सिनेमा : ‘लकी लू’
नवं जग कसं आहे ते ‘लकी लू’ आपल्याला दाखवतो. चित्रपटाचा दिक्दर्शक कोरियन आहे; चित्रपटात दाखवलेलं कुटुंब तैवानी आहे; चित्रपट घडतो न्यू यॉर्कच्या ब्रुकलीन विभागात.
ब्रुकलिनमधे चिनी वस्ती आहे. एक चिनी येतो. तो आपल्या नातेवाईकाला चीनमधून आणतो. चिनी विद्यार्थी शिकायला येतात, चिनी वस्तीत रहातात. चिनी विद्यार्थी कमवू लागतो, आपल्या आईबापांना ब्रुकलीनमधे आणतो, आपल्या बहीण भावांनाही चीनमधे आणतो. चायना टाऊन तयार होतं. सर्व चिनी एकमेकाला धरून असतात. अडीअडचणीत मदत करतात.
ब्रुकलीनमधे चिनी आहेत, कोरियन आहेत, तैवानी आहेत, इंडोनेशियन आहेत, बांगला देशी आहेत, नायजेरियन आहेत. अशा नाना संस्कृतींची माणसं तिथं रहातात. ब्रुकलिनमधे म्हणजे अमेरिकेमधे.
अशाच वस्त्यांमधे एक जोहरान ममदानी.आई भारतीय, वडील युगांडाचे. ममदानी सांगतो की अमेरिका इमिग्रंट्सची आहे, गोऱ्यांनी ती स्वतःची आहे अशी डिंग मारू नये.
अशा या अमेरिकेत माणसं जगतात तरी कशी? प्रस्तुत चित्रपटात ते आपल्याला दिसतं.
लू हा तैवानी तरूण. नशीब काढायला न्यू यॉर्कमधे पोचला. कोणीही चिनी माणूस अमेरिकेत सहजपणे करेल ते करायचा प्रयत्न; चिनी रेस्टॉरंट. मराठी माणूस वडापावची गाडी टाकेल,उत्तर प्रदेशातला माणूस पाणीपुरी-भेळपुरीचा ठेला टाकेल. तसं. त्याचे भाईबंद त्याला मदत करतात. जमत नाही. कर्जबाजारी होतो. मग सायकलवरून पदार्थ घरोघरी पोचवणारा डिलिव्हरी बॉय होतो. त्याची पत्नी तैवानमधे असते, त्याला एक छोटी मुलगीही असते. लूला आपल्या पत्नीची व मुलीची सतत आठवण येत असते, खटपट करून तो त्यांना ब्रुकलीनमधे आणतो.
ब्रुकलीन हे बहुढंगी जगण्याच्या जीवघेण्या खटाटोपात अडकलेलं शहर. हवामान क्रूर. गर्दी. आवाज. पैसा, पैसा. मरमर.
अंधारही नाही आणि लखलखीत प्रकाशही नाही असं वातावरण पूर्ण चित्रपटभर आपण पहातो. एयर कंडिशनिंशंड खोलीतून बाहेर पडल्यावर आपल्या चष्म्याची काच धुरकट होते,सभोवतालचं जग धुरकट दिसतं, समोरच्या दृष्यांमधल्या माणसांच्या आणि वस्तूंच्या बाह्य रेषा दिसत नाहीत, प्रत्येक गोष्ट विसविशीत दिसते. तसंच.
लूनं एक छोटं अपार्टमेंट घेतलंय. त्यासाठी पैसे मोजलेत. पत्नी न्यू यॉर्कमधे पोचलीय, विमानतळावरून लूच्या घराकडं यायला निघालीय. लू वेगळ्याच संकटात आहे. त्याचं जीवन असलेली सायकल चोरीला गेलीय. अपार्टमेंट भाड्यानं घेण्यासाठी मोजलेले पैसे एका चोरानं पळवलेत. तो जवळपास बेघर आहे. घर नाही, सायकल नाही. बायको मुलीला ठेवणार कुठं? जगवणार कसं? तिथून चित्रपट सुरु होतो. नाना संकटं, नाना खळगे. जवळची माणसंही दगा देतात. लू प्रामाणिक आहे. सभोवतालच्या अप्रामाणिक जगात तो आपला प्रामाणिकणा घट्ट धरून लढत रहातो. चित्रपट संपतो तिथंही तो कासवाच्या पावलानं पुढं सरकण्याच्या प्रयत्नात दिसतो.
घरोघरी वस्तू पोचवणाऱ्या नाना कंपन्या आज महाराष्ट्रात आणि भारतभर पसरलेल्या आहेत. दिवसाच्या कुठल्याही प्रहरात डिलिव्हरी घेऊन माणूस येतो, पदार्थ देतो, सटकन नाहिसा होतो. बाहेर त्याची बाईक उभी असते, त्याला पुढली डिलिव्हरी करायची असते. काहीही कारणानं एकाद दोन डिलिव्हऱ्यांमधे घोळ झाला तर त्याचं नुकसान होतं,नागरिकांच्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळंच. हे एक वेगळंच जग आहे, हे एक वेगळंच जगणं आहे, आपल्याला ते चार दोन वर्षांपूर्वी माहित नव्हतं. ‘लकी यू’ या चित्रपटातून ते जग आपल्याला दिसतं. हा दिक्दर्शक लॉईड चोईचा पहिला चित्रपट कान्स महोत्सवात वाखाणला गेला याचं चित्रपटाचा विषय हेही एक कारण असेल.
लूची याया ही मुलगी गोड आहे. निष्पाप, अवगुणाचा लवलेशही नाही. तिचं एकच स्वप्न, तिला एक गोल्ड फिश हवाय. ब्रूकलीनच्या अमानवी वातावरणात ती बिनधास्त बाहेर पडते, फिरते. एक घड्याळ तिला सापडतं.असं घड्याळ कुठं तरी मिळालं म्हणून घेणं ही जगाच्या दृष्टीनं चोरी असते हे तिला कसं माहित असणार? अजून तिनं ब्रुकलीनची चोरांची दुनिया पाहिलेली नाही. अगदी निर्व्याजपणे ती ते घड्याळ आपल्या बापाला देते.
याया हे पात्र चित्रपट हळवा करतं. दिक्दर्शकानं तो हळवा भाग मर्यादित ठेवलाय, चित्रपट भावनेच्या अंगानं नेला नाही. गळा दाटून यावा, डोळे डबडबावेत अशी शैली दिक्दर्शकानं टाळली आहे. लू, त्याची पत्नी, त्याचे भाईबंद, त्याची मुलगी सगळी पात्रं दिक्दर्शकानं मापात ठेवलीत. ही सारी माणसं ज्या वातावरणात वाढतात ते ब्रुकलीन, ते अमेरिका हा चित्रपटाचा फोकस आहे असं चित्रपट पहाताना वाटतं. चित्रपटात नाट्यमय प्रसंग, नाट्यमय घटना दिक्दर्शकानं टाळल्या आहेत. नाट्यमयता यावी अशा अनंत जागा चित्रपटात आहेत. ब्रुकलीनमधली गर्दी, ब्रुकलीनमधली अस्वच्छता आणि त्या साऱ्याला छेद देणारं ब्रुकलीनमधलं अती श्रीमंतांचं जगणं या साऱ्या गोष्टी चित्रपटात ओझरत्या दिसतात.
लू आणि त्याची पत्नी यांची स्वप्नं चित्रपटात रंगवलेली नाहीत. अनेक गोष्टी टाळून चित्रपट केलाय.
समजा आपण चित्रपटाचे अभ्यासक नाहीयोत; डे सिकाचा बायसिकल थीव्ज हा चित्रपट आपल्याला माहीत नाहीये; तर आपल्याला ‘लकी लू’ हा चित्रपट स्वतंत्रपणे आवडेल.
तसं म्हणायचं कारण असं की बायसिकल थीव्जमधे भिंतीवर पोस्टर डकवणाऱ्या माणसाची सायकल चोरीला गेलेली असते. चोरीला गेलेली सायकल मिळवणं किंवा नवी सायकल घेणं यासाठी केलेली खटपट बायसिकल थीव्जमधे आहे. ती खटपट हिलॅरियस आहे, डोळ्यात पाणी आणणारी आहे, महायुद्धानंतरच्या काळातला इटाली दाखवणारी आहे. बायसिकल थीव्ज जगातल्या थोर चित्रपटात पहिल्या १०मधे गणला जातो.
डे सिका आणि लॉईड चोई ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, दोघांची संस्कृती वेगळी आहे, दोन्ही चित्रपटांची भौगोलिक पार्श्वभूमी वेगळी आहे, दोघांचा काळ वेगळा आहे. मुख्य म्हणजे दोघांची चित्रपट दृष्टी वेगळी आहे. म्हणून दोन्ही चित्रपट स्वतंत्रपणेच पहायला हवेत.
चित्रपट ग्रेट नाही, पण चांगला आहे.
चित्रपट गोव्यात इफ्फीमधे होता.
।।