जळी स्थळी काष्ठी पाषाणी ट्रंप
गेल्या आठवड्यात ट्रंपनी न्यू यॉर्क आणि पेनसिल्वानिया यांना एक ऑफर दिलीय. न्यू यॉर्कमधलं पेन स्टेशनला आणि पेनसिल्वानियामधील विमानतळाला ट्रंप यांचं नाव द्यायचं. नाव दिलं तर तर ट्रंप काही अब्जांचा निधी त्या राज्यांना देतील.
समजा नाव दिलं नाही तर काय होईल ते ट्रंपनी जाहीर केलेलं नाही. एकूण ट्रंप यांचं व्यक्तिमत्व पहाता नाव दिलं नाही तर सूड म्हणून त्या राज्यांचे निधी रोखले जातील. ट्रंपनीडेमॉक्रॅटिक पक्षाचं राज्याचे अनेक निधी ट्रंपनी त्यांचे वैधानिक निधी नाकारले आहेत. हे वर्तन राज्यघटना विरोधी आहे असा निकाल कोर्टानं दिला, ट्रंपनी तो धाब्यावर बसवला, निधी दिले नाहीत.
ट्रंप यांचा एकूण कल पहाता ते कुठल्याही दिवशी अमेरिकेचं नाव ट्रंप अमेरिका असं करतील; अमेरिकेच्या झेंड्यावर ट्रंप यांचं चित्र टाकतील.
काही दिवसांपूर्वीची आणखी एक गोष्ट घ्या.
युक्रेन युद्ध पेटलंय. गाझात दररोज शेकडो माणसं मारली जातातेत. आज्ञेची वाट पहात असलेले इराणकडं रोखलेले अग्नीबाण आहेत.या भीषण घटनांच्या केंद्रात असलेले प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप वॉशिंग्टनमधल्या ‘ट्रंप केनेडी सांस्कृतीक केंद्रा’त गेले. केंद्राची पहाणी केली. पहाणीनंतर ट्रूथ सोशल या व्यक्तिगत खाजगी सोशल मिडिया मंचावर निर्णय जाहीर केला. अमेरिकन सरकार, अमेरिकेचे प्रेसिडेंट यांचे अधिकृत सोशल मिडिया मंच आहेत, त्यावर मजकूर टाकला नाही. मजकूर खाजगी मंचावर टाकला.
केंद्र दोन वर्षासाठी बंद होईल, त्यात सुधारणा करायच्या आहेत.
सांस्कृतीक केंद्र असो, न्यू यॉर्कमधली गटारं असोत, वॉशिंग्टनमधली बालवाडी असो, मिलवॉकीमधलं एकादं कँटीन असो, रेलवेचं एकादं नवं स्टेशन असो. या सर्व गोष्टी महत्वाच्या नक्कीच आहेत. पण त्यांची उद्घाटनं इत्यादी करणं हे प्रेसिडेंटचं काम असतं काय? ती कामं करायला माणसं नेमलेली असतात ना? केनेडी सेंटरचं काम करण्यासाठी व्यावसायिक कौशल्य असणाऱ्या माणसांचं एक बोर्ड असतं. त्यावर नट, संगीतकार, आर्किटेक्ट इत्यादी मंडळी असतात. त्यांनी केंद्र कसं चालवायचं याचे निर्णय घ्यायचे असतात.
देशाच्या प्रेसिडेंटनं त्यात कशाला पडावं?
ट्रंप केनेडी सेंटर ही सांस्कृतीक संस्था आधी केनेडी सेंटर होती. संसदेनं कायदा करून ही संस्था प्रेसिडेंट केनेडी यांच्या स्मरणार्थ बांधली होती. या संस्थेमधे काहीही करायचं असेल तर संस्थेचं कार्यकारी मंडळ आणि संसद यांची परवानगी घ्यावी लागते.
ट्रंप यांनी २०२५ साली प्रेसिडेंट झाल्या झाल्या केनेडी सेंटरचं नाव बदलून ट्रंप केनेडी सेंटर केलं. स्वतःचं नाव घुसवलं. या सेंटरच्या चेअरमनपदी त्यांनी स्वतःलाच नेमलं. संसदेला विचारलंही नाही. घरी बसल्या बसल्या सणक आली, एक फूट उंचीचा बर्गर खात असताना रात्रीचे दोन वाजून गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात हा विचार आला असावा. झालं. दुसऱ्या दिवशी ट्रंप केंद्राचे चेअरमन.
नंतर कार्यकारी अधिकारी म्हणून स्वतःच्या मर्जीतला माणूस नेमला. या माणसाचाही कला किंवा संस्कृतीशी मोहोरीच्या दाण्यायेवढाही संबंध नव्हता, हा गडी एका देशात राजदूत होता.
लगालगा ट्रंपनी जाहीर केलं. ‘वोक’ कला आणि संस्कृती कला केंद्रातून कटाप केली जाईल.’वोक’ ही अमेरिकेतली शिवी आहे. रुढी सोडून विचार करणं, परंपरा मोडून काही तरी नवं करणं याला ट्रंप वोक म्हणतात.
कलेच्या इतिहासात ‘बारोक’ काळ होता. बारोक म्हणजे अलंकरणाला महत्व. ट्रंप यांनी ‘बटबटीत’ काळ सुरु केला आहे. व्हाईट हाऊसमधल्या प्रत्येक वस्तूला सोन्याचा मुलामा द्यायची टूम ट्रंपनी काढलीय. ‘ट्रंप केनेडी सेंटर’ त्यांना बटबटीत करायचंय. त्यांच्या कल्पनेला विरोध करणाऱ्या सेंटरच्या आर्किटेक्टला त्यांनी हाकललं, स्वतःच आर्किटेक्ट असल्यागत त्यांनी सेंटरला भेट देऊन आदेश दिले.
वरवर हा निर्णय जसा दिसतो तसा तो नाहीये. ट्रंप सेंटर चालत नाहीये. ट्रंपचं नाव केंद्राच्या इमारतीवर चढल्यावर अमेरिका आणि जगातल्या नामांकित कलाकारांनी तिथं आपली कला सादर करायला नकार दिला. संगिताचा जलसा असो, नाटक असो, व्याख्यानमाला असो, चित्रपट असो; कलाकारांनी सेंटरकडं पाठ फिरवलीय. प्रेक्षक कार्यक्रमाची तिकीटं खरेदी करत नाहीयेत. देणगीदार देणग्या देत नाहीयेत. केंद्र बंद पडायची पाळी आलीय. दुरुस्तीचं कारण दाखवून दोन वर्षं ते बंद केलं की काम झालं. दूरवर काय घडणार आहे, भविष्यात काय घडेल याचा विचार करायची सवय ट्रंपना नसल्यानं दोन वर्षाचा कालावधी त्यांना पुरेसा आहे.
यात आणखी एक भानगड आहे. लवकरच ट्रंप केनेडी सेंटरच्या सुधारणेवर होणाऱ्या खर्चाचा आकडा जाहीर करतील. तो खर्च १ कोटी डॉलरपेक्षा कमी नसणार. कंत्राटदारांची चांदी. हे कंत्राटदार नंतर किंवा आधी ट्रंप यांच्या निवडणुकीसाठी पैसे देणार. काही संकट आलं की ट्रंप देशासमोर जाऊन आपला छळ होतोय असा कांगावा करून पैसे मागतात. कंत्राटदार तिथं पैसे देणार.
मी.मी.मी.मी.
विज्ञान म्हणू नका, कला म्हणू नका, साहित्य म्हणू नका, तंत्रज्ञान म्हणू नका, अद्यात्म म्हणू नका, अर्थ-फायनान्स इत्यादी म्हणू नका, आर्किटेक्चर म्हणू नका. सर्व मला समजतं. जगाचे सर्व निर्णय मी घेणार.
ट्रंप ट्रंप ट्रंप ट्रंप.
सरकारनं कुठलीही नवी स्कीम काढावी. त्यावर ट्रंपचं नाव आणि फोटो असणार. उद्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा जाऊन तिथं ट्रंपदेवाचा पुतळा यायला हवं असं ट्रंप यांना मनापासून वाटत असणार. स्वातंत्र्य देवतेच्या हातात मशाल आहे, ट्रंपदेवाच्या हातात दंडुका असेल येवढाच फरक.
उगाच नाही, पुतीन यांच्याशी युक्रेनबाबत चर्चा व्हायची होती तेव्हां ट्रंप यांचे दूत विटकॉफ पुतीनना म्हणाले ‘ट्रंप यांची स्तुती करा, तुम्हाला जे हवंय ते मिळेल.
।।