मदारी आणि माकड
भारतीय लष्करानं एक चांगली कामगिरी केलीय.
जैशे महंमदच्या पाकिस्तानातल्या बहावलपूरमधील छावणीवर भारतीय सैन्यानं हल्ला केला. खुद्द मसूद अझरनंच ते मान्य केलंय.
मसूदची छावणी साऱ्या जगाला माहित होती.तिची छायाचित्रं असंख्य वेळा पेपरात छापून आलीयत, वाहिन्यांनी दाखवली आहेत. मसूद हा दहशतवादी आहे असं जगानं अधिकृतरीत्या मान्यही केलेलं आहे. त्यामुळं या छावणीवर हल्ला करणं योग्य होतं, केव्हांही कोणी तरी हा हल्ला करायला हवा होता. पण पाकिस्तान सरकारचा छुपा पाठिंबा असल्यानं सरकारं तो उद्योग करत नसत. त्यासाठीच भारताला बहावलपूर माहीत असूनही गप्प बसावं लागत होतं. आज भारतीय लष्करानं ती कामगिरी पार पाडली.
पण मसूद सुटला कसा? मसूदला भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती मिळाली असणार. पाकिस्तानचं इंटेलिजन्स खातं त्याच्या मदतीला होतंच.
खरं म्हणजे मसूदला पकडून त्याच्यावर भारतात किंवा आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला व्हायला हवा.
मसूद कोण आहे? आठवण करून द्यायला हवी?
मसूद अझरनं २००१ साली भारताच्या संसदेवर हल्ला घडवला.( तेव्हां भाजपचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते)
चमत्कारीक गोष्ट अशी की त्या वेळी भाजपचे मेजर जसवंत सिंग परराष्ट्र मंत्री होते. आणि जसवंत सिंगांनीच मसूदला १९९९ साली भारतातल्या तुरुंगातून सोडवलं, पाकिस्तानात जायला दिलं.
मसूदवर भारतात दहशतवादी कृत्यं केल्याचा आरोप होता, मसूद १९९५ पासून १९९९ पर्यंत भारतात विविध तुरुंगात सडत होता. मसूदनं काठमांडूहून दिल्लीला जाणारं विमान पळवण्याची व्यवस्था केली. नंतर विमान आणि त्यातले प्रवासी सोडवण्याच्या बदल्यात मसूदला सोडावं ही अट वाजपेयी सरकारनं मान्य केली, जसवंत सिंग यांनी मसूदला इतमामानं त्याच्या घरी पोचवलं.
मसूदनं जसवंत सिंग यांचे उपकार अशा रीतीनं फेडले.
मसूदनं २००८ साली मुंबईवर हल्ला केला.१० धर्मवीरांनी या हल्ल्यात भाग घेतला. १७३ भारतीय आणि ९ धर्मवीर या हल्ल्यात मेले. १० जणं बिनधास्त मुंबईत घुसले. गल्लीगल्लीमधे फिरले. ताज हॉटेल, हॉस्पिटल, बाटला हाऊस, बोरीबंदर स्टेशन इत्यादी ठिकाणी हिंडून गोळीबार केला. पोलिस व्यवस्था उघडी पडली. पोलिस व्यवस्थेतील गलथानपणामुळं पोलिस अधिकाऱ्यांचा बळी गेला.
२०१६ मधे मसूदनं पठाणकोट हल्ला घडवला. पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळामधे ४ धर्मवीर घुसले. पाकिस्तानमधून बोटीनं नदी पार करून ते पठाणकोटमधे पोचले. पोलिस व्यवस्था भ्रष्ट होती, झोपली होती. दाणादाण उडवून ९ माणसं मारून धर्मवीर मेले. आत्मघातकी हल्लाच होता, मरण्यासाठीच ते पठाणकोटमधे आले होते.
२०१९ मधे एक आत्मघातकी माणूस एका ट्रकवर टनावारी स्फोटकं घेऊन जम्मू श्रीनगर रस्त्यावर पुलवामा या ठिकाणी पोचला. या रस्त्यावरून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना नेणारा ट्रकचा काफिला जाणार होता हे त्या आत्मघातक्याला माहीत होतं. तो काफिल्यावर धडकला. प्रचंड स्फोट झाला. त्यात ४० पोलीस मारले गेले.
ही घटना जगभर गाजली. हा हल्ला जैशे महंमदनं, मसूद अझरनं योजला होता हे जगभर प्रसिद्ध झालं. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, युनायटेड नेशन्सनं मसूदला दहशतवादी म्हणून जाहीर केलं. तरी मसूद बिनधास्त पाकिस्तानभर फिरत होता, पाकिस्तानी पोलिसांची सेक्युरिटी त्याला असे.
मसूदनं भारतात जाऊन घातपात करावे ही पाकिस्तानच्या आयएसआयची योजना होती. मसूदनं १९९३ पासून तयारी सुरू केली होती. सोमालियात गेला. इंग्लंडमधे गेला. मशिदींमधे हिंसेला चिथावणी देणारी भाषणं केली. कुराण आणि प्रेषितांच्या मजकुराचा त्यासाठी वापर केला. पैसे गोळा केले. हरकतुल अन्सार ही संघटना आयएसायच्या मदतीनं तयार केली आणि काश्मिरात घातपाताला सुरवात केली.
१९९५ ते १९९९ मसूद जम्मू, तिहार इत्यादी तुरुंगात होता. त्याच्यावर दहशतवादी कृत्यांचे आरोप होते. तुरुंगात असताना अमेरिकेच्या एफबीआयनं त्याची जबानी घेतली होती. तेव्हांपासूनच अमेरिकेकडं मसूदबद्दलची सर्व माहिती तयार होती. भारताकडंही त्याच्या सर्व उद्योगांचे पुरावे गोळा झाले होते.
भारतीय लष्करानं बहावलपूरसह ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. एकाद्या देशात आत घुसून असा हल्ला करणं हे तांत्रिक दृष्ट्या युद्ध करणं असं मानलं जातं. अजूनपर्यंत तरी भारतानं हे हल्ले दहशतवादी अड्ड्यांपुरते मर्यादित ठेवल्यानं जग त्या बद्दल आक्षेप घेणार नाही. दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचा पाठिंबा होता हा आरोप खरा असला तरी कोर्टात सिद्ध होण्यासारखा नसतो.कारण सरकारं खुबीनं अशा संघटना पोसत असतात. भारतानं हे हल्ले पाकिस्तान या देशाविरुद्ध नसून दहशतवादाविरोधात आहे हे जगाच्या लक्षात येईल इतक्या स्पष्टपणे मांडायला हवं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध व्हावं की नाही हा स्वतंत्र विषय आहे. भारत पाकिस्तान नष्ट करू शकेल काय किंवा पाकिस्तान भारत नष्ट करू शकेल काय हे स्वतंत्र प्रश्न आहेत. सध्याच्या परिस्थितीत ते दूर ठेवावेत. दहशतवाद या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करावं कारण पहेलगाममधली घटना दहशतवादाची घटना आहे. जरी पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असलं तरी मुख्य मुद्दा दहशतवाद हाच आहे.
पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष ठेवून ते निकामी करणं हे काम व्हायला हवं. पण खुबीनं. जगाला पाकिस्तानची लबाडी कळत राहिली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला दहशतवाद्याना भारतात वाव मिळणार नाही याकडं लक्ष द्यायला हवं. बहावलपूरहून दहशतवादी बिनधास्त पठाणकोटमधे जातात; भारतीय पोलिस अधिकार त्यांना वश असतात; भारतीय सुरक्षा व्यवस्था फक्त पुढारी आणि मंत्र्यांभोवती फिरत असते त्याना दिलेली कामं ती पार पाडू शकत नाही; याकडंही लक्ष द्यायला हवं. मुंबई हल्ल्यानंतर सरकानं कमिटी नेमून सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अमलात आलेल्या नाहीत असं वारंवार लक्षात येतंय.
एक बारीकसा मुद्दा. दहशतवाद्यांच्या प्रचाराला माणसं बळी पडतात याचं कारण माणसांनी आपली अक्कल गहाण ठेवलेली असते. समोरचा माणूस ढीग सांगेल, आपण आपलं डोकं वापरायला हवं की नाही? समोरचा माणूस जे सांगतोय ते तपासून पहाण्यासाठी इतर स्त्रोतांतूनही माहिती घ्यायला हवी की नाही? माणसानं डोकं वापरलं तर दहशतवादी प्रभाव साठ सत्तर टक्के तरी कमी होतो. तेव्हां भारतातली अक्कलगहाणी मोहिम निष्प्रभ करण्याकडंही लक्ष द्यायला हवं. लोकांना जगभरात काय चाललंय ते नीटपणे मोकळेपणानं कळू द्या, त्यांना बोंडल्यानं माहिती व मतं पाजणं सोडून द्या असं सांगण्याची वेळ आलीय.
जैशे महंमद ही दहशतवादी संघटना होती. जी कामं सरकारला करायची असतात पण अनेक कारणांमुळं जमत नाही ती कामं सरकारं ‘पाळलेल्या’ संघटनेकडून करवून घेत असतात. कायदा, मानवता, नीतीमत्ता इत्यादी गोष्टी धाब्यावर बसवायच्या असतात तेव्हां अशा संघटना उपयोगी पडतात. ओरड झाली, टीका झाली की आपला संबंध नाही म्हणून हात वर करून सरकारं मोकळी होतात. पाकिस्तान जैशे महंमदबाबत तेच करत आलं आहे.
दहशतवादी संघटना म्हणजे लष्कर नव्हे. लढाई करणं, एकादा अख्ख्या देशाला हरवणं हे दहशतवादी संघटनेचं काम नसतं. लोकाना हादरवणं, लोकांचा त्यांच्या त्यांच्या समाजातल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडवणं, लोकाना हिंसेला प्रवृत्त करणं हा दहशतवादी संघटनांचा उद्देश असतो.
दहशतवादी संघटना म्हणजे मदारीनं नाचवलेली माकडं असतात. या माकडांचा स्वतंत्र बंदोबस्त करावा लागतो, त्याचे स्वतंत्र मार्ग असतात. भारताला त्या उद्योगांची सवय नाही ही मुख्य अडचण आहे. मदारीशी होणारी लढाई आणि माकडाचा बंदोबस्त या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे समाजानं समजून घ्यायला हवं आणि सरकारला सांगायला हवं.