विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स

विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स

विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स ६० वर्षाचा झाला. त्याचं विकीपेडिया २५ वर्षाचं झालं. 

विकीपेडिया हा खुल्ला विश्वकोष आहे. त्यात आता ३०० भाषांत ६५ कोटी लेख-नोंदी आहेत. महिन्यात १ अब्ज माणसं हा कोष वापरतात. विकीपेडिया मोफत आहे. 

एकेकाळी ब्रिटानिका, पियर्स इत्यादी अनेक खंडांचे   विश्वकोष होते. दर काही काळानं त्यात नव्या नोंदी होत, पुरवण्या निघत. लोकांची कपाटंच्या कपाटं विश्वकोषानं भरलेली असत. तो विकत घेणं परवडत नसे, पुस्तकालयात जाऊन तो वाचावा लागे.

जिम्मी वेल्स मुळात अमेरिकन. गेली काही वर्षं तो लंडनमधे स्थायिक झालाय. एका इमारतीच्या तळधरात तो बसतो. एका खोलीचं त्याचं ऑफिस. समोर दोन कंप्यूटर असतात. बस. येवढंच. 

ईलॉन मस्क, जेफ बेझोज, लॅरी पेज, सर्जे बिन इत्यादी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीवाली मंडळी जिम्मीची समकालीन. सर्वांनी जवळपास एकाच वेळी कामाला सुरवात केली. मस्क आता ट्रिलियनपती होतोय. बाकीचे अब्जाधीश आहेत. जिम्मी त्यांच्या तुलनेत कणभरच आहे.

जिम्मी आनंदात आहे. तो समाजवादी नाही, तो बाजारवादी आहे. तरीही त्याला पैसे मिळवण्यात रस नाही.कामं करता येतील, सुखानं जगता येईल येवढेच पैसे त्याला हवेत. विकीपेडिया चालवण्याचा खर्च असतो. तेवढे पैसे विकीपेडिया वाचकांकडून देणग्यांच्या रुपात मिळवतो.

विकीपेडियात हज्जारो संपादक आहेत, ते सर्व विनावेतन काम करतात. विकीपेडिया चालवण्यासाठी इंजिनयर्स, हिशोब ठेवणारे, कंप्यूटरवर कामं करणारे इत्यादी मिळून सुमारे ७०० कर्मचारी आहेत. त्यांना प्रत्येकाला साधारणपणे वर्षाला १५ ते १६ लाख रुपये वेतन मिळतं.  

विश्वासार्ह माहिती प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे मिळाली पाहिजे या तत्वासाठी जिम्मीनं विकीपेडिया उभं  केलंय.

त्याचं असं झालं. जिम्मीची छोटी मुलगी असाध्य रोगानं आजारी पडली. एक डॉक्टर उपचार करणार होते, ते उपचार नवे होते, सिद्ध झाले नव्हते.  जिम्मी जिवाच्या आकांतानं व्याधीबद्दल माहिती गोळा करत होता. या व्याधीचे उपचार घेतलेल्या व्यक्तीनी लिहिलेले लेख उपलब्घ होते. त्यात वैज्ञानिक, शास्त्रीय ज्ञानाचा अभाव होता. जिम्मीला विश्वास ठेवण्यालायक माहिती अगदी लगोलग हवी होती. मिळाली नाही. उपचार यशस्वी झाले. मुलगी ठीकठाक झाली. आज ती उत्तम जगतेय. पण त्या वेळी जिम्मीनं जगातलं सारं ज्ञान मावू शकेल असा विश्वकोष प्रत्येक क्षणी उपलब्ध करायचं ठरवलं. तो ट्रेडिंग करत असे, काही पैसा त्याच्या जवळ होता. तेवढ्यावर विकीपेडिया सुरू झाला.

विश्वकोषात नोंदी करणारी जाणकार, ज्ञानी माणसं लागतात. त्या नोंदी अचूक, खऱ्या आहेत की नाहीत ते तपासणारी माणसं लागतात. तेच आव्हान होतं. सभोवताली खोट्या, विषारी,मतलबी,एकतरफी माहितीला उधाण आलं होतं. पूर्वी ज्याला लेखक किंवा पत्रकार म्हणत त्यांना हल्ली कंटेंट क्रियेटर म्हणतात. हे माहिती-ज्ञान निर्माते ज्या माहितीच्या अवकाशात वाढले होते तिथं लोकांना भडकवणं, चिथावणं, खोटी माहितीचा मारा करून त्यांचं रूपांतर वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या प्राण्यांमधे करणं असा धंदा चालला होता. तिथं नीती (एथिक्स) शिकवली जात नव्हती. तिथं सचोटी, विश्वसनीयता या गोष्टी नष्ट झाल्या होत्या.

 जिम्मीचं म्हणणं की सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे, त्यातून जो काही निर्णय घ्यायचा तो नागरिकानी घ्यावा. हिटलरनं काय काय केलं ते लोकांसमोर ठेवावं, तो क्रूरकर्मा होता असं आपण सांगायची आवश्यकता नाही, माहिती नीटपणे ठेवली गेली तर ते लोकांना कळेल. 

ट्रंप हा भीषण खोटारडा माणूस आहे असं जिम्मीला वाटतं. पण अमेरिकन वर्तमानपत्रं आणि चॅनेल जसं ट्रंपला विशेषणं लावून ठोकत असतात तसं करायला जिम्मी तयार नाही. जे जे घडतंय ते विकीपेडिया लोकांसमोर ठेवतं; ट्रंप जे जे बोलतात ते विकीपेडियातून लोकांसमोर येतं; वस्तुस्थिती काय आहे तेही विकीपेडिया लोकांसमोर ठेवतं. पुढं त्यातून काय अर्थ काढायचे ते लोकांनी ठरवायचं असं जिम्मीचं म्हणणं आहे.

ईलॉन मस्कचा विकीपेडियावर खुन्नस आहे. विकीपेडिया डावा आहे, तो पोलिटिकली करेक्ट गोष्टी (वोक) प्रसिद्ध करतो असं मस्कचं म्हणणं आहे. ट्रंप यांचा समर्थक टकर कार्लसन म्हणतो की विकीपेडिया अप्रामाणिक आहे.

जिम्मी अशा आरोपांना उत्तर देत नाही. जिम्मी म्हणतो की ज्या कोणाला एका बाजूनं ठोकाठोकी किंवा कौतुक करायचं असेल ते त्यांनी आपापल्या ब्लॉगमधून करावं, विकीपेडिया ते करणार नाही. विकीपेडिया टोकाची भूमिका घेत नाही. जिमी म्हणतो सत्य मांडा. पर्यायी सत्य मांडू नका. 

ब्रीटनचे पुढारी जिम्मीकडं सल्ला मागायला जातात. टोनी ब्लेअर, कीर स्टार्मर,एड मिलिबँड, जिम्मीशी विविध विषयावर चर्चा करतात. ही सल्ला मसलत फुकट असते.  ब्रीटनमधले सेलेब्रिटी जिम्मीच्या परिचयाचे आहेत, पण जिम्मी एका हद्दीपलीकडं घसट वाढवत नाहीत. या संबंधांचा परिणाम विकीवर होत नाही.

विकीपेडियातली चुक कोणी दाखवली, तर विकीपेडिया ती   सुधारतो. विकीपेडिया सर्वार्थानं लोकाश्रयावर चालतो, लोकच तो चालवतात. कोणी विकीपेडिया ताब्यात ठेवू पाहील तर ते जमणार नाही कारण जिम्मी खमक्या आहे. सरकारनं किंवा कोणीही विकीपेडियात हस्तक्षेप केलेलं जिम्मीला चालत नाही. रशिया आणि चीनमधे विकीपेडियाला बंदी आहे. जिम्मी म्हणतो, ती त्यांची मर्जी. आता ट्रंप यांचा डोळा विकीपेडियावर आहे. विकीपेडियाला खिंडीत गाठायचा प्रयत्न ट्रंप यांच्या वतीनं कोणी कोणी करत आहेत. जिम्मी यांच्या ते गावीही नाही.

जिम्मी याचं The Seven Rules of Trust:
Why It Is Today’s Most Essential Superpower is out now  हे पुस्तक नुकतंच प्रसिद्द झालंय. समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण करून समाजातली दुही कशी संपवता येईल ते या पुस्तकात जिम्मी वेल्सनं सांगितलंय.

।।

निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर जावे.

Comments are closed.