कावळे आत्म निर्भर असतात.
कावळे एका मर्यादित भूभागात जन्मतात, वाढतात, मरतात. ते आपला भूभाग सोडून जात नाहीत. अन्न मिळत नाही किंवा घरटं बांधायला जागा मिळत नाही म्हणून कावळे शेजारच्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात जात नाहीत. कावळे पालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकवर बसून कचऱ्यातलं अन्न उचलतात. कचऱ्याचा ट्रक त्यांचा रहाता विभाग सोडून गेला की कावळे ट्रकबरोबर जात नाहीत; ट्रक सोडतात आणि आपल्या भागात परततात.
कावळ्यांच्या गरजा मर्यादित असतात. घरट्यासाठी एकाद चौरसफूट जागा पुरते. अगदी मोजकंच खातात. ताजंच अन्न पाहिजे, अन्न शुद्ध असलं पाहिजे असाही त्यांचा आग्रह नसतो. शाकाहारच करेन, मांसाहारच करेन अशी घट्ट आवडनिवड नसते. गाडीखाली चिरडला गेलेला उंदीरही त्यांना आवडतो. उंदीर सडलेला असला तरीही चालतो.
कावळा जरीचे कपडे वापरत नाही, दागिने वापरत नाही.
कावळ्याच्या गरजा तो रहातो तिथंच भागत असल्यानं तो कुठ्ठंही जात नाही. फार तर पाव मैल इकडे तिकडे. प्रवासही तो कुणाच्या तरी ट्रकवरून करतो.
पिंडदान करण्यासाठी केळीच्या पानावर अन्न पदार्थ ठेवले तर कावळा ते खाईलच याची खात्री नाही. दूरवर उभा राहून तो अन्नाचं निरीक्षण करतो. सडलेल्या उंदरापेक्षा भाताची मूद स्वच्छ असते वगैरे विचार तो करत नाही. त्याचं पोट भरलेलं असतं. पोट भरलं की पुन्हा भूक लागेपर्यंत तो काही खात नाही. मेलेल्या माणसांचे नातेवाईक पिंडाला शिवायला कावळा येत नाही म्हणून दुःखी असतात. मेलेल्या माणसाच्या आत्म्याशी कावळ्याला काही देणंघेणं नसतं, त्याला भूक नसते येवढंच.
दोन शतकांमागे भारतातली माणसं एडनला व्यापारासाठी स्थलांतरीत झाली. तिथं त्यांना मृतांच्या आत्म्याला पिंडदान करायचं होतं. एडनमधे कावळे नव्हते. त्यामुळं त्यांचे आत्मे परलोकात दुःखी असणार;आत्मे दुःखी त्या मुळातले ईहलोकातले त्यांचे नातेवाईक दुःखी.एडनवासियांनी आपल्या भारतीय नातेवाईकांना पत्रं लिहून कावळे पाठवायला सांगितलं. कावळे बोटीवरून एडनला रवाना झाले. मृतात्मे संतुष्ट झाले.
कावळे समूहानं रहातात, एकमेकाला मदत करतात. एका कावळ्याच्या घरट्यातली अंडी किंवा पिल्लं खायला साप झाडावर चढला तर आसपासचे शेकडो कावळे एकत्र येतात, कावकाव करतात, सापाला टोचून टोचून हैराण करतात, पळवून लावतात.
कावळे समूहानं रहातात खरे पण कावळ्यांचं राज्य नसतं. त्यांना नेता नसतो, राजा किंवा पंतप्रधान किंवा प्रेसिडेंट नसतो. कावळे आजारी पडतात, म्हातारे होतात, उडून जाऊन अन्न खाण्याची शक्ती त्यांच्यात नसते. क्षीण कावळ्यांचे घसे बसलेले असतात, त्याना नीट ओरडताही येत नसतं. कावळे प्रजा ताया कावळ्याला त्याच्या नशीबावर सोडते. बाहेर एकादं चांगलं औषध मिळतंय का याची चौकशी कावळा करत नाही. त्याला उंदीर घरटंपोच पाठवायचा विचार कावळा समाज करत नाही. हे उद्योग करण्यासाठी कावळे स्टेट, सरकार स्थापन करत नाहीत.
कावळे संध्याकाळी गच्चीवर, झाडावर एकत्र येतात, आपसात विचार विनिमय करतात, फार वेळ खर्च करत नाहीत. थोड्याच वेळात उडून आपापल्या घरट्यात रवाना होतात.
कावळ्यांच्या गरजाच कमी. आहे त्यात भागवतात, मरून जातात.
उंदीर मिळत नाहीत. कावळे पालिकेवर मोर्चा नेऊन त्यांनी उंदीर मारू नयेत अशी मागणी करत नाहीत. किंवा सरकारला उंदरांचं महत्व पटवून देऊन जाडजूड-निरोगी-टवटवीत उंदीर निर्माण करण्यासाठी महामंडळ तयार करा असं कावळे सांगत नाहीत.
कावळे बाहेरून काही आणत नाहीत, बाहेर काही पाठवत नाहीत. कावळे व्यापार करत नाहीत. त्यामुळं जगातल्या इतर ठिकाणच्या कावळ्यांशी त्यांचा संबंध येत नाही.
कावळे भूक लागली की खातात, उद्या परवाच्या भुकेसाठी अन्न साठवून ठेवत नाहीत. त्यांचं घरटं मोकळं असतं. अंडी उबतात, पिल्लं मोठी झाली की उडून जातात. घरटं मोकळं होतं. पुढल्या मोसमात नवं घरटं. कावळे ना परमनंट घर बांधतात, ना घरात वस्तू साठवतात. कावळे शेती करत नाहीत, कारखाने चालवत नाहीत, वस्तू विकण्याचा प्रश्नच येत नाही, वस्तू विकत घेण्याचाही प्रश्न येत नाही. कावळे काहीच साठवत नाहीत, गरजेपेक्षा जास्त असा एक कणही गोळा करत नाहीत. ना आयात, ना निर्यात. ना विकत घेणं, ना विकणं.
कावळ्याचा मेंदू माणसाइतका विकसित झाला नसल्यानं कावळे असे आत्मनिर्भर असतात.
एका कावळ्यानं पंतप्रधानाच्या आवारातल्या झाडावर घरटं बांधलं होतं. कावळा संध्याकाळी घरट्यात परतला की पंतप्रधानाच्या घरी चाललेल्या मिटिंगा पहात असे. चार माणसाची एक मीटिंग होई. ती उठून जात मग नवी पाच माणसं येत. ती उठून जात मग आणखी दहा माणसं येत. चर्चा चाले. रात्रभर. पहाटे कावळ्याला जाग येई तेव्हांही पंतप्रधानाच्या घरी मीटिंग चाललेली असे.
‘जमीन द्या, कर्ज द्या, उत्पादन वाढवा. निर्यात करा. आयात करा. बेकारी वाढलीय, रोजगाराची सोय करा. गणीत बिघडलंय, कर बसवायला हवेत. गुन्हेगार बोकाळलेत. तुरुंग कमी पडताहेत. विमानं कमी पडत आहेत. बंदुका आणि बाँब कमी पडत आहेत. लोकांचं आरोग्य बिघडलय. पर्यावरणाची वाट लागलीय….’
कावळ्याला मीटिंगमधे जमणाऱ्या लोकांची भाषा कळत नव्हती. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, न्यायालयं, वर्तमानपत्रं असलं काहीही त्याला समजत नव्हतं.कावळ्याला कान नव्हते, नुसत्या ध्वनी लहरी त्याच्या अंगावर आदळत. त्यातून त्याला काही बोध होत नसे. त्याचा मेंदू विकसित झालेला नव्हता.कावळा शांत झोपत असे. सकाळी फ्रेश होऊन अन्न गोळा करायला जात असे.
तो कावळा दिल्लीतला. आत्मनिर्भर होता.
मुंबईत वेगळे कावळे होते. तेही आत्मनिर्भर होते.
सांगलीत आणि कोल्हापुरातही कावळे आहेत.तेही आत्मनिर्भर आहेत.
कावळे आत्मनिर्भर असतात.
।।