१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

 एक लेख लिहिण्याच्या निमित्तानं संदर्भासाठी पुस्तकं वाचत असताना वॉल्टर बॅजेट यांनी लिहिलेली एक पुस्तिका मिळाली. Memoirs of the Right Hon. James Wilson असं या पुस्तिकेचं नाव आहे. १८६१ साली ही ६७ पानी पुस्तिका प्रसिद्ध झाली. आता गुगल बुक्सनं ती पुस्तिका उपलब्घ केली आहे.  

पुस्तकात जेम्स विल्सन यांच्या आठवणी आहेत. जेम्स विल्सन म्हणजे इकॉनॉमिस्ट या जगन्मान्य साप्ताहिकाचे संपादक. ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते.

१८५७ पूर्वी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. १८५७ साली बंड झालं. बंडाला तोंड देता देता फार पैसा खर्च झाला. भारताची अर्थव्यवस्था कोसळली. भारत सांभाळणं ईस्ट इंडिया कंपनीला जमत नव्हतं. राणीनं राज्यकारभार हाती घेतला, भारतावर ब्रीटनचं राज्य सुरु झालं. भारत ही ब्रीटनची वसाहत झाली.

तिजोरी ठीकठाक करणं, महसूल गोळा करणं, अर्थव्यवस्था तयार करणं ही जबाबदारी राणीनं जेम्स विल्सन यांच्यावर टाकली. जेम्स विल्सन दोन टर्म संसद सदस्य होते, काही काळ अर्थखात्यात मंत्री होते, दी इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाचे संपादक होते. विल्सन यांनी १८६० साली भारताचं पहिलं बजेट मांडलं.  प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, मुळातच उत्पन्नावर कर भरणं या बाबत भारत अनभिज्ञ होता; विल्सननी कर पद्धती भारतात रूढ केली. भारतात कागदी चलन त्यानी सुरू केलं. हे सारं विल्सन यांनी वर्षभराच्या काळातच पार पाडलं होतं. १८५९मधे ते कलकत्त्यात दाखल झाले आणि तिथंच १८६० साली वारले.

वॉल्टर बॅजेट हे विल्सन यांचे जावई, इकॉनॉमिस्टचे संपादक. स्वतंत्रपणे त्यांना विचारवंत, राज्यघटनेचे भाष्यकार, अर्थशास्त्रज्ञ अशी मान्यता होती. प्रस्तुत पुस्तक हे विल्सन यांचं संक्षिप्त चरित्र आहे. बॅजेट यांना लाभलेला सहवास आणि विल्सननी बॅजेटना लिहिलेली पत्रं हा पुस्तकाचा आधार आहे.

विल्सन यांच्याबद्दल फारसा मजकूर सापडत नाही.कारण विल्सन यांना त्यांच्याबद्दल व्यक्तिगत लिहिलेलं आवडत नसे. आपल्या हातून जे काही घडलं त्यात आपल्या व्यक्तिगत वाट्यापेक्षा सरकारचा आणि सहकाऱ्यांचा वाटा मोठा आहे असं विल्सन याना वाटत असे. इकॉनॉमिस्टचं संपादकपद, ब्रीटनचे ट्रेझरी सेक्रेटरीपद, भारताचे अर्थमंत्रीपद, या काळात जे जे विल्सननी घडवलं त्याचं श्रेय विल्सन स्वतःकडं घेत नाहीत, इदं न मम अशी त्यांची भूमिका आहे.  प्रस्तुत पुस्तकही बॅजेट यांनी कष्टानं आणि अपराधी भावनेनं लिहिलं आहे.

प्रस्तुत पुस्तकात विल्सन यांनी बॅजेटना लिहिलेल्या शेवटल्या पत्रातला उतारा आहे. त्यात विल्सन म्हणतात…

भारतीय  अर्थव्यवस्था हे एक प्रचंड प्रकरण आहे, इंग्लीश ट्रेझरी त्यापुढं काहीच नाही. इंग्लीश ट्रेझरीच्या तुलनेत भारतात अधिक गुंते आहेत, विविधता आहे. इथे आमचे शत्रू आहेत वेळ आणि अंतरं. भारताची हद्द प्रचंड लांबीची आहे. हद्दीवर आणि देशात सतत काही  तरी घडत असतं, तिकडं लक्ष द्यावं लागतं. दररोज कुठं ना कुठं तरी दंगल असते, आक्रमण असतं. भारतीय साम्राज्य जगडव्याळ आहे, पेलवण्यासारखं नाही. आपली सिवियालझेशन सतत  त्यांच्या माथी मारून काही निष्पत्ती होणार नाही.( इथली परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्यावे लागतात).  अफगाणिस्तानात हेरट आणि काबुल आपसात भानगडी करत असतात, रशियन फौजा तिथं उद्योग करतात. तेवढ्यात पंजाबमधे आक्रमण होतं. ते सांभाळत असतानाच नेपाळ अवाजवी मागण्या करू लागतो. त्यांची समजूत काढेकाढेस्तोवर आसामात जमाती हिंसा करू लागतात. तिकडं अधिकारी पाठवावे लागतात. ब्रह्मदेशातलं सरकार भांडण सुरु करतं. हे सारं सीमेवर चाललं असताना देशात अंतर्गत भानगडी असतात. मध्य भारतातली जनता संस्थानिकांविरोधात बंड करून उठते. एके दिवशी शिंदेंना साभाळा. दुसऱ्या दिवशी होळकर. यात आणखी एक भानगड अशी की राज्य, संस्थानं, केंद्र यांचे अधिकार आणि कर्तव्य नीटपणे ठरलेली नाहीत. त्यामुळं सतत वाद निर्माण होत असतात. न्यायव्यवस्था, कायदा अजून नीट तयार झालेली नाही, तिच्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत. ती ठीकठाक केल्या शिवाय काहीही करता येत नाही. ७० लाखाची तूट आहे. ती भरून काढून पुरेसे पैसे उभे केले नाहीत तर राज्यशकट कसं चालवणार.

पत्रात विल्सन म्हणतात की कामं इतकी आहेत की वेळ पुरत नाही, एकाद दोन दिवसांची विश्रांती आणि शुद्ध हवाही मिळत नाही. हे पत्र लिहून झाल्यावर काही दिवसातच विल्सन यांची प्रकृती ढासळली,  निधन झालं.

पटकन चाळून संपवावं असं हे पुस्तक नाही. विल्सन यांच्या निमित्तानं ब्रिटीश सवयी, ब्रिटीश मन, ब्रिटीश सिविलायझेशन, ब्रिटीशांची व्यवस्था उभारण्याची पद्दत, पत्रकारी इत्यादींवर संक्षिप्त निर्देश पुस्तकात आहेत.  भारत आणि जगभरचे राज्यकर्ते, पुढारी आणि पत्रकार आज आपण अनुभवत आहोत. ते विल्सन यांच्याशी ताडून पहाणं उदबोधक ठरेल.

मूळ पुस्तक १८६१ साली प्रसिद्ध झालं. १९२० साली ते पुन्हा प्रकाशीत झालं. २०१२ सालच्या सुमाराला पुस्तकाचा कॉपीराईट संपल्यानंतर ते पुस्तक वाचकाना मुक्तपणे उपलब्ध करावं असं गुगलनं ठरवलं. पुस्तकाच्या उपलब्ध प्रती जीर्ण झाल्या होत्या. काही अक्षरं पुसट झाली होती. कागदाला घड्या पडल्या होत्या. कागद पिवळे पडले होते.  नवं ओसीआर तंत्रज्ञान वापरून मजकूर नव्यानं तयार करावा लागला. ओसीआर तंत्रज्ञानात अक्षरं दृश्य रूपात ओळखली जातात. मूळ अक्षरं पुसट झाली असतील, किंवा त्यावर डाग पडले असतील तर यंत्रं ती अक्षरं वाचू शकत नाही. अशा वेळी भाषा, इतिहास या विषयांच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते.थोडक्यात असं की जुन्या पुस्तकांचं पुनरुज्जीवन करणं हे फार कठीण आणि खर्चाचं काम असतं. कल्पनाशक्ती, बुद्धीवैभव इत्यादी सारं ठीक आहे, पैशाचं पाठबळ नसेल तर सारं फोल असतं.

असो.

।।

Comments are closed.