गडगडाट. पाऊस पडला नाही. ट्रंप पुतीन चर्चा.
गडगडाट झाला. विजा चमकल्या. पाऊस पडला नाही. युक्रेन-रशिया युद्ध थांबलं नाही. डोनल्ड ट्रंप व्लादिमिर पुतीन यानी ढोल बडवून गवगवा करून चर्चा केली. युद्ध सुरूच राहिलं.
अलास्का या अमेरिकेतल्या राज्यात बैठक झाली. हे राज्य १८७८ साली रशियन राणीनं अमेरिकेला विकलं होतं.रशिया एका युद्धात पार बुडाला होता, रशियाकडं पैसे नव्हते. अलास्का विकून रशिया तगला होता.
आठवडाभर ट्रंप संदेश देत होते. निघतांना व्हाईट हाऊसच्या विमानतळावर त्यांनी संदेश दिला. विमानात बसून संदेश दिला. विमान अलास्कात उतरल्यावर ट्रंप विमानाबाहेर आले आणि सदेश दिला. ‘मी युक्रेन-रशिया युद्ध थांबवणार आहे.’
पुतीन काहीच बोलत नव्हते.
पुतीनचं विमान आलं. पुतीनसमोर लाल पायघडी पसरली होती.
बुचा हे अख्खं युक्रेनियन गाव रशियन फौजानी ठार मारलं तेव्हांपासून पुतीनना ‘बुचाचा खाटिक’ असं म्हटलं जातं. खाटिकाचं स्वागत.
पुतीन विमानातून उतरले त्याच वेळी पूर्व युरोपमधे बाँब कोसळत होते, राजधानी कीवमधे सायरन वाजत होते. पुतीन-ट्रंप चर्चा सुरु झाली तेव्हां कीववर बाँब पडले.
पुतीन ट्रंप यांच्या बीस्ट (जनावर) या सहादारी चिलखती गाडीकडं निघाले तेव्हां पत्रकाराना पायघडीपासून दूरवर रोखण्यात आलं होतं. तरीही एक पत्रकार जोरात ओरडला- प्रेसिडेंट पुतीन तुम्ही नागरिकाना ठार मारणं थांबवणार आहात कां?’
आसपासच्या सर्वाना हा प्रश्न ऐकू गेला. पुतीननी हात हलवत आपल्याला ऐकू आलं नाही असा आविर्भाव केला. ट्रंपनी पुतीनना ओढलं ‘त्यांचं काही ऐकू नका’ असा आविर्भाव करून पुतीननं हलकेच पुढं ओढलं.
एक दालन सजवण्यात आलं होतं. अलास्का २०२५ असं या घटनेचं शीर्षक ठरलं होतं.ट्रंप, पुतीन एकमेकाच्या मांडीवर हात ठेवता येईल इतक्या अंतरावर खुर्च्यांवर बसले. तिथपर्यंत फोटोग्राफर आणि पत्रकार होते. नंतर दोघंच उरले.
तीन तास चर्चा झाली.
नंतर पत्रकार परिषद झाली. यजमानानं आधी निवेदन करायचं आणि नंतर पाहुण्यानं असा संकेत आहे. अलास्कात आधी भाषण केलं पुतीन यांनी.
चर्चेत काय झालं ते पुतीननी सांगितलं नाही. ट्रंप कसे थोर आहेत याचंच वर्णन पुतीननी केलं. पुतीन यांचं एक वाक्य असं होतं ‘ट्रंप म्हणाले होते ते खरं आहे. २०२२ साली ट्रंप अध्यक्ष असते तर हे युद्ध झालंच नसतं.’ बायडन यांना युद्ध रोखता आलं नाही असं पुतीन यांना म्हणायचं होतं.
ट्रंपनी तरी युद्ध कुठं रोखलंय?
पत्रकारांसमोर पुतीन युद्ध थांबवण्या बद्दल काहीच बोलले नाहीत.
हिज एक्सलन्सी प्रेसिडेंट पुतीन यांच्या सन्मानार्थ सेरेमोनियल भोजन ठरलं होतं. ते रद्द झालं. जेवण न करताच दोन्ही प्रेसिडेंट आपापल्या घरी परतले.
पत्रकारांसमोर ट्रंप यांनी पुतीन यांचं गुणगान केलं. पुतीन आपले कसे ग्रेट, फँटास्टिक मित्र आहेत ते सांगितलं. चर्चेत ग्रेट प्रगती झाली पण निष्कर्ष निघाला नाही असं ट्रंप म्हणाले.
पुतीनचं आगमन, चर्चा, पत्रकार परिषद, निर्गमन या साऱ्या गोष्टी अत्यंत वेगानं पार पडल्या. गुंडाळल्या हेच योग्य वर्णन ठरेल.
ट्रंप विमानात बसले. बसल्या बसल्या त्यानी झेलेन्सकीना फोन लावला. झेलेन्सकीना वॉशिंग्टनला बोलावलं.
विमानातून उतरल्या उतरल्या ट्रंपनी फॉक्स न्यूजचे शॉन हेनेटी याना अर्ध्या तासाची मुलाखत दिली. व्हाईट हाऊसमधून अधिकृत मुलाखत ट्रंप देत नसतात, त्यांचा सगळा मामला खाजगी असतो.
मुलाखत मुलाखत नव्हतीच. ट्रंप त्यांच्या चाहत्या पत्रकारांना (मराठी भाषेत म्हणायचं तर चमच्याना) मुलाखती देत असतात. ट्रंपना आवडतील असे, ट्रंपनी लिहून दिल्यागत असलेले प्रश्न हेनेटीनी विचारले.
आपण जगातली सात युद्धं थांबवली असं ट्रंप म्हणाले. त्यात कंबोडिया वगैरेचे उल्लेख होते. कंबोडियातलं युद्ध त्या आधी कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं.
गाझा युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा खूप गाजावाजा झाला. नेतान्याहू गाझाला कुटत आहेत, अजूनही. आफ्रिकेतल्या कांगोमधे युद्ध चाललंय. शेजारचे रवांडा, युगांडा इत्यादी देश त्यात गुंतलेले आहेत. ट्रंपनी रवांडा-कांगोच्या नेत्याना व्हाईट हाऊसमधे बसवलं, फोटो काढून घेतले, युद्ध थांबवल्याचं जाहीर केलं. कांगोमधलं युद्ध थांबलेलं नाही.
युक्रेनचं तर विचारायलाच नको. प्रेसिडेंट झाल्या झाल्या ट्रंप म्हणाले की मी चोविस तासात युद्ध थांबवून दाखवतो, झेलेन्सकी आणि पुतीन दोघांशीही माझे घट्ट संबंध आहेत, ते माझं ऐकल्या शिवाय रहाणार नाहीत. नंतर ट्रंप आज झेलेन्सकीना, उद्या युरोपीय पुढाऱ्याना, परवा पुतीननं धमक्या देत राहिले. युद्ध थांबवलं नाहीत तर तुमच्यावर प्रलय कोसळणार आहे असं म्हणत राहिले. प्रत्येकाला मुदत दिली. दोन महिन्यांची मुदत देतो, महिन्याची मुदत देतो, आता शेवटली आठ दिवसांची मुदत देतो; एक मुदत संपली की दुसरी मुदत देत राहिले.
अलास्कात भेटण्याआधी आपल्या दूताकरवी त्यानी युद्धबंदीचा प्रस्ताव पाठवला होता. युक्रेननं रशियाच्या टाचेखालची जमीन रशियाला द्यावी आणि रशियानं दक्षिण युक्रेनमधली लाटलेली जमीन युक्रेनला परत करावी. ना रशियाला हे मान्य झालं, ना युक्रेनला, ना युरोपीयन देशाना. तिघंही ट्रंप यांचा प्रस्ताव झिडकारत होते.
युक्रेन युद्धाला बायडन जबाबदार आहेत असं ट्रंप मुलाखतीत म्हणाले. आता युद्ध थांबवणं झेलेन्सकींच्या हाती आहे असं म्हणून जबाबदारी झेलेन्सकींच्या खांद्यावर ट्रंपनी टाकली.
युक्रेन रशिया युद्धाबद्दल ट्रंप एकट्यानं ठरवतात, एकट्यानं बोलतात. अख्ख्या जगातल्या कोणालाही विचारत नाहीत.
सम्राट ट्रंप आणि सम्राट पुतीन असे दोन राजे करोडो लोकांच्या वतीनं निर्णय घेत आहेत.. प्रजाजनांनी फक्त ऐकायचं, टाळ्या वाजवायच्या, आपसात हळूच म्हणायचं, छान करमणुक झाली बुवा, लाखो लोकांच्या मृत्यूची किमत देऊन.
बाय द वे गेल्या आठवड्यात ट्रंपनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्याना फोन लावला. मंत्री चकीतच झाले. ते रस्त्यावर चालत असताना फोन वाजला. कशासाठी फोन, ट्रंपनी काय काढलं, सेक्रेटरी वगैरे नव्हे तर खुद्द ट्रंपच बोलत आहेत. मंत्री चक्रावले. ट्रंप म्हणाले की त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे, काय करता येईल?
त्या फोन नंतर फेल गेलेली अलास्का चर्चा.
ट्रंपचं नोबेल हुकलेलं दिसतंय.
।।