(समाज घडवणारा) एक डिझायनर गेला

(समाज घडवणारा) एक डिझायनर गेला

 जॉर्जियो आरमानी हा इटालियन माणूस  वयाच्या ९१ व्या वर्षी वारला.आरमानी या त्याच्याच नावाचा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे.जगभरातल्या पेपरांनी त्याच्या मरणाची हेडलाईन केली, त्याच्यावर मृत्यूलेख लिहिले. मार्टिन स्कॉरसेसे या दिक्दर्शकानं त्याच्यावर २० मिनिटांचा माहितीपट केला होता. जाहिरात म्हणून नव्हे, त्याच्या प्रेमाखातर.

लोक हळहळले नाहीत पण त्यांना दुःख मात्र निश्चीतच झालं.

आरमानी डिझायनर होता. त्यानं कपडे, बूटचपला, अत्तरं, आभूषणं, घरं, कॅफे,ऑफिसं असं बरंच काही डिझाईन केलं.   तो ओळखला जातो तो त्याच्या वस्त्रप्रावरणाच्या डिझाईनमुळं. हॉलीवूडमधले टॉप अभिनेते आणि अभिनेत्या आरमानी कपडे वापरून लोकप्रीय झाले.  आरमानीमुळे नटनट्या प्रसिद्ध झाल्या की नटनट्यांमुळे आरमानी ब्रँड? या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे.

आरमानीची कपडे डिझाईन व्यवसायातली २०२४ सालातली कमाई २.६ अब्ज डॉलर होती. आरमानीपेक्षा कित्येक पटीनी जास्त कमाई आणि लोकप्रियता मिळवणारे ब्रँड जगात आहेत. 

फॅशन डिझाईन हे प्रकरण मजेशीर आहे.  आपल्या पुण्यात गल्लीतल्या दुकानात पैठण्या, चपला, मिठाया, दागिने विकले जातात. दुकानावर  लिहिलेलं असतं की जगात  कुठंही या दुकानाची शाखा नाही. एकमेव दुकान.  दुकानाबाहेर रांगा लावणारे लोक असतात, पुणेकर जगात कुठंही गेले तरी ते दुकान व तिथल्या वस्तूची फार स्तुती करत असतात.

डिझाईन माणसाला आवडतं किंवा आवडत नाही. कां आवडतं ते माणसाला सांगता येत नाही. कापडाचा एक फील येतो. कपडा अंगावर घातल्यानंतर वाटसरू आपल्याकडं कौतुकानं पहातात ही भावना माणसाला त्या  कपड्याला बांधून ठेवते. आवड निवड नियमात  बसवता येत नाही. 

आरमानी ब्रँडची सुरवात १९७५ साली झाली. मिलान या त्याच्या गावातल्या अँफिथियेटरमधे  त्याचे कपडे प्रदर्शित होत.  नंतर जगाच्या पॅरिस, न्यू यॉर्क,लंडन इत्यादी फॅशननगरीत त्याचे शो होत असत. 

जॉर्जियो आरमानी हा माध्यमांच्या हाती  लागणारा माणूस नव्हता. त्याचं एक घर बोटीवर होतं, एक घर पर्वताच्या कपारीवर उभं होतं, एक घर पुरातन शॅटूमधे होतं. त्याचा सर्व वेळ डिझायनिंगमधेच जात होता. प्रत्येक डिझाईन तो स्वतः करत असे.  त्याला एक बहीण आहे आणि दोन मांजरं आहेत. त्यांच्याबरोबर तो घरातला वेळ व्यतीत करत असे.एकच प्रॉडक्ट   तो वर्षानुवर्ष विकत बसला नाही.  वर्ष सहा महिन्यांनी नवा प्रॉडक्ट प्रदर्शित होत असे. तो सतत नाविन्याच्या शोधात असे. एकदा त्यानं जोधपुरी कोटाची कल्पना विस्तारून सूट डिझाईन केला .लोकांना तो पसंत पडला नाही. त्याच्या डिझाईनमधे तोच तोच पणा येतो अशी  टीका  झाली होती.   त्याला ती टीका मान्य नव्हती.

आरमानीनं काय केलं?

 युरोप अमेरिकेत सूट वापरत असत, ट्राऊझर आणि जॅकेट. आपण जॅकेटला कोट म्हणतो. या कोटाला आतून जाड दणकट अस्तर असे, खांद्याला पॅडिंग असे. खरं म्हणजे हा कोट अडसरच असे, तो घातल्यावर हालचालीत मोकळेपणा रहात नसे. लग्नात असाच कोट घातला पाहिजे असा आपल्याकडे रिवाज होता. कोट घातलेला नवरा मुलगा स्वागत समारंभर अवघडलेला असे.

आरमानीनं अस्तर आणि पॅडिंग काढून टाकलं. जॅकेट हलकं झालं, हातांची-शरीराची वाट्टेल तशी हालचाल करायला माणूस मोकळा झाला. म्हटलं तर कोट स्वस्तही झाला. 

स्त्रियांची फार सोय झाली. आरमानींचा ब्रँड आला तेव्हां स्त्रिया जीन्स वापरू लागल्या होत्या, विविध प्रकारची  कामं करू लागल्या होत्या, नोकऱ्या करू लागल्या होत्या. तिथं जॅकेट घालावं लागत असे.आरमानी ब्रँडची जॅकेट स्त्रिया सहज वापरू शकत,आपली छाती पुरेशी  उघडी रहाते याचा स्त्रियांना आनंद होता. पुरुषांचं जॅकेट स्त्रियांचं झालं.

डिझायनर फक्त बाह्यरुप ठरवतो ही डिझाईनची कल्पना अपुरी आहे. डिझायनर एकूण प्रॉडक्ट कसा असावा, त्याचं उत्पादन कसं व्हावं, त्याचं मार्केटिंग कस करावं, त्या  प्रॉडक्टचा समाजावर काय परिणाम व्हायला हवा इत्यादी असंख्य गोष्टीचा विचार करतो. वस्तू माणसासाठी असतात; म्हणून  माणसाच्या जीवनाच्या सर्व अंगांचा विचार डिझायनर करतो. संस्कृती, धर्म, अर्थव्यवस्था, कला जाणीवा, भाषा इत्यादी इत्यादी. 

जॉर्जियो आरमानीनं अत्तरं डिझाईन केली. बुटांसाठी कापड वापरलं आणि जॅकेटसाठी कातडी वापरली. आरमानी   घालून माणूस  एकाद्या खाणावळीत जाणार असेल तर त्या खाणावळीतलं फर्निचर कसं असेल, तिथल्या भितींचा रंग कुठला असेल, तिथं कुठलं संगित असेल अशा नाना गोष्टींचं डिझायनिंग आरमानी करत असे.

माणूस काँप्लेक्स असतो. तो गर्वही करतो, विनयशीलही असतो. तो दादागिरी करतो आणि मृदूही असतो. तो चिलखत घालतो आणि तलम कपडेही घालतो. तो कठोर बॉस असतो आणि आज्ञाधारक नोकरही असतो.तो तरूण असतो, म्हातारा असतो, गरीब असतो, श्रीमंत असतो. माणसाच्या जास्तीत जास्त  कंगोऱ्यांना आत्मसात करणारं कपड्यांचं  डिझाईन आरमानीनं तयार केलं.

असीम कल्पना शक्ती हा डिझायनरचा फंडा असतो.

१९७२ च्या सुमाराला मी लातूरमधे होतो.फाटका होतो. एका कारखान्यात  माझा मुक्काम असे.  अमर्याद सक्रीय होतो आणि खुष होतो. थंडीचे दिवस होते. मी बिहारमधे जायला निघालो. कोट विकत घ्यायला पैसे नव्हते.माझे मेंटॉर जयंत वैद्य गुरुजी  मला एका दुकानात घेऊन गेले. तिथं एक ब्लँकेट विकत घेतलं. टेलरसमोर मला उभं केलं. टेलरला म्हणाले कोट शीव. टेलर म्हणाला ब्लँकेट जाड आहे,सुया मोडतात. वैद्य गुरुजी म्हणाले सुयांचे पैसे मी देतो. कोट शीव.

तो कोट घालून मी मुंबई, दिल्ली असं करत करत हझारीबागला गेलो. माझ्या कोटाचं खूप कौतुक होत असे.

डिझायनर आरमानी लोकांच्या दीर्घ काळ लक्षात राहील.

वस्तू समाज घडवतात. वस्तू घडवणारे समाज घडवत असतात.

।।

Comments are closed.