सुदान. सत्तेसाठी समाजाचा बळी
सुदान हा देश आपल्या निकट परिचयाचा देश नाही.
साधारणपणे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकत्र केल्यानंतर होईल तेवढा सुदानचा भूभाग आहे. आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातल्या या देशात सध्या धुमश्चक्री चाललीय आणि जगातले बरेच देश त्या धुमश्चक्रीत सामिल आहेत.
जग किती एकमेकात गुंतलंय ते सुदानच्या धुमश्चक्रीतून लक्षात येतं.
पूर्व सुदानमधल्या एल बशर या शहरातील अधिकृत सुदानच्या सैन्याला फुटीर सैन्यानं पळवून लावल्यामुळं लढ्याला एक नवं वळण मिळालंय. या खटाटोपात तिथली हजारो माणसं मेलीयत आणि लाखो माणसं बेघर झालीयत. उपासमारी आणि रोगराईची समस्या तिथं निर्माण झालीय. फुटीर सैन्य खार्टुमवर चाल करून खार्टुम जिंकण्याची तयारी करतंय.
सुदानमधे सध्या देशाचं अधिकृत सैन्य (सुदानीज आर्म्ड फोर्सेस) आणि एकेकाळी या सैन्याचा भाग असलेलं पण आता एक स्वतंत्र झालेलं फुटीर सैन्य (रॅपिड सपोर्ट फोर्सेस) यांच्यात मारामारी चाललंय. दोन्ही सैन्यांनी २०२३ सालापासून मारामारी करून सुदानची वाटणी करून टाकलीय.
२०११ साली सुदानची सुदान(उत्तर) आणि दक्षिण सुदान अशी फाळणी झाली; (उत्तर) सुदानमधे दोन सैन्यांमधील लढाई निर्णायक झाली नाही तर (उत्तर) सुदान पुन्हा पूर्व सुदान आणि पश्चिम सुदान असं विभागेल. सुदानला फुटीरतेचा शाप आहे. १९५६ साली सुदान स्वतंत्र झाला. आजवर सुदानमधे वीसपेक्षा जास्त बंडं झाली आहेत. कुठलंही सरकार स्थापन झालं रे झालं की सरकार मान्य नसणारे गट उफाळून येतात,बंड करतात. बंडं अर्थातच लष्करी असतात.
सुदानमधे अनेक तटगट आहेत. अरब, काळे. मुस्लीम, ख्रिस्ती. लोकशाहीवादी,लष्करवादी. लष्करातल्या सेनापतीची सत्तेची हाव हा सुदानमधल्या सर्व भानगडींचा मुख्य प्रभावी घटक असतो.
सध्याच्या लढाईचा ताजा इतिहास असा.
सुदानमधे अल बशीर यांची लोकशाही राजवट चालली होती. अल बशीर यांनी पश्चिम सुदानमधल्या अरब जमातीतल्या लोकांना जवळ केलं. त्यांना शस्त्र देऊन त्यांची एक अनधिकृत सेना तयार केली जी नंतर फुटीर सेना झाली.त्यांना येमेनमधे यादवी युद्धात लढायला पाठवलं. येमेनमधे हुती जमातीच्या लोकांना इराणनं हाताशी धरून येमेन काबीज करण्याचा प्रयत्न चालवला होता. इराण या शिया देशाशी अरब या सुन्नींचं वैर होतं. अमिरात या अरब देशानं सुदानी अरबाना गोळा करून, शस्त्र देऊन येमेनमधे धाडलं. शस्त्रं अमिरातीनं दिली. बरेच कंत्राटी सैनिक आणि प्रशिक्षण पुतीननी उभ्या केलेल्या वॅग्नर सेनेनं दिलं. या अनधिकृत सैन्याला अल बशीर यांनी अधिकृत सैन्याच्या बरोबरीचं स्थान दिलं. थोड्याच काळात या सैन्याचा प्रमुख हेमेटी प्रबळ झाला आणि अधिकृत सैन्याशी बरोबरी करू लागला, अधिकृत सैन्यात आपल्याला सामिल करून घ्या असं म्हणू लागला.
२०१९ साली अल बशीर यांच्या भ्रष्ट राजवटीविरोधात सुदानमधे आंदोलन झालं. अल बशीरनी ते आंदोलन चिरडलं. लोकांच्यातल्या या असंतोषाचा फायदा घेऊन अधिकृत सैन्याचे जनरल अल बुरहानी यांनी बशीर यांचं सरकार बरखास्त केलं आणि सुदानमधे लष्करी राजवट सुरु केली. भ्रष्टाचारामधले नागरीक पार्टनर आता दूर झाले, भ्रष्टाचार पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात आला. फुटीर सेनेचे हेमेटी आता अधिकृत सैन्याच्या प्रमुखपदाची स्वप्नं पाहू लागले. त्या वेळी २०२३ साली हेमेटी आणि जनरल अल बुरहानी यांच्यात सैन्याच्या नेतृत्वाची मारामारी सुरु झाली.
हेमेटी यांच्या फुटीर सैन्याची माणसं पश्चिम सुदानमधे होती. हेमेटी यांच्या फुटीर सैन्यानं पश्चिम सुदानमधली अधिकृत सेनेची ठाणी एका मागामोग एक अशी काबीज करायला सुरवात केली. हेमेटीच्या सेनेनं राजधानी खार्टुमवर हल्ला केला.अधिकृत सेनेन खार्टूममधलं मुख्यालय आवरलं आणि पोर्ट सुदान या शहरात नेलं.
अधिकृत सैन्याला इजिप्त, इथियोपिया, एरिट्रिया, चीन, सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. उघड आणि लपून छपून अशा दोन्ही रुपात ते देश अधिकृत सैन्याला पाठिंबा देतात. फुटीर सैन्याला प्रामुख्यानं संयुक्त अरब अमिरातचा पाठिंबा आहे. शक्यता अशी आहे की अमिरातीनं केलेली मदत अधिकृत सैन्याला मिळणाऱ्या मदतीपेक्षा जास्त आहे. अमिरातीतून सुदानच्या पश्चिमेला असलेल्या चॅड या देशातल्या विमानतळावर दररोज विमानंचं विमानं भरून मदत येत असते. अमिरात म्हणतंय की ही मदत औषधं, अन्न इत्यादींच्या रुपात आहे. विमानातून येणाऱ्या खोक्यातून दारुगोळा येतो हे एक उघड गुपीत आहे. खूप ड्रोन अमिरात पाठवतं,त्या जोरावरच फुटीर सैन्य आगेकूच करत आहे.
सुदानमधे तेल आहे. सुदानमधे सोनं आहे. त्यावर अनेक देशांचा डोळा आहे. लाल समुद्राच्या काठावर ‘पोर्ट सुदान’ आहे. आफ्रिकेतल्या अनेक देशांना या बारमाही समुद्राचं आकर्षण आहे. पोर्ट सुदानच्या दक्षिणेला आणखी एक बंदर अमिरात उभारून देणार आहे, त्यासाठी अमिरात पैसा गुंतवणार आहे.
गेली साठ वर्षापेक्षा जास्त काळ सुदानमधे अराजक आहे. अरब आणि काळे असे दोन वांशिक गट सुदानमधे आहेत, त्यांच्यात मारामारी आहे. अराजक असल्यामुळं सुदानमधे भीषण गरीबी आहे, इन्फ्रा स्ट्रक्चर तयार झालं नाही. शिक्षणाचा अभाव आहे, आधुनिकता फक्त शस्त्रांच्या रुपात सुदानमधे दिसते. काभार करण्याचं कौशल्य सुदानजवळ नाही. सुदानमधल्या लोकाना लढाई दिसते, तेवढीच जमते.
गेल्या पन्नास वर्षात सुदानमधे अनेक दुष्काळ झाले, अनेक लढाया झाल्या. उपासमारीनं माणसं मेली. लढायात माणसं मेली. आज लढाईत असलेल्या दोन्ही सैन्यांनी अपरिमित अत्याचार केलेत, बलात्कार केलेत. लाखो मेले, लाखो इतर देशात स्थलांतरित झाले.
सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळालेली टिकवण्यासाठी माणसं काय करतात, त्याचे परिणाम समाजावर कसे होतात याचं सुदान हे एक उदाहरण आहे.
एकूणात पहाता अंतर्गत मारामारी थांबेल असं दिसत नाही, अराजक थांबेल असंही दिसत नाही.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com या वेबसाईटवर जावे.