युनायटेड स्टेट्स ऑफ डोनल्ड ट्रंप
वॉशिंग्टनमधे केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट या संस्थेचं केंद्र आहे. ट्रंप यांनी या केंद्राच्या नावात आपलं नाव घुसवलं. केंद्राचं नाव झालं डोनल्ड ट्रंप केनेडी सेंटर.
ट्रंप यांचं नाव कला केंद्राला (सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, वॉशिंग्टन) दिल्यानंतर रसीक तिथं जाईनासे झाले आहेत. यंदाच्या सीझनमधे त्या केंद्राच्या पाच कला मंचाची ५७ टक्के तिकीटं विकली गेली नाहीत. रसीक तिथं जायला तयार नाहीत, नामांकित नाट्य निर्माते, संगित संस्था तिथं प्रयोग करायला तयार नाहीत. ‘ट्रंपकला’ आपल्याला मंजूर नाही असं अनेक मान्यवर कलाकार, कलासंच, कला संस्थांचं म्हणणं आहे.
हे काय प्रकरण आहे?
मुंबईत एनसीपीए (नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग ऑफ आर्टस) ही संस्था, कला सादर करण्यासाठी, टाटांनी स्थापन केली. पुल देशपांडे, विजया मेहता, अशोक रानडे या कलाकारांनी ही संस्था वाढवली, चालवली. सादर करण्यासाठी उत्तम दर्जाचा मंच व इतर व्यवस्था असावी लागते, कलेचा विकास व्हावा यासाठी संशोधन व्हावं लागतं, कला जतन करावी लागते. एनसीपीए ही संस्था वरील कामं करते.
अमेरिकेत १९५८ साली आयझेनहॉवर यांनी वॉशिंग्टनमधे कला केंद्र स्थापन केलं. स्थापनेनंतर ते केंद्र कलाकारांच्या हातात सोपवलं, आयझेनहॉवर यांची किंवा त्यांच्या विचारांची भलामण केंद्रानं केली नव्हती, कलेचं ते काम नसतं. इंग्लंडमधेही अशीच संस्था आहे, तिथंही कलाकार संस्था चालवतात, पंतप्रधान ती संस्था कशी चालावी ते सांगत नाहीत. १९६४ साली वॉशिंग्टनमधल्या या कला केंद्राला प्रेसिडेंट केनेडी यांचं नाव देण्यात आलं, केनेडींच्या मृत्यूनंतर. १९७१ साली ही संस्था जनतेकडं सोपवण्यात आली, संस्था चालवण्यासाठी लागणारे पैसे जनतेकडून देणगीच्या स्वरूपात मिळावेत अशी तरतूद झाली,सरकार संस्थेत उरलं नाही.
या संस्थेचा केनेडी कुटुंबाशी किंवा केनेडी यांच्या राजकीय पक्षाशी काहीही संबंध कधीही नव्हता.
२०२५ साली डोनल्ड ट्रंपनी त्यांचं बळ वापरून सेंटरच्या ट्रस्टमधले कलाकार, आर्किटेक्ट इत्यादींना हाकलून दिलं, तिथं आपली माणसं नेमली. एकेकाळी जर्मनीत राजदूत असलेल्या एका ग्रेनेल नावाच्या माणसाला त्या ट्रस्टमधे घुसवलं. इतकी सगळी व्यवस्था झाल्यावर एके दिवशी डोनल्ड ट्रंप केनेडी सेंटरचे चेयरमन झाले. ट्रंप यांचा कलेशी काय संबंध? तरीही ते बिनधास सेंटरचे चेयरमन झाले.
चेयरमन झाल्यावर लगोलग त्यानी केंद्राचं नाव बदललं. केनेडी सेंटर या नावाच्या पाठी डोनल्ड ट्रंप ही अक्षरं चिकटवली, डोनल्ड ट्रंप केनेडी सेंटर असं नामकरण केलं. अमेरिकेतल्या प्रत्येक दृश्य गोष्टीवर ट्रंप यांना त्यांचं नाव हवं असतं. ट्रंपनी टोप्या, टी शर्ट, चहाचे आणि बियरचे मग यावरही आपलं नाव कोरून ते विकायला ठेवले. जागोजागी दिसणारी ट्रंप यांची पोस्टर्स आणि वस्तू पाहिल्यावर अमेरिका हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका राहिला नसून ट्रंप लँड झालं आहे की काय असं लोकाना वाटू लागलं आहे.
नुसतं नावच नव्हेत, ट्रंप यांना सेंटरचं रूप पालटायचं आहे. ट्रंपनी जाहीर केलं की सेंटरमधे होणारी नाटकं, प्रदर्शन आणि जलसे बकवास असतात, ते वोक कल्चर आहे. आपल्याला ते वोक कल्चर नष्ट करून तिथं देशप्रेम आणि धर्मप्रेम आणायचं आहे.
वोक कल्चर किंवा वोक हा एक शब्द अलीकडं प्रचारात आला आहे. समाजातल्या रुढी,परंपरा,देशप्रेम,धार्मिकता इत्यादी उधळून लावणारी संस्कृती म्हणजे वोक संस्कृती अशी व्याख्या करण्यात आलीय.
केनेडींचा खून झाला त्या काळी अमेरिकेत दशकभर तरूण रस्त्यावर आले होते. अमेरिेकेत काळ्यांना माणुसकीची वागणूक दिली जात नाही, समानतेनं वागवलं जात नाही या विरोधात तरूण रस्त्यावर आले होते. माणुसकीची मागणी करणाऱ्या डॉ.किंग यांचा खून झाला होता.काळ्या तरुणाला कॉलेजमधे प्रवेश नाकारल्यावर केनेडीनी त्या तरुणाला सैनिकांच्या पहाऱ्यात कॉलेजमधे पाठवलं होतं. केनेडींचाही खून झाला.
नंतर अमेरिकेनं वियेतनाममधे केलेल्या घृणास्पद वर्तनाचा निषेध करण्यासाठी तरूण रस्त्यावर आले होते.
अमेरिकेतले गायक, संगितकार, नाटककार, लेखक, चित्रपट कलावंत अशी तमाम कलाकार मंडळी आपापल्या कलेतून वियेतनाम आणि वंशद्वेष लोकांसमोर मांडत होते. ही मंडळी राजकारण करत नव्हती, राजकारणा पलिकडल्या गोष्टी मांडत होती.
ट्रंप त्या कलाव्यवहाराला वोक असं म्हणतात. अमेरिका हा देश केवळ गोऱ्या ख्रिश्चनांचा नाहीये, तो जगभरून आलेल्या नाना रंगाच्या, नाना पंथांच्या, पंथ नसलेल्या माणसांचा आहे, हे सत्य लोकांच्या बोलण्यात येतं, वागण्यात येतं, दैनंदिन व्यवहारात दिसून येतं. अमेरिकेत विकसित झालेली संस्कृती केवळ कलाकारांनी तयार केलेली नाही, ती लोक व्यवहारातून घडत आली आहे. ट्रंपचा या संस्कृतीला, लोकव्यवहाराला आणि तो प्रतिबिंबित होणाऱ्या कलाव्यवहाराला विरोघ आहे. नुसता विरोध नाही तर ट्रंपना ‘वोक’ संस्कृती नष्ट करायची आहे.
आपल्याला मंजूर नसलेला विचार आणि आचार देशद्रोहाचा-धर्मद्रोहाचा असतो अशी ट्रंप यांची समजूत आहे. गंमत कशी आहे पहा. ट्रंप स्त्रियांशी अत्यंत घाण पद्धतीनं वागतात. अमेरिकेत जेव्हां सैन्यात भरती होण्याचा कायदा होता तेव्हां खोटी कारणं दाखवून ट्रंप सैन्यात गेले नाहीत. ट्रंप कर भरत नाहीत. निवडणुकीत पराभव झाल्यावर ट्रंपनी हज्जारो ‘देशप्रेमी’ गुंडांना चिथावून संसदेवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. संसदेवरच्या हल्ल्यानंतर आता ट्पंपच्या हल्ल्याचं लक्ष्य आहे कला.
ट्रंपचं नाव असलेल्या केंद्रामधे कला सादर करायला कलाकार तयार नाहीयेत.ट्रंपचं नाव असलेल्या केंद्रात कार्यक्रम पहायला जायला लोक तयार नाहीयेत. ट्रंप युग जोरात असताना असं अमेरिकेत घडतंय, ही सुद्धा अमेरिकेची एक बाजू आहे.
।।
निळूदामले डॉट कॉम

Comments are closed.