प्रेसिडेंटची न्यायाधिशाला लाच. दोघेही तुरुंगात.

प्रेसिडेंटची न्यायाधिशाला लाच. दोघेही तुरुंगात.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना कोर्टानं पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. सारकोझी २००७ ते २०१२ फ्रान्सचे प्रेसिडेंट होते. 

त्यांच्या भानगडींची एक साखळीच आहे. निवडणुक प्रचार मोहीमेवर भरमसाठ पैसा खर्च केला. हा पैसा बेकायदेशीर पद्दतीनं गोळा केला. खर्चावरची कायद्यानं घातलेली मर्यादा  ओलांडली. खटला सुरु झाल्यावर न्यायाधिशाला लाच दिली.

पोलिस आणि न्यायाधीश देशद्रोहीच म्हणायचे. त्यांनी चक्क नीट चौकशी करून प्रेसिडेंट महोदयांना तुरुंगात धाडलं.

सारकोझींची प्रचार मोहीम भारी देखणी. प्रचार सभांच्या वेळी झेंडे नाचवण्यासाठी माणसं गोळा केली. एका सभेत ६५ हजार, दुसऱ्या सभेत ५० हजार, तिसऱ्या सभेत ४५ हजार माणसं गोळा करून त्यांच्या हातात नाचवण्यासाठी झेंडे दिले,त्यांनी ‘सारकोझी,सारकोझी’अशा घोषणा द्यायची व्यवस्था केली. या तीन इवेंटसाठी १ लाख युरो खर्च केले.

सारकोझी सभेला जात केव्हां मैदानाच्या मागे एक तात्पुरतं घर बांधलं जात असे.त्यात अनेक खोल्या, अँटिचेंबर्स असत. त्या घरात बेडरूम, बाथरूम इत्यादी सर्व गोष्टी चकाचक असत. सभा आटोपली की ते घर मोडून टाकत.तिथं सभेच्या आधी खान पान  होत असे. एका सभेच्या आधी मंचामागं तयार केलेल्या शामियानात १० हजार माणसांची पार्टी झाली. शँपेनचा मुबलक वापर झाला. पदार्थ इतके मधुर होते की पुढं सभेत जमलेल्या लोकं त्या  पदार्थांच्या घमघमाटानं हैराण होत असत. 

एका कंपनीला कंत्राट दिलं होतं. कंपनीनं दर माणशी ५० युरो असा दर लावला होता. ५० गुणिले काही हजार माणसं, बसा हिशोब लावत.

फ्रेंच निवडणुक कायद्यानुसार २.२५ कोटी युरो ही खर्चाची मर्यादा असते. सारकोझीनी मर्यादेच्या पलिकडं १.८५ कोटी युरो जास्त खर्च केले. हा आकडा निवडणुक आयोगाच्या कर्मचाऱ्यानी ठिकठिकाणी हजर राहून तयार केला. अर्थात सर्वच ठिकाणी कर्मचारी पोचू शकले नसणार.  बिगमॅलियन नावाच्या कंपनीला प्रचार मोहिमेचं  कंत्राट दिलं होतं. सारकोझीनी खोटी बिलं दिली, हजार दिले आणि बिल पाचशेचंच घेतलं असले प्रकार केले. निवडणुक आयोगानं ते सारे शोधून  काढून सारकोझींवर खटला भरला.

सारकोझींनी निवडणुकीसाठी लिबियाचे अध्यक्ष गद्दाफी यांच्याकडून पैसे घेतले. दोन नंबरचे. हिशोब वगैरे काही नाही, रोख. हा तर फारच गंभीर गुन्हा. दुसऱ्या देशांकडून निवडणुकीत हस्तक्षेप घडवून आणणं. देशाचा अध्यक्ष खिशात आला की प्रश्नच मिटला. त्या देशात काहीही उद्योग करता येतात.उद्योगपती नेहमीच प्रेसिडेंटांना खिशात घालतात.  उद्योगपतीना देशी-परदेशी कंत्राटं मिळतात. ती कंत्राटंही भानगडींची असतात, ज्यात उद्योगपती पैसे खातो आणि प्रेसिडेंटाला त्याचा हप्ता देतो. तिकडं गद्दाफीनाही दोन नंबरचे पैसे लागतच असतात. ते मिळवायची सोय सारकोझीनी करून दिली.

याला आपल्याकडं राजधर्म असं म्हणतात.

सारकोझींच्या दुर्दैवानं त्यांचा राजधर्म पोलिसांनी हुडकला.

खटला सुरू झाला.

खटल्यासाठी पोलिसांना पुरावे लागतात. पोलिसांनी सारकोझींचा फोन टॅप केला. सारकोझी कोणाकोणाशी काय काय बोलत होते याच्या नोंदी पोलिसानी केल्या.  त्यात आणखीनच नवी भानगड मिळाली.

सारकोझींचा वकील न्यायाधिशांशी बोलत असे. न्यायाधीश, सारकोझींचा वकील आणि सारकोझी असे आपसात बोलत.न नोंदलेल्या फोनवरून बोलत. ते संभाषण पोलिसांनी मिळवलं. पोलिसांनी काय काय माहिती गोळा केलीय त्याची माहिती न्यायाधीश सारकोझीना देत असे.न्यायाधिशाला भरपूर वेतनं आणि ‘अन्य’ फायदे मिळणारं पद आपण देऊ असं सारकोझीनी वकीलाला सांगितलं, वकिलानं तो निरोप न्यायाधिशाला दिला.

मुळ खटला चालला असतानाच हा एक उपखटला उपटला. न्यायाधिशच त्यात आरोपी झाला. न्यायाधीश आणि सारकोझीचा वकील अशा दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले, दोघांनाही तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या.

सारकोझींचं म्हणणं की हा सारा विरोधकांनी केलेला बनाव आहे. सारकोझी या ‘देशभक्ताला’ बदनाम करण्यासाठी, निवडून येण्याला अटकाव करण्यासाठी विरोधकांनी कारस्थान केलंय, आपण निर्दोष आहोत असं सारकोझी सांगत राहिले.

शेवटी मुख्य खटला उभा राहिला. सारकोझींना शिक्षा झाली.

 काही काळापूर्वी फ्रान्सच्या नॅशनल फ्रंट या विरोधी पक्षाच्या नेत्या मेरियन ल पेन यांच्यावरही भ्रष्टाचाराचा खटला झाला. युरोपियन युनियनमधे संसदेत निवडून गेलेल्या ल पेन आणि त्यांच्या सहकारी खासदारांना ऑफिसमधे मदत करण्यासाठी युरोपियन युनियन पैसे देत असे, अलावन्स देत असे. युरोपियन पार्लमेंटचं कामकाज करण्यासाठी हा अलावन्स होता. ल पेन व त्यांचे सहकारी खासदार हा पैसा पक्ष कार्यासाठी वापरत होत्या. हा गंभीर गुन्हा मानला जातो.

ल पेन यांना चार वर्षाची शिक्षा झाली. त्यातली दोन वर्षं त्यांच्या घराबाहेर पडायची परवानगी नव्हती, त्यांच्या मनगटावर कडं बांधलं जाणार होतं, त्यात बसवलेल्या चिपवरून त्यांच्या हालचालींवर पोलिस नजर ठेवणार होते.

ल पेन यांना पाच वर्षं निवडणूक लढवण्यावर मनाई आली.  

या निकालानंतर झालेल्या निवडणुकीत ल पेन यांच्या पक्षाचा पराभव झाला. सारकोझीनी भरपूर पैसा खर्च करूनही २०१२ च्या निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला.

२०११ साली माजी प्रेसिडेंट जॅक शिराक यांना पक्षाच्या पैशाची अफरातफर केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगात जाणारे ते फ्रान्सचे पहिले अध्यक्ष होते.

सारकोझी शिक्षेतून सूट मागण्याच्या प्रयत्नात आहेत. तुरुंगात जायच्या ऐवजी पायात इलेक्ट्रॉनिक पैंजण घालायला ते तयार होतील. नीट वागलो, भानगडी केल्या नाहीत असं दाखवून शिक्षा कमीही करून घेता येईल अशी त्यांची कल्पना आहे. 

इतकी बदनामी झाली तरीही सारकोझी पुढल्या अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. 

।।

निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर जावं.

Comments are closed.