पुतीन मोदी भेट, रशिया भारत भेट.
पुतीन सप्टेंबर महिन्यात मोदींना भेटले होते. लगोलग दोन महिन्यांनी दोघं दिल्लीत भेटले. लगबग कशासाठी?
युक्रेन युद्धानं केलेल्या गोचीतून पुतीनना वाट काढायचीय. पुतीनना त्यांची अर्थव्यवस्था सांभाळायचीय; पुतीनना आपण जगात एकटे पडलेलो नाही आपल्याला मित्र आहेत हे जगाला दाखवायचंय.
युद्ध महाग पडतय. दररोज किमान पाच हजार रशियन सैनिक मरत आहेत. पैसा वारेमाप खर्च होतोय. भारत आणि चीननं रशियन तेल व इतर गोष्टींची खरेदी चालवलीय, तेवढ्यावर रशिया तग धरून आहे. युरोपीय देश हळूहळू रशियन तेल आणि गॅस कमी वापरू लागलेत, पुढल्या वर्षात ते तेल-गॅस रशियाकडून घेणार नाही म्हणताएत. अमेरिकाही रदबदली करू लागलीय, अमेरिकेची खात्री राहिलेली नाहीये. भारतानं रशियन वस्तू,तेल इत्यादी खरेदी केल्यास रशिया काही दिवस तगू शकेल.
युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधी भारत रशियाकडून दररोज १.६ कोटी पिंपं तेल खरेदी करत होतं. २०२५ च्या शेवटापर्यंत ती खरेदी दर दिवशी ६४ कोटी पिंपांवर गेली. अमेरिकेनं रशियातून भारताला तेल विकणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध लादले. काही प्रमाणात भारतानं कमी तेल विकत घेतलं. रशियानं निर्बंध घातलेल्या कंपन्यांच्या जागी इतर कंपन्या उभ्या केल्या, निर्बंधांना टांग मारून तेल विकायला सुरवात केली. इतरही वाटा रशिया शोधेल. चीनसारख्या देशातल्या कंपन्यांच्या वाटेनं भारतात तेल येऊ शकेल. आज भारताच्या एकूण तेल गरजेच्या ३६ टक्के तेल रशियातून येतय. तेल खरेदी वाढवण्याचा प्रयत्न रशियाला करायचा आहे.
भारतात अंबानी तेल खरेदी करतात. रशियानं किमती कमी केल्यानंतर त्याचा फायदा अंबानीना झाला. तो फायदा सत्ताधारी पक्षाकडं सरकला असणार. भारत सरकार अदानीना या व्यवहारात घुसवेल, नव्या कंपन्या स्थापन होतील, तेलाशी संबंधित नसलेल्याही जुन्या कंपन्या तेल खरेदी करू लागतील. काय न् काय.
तर हे प्रकरण पुतीन आणि मोदी दिल्लीत बसून हाताळतील. पुतीन विमानतळावरच्या लाल गालिचावरून चालत सरळ मोदींच्या खाजगी भेटीला गेले. पुतीन आणि मोदी गोष्टी लपवून ठेवण्यात हुशार वाकबगार आहेत. त्यामुळं तेलाचे व्यवहार नेमके कसे ठरतील ते कळायला वेळ लागेल.
भारत पूर्वीपासून रशियाकडून शस्त्र सामग्री घेतो. रशियन विमानं, रणगाडे, रशियन रायफली, हवाई बचाव सामग्री भारत रशियाकडून घेतो. भारतानं ब्राह्मोस हे क्षेपणास्त्रं पाकिस्तानवर फेकण्यासाठी रशियन सामग्री वापरली होती. युक्रेन युद्ध सुरु होण्याच्या आधी रशियाकडून भारत दर वर्षी सुमारे १५ अब्ज डॉलरची शस्त्रं विकत घेत होत होता. युक्रेन युद्धाचा चटका बसायला लागल्यानंतर २०२४ साली भारतानं ६७ अब्ज डॉलरची शस्त्रं विकत घेतली. पुतीन यांची खटपट आहे की अधिक शस्त्रं भारतानं विकत घ्यावीत.
त्याची काही बोलणी पुतीन मोदी भेटीत होतील.
रशियाची आणखी एक गोची झालीय. फार माणसं मेलीयत. अर्थव्यवस्था, एआय व्यवस्था, फायनान्स व्यवस्था, तंत्रज्ञान इत्यादी चालवण्यासाठी रशियाला मनुष्यबळ कमी पडतंय. दिलेलं काम पार पाडणारी शिकली सवरलेली माणसं पुरवणं यात तर भारताचा हातखंडा आहे. हैदराबाद, बंगलोर, पुणे इथली हज्जारो माणसं अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी काम करत असतात; अमेरिकेत राहून किंवा भारतातच राहून. नेमकं तेच आता पुतीनना रशियाबाबत घडवून आणायचंय. भारतीय कर्मचारी पुतीनना हवेत. अमेरिके इतकाच पगार वगैरे दिला की काम भागेल. पुणे,हैदराबाद,बंगळुरूच्या माणसांचं काय, त्यांना पैसे मिळाले की काम झालं. रहाता राहतो प्रश्न व्हिसाचा. अमेरिका व्हिसा देतांना खळखळ करतेय, पुतीन एका पायावर तयार. त्याबाबतही खाजगी भेटीत बोलणी होतील. अमदाबादेत मुख्य ऑफिस उघडलं जाईल.
छोटे न्युक्लियर प्लांट, खतांचा पुरवठा हेही मुद्दे चर्चेत घेतले जातील.
यात भारताला काय मिळणार?
भारताला तेलाची गरज आहे. गरजेच्या १२ टक्के तेल भारतात निर्माण होतं. बाकीचं सारं ८८ टक्के तेल जगभरातून आयात करावं लागतं. त्यामुळं भारताला तेल विकणाऱ्या देशाशी मिळतं जुळतं घ्यावंच लागतं. इराक, सौदी, इराण इत्यादी मुसलमान देशांच्या मुसलमान पुढाऱ्यांना मिठ्या घालाव्याच लागतात कारण तेल त्यांच्याकडून येतं. ट्रंपनी कितीही चक्रमपणा केला तरी अमेरिकेकडून मिळणाऱ्या तेलासाठी अमेरिकेला लोणी लावावंच लागतं. रशियाशी बरं जुळल्यानं तेलाची बरीच गरज भागणार आहे.
भारताच्या आयात निर्यातीतला फरक ४२ अब्ज डॉलरचा आहे. भारत आयातीवरच जगतो. अमेरिका, चीन, रशिया इत्यादी बलाढ्य देशांकडून होणारी विविध गोष्टींची आयात हाच भारताचा प्राणवायू आहे. पुतीनशी वाटाघाटी करून भारत स्वतःला वाचवेल.
यात बरेच विनोदी लोचेही आहेत. भारताचा एक नंबरचा शत्रू आहे चीन. पण चीन आणि रशिया घट्ट मित्र आहेत. त्यामुळं भारत-चीन-रशिया हा त्रिकोण अत्यंत अस्थिर आहे.
पाकिस्तानकडं चिनी शस्त्रं आहेत. भारताकडं भारताकडं रशियन (फ्रेंचही) शस्त्रं आहेत. नुकत्याच झालेल्या भारत पाक चकमकीत चिनी सामग्री वापरून पाकिस्ताननं भारताची विमानं पाडली. चीन आणि रशिया भारत आणि पाकिस्तानला झुंजवत असतात. भारत आणि पाकिस्तान युद्धयुद्ध हा खेळ त्यांच्या जिवावर खेळत असतात. या खेळात अमेरिकाही काही प्रमाणात असतेच.
भारत तेलासारख्या अगदी आवश्यक पायाभूत गोष्टींसाठी जगावर अवलंबून आहे, स्वयंपूर्ण नाही. खतं आणि औषधं या दोन गोष्टींबाबत भारत ८० टक्केपेक्षा जास्त चीनवर अवलंबून आहे. रशियाकडून खतं मिळवून तो अवलंब कमी करण्याची खटपट पुतीन-मोदी भेटीत झाली असेल. भरड अन्न सोडता भारत स्वयंपूर्ण नाही; भारत निर्यातीवर नव्हे आयातीवर जगतो. धान्याच्याबाबती स्वयंपूर्ण भारतात शेतकरी मात्र आत्महत्या करतो.
अमेरिका, चीन, रशिया इत्यादी दांडग्यांशी व्यवहार करणाऱ्या भारताची ताकद किती? ती वाढवण्याचे कोणते प्रयत्न भारतात होत आहेत?
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर जावे.