सत्याला सोडून आरोप केलेले नव्हते. आरोपीचं वर्तन वाईट असल्यानं त्या बद्दल लिहिणं हे एक कर्तव्यच होतं, ते कर्तव्य पेपरानं पार पाडलं हे चांगलं झालं असं कोर्टानं म्हटलं.
क्लार्कनं मांडलेल्या या छळवादाची आर्थिक भरपाई करण्यासाठी कोर्टानं त्याला पैसे मोजायला लावले.तो दंड नव्हता, कायद्याच्या भाषेत खटल्याचा खर्च परत करणं होतं. भाषेचा घोळ, पण दंडच होता.
चित्रपट आणि राजकारण, या दोन्ही क्षेत्रात सत्तेचं राजकारण चालतं. दोन्ही ठिकाणी भास आणि प्रतिमा यांना महत्व असतं. पडद्यासमोर जे दिसतं त्यापेक्षा किती तरी गोष्टी पडद्यामागं घडत असतात. राजकारणी लोक मंचावर, सोशल मिडियात, विधीमंडळात स्वतःची एक प्रतिमा उभी करत असतात, ती पडद्यावरच्या पात्रांसारखीच असते. पुढारी टर्रे मारत असतो, पाठीमागं धनाढ्य आणि गुन्हेगार सूत्रं हलवत असतात.
गार्डियननं पडदा आणि मंचामागं काय चालतं त्याचं दर्शन घडवलं.
।।