मारेकरी  मोकाट सुटलेत.

मारेकरी  मोकाट सुटलेत.

 जगात कोणाच्याही  जगण्याची शाश्वती राहिलेली नाही. मारेकरी  मोकाट सुटलेत.

 मदुरो अटकेत, खोमेनाई परलोकात. 

आता कोणाचा नंबर? 

आता कोणाचा नंबर? 

।।

  बातम्या अशा आहेत की तेहरानमधील राजप्रासादात इराणचे सर्वेसर्वा खामेनाई अमेरिका-इस्रायलच्या बाँबिंगला बळी पडलेत.

इराणच्या रस्त्यावरची काही दृश्यं माध्यम दाखवत आहेत. एकामधे माणसं भयचकित झाली आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च माणसाला बाहेरच्या देशातल्या कोणी तरी ठार मारलंय याचा धक्का त्यांना बसलाय.एका दृश्यामधे माणसं आनंदचकित झाली आहेत. गेली वीस वर्षापेक्षा जास्त काळ आपल्याला छळणाऱ्या क्रूर माणसाचा मृत्यू झालाय याचा आनंद त्यांना झालाय.

गेले महिनाभर इराण आणि अमेरिकेचे प्रतिनिधी जगात कुठं कुठं चर्चा करत होते. 

ट्रंप यांचं  सुरवातीचं म्हणणं होतं की इराणनं अण्वस्त्रं तयार करणं थांबवावं. अमेरिकेनं इराणविरोधात आर्थिक बंधनं घातली होती, त्याचा फटका इराणला बसला होता. इराण म्हणत होतं की बंधनं काढा आणि अण्वस्त्राबाबत चर्चा करू. चर्चा अनिर्णित होती.

गेल्या वर्षी अमेरिकेनं इराणच्या अणुविकास केंद्रावर हल्ला केला होता, इराणचा अणुकार्यक्रम पुर्ण उध्वस्थ करून टाकला आहे असं ट्रंपनी जाहीर केलं होतं. तरीही अण्वस्त्रांचा प्रश्न कसा काय आला? चार सहा महिन्यात अण्वस्त्रं कार्यक्रम विकसित करता येतो? वैज्ञानिक तर सांगतात की तसा कार्यक्रम विकसित करायला कित्येक वर्षं लागत असतात.

एकाएकी अण्वस्त्राच्या बातम्या थांबल्या. इराणकडं लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत, ती धोकादायक आहेत,ती इराणनं नष्ट करावीत अशी मागणी कधी ट्रंप करत तर कधी नेतान्याहू करू  लागले.

इस्रायल आणि अमेरिका तर ऊठसूठ प्रचार करतात की क्षेपणास्त्रं थांबवण्याची आणि नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे. आयर्न डोमचं गुणगान इस्रायलची पीआर यंत्रणा सतत करत असे. मग अचानक इराणची क्षेपणास्त्रं चर्चेत कशी काय उपटली?

चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं.

दोन दिवसांपूर्वी एकाएकी थकलेले ट्रंप कॅमेऱ्यासमोर आले. ‘या अनिर्णित चर्चेला मी कंटाळलो आहे. इराणचं सरकार बदलणं सोडून दुसरा पर्याय मला दिसत नाहीये’ असं ट्रंप  म्हणाले. तोवर काही दिवसांपासून अमेरिकेनं आपलं नौदल जगभर जाहिराती  करत जगभर पसरलं होतं. ट्रंप इराणवर हल्ला करणार हे स्पष्ट होत होतं. 

आठवून पहा. पुतीननी युक्रेनच्या हद्दीवर दीड लाख सैन्य नेऊन ठेवलं होतं. पुतीन युक्रेनवर हल्ला करणार आहेत हे जगाला कळलं होतं. दीड लाख सैन्य हद्दीवर चणेफुटाणे भेळ खायला कुणी नेऊन  ठेवतं काय? पुतीन सांगत होते की बरेच दिवस एका जागी बसून कंटाळलेल्या सैन्याला पाय मोकळे करायला युक्रेनच्या हद्दीवर पाठवलंय. पुतीननं युद्ध सुरु केलं. आज चार वर्षं युद्ध थांबलेलं नाही. युद्ध आपण थांबवलं असा दावाही ट्रंपनी केला आणि शांततेच्या नोबेलची मागणी केली. युद्ध अजूनही सुरु आहे.

इराणवर बाँब पडू लागले. इराणनं प्रतिहल्ला केला. माणसं मरू लागली.

तेहरानच्या राजप्रासादावर बाँब पडले.

एका इराणी स्त्रीनं योग्य रीतीनं बुरखा न घालता चेहरा-केस उघडे ठेवले होते या आरोपावरून त्या स्त्रीला तुरुंगात घालण्यात आलं होतं. तिथं तिचा छळ झाला, छळात ती मेली. हज्जारो स्त्रिया सरकारच्या क्रूर सैनिकांना न घाबरता रस्त्यावर आल्या. त्यांनाही सरकारनं मारलं.

गेली किमान १० वर्षं इराणी जनता आंदोलन करत आहे. जनतेची मागणी होती की त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, सत्तेवर बसलेल्या धर्मनेत्याला हटवण्याचं स्वातंत्र्य द्या.

इराणची अर्थव्यवस्था पार कोसळलेली आहे. त्याचं एक कारण अमेरिकेनं घातलेले आर्थिक निर्बंध हे आहे. अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधाचं कारण इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम होता. तेव्हां चुलीत घाला अण्वस्त्रं, तो पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वापरा असं काही इराणी नागरीक म्हणत होते.

इराणी सरकारकडं सैन्य आहे शस्त्रं आहेत. नागरीक निःशस्त्र आहेत. जगात सर्वच ठिकाणी असं असतं. इराणचं  वैशिष्ट्यं म्हणजे इराणी धर्मनेत्यांची एक खाजगी सेनाही इराणमधे आहे. ही सेना माणसं धर्माचरण नीट करतात की नाही ते तपासत असते. नमाजाच्या  वेळी लोक नमाज पढतात की ऑफिसात कामं करत असतात याची पहाणी धर्मसैनिक करतात. कोणी संगित ऐकतंय  कां? कोणी पश्चिमी साहित्य वाचतंय कां? कोणी जगभरातले सिनेमे पहातंय का यावर हे सैनिक लक्ष ठेवतात. अफगाणिस्तानात तर लोकांच्या दाढीची लांबी मोजत, फूटपट्ट्या घेऊन. अमूक इंचापेक्षा कमी दाढी दिसली की तुरुंग आणि फटके.

इराणमधे हुकूमशाही होती. हुकूमशाही एका माणसाची होती,  त्या माणसानं जमवलेल्या गँगची होती. हुकूमशहानं धर्माचा आधार घेतला होता. प्रत्येक हुकूमशहाला कसला तरी आधार लागतो. चीनमधे कम्युनिझमचा आधार, रशियात रशियन अस्मितेचा आधार, इस्रायलमधे अरब मुस्लीमांना नष्ट करण्याचा आधार, इराणला इस्लामचा आधार. हिटलरला ज्यू मुक्त जग हवं होतं, नेतान्याहूना अरब मुक्त पॅलेस्टाईन हवंय. हूकूमशाहीकडं पाशवी शक्ती असते, जनतेकडं याचना करणं येवढंच असतं.

अयातुल्ला खोमेनी यांच्या नंतर अली खोमेनाई यांचं राज्य आलं. खोमेनी आणि खामेनाई दोघांनीही लाखो माणसं (इराणी आणि इराकी) मारली. ते त्यांना जमलं कारण इराणी जनतेची दुर्बलता. जनतेनं क्रूरकर्म्यांना सत्तेत बसवलं आणि  त्यांच्या हातून स्वतःचा नाश करवून घेतला.

 नेतान्याहू आणि ट्रंप,दोघांवरही भ्रष्टाचार आणि कायदा तुडवण्याचे अनंत आरोप आहेत. कोणाची तरी भ्या दाखवून दोघंही आपली सत्ता टिकवून आहेत. दोघंही लोकशाहीच्या वाटेनं हुकूमशहा झाले आहेत. इराणच्या जनतेनं जसं हुकूमशहा उरावर घेतले तसेच इस्रायल आणि अमेरिकेची जनता हुकूमशहा उरावर घेतेय.

दोन हुकूमशहानी टोळी करून तिसऱ्या हुकूमशहाला संपवलंय.

।।

Comments are closed.