सीआयएचं गूढ उकलणारं पुस्तक
टिम वायनर यांचं The Mission: The CIA in the 21st Century हे पुस्तक दुकानांत आणि ॲमेझॉनवर आलंय. टिम वायनर हे पत्रकार आहेत. तीसेक वर्षं ते टाईम्सचे विदेश बातमीदार होते. त्या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, मेक्सिको आणि सुदानमधून त्यांनी टाईम्ससाठी वृत्तांत, बातम्या पाठवल्या.
लेखकानं एकविसाव्या शतकात सीआयए कसे निर्णय घेतं याचं तपशीलवार वर्णन प्रस्तुत पुस्तकात केलं आहे.
सीआयएनं माहिती गोळा करावी आणि त्यावर प्रेसिडेंटनं निर्णय घ्यावा असं अपेक्षित असतं. तसं धडतंच असं नाही.
सीआयएचं मुख्य काम आहे हेरगिरी. अमेरिकेच्या शत्रूंवर लक्ष ठेवणं, शत्रूदेशात काय चाललंय याची माहिती अमेरिकेची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून गोळा करणं हे सीआयएचं उद्दिष्ट असतं. मिळालेली माहिती प्रेसिडेंट, मंत्रीमंडळासमोर ठेवली जाते. १९४८ साली सीआयए स्थापन झाल्यापासून सीआयएचा माणूस दररोज प्रेसिडेंटना भेटत असतो, एक अहवाल प्रेसिडेंच्या टेबलावर ठेवत असतो. त्यानंतर काय करायचं याचा निर्णय प्रेसिडेंट घेतो. कधीकधी सैन्य, परदेश विभाग, संसद यांच्याशी प्रेसिडेंट चर्चा करतो. कधी कधी एकतरफी निर्णय घेतो.सारा मामला प्रेसिडेंच्या लहरीवर आणि व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो.
डोनल्ड ट्रंप यांनी इराणच्या अणुसंस्कार आस्थापनेवर बाँब टाकले. इराणची अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता पूर्ण नष्ट केली असा दावा ट्रंप यांनी केला.
इराणच्या संभाव्य अणुशस्त्रांचा परिणाम अमेरिकेवर कसा होऊ शकतो? इराण आणि अमेरिका यात खूप अंतर आहे. अण्वस्त्र तयार करून ते इतक्या दूरवर पाठवण्याची क्षमता इराणमधे आहे काय असे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. इराणी अण्वस्त्रांचा त्रास इस्रायलला, अरब आणि आखाती देशांना होऊ शकतो, त्यांनी इराणवर बाँब टाकले तर समजण्यासारखं आहे. अमेरिकेनं कां बाँब टाकावेत? म्हणजे अमेरिकेची सुरक्षा हा मुद्दा इराण कारवाईत येत नाही.
दुसरं म्हणजे इराण खरोखरच अण्वस्त्रं तयार करू शकत होतं काय? इराणमधे अणुवर संस्कार होतात, बाँब तयार करण्यासाठी ज्या दर्जाचं युरेनियम लागतं, ते तयार करण्याची खटपट इराण करत आहे. परंतू त्याची मात्रा पुरेशी नाहीये, बाँब तयार करायला इराणला अजून खूप वेळ लागेल अशी माहिती सीआयएजवळ होती. ट्रंप यांनी सीआयएची माहिती धुडकावून लावली, सीआयएची माहिती चुकीची आहे आपल्या त्या माहितीवर विश्वास नाही, आपल्याकडं स्वतंत्र माहिती आहे असं ट्रंप म्हणाले. सत्तरेक अब्ज डॉलर आणि बावीस हजार कर्मचारी बाळगणाऱ्या सीआयएपेक्षा अधिक विश्वासार्ह माहिती ट्रंप कुठून मिळवतात?
थोडक्यात असं की सीआयएला धुडकावून मनास येईल तसा निर्णय ट्रंपनी घेतला, इस्रायलसाठी. निर्णय घेताना संसदेला विचारलं नाही, सैन्याला विचारलं नाही, मंत्रीमंडळाला विचारलं नाही.
टिम वायनर यांनी प्रस्तुत पुस्तकात जॉर्ज बुश यानी इराकवर केलेल्या आक्रमणाची सविस्तर हकीकत सांगितली आहे. इराकमधे महाविनाश करणारी शस्त्रं आहेत असं कोणीतरी बुशना सांगितलं. सांगणारा कोण, त्याची लायकी काय इत्यादींची चौकशी बुशनी केली नाही. सीआयए किंवा युकेची एमआयसहा ही हेरसंस्था या कोणाकडंच विनाशकारी शस्त्रांची माहिती नव्हती.
बुशना वाटत होतं की अल कायदाची मुळं इराकमधे आहेत. इराकचा सद्दाम हुसेन अल कायदाला पाठिंबा देतोय. तेव्हां सद्दामला खतम करायचं असं बुशनी ठरवलं. त्यासाठी आवश्यक पुरेशी माहितीही बुश यांच्याकडं नव्हती.
बुशनी सीआयएला धाब्यावर बसवलं.इराकवर आक्रमण केलं.
कोणीतरी क्लिंटना सांगितलं की ओसामा बिन लादेन अफगाणिस्ताना तोरा बोरा पर्वत प्रदेशात आहे. क्लिंटन टॉम हॉक मिसाईल्स सोडत बसले. सीआयएला ओसामाबद्दल पुरेशी माहितीच नव्हती. नंतर कित्येक वर्षांनी सीआयएनं पाकिस्तानच्या आयएसआयला टांग मारून स्वतंत्रपणे बिन लादेन अबोटाबादमधे आहे हे शोधून काढलं. त्या माहितीच्या आधारे ओबामानी बिन लादेनला मारलं.
टिम वायनर म्हणतात की सीआयएच्या संचालकांची वृत्ती प्रेसिडेटच्या होला हो करण्याची असते. प्रेसिडेंटना साधारणपणे ते थोर आहेत असं वाटत असतं; प्रेसिडेंटच्या कानाला जे सुखकारक वाटतं तेच सीआयएचे संचालक सांगतात. त्यातून इराकवरचं आक्रमण, तोराबोरावरचे हल्ले असे प्रकार उद्भवतात.
सीआयए क्षीण करणं, सीआयएला आपली बटीक करण्याकडं प्रेसिडेंटांचा कल असतो. ट्रंप फार धोकादायक आहेत, ते सीआयएची वाट लावतील असं लेखक म्हणतो.
ट्रंप यांचा एकूण कारभार पहाता ते शक्य आहे. सीआयए फालतू आहे, त्यावर अब्जावधी डॉलर खर्च करणं बंद करणं, हज्जारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवून सीआयए बंद करणं असा निर्णय ट्रंपनी घेतल्यास आश्चर्य वाटू नये.
तथापी इराणच्या अण्वस्त्र तयारीबाबत सीआयए ठाम राहिलं ही गोष्ट आशादायक आहे.
।।
लेखकानं २००८ साली सीआयएचा ५० वर्षाचा इतिहास Legacy of Ashes: The History of the CIA या पुस्तकात लिहिला. या पुस्तकाला पुलित्झर पारितोषिक मिळालं. त्या नंतरची सीआयएची स्थिती प्रस्तुत पुस्तकात वायनर यांनी मांडली आहे.
बातमीदाराला गावात काय घडतं ते माहित असतं. अनेक वर्षं बातम्या दिल्यानंतर त्यांना गाव कळतं. त्यातून हाताला लागलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर बातमीदार पुस्तक लिहितात. पुस्तकांचा आधार बातम्या असतो पण बातमीपलिकडं जे लक्षात आलेलं असतं, जे बातमीत नसतं, ते बातमीदार पुस्तकात लिहितो. त्यासाठी बातमीदारीच्या काळात तो तपशीलवार टिपणं करत असतो, वाचत असतो. ते सारं पुस्तकात येतं. अशी पुस्तकं अकॅडमिक नसतात, स्वतःचं संशोधन आणि विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी ती लिहिलेली नसतात. हे माझं मत आहे, घ्यायचं तर घ्या नाही तर सोडून द्या असा बाज असतो. पोलिश पत्रकार कापुश्चिन्सकीनं ही लिखाणाची पद्धत वापरली.
लेखकाच्या प्रस्तुत पुस्तकातून सीआयएचा इतिहास तर समजतोच पण अमेरिकेच्या परदेश धोरणाबद्दलही बरंच समजतं.
।।