युक्रेन युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत

युक्रेन युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत

 डोनल्ड  ट्रंप हा जत्रेतला आकाश पाळणा सध्या बराच खाली आलाय, युक्रेनच्या हिताकडं वळलाय. 

झेलेन्सकी, युरोपीय नेते आणि ट्रंप यांची वॉशिंग्टनमधली भेट सौहार्दाची झाली असं दिसतंय. 

सहा महिन्यांपूर्वी ट्रंप झेलेन्सकीना व्हाईट हाऊसमधे भेटले तेव्हां त्यांचं झेलेन्सकींबरोबरच वर्तन उद्धटपणाचं होतं. झेलेन्सकींनी पहेरलेल्या टी शर्टवर ट्रंप खडूसपणे बोलले होते की त्यांच्याकडं घालायला चांगले कपडेही नाहीत. काल वॉशिंग्टनमधे झेलेन्सकी भेटले तेव्हां ट्रंपनी झेलेन्सकींच्या कपड्यांचं कौतुक केलं. झेलेन्सकीनी ट्रंपची स्तुती टाळली पण  सर आणि थँक यू असं म्हणत होते.

युक्रेन युद्धाबाबत शस्त्रसंधी झाली?

एका वाक्यात सांगायचं तर युद्धाबाबतचा निर्णय लोंबकळत राहिला. ट्रंप म्हणाले की पुढल्या आठवड्यात ते झेलेन्सकी आणि पुतीन यांची गाठ ते घालून देतील. म्हणजे ट्रंप सटकले. ट्रंप जबाबदारीतून मोकळे झाले, श्रेय मात्र घेतील.

ट्रंपचा पाळणा अलास्कात जाताना  खूप उंचावर गेला होता. युक्रेनचे प्रांत रशियात जातील, रशियानं २०१४ मधे गिळलेला क्रायमिया युक्रेनला परत मिळेल, या मुद्द्यावर शस्त्रसंधी होईल असं ट्रंपच्या डोक्यात होतं. आता काटा १८० अंशात फिरलाय.

ट्रंप यांच्या पाळण्याला अलास्कात धडक बसली. पुतीननी ट्रंपचा प्रस्ताव नाकारला. बहुदा चर्चेच्या पहिल्या तासाभरातच चर्चेचं पंपाळं वाजलं. नेटो नको, युक्रेनची सेना वाढता कामा नये, युक्रेनला कोणी मदत देता कामा नये, क्रायमिया देण्याचा प्रश्नच नाही असं पुतीननी सांगून टाकलं. शस्त्रसंधी कचऱ्याच्या टोपलीत गेली. तो शुक्रवार होता.

रविवार संध्याकाळी ट्रंप यांचा पाळणा वेगानं खाली आला, सोमवारी सकाळी ट्रंप झेलेन्सकींचे घट्ट मित्र झाले.

ट्रंप यांचे दूत विटकॉफ पत्रकारांना म्हणाले की युक्रेन किवा कुठल्याही देशाचं सार्वभौमत्व, सीमा, महत्वाच्या असतात.

म्हणजे युक्रेनची भूमी रशियाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

उपराष्ट्रपती व्हान्स-परदेश मंत्री रुबियो म्हणाले ‘अमेरिका युक्रेनच्या सुरक्षेसाठी भरघोस योगदान करेल…युरोपीयन देशांनी युक्रेनला मदत करावी, युरोपीयन देशांच्या सुरक्षेसाठीही अमेरिका भरघोस मदत करेल…’ याचा अर्थ युक्रेन आणि रशिया यांच्या संघर्षात अमेरिका युक्रेनला शस्त्र व पैसे देईल; युरोपलाही शस्त्रं व पैसे देईल व त्याचा वापर युरोपीय देश रशियाच्या विरोधात करू शकतील.

व्हान्स-रुबियो यांच्या म्हणण्याचा अर्थ झेलेन्सकीनी सांगितला. त्यानी थेट ट्रंप यांचे आभार मानले, ट्रंपनी देऊ केलेल्या ‘९० अब्ज डॉलरच्या’ मदतीबद्दल आभार मानले.

ट्रंप झेलेन्सकीना पैसे आणि शस्त्रं देणार आणि लढा म्हणून सांगणार; ट्रंप युरोपीय देशांनाही पैसे व शस्त्र देणार आणि रशियाच्या विरोधात लढा म्हणून सांगणार. अशा रीतीनं तयार झालेल्या या लढवय्याना पुतीनशी बोलायला पाठवणार. टॅरिफ हे शस्त्रं ट्रंपनी म्यान केलेलं दिसतंय.

ट्रंप यांचा आकाश पाळणा सध्या इथे आहे, उद्या कुठं जाईल ते सांगता येत नाही.

ट्रंप यांचे निर्णय बदलत असतात. कोणाच्या  सल्ल्यानं हे बदल होतात? अजून कळलेलं नाही. पुतीन यांच्याबरोबर बोलणी चालली होती तेव्हां तिथं त्यांच्या सोबत कोणीही नव्हतं. बोलणी चालली असताना ते फोनवर कोणाशी बोलत होते याचेही पुरावे नाहीत. अचानक ट्रंप उठतात. तडकाफडकी वॉशिंग्टनला जायला निघतात, ठरलेला जेवणाचा कार्यक्रमही रद्द करतात. 

झेलेन्सकी आणि युरोपीय पुढारी यांच्याशी ट्रंप चर्चा करत असतात. मधेच ते उठतात, बाजूला जाऊन पुतीनना फोन करतात. इतक्या सहजपणे सामान्य माणूसही कोणाशी बोलत नाही. समोरच्या माणसाला बोलायला  वेळ आहे कां वगैरेची चौकशी सामान्य माणूस करतो. ट्रंप तसल्या भानगडीत पडत नाहीत. सामान्यपणे राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी लोकांच्या वतीनं त्यांचा सचीव, मदतनीस वगैरे आधी फोन करत असतात.  ट्रंप यांच्या बाबतीत तसंही घडत नाही. ते धाडकन नॉर्वेच्या अर्थमंत्र्याला फोन लावतात, तो मंत्री त्यावेळी रस्त्यावर असतो, कुठं तरी निघालेला असतो.

ट्रंप जे बोलतात, तो त्यांचा त्या क्षणीचा निर्णय असतो. तो कोणाच्याही सल्ला मसलतीनं तयार झालेला असेल याची खात्री नसते. तो क्षण जातो, नवा क्षण येतो. नव्या क्षणी ट्रंप यांचा नवा निर्णय असतो.

युरोपीय नेते अशा रीतीनं निर्णय घेत नसतात. युक्रेनच्या प्रश्नावर युरोपीय नेते गेले काही महिने सतत चर्चा करत आलेत. एकत्र बसतात, फोनवर बोलतात. ट्रंप अलास्काला गेले तेव्हां युरोपीय नेते स्वतंत्रपणे भेटले. झेलेन्सकी ट्रंपना भेटायला वॉशिंगटनला गेले तेव्हां त्या वेळी आपण काय भूमिका घ्यायची, झेलेन्सकी यांना एकटं पाडायचं नाही यावर खल करून युरोपीय नेते वॉशिंगटनला पोचले. पुतीन-झेलेन्सकी यांची चर्चेची तारीख ठरली की त्या वेळी काय करायचं याचा विचार आताच युरोपीय नेत्यानी सुरु केला आहे.

आज युक्रेनचा काही प्रदेश खाणार. उद्या पुन्हा काही सबब काढून आक्रमण करणार, आणखी प्रदेश खाणार. कधी तरी पूर्व युरोपमधल्या, बाल्टिक देशांवर हल्ला करणार. पुतीन आक्रमक  हुकूमशहा असल्यानं आपल्याला त्याचा धोका आहे हे युरोपला जाणवलंय. 

युक्रेनसोबत रहायचं; अमेरिकेला दुखवायचं नाही, बरोबर ठेवायचं अशी रणनीती युरोपनं आखलीय. ट्रंप लहरी आहेत, त्यांना खुशामत आवडते हे लक्षात घेऊन ट्रंपच्या कलानं घ्यायचं,त्यांच्याशी जुळवून घ्यायचं अशी रणनीती युरोपनं ठरवलीय.

रशियाचे दहा लाख सैनिक मेलेत. रशियाची अर्थव्यवस्था फार कठीण परिस्थितीत आहे. पुतीनना युद्ध थांबवायची इच्छा आहे. पडलो तरी नाक वर अशी काही तरी सोय त्यांना करून द्यावी लागणार आहे. युरोपीय नेते धूर्त आहेत, ते वाट काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

युद्ध लगेच थांबणार नाही हे झेलेन्सकी-युरोपच्या लक्षात आलंय. पण थांबेल तेव्हां रशिया जेरबंद झालेला असेल याची खटपट युरोप करतोय.

।।

Comments are closed.