मुलगी आई-भावाचा खून कां करते
आई,भाऊ, सहाध्यायी, शिक्षिका यांचा खून करणारी मुलगी.
।।
टंबलर रिज या कॅनडातल्या गावातल्या आजी आजोबांनी नातवंडांना टाटा केलं, मुलं शाळेत रवाना झाली. दुपारची डुलकी घ्यायला आजी आजोबा घरात परतले. कलंडले असतील नसतील येवढ्यात त्यांच्या फोनवर अलार्म वाजला. शाळेत एक मारेकरी घुसलाय, गोळीबार करतोय.
गावातल्या प्रत्येक पालकाच्या फोनवर अलार्म वाजला.
माणसं जशी होती तशी शाळेकडं निघाली.
प्रत्येकाचं फोनवर लक्ष होतं. सेलफोनवर चित्रफीती दिसू लागल्या. शाळेत लॉक डाऊन झाला होता. किंचाळण्याचे आवाज येत होते.
गावातला मेयर धावत सुटला. तो या गावात १८ वर्षं आहे. गोळीबाराचा आवाज आणि गावात? गोळीबार फक्त टीव्हीवरच्या फिल्ममधेच ऐकू येत असे.
२४०० लोकवस्तीचं गाव. गावात एकच प्राथमिक आणि एकच माध्यमिक शाळा.
गाव चारही बाजूनी जंगलानं वेढलेलं, सुंदर. २००३पर्यंत गावात एक खाण होती. ती बंद पडली. सरकारनं या गावातलं नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन तिथं पर्यटकांना आकर्षिक केलं होतं.
गावातल्या लोकांपेक्षा पर्यटकच जास्त.
इतकं लहान गाव की तिथं पोलिस स्टेशन ठेवणंही परवडत नाही.
शाळेच्या एका वर्गात गोळीबाराचे आवाज आल्यावर शाळेच्या प्रिंसिपलनी पटकन शाळेचे दरवाजे बंद केले, मुलांना लाऊड स्पीकरवरून सूचना केली की जिथं असतील तिथं दरवाजे बंद करा, बाकं आणि टेबलं दरवाजांना लावून दरवाजे उघडणार नाहीत अशी व्यवस्था करा. हिंसक हल्ला झाला तर काय करायचं याचं प्रशिक्षण कॅनडात विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलं जातं.
विद्यार्थ्यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या. गोळीबाराचे आवाज झाले. आपल्या वर्गापर्यंत अजून गोळीबार पोचलेला नाही याची जाणीव झाल्यावर काही वर्गातली मुलं काहीशी सुखावली.
जेस्से रूटसेलार नावाच्या १८ वर्षाच्या मुलीनं गोळीबार केला होता.
जेस्सेकडं दोन गन होत्या. याच शाळेतून चार वर्षांपूर्वी ती बाहेर पडली होती. बाहेर पडली होती म्हणजे तिनं शाळा सोडली होती. तिला मानसीक व्याधी होती.
शिरताना दारात पायऱ्यांवरच्या दोघांवर तिनं गोळ्या झाडल्या. आत शिरली. लायब्ररीत गेली. तिथं मुलं वाचत बसली होती. जेसेनं गोळ्या झाडल्या, नेम धरून नाही. पाच मुलं आणि एक शिक्षिका मेल्या. तिथून बाहेर पडली. दिसेल त्याला गोळ्या झाडत होती.
गोळीबार सुरु झाल्यावर पाचच मिनिटांच्या आत पोलीस पोचले. तो पर्यंत जेस्सेनं स्वतःलाच गोळ्या घालून आत्महत्या केली होती.
जेस्सेनं घराच्या बाहेर पडताना आपली आई आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार मारलं होतं.
छोटं गाव. गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक दुसऱ्या माणसाला ओळखत होता. अशी गावं घट्ट विणलेली असतात. दूरवरचं गाव, अगदीच काही माणसं कामाला गावाबाहेर जातात. बाकीची माणसं कायम गावातच. गावात एक दोन रस्ते. दहा बारा दुकानं. एक बार. एक लायब्ररी. पाच दहा दुकानांचा एक काँप्लेक्स. माणसं दिवसात अनेक वेळा एकमेकांना भेटत असतात.
कोणाच्या घरात काय चाललंय ते गावाला माहित असतं. काहीच लपलेलं नसतं. म्हणून म्हणा की काय पण माणसं नेहमी हळू बोलतात. भांडण झालंय, भांड्यांची आदळापट झालीय, माणूस किंचाळतोय असं घडत नाही. फार तर एकाद्या घरातून संगिताचे सूर बाहेर सटकत असतील येवढंच.
गावात घटना अशा घडतच नाहीत.
कित्येक वर्षात घडलेली ही पहिली घटना.
जेस्से जन्मतः मुलगा होता, पुरुष होता.दहा बारा वर्षांपर्यंत मुलगा होता. सहा वर्षांपूर्वी तो बदलू लागला. मुलगी होऊ लागला. मुलीसारखं वागू लागला, मुलीसारखे कपडे घालू लागला.
येवढस्सं गाव. गावातला प्रत्येक माणूस जेस्से मुलगी झाल्याचं पहात होता. समोरून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव जेस्से पहात होता.
अमेरिकन, कॅनडियन समाज पुढारलेला आहे असं आपल्याला वाटतं. त्यांच्याकडलं तंत्रज्ञान, सारं कसं टापटीप, नेटनेटकं, देखणं. शिक्षण वगैरे आधुनिक. पण अनेक गोष्टी या समाजानं स्वीकारलेल्या नाहीत. हार्मोनल बदल झाल्यावर पुरुषाची स्त्री होते, स्त्रीचा पुरुष होतो ही गोष्ट त्यांनी फार तर विज्ञानाच्या पुस्तकात वाचली असेल. पण ती अजून पुस्तकात आहे, लोकांच्या मनात नाही. लिंग बदल झालेल्यांना कॅडनियन, अमेरिकन समाज स्वीकारत नाही.
लिंगबदल झालेल्या व्यक्तीच्या घरापासून सुरवात होते. घरच त्यांना स्वीकारत नाही. बऱ्याच चळवळीनंतर अमेरिकन सैन्यानं लिंगबदल झालेल्या व्यक्तीना भरती करून घेतलं होतं. ट्रंपनी ती भरती बंद केलीय. माणूस एक तर स्त्री तरी असतो किंवा पुरुष तरी असतो, लिंगबदलून झालेला माणूस धर्मात बसत नाही असं ट्रंप यांचं म्हणणं. जगातले सर्व धर्म तेराशे पासून ते तीन चार हजार वर्षं जुने असल्यानं मानवी समाजात होणारे बदल धर्मांना अजून समजून घेता आलेले नाहीत. धर्माचा वापर राजकारणासाठी करून घेणारी माणसं लिंगबदल झालेल्या लोकांना लक्ष्य करून आपला राग काढतात. तेच समलिंगी कल असणाऱ्या व्यक्तींबद्दलही.
जेस्से उपचार घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जात असे. उपचार काय घेणार? हार्मोनल बदल झाले असतील तर दुसऱ्या हार्मोनचा मारा करून लिंग पुन्हा बदलता येत नाही, त्याचे दुष्परिणाम संभवतात. मग उपचार कसले? समाज स्वीकारत नाही यातून निर्माण होणाऱ्या तणावांना तोंड देण्यासाठी उपचार.
छोट्या गावात तणाव फार. छोट्या गावात काही लपून रहात नाही. छोटया गावात माणसाला एकांत, एकटेपणा हवा असेल तर तोही मिळत नाही. छोटं गाव, छोटा समाज अगदी सहज तुरुंग, छळछावणीही होऊन जाऊ शकतो.
टंबलर रीजला जबर धक्का बसला. कॅनडाला धक्का बसला. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कॅनडाचे प्रधान मंत्री कॅमेऱ्यासमोर उभे राहिले, त्यांना रडू कोसळलं.
नऊ माणसं मेली हा धक्का आहे. म्हटलं तर तो वरवरचा आहे. आत खोलवर बसलेला धक्का काय आहे याचा विचार कॅनडातले लोक करत असतील.
।।