जफर पनाही

जफर पनाही

सिनेमा. जफर पनाही.

‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’

रहस्य, ह्यूमर.

जफर पनाही या इराणी चित्रपट दिक्दर्शकाची ताजी बातमी;   त्याला इराणच्या पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकलंय. कारण.  जनतेच्या महागाई विरोधी, सरकार विरोधी आंदोलनात इराणी सरकारनं हजारो निरपराध माणसांना ठार मारलं याचा निषेध जफर पनाही यांनी केला. पत्रकात पनाही म्हणाले की धर्मनेते यांनी हजारो माणसं मारली. 

  पनाही यांची ही तिसरी अटक आहे. या आधी दोन वेळा ते तुरुंगात होते; एकदा सहा वर्षासाठी. 

पनाहींचे चित्रपट वास्तवाचं रूपांतर कलेत करतात. गेल्या वेळी सहा वर्षं तुरुंगात होते तेव्हां त्यांना तिथं राजकीय कैदी भेटले होते. त्या कैद्यांचा यातनाछळ सरकारनं केला होता. त्या छळाची पार्श्वभूमी त्यांच्या ताज्या  ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ या चित्रपटात आहे.

 ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ २०२६ च्या ऑस्कर स्पर्धेत आहे. या चित्रपटानं २०२५ मधे कॅन महोत्सवात बक्षीस मिळवलं आहे. नुकताच हा चित्रपट पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं दाखवला.

‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ हा चित्रपट हिचकॉकच्या चित्रपटाची आठवण करून देणारा आहे. सतत  धक्के बसतात,रहस्य उलगडतय असं वाटतं आणि नवं रहस्य उभं ठाकतं. हिचकॉकचं रहस्य शेवटी उलगडतं; पनाहीच्या चित्रपटात  रहस्य पूर्ण उलगडत नाहीच. गोष्ट खूप वळणं वळणं घेत फिरते.

चित्रपटातलं मुख्य पात्र एगभाल; हा माणूस एकेकाळी तुरुंगाधिकारी असतो; असं वाहिद या कार मेकॅनिकला वाटतं. या एगभालनं तुरुंगात आपला यातनामय छळ केलाय असं वाहिदला वाटतं. हा एगभाल अगदीच अपघातानं त्याच्या वर्कशॉपमधे कार दुरुस्त करायला येतो तेव्हां वाहिदची स्मृती जागी होते, तो एगभालला शिक्षा द्यायचं, मारायचं ठरवतो. एगभाल हा खरोखरच छळ करणारा आहे याची खात्री करण्यासाठी वाहिद आणखी दोघातिघांकडं जातो. एगभाल म्हणतो की मी तो नाही. पण सगळ्यांची खात्री असते की तो छळ करणारा एगभालच आहे. त्याला खड्ड्यात पुरायचा प्रयत्न होतो. सरतेशेवटी त्याला झाला बांधून ठेवलेलं असताना एगभाल कबूल करतो की मीच छळ केला.   हे तो मनापासून कबूल करतो की सुटका व्हावी म्हणून करतो ते कळत नाही. शेवटी एका क्षणी  वाहिदला एगभालची दया येते, वाहिद एकभालला सोडून देतो. 

एगभाल या माणसानं खून केलाय  असं दिक्दर्शक पात्रांकरवी   आपल्याला सांगत रहातो. यातनाछळ खरोखरच केला की एका पात्राच्या डोक्यात तसं बसलंय खरा छळ झालेलाच नसावा असंही दिक्दर्शक आपल्याला दाखवतो.

पनाही छळ दाखवत नाही. छळ कसा असू शकेल याची कलात्मक झलक पनाही दाखवतो.

गोंधळ. प्रेक्षक गोंधळतो पण खुर्चीला चिकटून रहातो.

चित्रपट  गंभीर आहे. इराणमधली जुलमी राजवट चित्रपटात लक्षात येते. इराणमधला दैनंदिन जीवनात बोकाळलेला भ्रष्टाचार आपल्या लक्षात येतो.   हे सारं ह्यूमरस पद्धतीनं आपण पहातो. माणूस मारला जातोय आणि आपल्याला हसू येतं. लग्न करायला निघालेलं जोडपं एक माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवायला जातं. लग्न बाजूलाच रहातं. जफर पनाहीच्या  चित्रपटात असा ह्यूमर असतो.

पनाही चित्रपट मांडतांना माणसं डोळ्यासमोर ठेवतो. बहुतेक वेळा ती   माणसं आणि त्यांच्यातले संबंध; त्यांची मनातली घालमेल आपल्याला दिसते. पडद्यावर दोन तीन, तीन चार माणसं दिसत रहातात; बाकी परिसर पडद्यावर असून नसल्यासारखा असतो. पडद्यावर दिसणाऱ्या माणसाच्या आपण पुरेसं जवळ जातो, एकदम चिकटत नाही आणि एकदम दूरवरूनही आपण त्यांना पहात नाही. पनाहीला गुरुस्थानी असलेल्या कियारोस्तामी याच्या चित्रपटात व्यापक समाज दिसतो, महाकाय व्यापकतेत पात्रं अनेक वेळा ठिपक्यागत दिसतात. कियारोस्तामीच्या चित्रपटात भव्य निसर्ग दिसतो, त्यात ठिपक्यासारखी त्याची पात्रं दिसतात. पनाहीच्या चित्रपटात पात्रं मुख्य असतात.

पैसे नाहीत; पोलिस चित्रणात अडथळे आणतात; पोलिस कलाकारांना धमकावतात; कारमधे लपवलेल्या कॅमेऱ्यानं चित्रण करावं लागतं; अशा अडचणीत पनाहींनी चित्रपट केलेत. इराणमधलं दाहक क्रूर वातावरण इराणी जनतेच्या बोकांडी बसलंय, कित्ती तरी वर्ष. आधी शहा, मग खोमेनी,मग खामेनाई. हे वास्तव पन्हाईच्या चित्रपटाचं नेपथ्य असतं. 

 नववास्तववादी असं पनाहींच्या चित्रपटाचं वर्णन केलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात नववास्तववादी चित्रपट जन्माला आला, इराणमधे नववास्तव चित्रपट गेल्या वीसेक वर्षात उद्भवला.शहा ते खोमेनी ही इराणमधली उध्वस्थ करणारी युद्धं होती.

पनाहींच्या चित्रपट पहाताना आपल्याला कळतं की हा चित्रपट आहे, कोणी तरी विचारपूर्वक रचलेली गोष्ट आपल्याला सांगतय. पडद्यावर दिसतंय ते कला आहे पण नुसती कल्पना नाही,   वास्तव आहे असं चित्रपटात मधे मधे जाणवतं. रस्त्यावरची माणसं कॅमेऱ्यात पहातात;  पडद्यावर रस्त्यावरची माणसं चित्रण पहात आहेत, नटनट्यांकडं कुतुहुलानं पहात आहेत  हे निसटत्या दृश्यात आपल्याला दिसतं.

ही पनाही यांची शैली. 

दैनंदिन जीवनाच्या रहाटात अडकलेल्या माणसाला विरंगुळा दाखवणारी एक शैली असते. पनाहीचे चित्रपट ह्यूमरच्या वाटेनं रंजक असतात पण त्याही पेक्षा विचार करायला लावतात, डोक्याला भोकं पाडतात.  

अशा चित्रपटांना महोत्सवातले चित्रपट असं लेबल लावलं जातं.  असे चित्रपट पहाणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी प्रेक्षकांची त्यांची संख्या मोठी असते.  पनाहीचे चित्रपट पहाण्यासाठी चित्रपट महोत्सवात जावं लागतं. भारतात केरळ, बंगळुरु, गोवा,पुणे,मामी असे अगदी मोजके महोत्सव होतात. तिथं जाणं कष्ट करून जमवावं लागतं. कॅन, व्हेनिस, न्यू यॉर्क, बर्लीन इत्यादी ठिकाणी जाणं तर अगदीच कठीण. तेव्हां असे चित्रपट ओटीटीवर पहायला मिळाले तर बरं होईल.

पनाही कष्ट करतात. शारीरीक आणि मानसीक क्लेष सहन करतात. चित्रपट त्यांच्या डोक्यात असतो, रक्तात असतो. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण आणि विपरीत असली तरी पनाही चित्रपट करतात. 

१९८८ पासून पनाहीनं १३ चित्रपट केले आहेत.

।।

Comments are closed.