पाच हजार रुपयांची पाण्याची बाटली

पाच हजार रुपयांची पाण्याची बाटली

घराबाहेर पडताना आपण पाण्याची एक बाटली जवळ बाळगतो. ती बाटली  आता एक दागिना झालाय.

 युरोपात, अमेरिकेत या बाटल्या साठ डॉलरला (पाचेक हजार रुपये) विकल्या जातात. 

बाटल्या आकर्षक रंगात असतात. बाटल्यांना टांगण्यासाठी की चेन मिळतात. बाटल्या हातात घेऊन हिंडता यावं यासाठी बाटलीला हुक असतात. बाटल्यांवर नामांकित माणसांची चित्रं असतात. मेस्सी या फूटबॉलपटूचं चित्र छापलेल्या  बाटल्या धडाधड संपत आहेत. कॉलेजात जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक आकर्षक बाटली लटकत असते.

 रस्त्यावर, कामाच्या जागी, चित्रपटघरात, रेलवेत, विमानात, चराचर सृष्टीत सर्व ठिकाणी रंगीत आकर्षक बाटल्या दिसतात. 

विशिष्ट ब्रँडच्या बाटल्या हे नव्या पिढीचं (जेन झेड) एक फॅशन स्टेटमेंट झालंय. नुसतं फॅशन स्टेटमेंट नव्हे तर जीवन चिन्हं झालंय. 

तरूण पिढी म्हणते ‘आम्ही सतत पाणी पीत असतो. पाणी हेच जीवन आहे. सतत हायड्रेट झालं तर प्रकृती आणि डोकं उत्तम रहातं. सेक्स असो की अभ्यास की करियर, भरपूर पाणी हा फंडा आहे’ तरूण पिढीला तसं वाटतं कारण सोशल मिडियातून डॉक्टर लोक पाण्याचं महत्व सांगत असतात. पाणी कमी पोटात गेलं तर अमूक त्रास होतो, तमूक रोग होतो इत्यादी गोष्टी मिडियातून येत असतात. हल्ली तुमचं आमचं आरोग्य  सोशल मिडिया ठरवतं. #watertok वर जावा. तिथं तरूण माणसं आपण कसं पाणी पितो याचे टिकटॉक रील्स टाकत असतात. अडीच अब्ज लोकांनी ही रील्स पाहिलीत.

पार्टीला जाताना एक बाटली, कॉलेजात जाताना दुसरी बाटली, डेटवर जाताना वेगळी बाटली. काही दिवसांनी सोमवारी या रंगाची, मंगळवारी त्या रंगाची असं सुरु होईल. भारतात नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची बाटली येऊ शकेल.  वट पौर्णिमेला एक बाटली, कडवा चौथला वेगळी बाटली.

यंदा वेगवेगळ्या ब्रँडच्या  २७ कोटी बाटल्या अमेरिकेत खपल्या. अमेरिकेत बाटल्या उत्पादक कंपन्यांनी ४ अब्ज डॉलरचा धंदा केलाय. 

 शंभरेक वर्षांपूर्वीची भारतात माणूस प्रवासाला निघाला तर एक फिरकीचा तांब्या आणि होल्डॉल नावाचा जडजंबाळ प्रकार सोबत असे. फिरकीच्या तांब्याचा फिरकीचा भाग हे एक भांडं असे. काही तांब्यात फिरकी फिरवून झाल्यावर  तांब्यात बसणारं एक फुलपात्र असे. तांब्या तीन चार पिढ्या चालत असे.

 कॅनव्हास सारख्या कापडाची एक पिशवी असे. त्यात दोनेक लीटर पाणी मावत असे.  तिच्यातून पाणी पाझरत असल्यानं पिशवीतलं पाणी थंड होत असे. एक फ्लेक्झिबल माठच म्हणाना. लोक ही पिशवी बसच्या खिडकीला किंवा ट्रेनच्या खिडकीला टांकून ठेवत असत.

माणसं अगदी परवा परवा पर्यंत  प्रवासात पाणी घेऊन जात नसत. रेलवे स्टेशन, बस स्टँड इत्यादी ठिकाणी मिळणारं पाणी वापरत. कुणाच्याही घरी, ऑफिसात गेलं की न मागता पाण्याचे ग्लास भरून समोर येत असत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात हवा कोरडी असते, फार उन्हाळा असतो. तिथं कुठंही गेलं की एक तारेचा क्रेट समोर येत असे आणि त्यात सहा स्टीलचे ग्लास समोर येत. दोन ग्लास पाणी तर अगदी सहज प्यालं जात असे. कित्येक घरामधे ताक ठेवलेलं असे. ते पाहुण्यांना तर दिलं जात असेच पण येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूनाही ताक दिलं जात असे. पाण्याचे किंवा ताकाचे पैसे कोणी मागत नसे.

अगदी परवा परवा पर्यंत माणसं मिळेल ते पाणी पीत प्रवास करत, फिरत. कधी पोट बिघडलं, प्रकृती बिघडली असं झालं नाही. असं कां? पाणी प्रदुषित नव्हतं? की लोकांची पोटं कुठलंही पाणी पिण्याला सरावली होती?

अलीकडं शहरांच्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतात शहरातला औद्योगीक गाळसाळ फेकला जातो. साखर कारखाने, टेक्सटाईल कारखाने असणाऱ्या शहरातल्या कारखान्यातून बाहेर पडणारं केमिकल युक्त पाणी नदीत सोडलं जातं. या पाण्याला घाण वास तर येतोच पण उघड्या डोळ्याना त्यावर फेस तरंगताना दिसतो.  

 आता शुद्ध पाणी विकतच घ्यावं लागतं.

अमेरिका, युरोपात, जपानात, चीनमधे काही शहरं पिण्याचं शुद्ध पाणी घरोघरीच्या नळातून देतात. तिथल्या कित्येक शहरात रस्त्यावर ठेवलेल्या नळातून सहज ओंजळीनं पाणी पिता येतं. कारण तिथं पाण्याचे स्त्रोत शुद्ध ठेवले जातात.

  शुद्ध पाणी मिळत नसल्यानं घरून पाणी न्यायचं किंवा कुणा उद्योगानं शुद्ध करून बाटलीत भरलेलं पाणी प्यायचं. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या दिसायला बऱ्या नसतात. म्हणून दिसायला देखण्या बाटल्या. बाटल्यांचे आकार वेगळे. पाणी शोषण्यासाठी त्यात रंगीत नळ्या. स्ट्रॉ. 

‘उद्योग’ पाणी अशुद्ध करणार. शुद्ध पाणी ‘उद्योग’ पुरवणार. पाणी अशुद्ध करणारे उद्योग आपली उत्पादनं खपवण्यासाठी जाहिराती करणार, त्या जाहिराती टीव्हीवर, सेलफोनवर दाखवणार. तोही एक ‘उद्योग’च.  

शुद्ध पाणी पिण्यासाठी बाटल्याही ‘उद्योग’ तयार करणार. बाटल्यांचा प्रचार प्रसार करणाऱ्या जाहिराती तयार होणार, टिकटॉक इत्यादी ‘उद्योग’ सोशल मिडियात बाटल्यांच्या प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवणार.

उद्योग आणि उद्योग. त्यांची लक्ष घातांक लक्ष इतक्या रुपयांची उलाढाल. पाणी अशुद्ध करणाऱ्यांची कमाई, पाणी शुद्ध करणाऱ्यांची कमाई, पाणी विकणाऱ्यांची कमाई. लक्ष घातांक लक्ष.

  निसर्गातून मिळणारं पाणी शुद्ध ठेवलं तर वरील साऱ्या उद्योगांचा डब्बा गुल.

आपलं जगणं कसं,कोण, ठरवतंय पहा. आपण काय खायचं, काय प्यायचं, कसं खायचं, कुठं खायचं, कुठं आणि कसं पाणी प्यायचं, कसं जगायचं ते  ‘उद्योग’ ठरवणार. कशात नफा मिळतो, कुठं पैसे निघतात याचा हिशोब ‘उद्योग’ करणार.  तो नफा घडावा या बेतानं आपण आपलं जगणं बेतणार. ‘ते’ सांगतात त्यानुसार आपलं जगणं आकार घेणार.

।। 

Comments are closed.