पालक पनीर
पालक पनीर आणि अमेरिका
पालक पनीर खायची येवढी उर्मी की त्या पायी एका जोडप्याला अमेरिकेतली नोकरी गमवावी लागली, विद्यापीठातली शिक्षणाची संधी गमवावी लागली.
आदित्य प्रकाश आणि त्याची मैत्रिण उर्मी भट्टाचार्य कोलोराडो (बोल्डर) मध्ये मानववंशास्त्र या विषयात पीएचडी करत होते, तिथंच त्यांना सहाय्यक शिक्षकाची नोकरीही होती.विद्यापीठाच्या वसती गृहात रहात होते. एके दिवशी त्यानी बाजारातून पालक पनीरची भाजी आणली, वसती गृहाच्या मायक्रोवेवमधे गरम करायला ठेवली. वसतीगृहातल्या कर्मचाऱ्यानं आक्षेप घेतला. पालक पनीर मायक्रोवेवमधे ठेवायची नाही. आदित्यनं कारण विचारलं. कर्मचारी म्हणाली की त्या भाजीचा खूप तीव्र वास येतो.
आपल्याकडं पालक पनीरमधे दालचिनी आणि गरम मसाला घालतात, त्याचा खूप वास येतो हे खरं आहे. मसालेदार पदार्थ खायची सवय नसलेल्या लोकांना हा वास सहन होत नाही, ती भाजी खाल्ली तर जळजळ होते, ॲसिडिटीचा त्रास होतो.
अमेरिकेत घर विकत घ्यायला निघालेला माणूस भारतीय माणसाचं घर घ्यायला नाखुष असतो; त्याच्या स्वयंपाकघराला मसाल्यांचा वास येतो.
मध्यंतरी जर्मनीत स्थानिक गोऱ्या ख्रिस्ती लोकांनी आंदोलन केलं. स्थलांतरीत सीरियन लोकांना घालवून द्या अशी त्यांची मागणी होती. कारण काय तर त्यांच्या घरातून मसाल्याचे वास येतात. त्यांचं म्हणणं ते आल्यापासून पूर्ण स्ट्रीट वासानं भरते, नकोसं होतं. फ्रेंचांनीही अरबांना घालवा अशी मागणी केली.
तर मुद्दा असा की पालक पनीरच्या वासाला अमेरिकन लोकांचा आक्षेप असल्यानं कोलोराडो विद्यापीठानं पालक पनीर गरम करायला परवानगी नाकारणारा नियम केला होता.
आदित्यचं डोकं फिरलं. तो भांडला. कर्मचारी म्हणाली की तिचा इलाज नाही, नियमच तसा आहे, इतरांना मसाल्याचे वास नकोयत.
अमेरिकाच ती. आदित्य कोर्टात गेला.
काय मज्जा नै?
कोर्ट म्हणणार की पालक पनीरको हाजीर करो. मग कोणी पंजाबी खाणावळीतला माणूस पालक पनीरची भाजी कोर्टाला सादर करणार. ज्यूरीमधे नाना प्रकारची माणसं असणार. पैकी अमेरिकन ज्यूरी बाईच्या पोटात मळमळू लागणार, तिला ओकारी करावीशी वाटणार, ती वॉश रूमकडं पळणार. एक भारतीय ज्यूरी असणार. तो खुष. त्याच्या तोंडाला पाणी सुटणार. एकादा अरब असणार. तो हंहं असं म्हणणार, त्याला त्याच्या पदार्थाची आठवण येणार.
ज्यूरींचं एकमत होणार नाही.
न्यायाधिशाचं काय? तो किंवा ती अमेरिकन निघाली तर निकाल लागला. न्यायाधीश कोणी तरी बरारा किंवा कमला हॅरिस निघाला तर तो खुष. पण ज्यूरींचं एकमत नसल्यानं मामला अडकून बसणार. मामला वरच्या कोर्टात मामला जाणार. न्यायाधीश म्हणणार की अशा प्रकारचे इतर पदार्थही तुलेनेसाठी कोर्टासमोर सादर करावेत. दणादण मराठी, उडुपी,बिहारी,राजस्थानी, पंजाबी पदार्थ कोर्टात येणार…घमघमाट..
हा सारा उद्योग करण्यासाठी वकील लागणार. विद्यापीठ प्रतिष्ठित असल्यानं वकीलही खोल खिशाचे असणार. कोर्टाच्या खर्चाच्या आकड्यावर शून्यं वाढत जाणार. तेव्हां ती भानगडच नको असं म्हणून विद्यापीठानं सेटलमेंट केली. आदित्य आणि ऊर्मीला २ लाख डॉलर भरपाई दिली. विद्यापीठानं पैसे देताना म्हटलं की त्यांनी गुन्हा कबूल केलेला नाही, मामला मिटवला आहे.
खटल्याची वाच्यता झाली. सोशल मिडियात उलट सुलट पोस्ट आल्या. भारतीयांनी विजय पताका नाचवली, भारताचा झेंडा नाचवला, भारत माता की जय म्हटलं. काही पोस्ट रागावलेल्या होत्या. तुम्हाला मसालेदार पदार्थ खायची हौस असेल तर आपल्या देशात परत जा असं काही पोस्टमधे आलं.
आदित्य उर्मी खुष झाले. त्या दिवशी त्यांनी सरसोंका साग आणि मकईकी रोटी खाल्ली असणार.
त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही. विद्यापीठानं दोघांनाही विद्यापीठातल्या नोकरीतून काढून टाकलं. त्यांच्या पदव्या परत घेतल्या, विद्यापीठात यायला मनाई केली, त्यांचा पीएचडीचा अभ्यास थांबला. दोघं कोर्टात गेले.विद्यापीठानं त्यांच्या पदव्या परत दिल्या पण नोकऱ्या मात्र दिल्या नाहीत, पीएचडीचा अभ्यास दिला नाही. कोणाला नोकरीवर ठेवायचं आणि कोणाला पीएचडीत प्रवेश द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार विद्यापीठाला असतो; निर्णय कां घेतला हे न सांगण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे; हे कोर्टानं मान्य केलं.
पालक पनीरच्या मिळालेल्या पैशातला बराच पैसा वरील खटल्यात खर्च झाला असणार.
या प्रकरणामुळं बहुदा इतर विद्यापीठांनीही दोघांना शिक्षण आणि नोकरीसाठी नकार दिला असणार. दोघंही भारतात परत आलेत. पुन्हा अमेरिकेत पाऊल ठेवणार नाही असं ते म्हणत आहेत.
भारतात आल्यावर त्यांचं काय झालं? त्यांना रहाण्यासाठी एकाद्या जैनांच्या वस्तीत जागा मिळाली? दोघंही अमेरिकेत नॉनव्हेज खात असतील तर त्यांना कोथरूडमधे घर मिळालं? अलीकडं वस्त्या जातीभाषाधर्मात वाटल्या जात आहेत. त्यांना उर्मीच्या जातीभाषापंथाच्या लोकांच्या वस्तीत किंवा आदित्यच्या जातीभाषापंथाच्या लोकांच्या वस्तीतच जायला लागेल. भारत त्या दिशेनं चालला आहे.
व्यक्तिशः माझी आठवण सांगतो. माझं लहानपण मुंबईतल्या एका अत्यंत कडक व्हेज, वरण भात तूप अळवाचं फदफदं खाणाऱ्या शेजारपाजारात गेलं. तळ मजल्यावर एका घरात बांगडे तळत. त्याचा घमघमाट येत असे. आम्हाला त्या वासाची सवय नव्हती, पोटात मळमळत असे. पण त्याच वेळी तळ मजल्यावरच्या दुसऱ्या कुटुंबाच्या तोंडाला पाणी सुटत असे.
त्या काळात निभावून गेलं. आम्ही बांगडे सहन केले, बांगडेवाल्यांनी वरणभात सहन केला. आता परिस्थिती बदललीय.
फक्त फिशवाले, फक्त भेंडीची भाजी खाणारे, फक्त उंधियू खाणारे, फक्त कोंबडी खाणारे, फक्त मटण खाणारे, फक्त तांबडा पांढरा रस्सा खाणारे, फक्त इडली डोसा खाणारे, अशा वस्त्या तयार होऊ घातल्या आहेत.
घरात व्हेज, हॉटेलात दणादण मासेमटण.
कठीण आहे.
।।