दावोस
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. दावोस.
वसुंधरा टिकवणं, जगातले संघर्ष मिटवून शांतता निर्माण करणं, जगाचा आर्थिक विकास साधणं हे दावोस परिषदेच्या कामकाजाचे मुख्य विषय असतात. यंदा सर्व विषय बाजूला सरले, ट्रंप काय म्हणतात, ट्रंपना तोंड कसं द्यायचं या मुद्द्याभोवती दावोस परिषद फिरली.
स्वित्झर्लंडमधे कुरपार्क या गावात दावोस परिषद भरते. तीनेक हजार माणसं जमतात.त्यात पुढारी, कंपन्यांचे मालक,कंपन्यांचे कारभारी असतात. ६५ हजार चौफुचं लाकडी बांधकाम करून पाच इमारतींचा समूह तयार केला जातो. उतरत्या छपरांची शॅले हे स्विस वैशिष्ट्यं आहे. इमारती दर वर्षी उभारतात आणि परिषद झाल्यावर मोडून टाकतात. हजर असणाऱ्या लोकांना आपसात मोकळेपणानं भेटता यावं, एका दालनातून दुसऱ्या दालनात जायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये अशा बेतानं इमारती उभारलेल्या असतात.
परिषदेचा प्रकल्प पर्यावरण टिकवणारा प्रकल्प असतो. लोकांनी पायी फिरावं, सार्वजनिक वाहनांनी परिषदेच्या ठिकाणी यावं अशी कल्पना असते. आसपासच्या तीन चार गावात ४५ हॉटेलमधे रहायची व्यवस्था असते. तिथून माणसं बस आणि ट्रेननं परिषदेच्या ठिकाणी यावीत अशी अपेक्षा असते. परिषदेपुरती एक रेलवे लाईन टाकली जाते, एक स्टेशन निर्माण केलं जातं. परिषद संपली की रूळ काढतात, स्टेशनचे भाग सुटे करून (डिसमँटल) नेले जातात, जागा रिकामी होते.
स्वित्झर्लंडमधे बर्फ पडतं. इमारत आतून उबदार ठेवावी लागते. त्यासाठी सौर ऊर्जा वापरली जाते. वीज निर्माण करण्यासाठी लाकडाची कांडकी वापरली जातात. ज्या जंगलात लाकडं तोडली जातात आणि तोडलेल्या झाडाच्या ऐवजी एक नवं झाड वाढवलं जातं तिथून ही कांडकी आणलेली असतात. परिषदेत पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जात नाहीत.
परिषदेच्या काळात वापरलेलं फर्निचर व इतर वस्तू परिषद संपल्यावर इतर संस्थांना वापरायला दिल्या जातात, टाकत नाहीत. विमानात वापरलं जाणारं इंधन खूप प्रदूषण करत असतं, विमानं कमीत कमी वापरावीत, पुढाऱ्यांनी ट्रेननं आणि कारनं प्रवास करावा असं परिषदेचं म्हणणं असतं. युरोपातले मंत्री ट्रेननं स्वित्झर्लंडमधे येतात.
अपवाद ट्रंप यांचा. अमेरिकेतून ट्रेननं येता येत नाही हे खरं आहे. पण जेनेवात विमानानं पोचल्यावर पुढल्या हालचाली ट्रेन किंवा कारनं करता येणं शक्य आहे. युरोपीय पंतप्रधान तसं करतात. ट्रंपनी मात्र अमेरिकेतून विमानांचा ताफा आणला. मुख्य विमानतळापासून परिषदेच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांचा हेलेकॉप्टरचा ताफा वेगळा होता.
यंदाची परिषद भरण्याच्या आधी ट्रंपनी युरोपला दणका दिला होता. ग्रीन लँड विकत घेण्याला युरोपीय देशांनी विरोध केला तर त्या देशांवर जबर जकात लावू असं ते म्हणाले होते. विकत घ्यायला विरोध झाला तर सैनिकी कारवाई करून ग्रीनलँडचा ताबा घेऊ असंही ट्रंप म्हणाले होते. परिषदेला गोळा झालेल्या लोकांमधे जाम उत्सूकता होती की त्या प्रश्नावर ट्रंप काय म्हणतात.
ट्रंप परिषदेच्या मुख्य सभागृहात भाषण करणार होते. सभागृहाची क्षमता ५ हजार लोकांची होती. वेळेच्या आधी सभागृह गच्च भरलं अनेक पुढाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
ट्रंप बोलले. नेहमीसारखं. त्यांना मुद्देसूद बोलता येत नाही. त्यांचं भाषण घरंगळत जातं. सुरवातीला म्हणाले की युरोपच्या नेत्यांशी माझं बोलणं झालंय. आमचं एकमत झालंय. मी लष्करी कारवाई करणार नाहीये. येवढं वाक्य झाल्यावर ट्रंप तिसऱ्या विषयाकडं वळले. युरोपीय पुढाऱ्यांशी कोणत्या मुद्द्यावर एकमत झालं ते ट्रंपनी सांगितलंच नाही. जकात लावणार की नाही, लावल्यास किती लावणार यावर एक शब्दही बोलले नाहीत.
ट्रंपनी शांतता बोर्डाच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांच्या अध्यक्षतेखालच्या बोर्डात जगातले नामी लोक ट्रंप घेणार होते. हे बोर्ड जगात शांतता नांदावी असा प्रयत्न करणार होतं. जगात म्हणजे कुठंकुठं? उल्लेख नाही. युक्रेन, गाझा, कांगो,पाकिस्तान-भारत, कंबोडिया? ते श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं. ट्रंप यांचे जावई आणि मित्र युक्रेन रशिया लढाईत मध्यस्थी करत होते. समांतर पातळीवर तो उद्योग चालला होता. गाझातही शांतता मंडळ स्थापण्याची घोषणा झाली होती. त्या प्रयत्नांचा आणि शांतता बोर्डाचा काय संबंध असेल? ट्रंपनी स्पष्ट केलं नाही.
एक गोष्ट मात्र सांगितली. फुकट शांतता बोर्डाचा सदस्य होता येणार नाही. जे एक अब्ज डॉलर देतील त्यांना ट्रंप आमंत्रण देणार. माणूस ट्रंप यांच्या मर्जीतला असेल तर त्याला फी असणार नाही. उदा. ट्रंप यांचे जावई जेरेड कुश्नर.
जगातल्या अशांततेबद्दल बोलता बोलता ट्रंपनी सोमालियातील युद्धाचा उल्लेख केला. सोमालियातल्या लोकांचा बुद्ध्यांक कमी आहे असं म्हणून तो मोकळे झाले. सभागृहातल्या लोकांनी एकमेकाकडं पाहिलं, पण कोणी बोललं नाही.
कोण बोलणार?
जेपी मॉर्गन या कंपनीचे मुख्य कारभारी जेमी डायमन अगदी मृदूपणे म्हणाले की आता अमेरिका हा विश्वास ठेवण्यासारखा मित्र राहिलेला नाही. मिनेसोटात इमिग्रेशन विरोधी पोलिसांनी एका माणसाला गोळ्या घातल्या. त्यावर डायमन येवढंच म्हणाले की या घटनेनं मी अस्वस्थ झालो. दुसऱ्याच दिवशी डायमन यांच्यावर ट्रंपनी ५ अब्ज डॉलरचा बदनामी खटला गुदरला.
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर न्यूसम दावोसला गेले होते. ते डेमॉक्रॅट आहेत, ट्रंप यांचे विरोधक आहेत. अमेरिकन सरकारनं दावोसमधे एक चर्च भाड्यानं घेऊन तिथं पत्रकार परिषदांची सोय केली होती.तिथं न्यूसम पत्रकारांशी बोलणार होते. एकाएकी त्यांना परिषदेला जागा नाकारण्यात आली.
परिषद भरवतात स्विस लोक. दहा दहा लाख डॉलरची फी भरून जगभरचे लोक तिथं येतात. जगभरातले प्रश्न तिथं चर्चिले जातात. ट्रंप तिथं गेले की सर्व ‘फालतुगिरी’ बंद. ट्रंपचंच ऐकायचं.
जगाचं भवितव्य आता ट्रंप घडवणार.
।।