बांगला देशातली खानदानी सत्ता

बांगला देशातली खानदानी सत्ता

 बांगला देशात निवडणुका झाल्या. ३०० सदस्यांच्या लोकसभेत बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी- बांगला देश जातीयवादी दल-जद)) या पक्षाला २१२ जागा मिळाल्या, जमाते इस्लामी या पक्षाला ६८ जागा मिळाल्या. तरुणांच्या ज्या संघटनेनं आंदोलन केलं होतं त्या संघटनेला ६ जागा मिळाल्या. अवामी लीग या आधीच्या सत्ताधारी पक्षावर बंदी असल्यानं तो पक्ष निवडणुकीत उभा नव्हता.

शेख हसिना (अवामी लीग)  यांच्या यांची १५ वर्षाची कारकीर्द तरूणांनी आंदोलन करून संपवली. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले, कोर्टानं त्यांना फाशी सुनावली. त्यांनी पळ काढला, भारत सरकारनं त्याना दिल्लीत आश्रय दिला आहे.

जद पक्षाचे नेते तारिक रहमान बांगला देशचे प्रधान मंत्री झाले आहेत. तारीक रहमान १७ वर्षं लंडनमधे रहात होते. प्रचारासाठी ते बांगला देशमधे गेले नव्हते. कार्यकर्त्यांनी प्रचार  केला, पक्षाला बहुमत मिळालं, आता तारीक देशात परतले आहेत.

बांगला देश फर्स्ट अशी ट्रंप शैलीची घोषणा तारीक रहमान यांनी केली आहे.

विकास आणि भ्रष्टाचार रहित प्रशासन असा कार्यक्रम ते अमलात आणणार आहेत.

बांगला देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वित्त संस्थांनी अती गरीब या वर्गातून गरीब या वर्गात बांगला देशला घातलं आहे. त्यामुळं बांगला देशला मिळणारं सवलतीच्या दरातलं कर्ज, मदत, यांना बांगला देश मुकणार आहे. 

टेक्सटाईल निर्यात हे बांगला देशाच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. पाच वर्षापूर्वी बांगला देशातल्या वस्तूवर अमेरिकेची दोन टक्के जकात होती. ट्रंप यांनी ती वीस टक्के केली आणि नंतर एकोणीस टक्क्यांवर आणली. बांगला देशला तो मोठा फटका आहे.

तोट्यातलं सरकार चालवणं, विकासाची मंदावलेली गती वाढवणं ही आव्हानं तारीक यांना हाताळायची आहेत.

बांगला देशाच्या अडचणी बांगला देशाच्या इतिहासात गुंफलेल्या आहेत. 

बांगला देशात घराण्यांची सत्ता, व्यक्तींची सत्ता असते. बांगला स्वतंत्र करण्यात वंगबंधू मुजीबुर रहमान यांचा सिंहाचा वाटा होता. बांगला स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी आपल्या गटातली माणसं, आपल्या घरातली माणसं सत्तेत भरली, सत्ता त्यांच्या हाती केंद्रीत झाली होती. त्यांचा खून झाला.

मुजीबचा खून करण्यात वाटा असलेले (थेट नव्हे पण खुनींच्या गटातले) झिया उर रहमान सत्तेत पोचले. त्यांची आणि लष्कराची सत्ता सुरु झाली. त्यांची पत्नी खालिदा पक्ष प्रमुख झाली. झियांचा खून झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या जातीयवादी पक्षाची सत्ता आली, खालिदा झिया प्रधान मंत्री झाल्या. खालिदा झियांना घालवून शेख हसिना प्रधान मंत्री झाल्या. शेख हसीना या मुजीबच्या कन्या. खालिदांचा मुलगा तारीक आता प्रधान मंत्री होतोय.

जमाते इस्लामी हा इस्लामवादी पक्ष बांगला देश स्वतंत्र होण्याआधीपासून होता. पाकिस्तानी सत्तेनं या पक्षाला हाताशी धरून मुजीब यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. जमाते इस्लामीचा अवामी लीग-मुजीब यांच्यावर जुना खुन्नस आहे. या पक्षाला आजच्या निवडणुकीत ६८ जागा मिळाल्या. आजवर झालेल्या निवडणुकांत जमाते इस्लामीला एकदा १७ आणि एकदा १८ जागा मिळाल्या होत्या. जमातेनं १८ ते ६८ अशी उडी मारलीय.

प्रचार मोहिमेच्या काळात सुरवातीला जमाते इस्लामीनं आघाडी घेतली होती. त्याना बहुमत मिळू शकेल असं भविष्य निरीक्षक वर्तवत होते. आयत्या वेळी जमातच्या नेत्यांनी आपले बांगला देश निर्मितीचे जुने राग आळवले, बांगला देशानं फुटायला नको होतं, पाकिस्तानातच रहायला हवं होतं असं नेते भाषणात बोलले. बांगला देश लढा होईन आता ६७ वर्षं झालीत. आज विशीत आणि तिशीत असलेल्या तरुणांना (ते बहुसंख्य आहेत) जुना पाकिस्तान आठवतही नाही, ते आज बांगला देशात रहात आहेत. त्यामुळं जमातनं उगाळलेला इतिहास त्यांना वेडेपणाचा वाटला.

जमात कर्मठ इस्लामी आहे. इस्लामचे समर्थक कुराणाचे दाखले देऊन इस्लाम कसा स्त्रीची काळजी घेतो वगैरे सांगत असले तरी इस्लामी पुढाऱ्यांची वक्तव्यं स्त्रीबाबत अनुदार असतात. बांगला देशात स्त्री हा घटक फार महत्वाचा आहे. खेड्यात आणि शहरात स्त्री मिळवती आहे, स्त्री कुटुंबाचा आधार आहे. तिच्याबद्दलची अनुदारता तिला कशी मान्य होईल? निवडणुकीच्या काळात जमात पुढाऱ्यांची वक्तव्य पक्षाला महागात पडली.

बांगला देशची सामाजिक रचना अजूनही पारंपरीक आहे. गावातला, वस्तीतला खटपटी करणारा माणूस त्यांचा नेता असतो. पुर्वी आणि आजही माणसाची प्रत्येक गरज पूर्ण करण्याची वाट सरकारमधून जाते, हज्जार परवाने लागतात, पैसे चारावे लागतात, ओळख आणि वशिला महत्वाचा असतो. नोकरी खाजगी असो की सरकारी, ती मिळवण्यासाठी पुढाऱ्यानं पैरवी करावी लागते. लोकशाहीच्या गणितात खासदार कायदे करत असतो. लोकांच्या हिशोबात तो त्यांची गटारापासून खटाऱ्यापर्यंतची कामं करत असतो. हरकामे, खटपट्ये, अडल्या पडल्याला मदतीला येणारे लोक ज्या पक्षात जास्त असतात त्या पक्षाचे खासदार जास्त असा बांगला देशचा हिशोब असतो. तत्व वगैरे गोष्टींचा संबंध नसतो.

हसीना यांनी सगळी सत्ता आपले आश्रित, दलाल, कुटुंबातले लोक यांच्या हातात घेतली होती. भ्रष्टाचार अतीच झाला होता. 

समाज रचनेतच भ्रष्टाचार असेल तर तारीक काय करू शकतील?

५ ते १०  टक्केच मतदार पक्षाला बांधलेले असतात. बाकीचे परिस्थिती पाहून कुठं उडी मारायची ते ठरवतात. कोण जिंकण्याची शक्यता आहे ते पाहून लोक मतदान करतात. सत्तेबरोबर राहणं आवश्यक असतं, सत्ता कोणाचीही येवो.

अवामी लीग उभीच नव्हती. जमाते इस्लामीनं आयत्या वेळी माती खाल्ली. बीएनपीतही घोटाळे होते, भ्रष्टाचाराचा बोलबाला होता. पण साधारण वातावरण तो पक्ष निवडून येईल असं तयार झालं होतं. 

लंडनसे दोस्त आनेवाला था. वो आगया.

।।

Comments are closed.