भुतांच्या असण्यावर लोकांचा विश्वास
भुतांच्या असण्यावर लोकांचा विश्वास
ख्रिस्ती जगात ३१ ऑक्टोबरला हॅलोविन साजरा झाला. घरोघरी लोकांनी भोपळ्यात भुतं कोरली, घराबाहेर भुतं आणि हडळींच्या प्रतिमा टांगल्या.
हॅलोविनच्या रात्री आत्मे भुतांच्या रुपांत किंवा अरूप पृथ्वीवर येत असतात. त्यांचं येणं साजरं करणं हा असा या सणाचा उद्देश. अमेरिकेत आणि युकेमधे हा सण साजरा होतो.
मुलं खुष असतात. भुतं, हडळी पाहून ती एक थरार अनुभवतात. भुतांच्या गोष्टींची पुस्तकं त्या आठवड्यात खूप खपतात. आया मुलांना मोठ्या टायपातली ती पुस्तकं वाचून दाखवतात. सकाळी मुलं कॅंडी घेऊन घरोघरी जातात. माणसं त्यांना एकादा डॉलर देऊन त्या घेतात. खाऊन पिऊन लोक हा दिवस साजरा करतात. एक दिवस आपण आत्म्यांच्या सहवासात वावरतो असं एक प्रकारचं समाधान लोकांना लाभतं.
अभ्यासक सांगतात की हा सण सेल्टिक (जुनं इंग्लंड) प्रदेशात विकसित झाला. पिकं आलेली असतात. समृद्धी घरात आलेली असते. अनेक दिवसांच्या मेहनतीची फळं उपभोगायची असतात. खायचं, प्यायचं, रात्री पिकांच्या तुराट्यांची गंज तयार करून ती जाळून त्या भोवती नाचायचं, गाणी म्हणायची. ही सेल्टिक प्रथा आयरिशांनी जपली. नंतर ती युकेभर पसरली. आयरिश मंडळी महादुष्काळानंतर परागंदा झाली, अमेरिकेत पोचली, जाताना ती हा सण अमेरिकेत घेऊन गेली.
मेहनत घेऊन पिकं काढणं, ती समृद्धी कधी तरी उपभोगणं हा माणसाचा स्वभाव. मौज मजेसाठीच तर माणूस जगत असतो. पिकं, मौज, आनंद या गोष्टी माणसासोबतच आकार घेत गेल्या. वहिवाट, माणसाची जगण्याची रीत. गावोगावी, पिकोपिकी वेगळी रीत. कालातरानं माणसानं ती रीत धर्मात घुसवण्याचा प्रयत्न केला.
आजही इंग्लंडमधे (अमेरिकेतही) सरासरी ३५ टक्के माणसांना वाटतं की मृतांचे आत्मे अवकाशात हिंडत असतात, पृथ्वीवर येतात. पृथ्वीच्या पलिकडं एक जग आहे असं त्यांना वाटतं.
काही आत्मे चांगले असतात, त्यांचे पृथ्वीवरचे नातेवाईक त्यांना पृथ्वीवर बोलावतात, त्यांना खाउ पिऊ घालतात, त्यांना आनंदी करण्याची खटपट करतात. हॅलोविन हा त्यातलाच एक प्रयत्न. भारतात काही ठिकाणी श्राद्ध किवा तत्सम सोपस्कार करून पितरांचं स्मरण करतात. पुरोहीत त्या आत्म्यांना बोलावतो, नातेवाईकांच्या वतीनं त्यांना खायला प्यायला देतो. अर्थात हे करण्याची फी तो घेतो. ते सोपस्कार त्यालाच माहित असतात. त्यांना आवडत्या गोष्टी दिल्या ती ते खुष होतात. ते खुष झाल्यावर त्यांचे पृथ्वीवरले नातेवाईक खुष होतात.
काही आत्मे दुष्ट असतात. बहुदा पृथ्वीवरच्या जन्मात त्यांनी दुष्कृत्यं केलेली असतात. त्यांची भुतं होतात. ती रात्रीच उगवतात. ती बरेच वेळा पांढरे कपडे घालतात. त्यांचे पाय उलटे असतात. पृथ्वीवर पाय सुलटे पण मेल्यावर ते उलटे कां होतात ते कळत नाही. त्यांचे केस लांब असतात. तसं कां व्हावं ते कळत नाही. अवकाशात केस कापण्याची दुकानं नसतात की काय? मेलेला माणूस पुरुष असेल तर भूत, स्त्री असेल तर हडळ.
खेड्यांत लोकांना भुतं दिसतात. खेड्यात सळसळणारी झाडं असतात, उंच उंच झाडं असतात, तिथं भुतं असतात. भुतं बहुदा निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी असावीत. त्यामुळंच ती शहरात दिसत नाहीत. मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी ठिकाणी माणसं रात्री अपरात्री फिरत असतात, त्यांना भुतं दिसत नाहीत.
भुतं सिनेमात, सीरियलमधे दिसतात. बहुतेक वेळा ती खेड्यातच असतात. वह कौन थी मधे भुतं दिसतात तेव्हां आसमंतात कानाला सुखावणारी गाणी ऐकायला येतात. पश्चिमी सिनेमात ती भुतं झाँबी होतात, आत्मे नाना भीषण रुपं घेऊन रात्री शहरभर गोंधळ घालताना दिसतात. सध्याच्या छोट्या मुलांना भुतांबरोबरच झाँबीच्या गोष्टी सांगितल्या जातात.
मुख्य मुद्दा असतो तो माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं. लोकांचं म्हणणं असतं की माणसामधे एक आत्मा नावाचं काही तरी असतं. आत्मा म्हणजे हृदय, किडनी, लिव्हर असला एकादा अवयव असतो का? उत्तर असं की तसलं काहीही नसतं. आत्म्याला आकार नसतो, आत्मा हे फिजीकली काहीही नसतं, तरीही तो असतो. तो अमर असतो असं म्हणतात. आत्मा अमर आहे असा घोष करत तर्र दोघे तुझे आहे तुझपाशी या नाटकात धमाल करतात.माणूस मरतो पण आत्मा शिल्लक रहातो. याचा अर्थ आजवर पृथ्वीवर जी काही अब्जावधी माणसं मेलीत त्यांचे आत्मे अवकाशात भटकत असतात. अवकाशात आत्म्यांचा ट्राफिक जॅम असावा. आत्म्याला शरीर नसल्यानं त्यांना घरांची चणचण इत्यादी भासत नसावी. चहाच्या कपात हज्जारो आत्मे मावू शकत असावेत.
काही माणसांना गेल्या जन्मीच्या आठवणी असतात, ती माणसं अशा काही गोष्टी सांगतात की सभोवतालची लोक तशी माणसं पाहिलीत, ऐकलीत असं सांगतात.
काही माणसांना सभोवतालातून संकेत मिळतात. घरातली भांडी कोसळतात. कोणीही दारात नसताना दाराची घंटी वाजते. स्वप्नात आकार, रंग, इमारती, माणसं दिसतात. कोणी तरी त्यांच्याशी बोलत असतं पण ते माणूस दिसत मात्र नसतं. असं काही घडतं आणि नंतर काही काळानं (म्हणजे काही सेकंदापासून तर कित्येक आठवड्यांनी) काही तरी धक्कादायक, दुःखद किंवा आनंददायक घटना घडते. माणसं म्हणतात की आत्मे या पद्दतीनं पूर्व सूचना देत असतात.
तर असं हे आत्म्याचं प्रकरण. इंग्रजीत आत्म्याला स्पिरिट (दारू नव्हे) म्हणतात. भारतात आणि जगभर लोक स्पिरिट आहे असं मानतात. त्यातून स्पिरिच्युअलिझम ही एक विचारशाखा जन्माला आली. भारतात त्याला अद्यात्म असं म्हणतात.
विज्ञान म्हणतं की असलं काहीही नसतं, हे भास असतात, या गोष्टी मानवी कल्पनागिरीची बाळं आहेत.
विज्ञान काही म्हणो. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जन्मभूमीत अजूनही सरासरी ३५ टक्के लोक स्पिरिट वगैरे मानतात.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर क्लिक करावे.