रशियन शँपेन अमेरिकेत

रशियन शँपेन अमेरिकेत

न्यू यॉर्कमधल्या कार्नेगी सभागृहात युक्रेनमधील युद्धग्रस्त मुलांच्या मदतीसाठी कार्यक्रम चालू होता. सभागृहाच्या एका कोपऱ्यात वाईन   ठेवली होती. पैसे द्यायचे, वाईनचा ग्लास घ्यायचा. अमेरिकेत काहीही फुकट मिळत नाही.

एका महिलेनं एक ग्लास चमकदार वाईन घेतली. तिला २४ डॉलर मोजावे लागले. एका ग्लासला २४ डॉलर म्हणजे फार होते. विकत घेतलीच आहे तर वाईन चाखावी म्हणून महिलेनं वाईन तोंडात घोळवत असताना तिथं हजर असलेल्या आयोजकांना सहज विचारलं की वाईन प्रस्तुत वाईन कुठली.

आयोजकांनी सांगितलं की ही वाईन युक्रेनमधली, बाखमुटमधली, आहे. शँपेनसारखी वाटत असली तरी ही वाईन ‘शँपेन’ नाही. ही आहे ‘सोलोकिंग’, युक्रेनी वाईन. आयोजकांनी तपशीलही सांगितला. क्रायमियातल्या खास द्राक्षांपासून ती तयार केलीय. द्राक्षांचं वाण आणि वाईन तयार करण्याची पद्धत फ्रान्समधल्या शँपेन प्रांतातल्या शँपेनकडून घेण्यात आलीय. सुमारे २५० वर्ष ही वाईन तयार होतेय. ती महिला घेत होती ती वाईन २०१२ सालच्या द्राक्षांपासून २०१३ साली तयार केलेली वाईन होती आणि ६ वर्षं मुरवल्यानंतर ती बाजारात आली होती.

यात काय विशेष?

वाईनच्या सुमारे ७० हजार बाटल्या तयार होत्या, त्यातल्या १० हजार बाटल्यांची मागणी २०२१ साली अमेरिकन आयातकांनी नोंदवली. गोची झाली. २०२२ साल उजाडलं. रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. बाखमुट विभाग रशियाच्या सरहद्दीवर आहे. बाखमुटवर बाँबिंग झाले, रशियन रणगाड्यांनी गोळाफेक केली. शहरात एक इमारत शिल्लक ठेवली नाही.पण बाखमुटमधली वायनरी मात्र शाबूत ठेवली. जमिनीखाली २३६ फुटावर असलेल्या वायनरीवर बाँब  टाकायचे नाहीत, तोफा डागायच्या नाहीत अशा सूचना सैन्याला देण्यात आल्या होत्या. त्या सूचना अर्थातच लेखी नव्हत्या. तोंडी होत्या. 

पुतीननी वायनरीवर कृपा कां केली? कारण पुतीनना ती वायनरी प्रिगोझीन नावाच्या त्यांच्या मित्राला द्यायची होती.  

या वायनरीला एक मोठ्ठा इतिहास आहे.

रशियाला वाईन तयार करण्याचा इतिहास आहे, फ्रेंच वाईन इतकाच जुना. फ्रान्समधे डॉम पेरेनॉन ही वाईन तयार झाली तेव्हां पाठोपाठ काही काळानं तशीच वाईन रशियात तयार होऊ लागली. तीच द्राक्षं, तशीच उत्पादन प्रक्रिया, तशीच चमकदार सोनेरी वाईन. सोवियेत युनियन झाल्यावर सोवियेत सरकारनं या वाईनचं वावच सोवियेत शँपेन असं ठेवलं. पण या रशियन वाईनला बाजारात डॉम पेरेनॉनची प्रतिष्ठा नव्हती.

जे असेल ते असो पण रशियन वाईन चमकदार वाईन सोवियेत शँपेन या नावानं बाजारात विकली जात असे. रशियन जनता मद्यप्रेमी आहे. इतकी मद्यप्रेमी की दारुडी आहे असंही म्हणायला हरकत नाही. दारू पिण्यासाठी रशीयन माणूस सतत कारणं शोधत असतो. कधी फार बर्फ पडलंय म्हणून पितो तर कधी आपल्या पूर्वजांच्या आठवणी आळवण्यासाठी कबरीसमोर बसून दारु पितो. मुख्य मुद्दा दारू पिणं. रशियाचे एक अध्यक्ष येल्तसिन दिवसभर दारू पीत असत. कित्येक वेळा परदेशातल्या देशप्रमुखाशी फोनवर बोलत असताना दारूकाम सुरु असे आणि दारू इतकी चढलेली  असे की त्यांच्या हातातून फोन निसटत असे, पडत असे, पलिकडला माणूस हलोहलो करत फोन ठेवत असे.

क्रांती झाल्यावर, स्टालीनचं राज्य सुरु झाल्यावर, कम्युनिष्ट राज्यकर्त्यांना वाटलं की जनतेला दारूच्या व्यसनातून मुक्त केलं पाहिजे. सरकारनं दारुबंदी लागू केली. दारुबंदीला एक तात्विक किनारही होती. शँपेन (देशी किंवा फ्रेंच) फक्त श्रीमंत लोकंच पिऊ शकत होते. तेव्हां श्रीमंतांची ठासण्यासाठी दारू-वाईन बंद.

 रशियनांचं दारुशिवाय भागत नाही. मग? दारू स्वस्तात देता यायला पाहिजे. 

हा १९३६ च्या आसपासचा काळ होता.

बाखमुटमधे जमीनीत खोलवर वायनरी काढायचा आदेश जारी झाला, वाईन उत्पादनाला सुरवात झाली.

पण वाईनचं नशीब खडतर होतं. १९८५ च्या सुमाराला पुन्हा रशियन सरकारला रशियन जनतेचा  मद्यखुळेपणा आटोक्यात आणावासा वाटला. पुन्हा दारूबंदी. या काळात बाखमुटमधे वाईन तयार होत होती की नाही? माहित नाही. पण वायनरी बंद झाली नसण्याची शक्यता आहे. नंतर पुतीननं पुन्हा वाईन निर्मितीला चालना दिल्यानंतर वायनरी भरभराटली असणार. १९९०मधे गोर्बाचेवनी गोंधळ घातला, सोवियेत युनियन विस्कटलं, १९९१ मधे युक्रेन सोवियेत युनियनपासून वेगळा झाला. आता बाखमुटची वायनरी युक्रेनची प्रॉपर्टी झाली.

तर अशा रीतीनं बाखमुटमधली वायनरी रशियाचं आक्रमण सुरु झालं तेव्हां वाईन तयार करत होती. बाखमुटवर बाँबफेक सुरु झाली. आता पंचाईत अशी की अमेरिकेची १० हजार बाटल्यांची मागणी पूर्ण कशी करायची? वायनरी शाबूत होती पण वायनरीचा परिसर, अख्खं बाखमुट शहर तोफगोळ्यांनी दणाणत होतं. बाखमुटचा प्रदेश सोडला तर बाकीचा युक्रेन झेलेन्सकी चालवत होते, बाकीच्या युक्रेनमधे शेती होत होती, बाकीच्या युक्रेनमधून गहू व इतर वस्तू निर्यात होत होत्या. अडचण अशी की बाखमूटच्या भूमिगत वायनरीतल्या १० हजार बाटल्या काढून त्या युक्रेनमधे इतरत्र न्यायच्या कशा? वायनरी ते रेलवे स्टेशन. रेलवे  वाघिण्या युद्धग्रस्त विभागातून सुरक्षीत बाहेर काढायच्या.

युक्रेनच्या लोकांनी तो उद्योग जिवाच्या आकांतानं पार पाडला. एक तर युक्रेनला निर्यातीतून पैसे मिळवण्याची आवश्यकता होती. दुसरं म्हणजे  वाईनसारखी पवित्र गोष्ट. ती वाईनसाठी तहानलेल्या भक्तांपर्यंत पोचवायची होती. सभोवताली तोफगोळे पडत असताना कंटेनर सुरक्षीतरीत्या बाहेर पडले आणि शेवटी अमेरिकेत पोचले. 

सोलोकिंग एक ऐतिहासिक दारू झाली. एका बाटलीची किमत ३ हजार डॉलरपर्यंत पोचली. ट्रंपनी समजा रशियन दारूवर जकात मारली तर? मग तर दारूला आणखीनच चांगली चव येईल. जेवढी दुर्मीळ तेवढी चांगली,तेवढी महाग, तेवढी जास्त प्याली जाईल. 

 बाखमुटमधली वायनरी पुतीनच्या बाँबिंगमधे अजूनही चालू आहे की नाही? कळलेलं नाही.

।।

Comments are closed.