सिराट
सिनेमा.सिराट.
सिराट या अरबी शब्दाचा अर्थ नरक आणि स्वर्ग यातील साकव.
एकादा चित्रपट डोळे मिटून ऐका. तोच चित्रपट कान बंद करून पहा. चित्रपट समजेल? चित्रपट कळेल? चित्रपट आपल्याला खिळवून ठेवेल?
सिराट हा तसा स्पॅनिश चित्रपट तसा आहे.
माणसं स्पीकर एकावर एक रचून स्पीकरची भिंत उभी करतांना दिसतात. दोन पुरूष उंच साताठ पुरुष लांब रुंद भिंत उभी रहातेय. पाठीमागं करवतीनं नीटनेटका कापल्यागत पर्वत. पर्वताची रांग. समोरचं चित्र विस्तारू लागतं. वाळवंट दिसू लागतं. वाळवंटात उभी केलेली स्पीकरची भिंत.
ध्वनी नाही.
एक अगदी हलाकासा ध्वनी कानावर येऊ लागतं. भुंगा आहे की हेलेकॉप्टर येतंय असं वाटतं. तो ध्वनी स्पीकरमधून येत असतो.एका क्षणी धाडकन इलेक्ट्रॉनिक संगित सुरु होतं. ध्वनी सिनेमाघरातही मावणार नाही इतक्या वरच्या पट्टीतला.
गर्दी,जमाव नाचतांना दिसतो. कोणी उघडं आहे. हातात ग्लासेस आहेत. हातात बाटल्या आहेत. नाचता नाचता माणसं एकमेकाला मिठ्या घालत आहेत.डोक्यावर विचित्र टोप्या, फडकी बांधली आहेत. शर्टची बटनं लावलेली नाहीत, छात्या उघड्या आहेत. छातीवर, दंडावर, जिथं कुठं त्वचा आहे तिथं, टॅटू काढलेलं आहे.नाना आकारात वाढलेले केस आणि दाढ्या. भणंगपणा प्रत्येक माणसात दिसतोय.
सभोवताली इतकी प्रचंड जागा मोकळी पडलेली असताना माणसं एकेकाला चिकटून नाचत आहेत.
इलेक्ट्रॉनिक संगिताला एक वेगवान बेभान ताल आहे.हे संगित पश्चिमी अभिजात संगीत नाही.
मोरोक्कोचं वाळवंट. ही माणसं युरोपभरहून गोळा झालीत. मुक्तपणे जगू पहाणारी माणसं. आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करणारी माणसं.ओरडतील.रडतील. किंचाळतील.रडतील. काय वाट्टेल ते बोलतील. दारु पितील. ड्रग घेतील. मुक्तपणे सेक्स अनुभवतील.
रात्र होते. मग लेझर शो होतो. माणसं नाचतच असतात. कधी तरी रात्र संपते माणसंही थकतात, झोपतात.
दुसरी दुपार होईल तोवर पुन्हा नृत्य सुरु होईल.
तीन दिवस, चार दिवस माणसं नाचतात.
सैनिक येतात.या निःशस्त्रांना धक्काबुक्की करतात. निघून जा म्हणून सांगतात. त्यांना ही जमीन वापरायची असते. कां? सैनिक सांगत नाहीत. हातातल्या ढालींनी माणसांना ढकलतात.
शहरातल्या पोलिसांनी ढकललं म्हणून ही माणसं वाळवंटात आली. आता वाळवंटातही त्याना ढकललं जातंय.
माणसं गाशा गुंडाळतात. सैनिकांना चुकवून सैनिक सुचवत असतात ती दिशा टाळून पळतात.
कुठं? माहित नाही.
पुढली व्हॅन इतकी धूळ उडवते की समोर काही दिसत नाही. त्यातूनच वेगानं बस न्यायची. थांबवायची नाही.
दुसरी बस शेजारी समांतर चालू लागते. एक पाय या बसमधे दुसरा पाय त्या बसमधे, पाय फाकवलेले, दोन्ही बस वेगानं जात असतात, बसवासी चित्कार करतात.
बस रुतते. बाहेर काढावी लागते. बस नदीच्या प्रवाहात अडकते. बाहेर काढावी लागते.
माणसं माहित नसलेले रस्ते, खिंडी पार करत निघतात.
सुरुंग पेरलेले असतात.
शहरांत पेरलेले सुरुंग चुकवून ही माणसं बाहेर येतात तर त्यांचा पाय वैराण प्रदेशात पुरलेल्या सुरुंगांवर पडतो.
अनपेक्षित. धडाम. एक मेला. दुसरा मेला. एक बस जळली. दुसरी खलास झाली.
या साऱ्या घालमेलीत लुई नावाचा एक माणूस त्याची हरवलेली मुलगी शोधत असतो. ती एका रेव्ह पार्टीत नाहिशी झालेली असते. म्हणून लुई आपल्या मुलाला आणि पिपा नावाच्या छोट्या भूभूला घेऊन पार्ट्या शोधत फिरत असतो. या शोधात तो या पार्टीत पोचतो.
कार घसरून दरीत कोसळते. त्यात त्याचा मुलगा मरतो. नंतर त्याची कारही सुरुंगात जळून खाक होते. एकटा उरतो.
चित्रपटात दिसणारी ही भणंग माणसं कोण आहेत?चित्रपट त्या बद्दल बोलत नाही. ते आपल्याला अभ्यास करून समजून घ्यावं लागतं.
ही माणसं पश्चिमेतल्या बाजारवादी वस्तूरूप हव्यासी जगण्याला वैतागलेली आहेत. सभोवताली जे चाललंय ते नाकारणारी ही माणसं आहेत. मागं वियेतनाममधे अमेरिकेनं अमानवी पद्धतीनं माणसं मारली तेव्हां अमेरिका आणि युरोपमधले तरूण केस वाढवून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून भटकू लागले होते. त्यांना हिप्पी म्हणत. फॉरेस्ट गंप नावाचा टॉम हँक्सचा एक चित्रपट येऊन गेला. त्यात या समाजाशी फटकून असलेल्या माणसाचं चित्रण आहे. कविता,कथा,संगित या वाटेनं ही माणसं व्यक्त होत होती.
चित्रपटाचा कथाकाळ १९६०चं दशक वाटत नाही, काळ आताचा आहे. आताही अनेक रेव पार्ट्या होतात त्यात केवळ व्यसनी मुलं येतात असं नाही, समाजापासून तुटलेली मुलं तिथं येतात, आपला निषेध नोंदवण्यासाठी.
इराणमधले कलाकार तळघरात चोरून सराव करून वाळवंटात नृत्याचे कार्यक्रम कसे करतात यावर एक चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता.
ऑलिव्हर लेक्सनं दिक्दर्शन केलंय. लुई हा एकच कलाकार व्यावसायिक नट आहे. बाकीचे सगळे लोक रेग्युलर रेव पार्ट्या करणारे लोक आहेत. लेक्स आधीचा सिनेमा करताना पार्ट्या हिंडला होता. तिथं त्याची पार्टीवाल्यांशी गट्टी जमली आणि या चित्रपटाचं कथानकही सुचलं. त्याच लोकांना लेक्सनं या चित्रपटात घेतलंय. चित्रपटात एका पात्राचा एक पाय प्रोस्थेटिक आहे. दुसऱ्या पात्राला एक हात कोपरापासून पुढं गायब आहे. ती माणसं जशी आहेत तशीच या चित्रपटात आहेत.
माणसं आहेत, आपला ठाव घेणारी माणसं चित्रपटात दिसतात. कथानक आपल्या आतमधे पाझरू लागतं पण त्या सोबतच चित्रं आणि ध्वनी इतक्या प्रभावानं समोर येतो की कथानक बाजूला राहील की काय असं काही प्रसंगी वाटतं.
कॅन महोत्सवात चित्रपटाला दिक्दर्शनाचं बक्षीस मिळालंय. ऑस्करसाठी दिक्दर्शन आणि ध्वनी या दोन वर्गातली नामांकनं सिराटला मिळाली आहेत.
।।