लकी भास्कर

लकी भास्कर

 ‘लकी भास्कर’  ही तेलुगू फिल्म नेटफ्लिक्सवर आलीय. ट्रेलरमधे लिहिलं होतं की ही फिल्म थ्रिलर आहे.बँक क्लार्कच्या श्रीमंत होण्याचं धाडस चित्रपटात आहे असंही लिहिलं होतं. हीरोचे  धोनीसारखे भरघोस केस, चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य. देखणा नाही पण आवडू शकेल असा माणूस. बँकेत काम करतो. मग त्यात थ्रिल कशा प्रकारचं असेल असा विचार मनात आला.भाग्यवान आणि थरार. उत्सूकता जागृत झाली. 

एका साधा घरेलू माणूस, घर चालवण्यासाठी त्याला एक्स्ट्रा पैसे मिळवायचे असतात. बँकेचे पैसे तो वापरतो. बँकेचे पैसे घ्यायचे, स्मलगर लोकांना द्यायचे, वेळेवर पुन्हा बँकेत परत करायचे. गुन्हा हीरोवर शेकत नाही. असं करत करत खंडीभर पैसे घेऊन अमेरिकेत सूपर लक्झरी जगायला जातो.  गुन्हे पचवण्यात यशस्वी होतो. 

 गुन्हेपटात गुन्हेगाराचं कौशल्य हा महत्वाचा फंडा असतो.  नियोजन. नियोजन अमलात आणण्यात अडचणी.  गुन्हेगारांना टेन्शन येतं आणि आपल्यालाही टेन्शन येतं. आपणही गुन्हेगाराच्या भू्मिकेत जातो, गुन्हा पार पडावा असं आपल्याला वाटू लागतं. गुन्हा घडत असताना थोडासा गुन्हेगाराच्या आयुष्यावर प्रकाश. प्रेक्षकाचं मुख्य लक्ष गुन्हा पार पडण्यावर असतं. गुन्हा कधी यशस्वी होतो, कधी फसतो. त्यातला थरार पाहून प्रेक्षक खुष होतो.  

लकी भास्करमधे नियोजन, अमलबजावणी यातला थरार मांडलेला नाही. अगदीच पचपचीत रीतीनं गुन्हा घडत जातो.   हीरो भाग्यवान आहे हे दाखवायचं असल्यानं गुन्ह्यातला थरार पटकथा लेखकानं बाजूला ठेवला असावा. त्यासाठी चित्रपट विनोदाच्या अंगानं जायला हवा.पण तसं घडत नाही.  गुन्हा करायला गेला आणि फुस्स झालं तर त्यात मजा असते;  काहीही खटपट न करता गुन्हा पार पडला तरीही त्यात मौज असते. या चित्रपटात थरार नाही, मौज नाही. पचकट पद्धतीनं गुन्हा पार पडतो, प्रेक्षकांचा पचका होतो.

हाही एक नवा जॉन्र असावा, पचकापट.

भारतीय सिनेमात हळू हळू गुन्हेपट पाय पसरू लागले आहेत. भारतीय मानस बदलतंय. साठ सत्तर वर्षांपूर्वी भारतीय सिनेमात हीरो किरकोळ गुन्हे करताना दिसत असे. हळूहळू तो स्मगलिंगही करताना दिसू लागला. गुन्हेगाराची आई त्याला सतत विचारत असे की बाबा रे काही बेकायदेशीर तर करत नाहीयेस ना रे, देव क्षमा करणार नाही. तरीही हीरो गुन्हा करतोच. कारण त्याला मरू लागलेली आई किंवा कोणाला तरी वाचवायचं असे,  गुन्हे करून गरीबांना मदत करायची असे. रॉबिन हूड.  

खरं म्हणजे कर्ता करविता परमेश्वरच  असतो; परमेश्वराचंही माणसांकडून गुन्हे करवून घेण्यात काही तरी डिझाईन असणार असं सिनेमात दाखवायला हरकत नव्हती.   दिक्दर्शक त्या वाटेला गेले नाहीत.

निखळ गुन्हा, त्यातला थरार, त्यातलं नाट्य, त्यात गुंतलेली माणसं असं दाखवणं सुरु झालंय.  अंधाधुन आला. चुप आला. पहाताना नकोसं वाटावं अशा रीतीनं गुन्ह्याची दृश्य पडद्यावर दिसली. गुन्ह्याचं समर्थन नाही की गुन्हा अयोग्य आहे असंही दर्शवलेलं नाही. निव्वळ गुन्ह्याचा थरार. पब्लिकनं ते सिनेमे पाहिले, बोंबाबोंब केली नाही. पेपरवाल्यांनी सिनेमे समाजाला वाईट वळण लावत आहेत अशी बोंब केली नाही. 

 लकी भास्करमधे दाखवलेला हीरो हे एक वास्तव आहे.  

सरकारी नोकरीत, खाजगी नोकरीत लोक लफडी करून पैसे मिळवतात; पुढारी खच्चून लबाड्या करून खच्चून पैसे मिळवतात; लष्करी अधिकारी आणि पोलिस खूप गुन्हे करतात आणि प्रचंड पैसे मिळवतात. ही सर्व मंडली देवधर्म करत असतात, वारीत जातात, दान धर्म करतात. ही मंडळी सॉलिड धार्मिक असतात. मुख्य म्हणजे हा सर्व उद्योग करून ती मंडळी सुखात जगत असतात. त्यांना देव कधी शिक्षा करताा दिसत नाही. समाजात त्यांना गडगंज मान्यताही असते, लोक त्यांचं  कौतुकही करतात.त्यांना आपण बेकायदेशीर-अनैतिक वागतोय याची टोचणी नसते. जे काही करतात ते त्या त्या व्यवसायाचा भाग असतो. लष्कर असो, पोलीस असो, डॉक्टरकी असो, राजकारण असो; पैसे खाणं,कायद्याचे तीन तेरा वाजवणं; या गोष्टी  स्वाभाविक आहे असं ही मंडळी मानतात.

पेपरात लिहिणारे,कथा कादंबऱ्या कविता वगैरे करणाऱ्या लोकांना हे वास्तव एक तर माहीत नसतं; पेपर-पुस्तकांत लिहिणाऱ्यांचं जगणं वेगळं असल्यानं त्यांना वरील वर्तन अनैतिक, बेकायदेशीर वगैरे वाटतं. 

हॅना अरेंड्ट या बाईनं बनालिटी ऑफ एविल हा विचार मांडला. गुन्हा ही गोष्ट इतकी सर्वसाधारण करून टाकली जाते की गुन्हा हा गुन्हाच उरत नाही. आईकमननं हज्जारो ज्यू मारले.  आईकमनला आपण काही भीषण गुन्हा केलाय असं वाटलं नाही. वरिष्ठांनी आज्ञा  दिली, वरिष्ठांची आज्ञा पाळणं हे तर कर्तव्यच असतं, त्या कर्तव्य भावनेनं मी माणसं मारली असं त्याचं अगदी साधं म्हणणं होतं.

गुन्हेपटात तेच दिसतं. 

लकी भास्करनं मधली वाट काढलीय. साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या सिनेमाप्रमाणं बिच्चाऱ्या हिरोला आपल्या बायका मुलांच्या हितासाठी गुन्हे करावे लागतात हे दाखवलंय. पण गुन्हा करू नकोस असं सांगणारी सुलोचना किना ललिता पवार चित्रपटात नाहीये. तो मुद्दाच सोडून दिलाय. आणि एकदम पश्चिमी पटातल्या गुन्हेपटातला शेवट चित्रपटात जोडलाय. गुन्हेगार किती सुखात आहे ते दाखवलंय.

पटकथा लिहिणाऱ्याला किती उड्या माराव्या लागल्यात. त्या अर्थानं हा विनोदी चित्रपटच  म्हणायला हवा.लकी भास्कर दाखवतो तितक्या सोप्या पद्धतीनं पैशाचे व्यवहार होत नसतात. हेतूपूर्वक विनोदी चित्रपट करायचा असेल तर   तशी रचना, तसं संगित तरी वापरायला हवं होतं. तसंही घडलेलं नाही.  आट्या पाट्या खेळताना पाठीत धपका बसू नये याचं व्यवधान ठेवत खेळाडूला पुढं सरकावं लागतं. लकी भास्करचा दिक्दर्शकही तसाच चित्रपटात सरकलाय. 

म्हणूनच या चित्रपट शेवटपर्यंत पहात गेलो. 

।।

Comments are closed.