१४ लाख डॉलरला एक कबूतर

१४ लाख डॉलरला एक कबूतर

१४ लाख डॉलरला एक कबूतर
काही दिवसांपूर्वी आरमेंडो नावाचं एक कबूतर एका चिनी धनिकानं बेल्जियममधे १४ लाख डॉलरला विकत घेतलं. नाही म्हटलं तरी जरासा कमीच भाव आला. २०१९ साली एक कबूतर १९ लाख डॉलरला विकलं गेलं होतं. व्यवस्थित प्रशिक्षित केलेल्या कबूतराला चिनी लोक एकेका कबूतराला दहा बारा लाख डॉलरही द्यायला तयार होतात.
जगात कबूतरांचं एक नवं मार्केट तयार झालंय.
कबूतराला येवढी किमत कां येते?
कारण कबूतरामधे एक अद्भुत शक्ती आहे. कबूतराला आपण कुठं वाढलोय त्याची आठवण रहाते, शेकडो किमी अंतरावरून कबूतरं आपल्या स्थानावर परत येतात.
समजा मुंबईतल्या कबूतर खान्यातलं कबूतर असेल. त्या कबूतराला व्यवस्थित खायला घालून परिसर दाखवायचा, वारंवार, परिसर पहाण्याची तालीम त्याच्याकडून करून घ्यायची. ते कबूतर कबूतर खान्याचा परिसर लक्षात ठेवतं. ते कबूतर दिल्लीत नेऊन सोडून दिलं तर ते बरोब्बर कबूतर खान्याला परत येतं. आकाशातून दूरवरून त्यांना कबूतरखाना, बाजूचं कीर्तीकर मार्केट, नाक्यावरच समोसे आणि खमंड ढोकळा विकणारं दुकानं, जैन देरासर इत्यादी वास्तू बरोब्बर लक्षात येतात. कबूतराला हे कसं जमतं यावर पक्षीशास्त्राच्या संशोधकांनी खूप अभ्यास केला पण त्याना नेमकं कारण सापडलेलं नाही.
कबूतराची ही अद्भुत शक्ती पाहून त्यांचा वापर निरोप पोचवण्यासाठी, टपाल पोचवण्यासाठी केला गेला.कबूतर आंतराष्ट्रीय पोष्टमन झालं. सीआयएनं एके काळी कबूतरं हेरगिरी करण्यासाठी वापरली. कालीदासाच्या काळात कबुतरं होती की नाही ते माहित नाही, कबूतरांची अद्भुत शक्ती कदाचित कालिदासाला माहित नसावी. नाही तर कालिदासानं संदेश पोचवण्यासाठी ढगांच्या जागी कबुतराला योजलं असतं. आता त्या ‘पोष्टमन’चं रूपांतर स्पर्धकात झालंय.
जगभर कबूतरांच्या स्पर्धा भरतात. स्पर्धेची जागा ठरते. लोक आपली कबूतरं तिथं नेतात, विमानातून. दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळी तिथून कबूतरं उडवली जातात. कबूतरं आपल्या मालकांच्या गावात परत येतात. त्यांच्या पायाला इलेक्ट्रॉनिक लेबल चिकटवलेलं असतं. त्यात प्रवास कसकसा झाला, कुठल्या वेळी ते कुठं होतं याच्या नोंदी होतात. निघाल्याची वेळ आणि पोचण्याची वेळ नोंदली की स्पर्धेचा निकाल तयार होतो.
स्पेनमधल्या बार्सेलोनातली स्पर्धा अत्युच्च स्पर्धा मानली जाते. कबूतरांचं ऑलिंपिक. परवाच्या ४ एप्रिल २०२५ रोजी बार्सेलोनातून १५,५९८ स्पर्धक कबूतरं उडाली. युरोपभरातून कबूतरं या स्पर्धेला आली होती.
अँथनी पेलीटरीचं आरएस ६ हे कबूतर जिंकलं. त्यानं बार्सेलोना ते बेल्जियममधलं राँगी हे गाव यातलं ९९९ किमीचं अंतर दोन दिवसात कापलं, दर मिनिटाला ९८६ मीटर या वेगानं ते उडालं.
बेल्जियम हे कबूतर निर्मितीचं जगातलं एक नंबरचं केंद्र तयार झालंय. तिथं जागोजागी कबूतर निर्मितीचे ‘कारखाने’ उभे राहिलेत. कबूतरी वर्षाला बारा अंडी देऊ शकते. साधारणपणे कबूतर एक पत्नीव्रती असतं, जोडीनं रहातं. जोडीतलं एक कबूतर नाहिसं झालं तर कबूतर दुसरा जोडीदार निवडतं. नव्या जोडीदाराशी जुळवून ग्यायला कबूतराला फार वेळ लागतो. शहरात, सुखी वातावरणात पाळलेलं कबूतर १५ वर्षं जगू शकतं. जंगलात वाढलं असेल तर त्याला इतर प्राण्यांचा धोका असतं, ते लवकर एकाद्या प्राण्याचं भक्ष्य ठरू शकतं.
टॉन व्हॅन गेवर नावाचा माणूस जगातला एक नंबरचा कबूतर निर्माता-विक्रेता झालाय. बेल्जियममधे Vijverstraat 65,9860 Oosterzele या ठिकाणी (ब्रसेल्सच्या जवळ) टॉम व्हॅन गेवरचं ऑफिस आहे. तिथं तो कबुतरं विकतो. टॉमकडली कबूतरं जातीवंत असतात, वेगवान असतात. चीनमधले धनाढ्य लोक विमानानं ब्रसेल्सला पोचतात आणि लगोलग टॉमकडं पोचतात. कबूतरं खरेदी करण्यासाठी.
टॉम कबुतरांची शेती करतो. तो जातीवंत कबुतरं निवडतो. त्यांची प्रजा वाढवतो. काही खास कबुतरं तो केवळ स्वतःसाठी राखून ठेवतो, ती कबूतरं स्पर्धेत उतरवतो.बाकीची विकतो. त्याच्याकडं ११ इंचाचं अर्धा पाऊंड वजनाचं एक कबूतर आहे. त्याचं नाव आहे फिन. चिनी लोक टॉमकडं फिनची मागणी करतात, मागेल तेवढे डॉलर द्यायला तयार असतात. टॉम ते विकत नाही.
दर्दी लोक पेंटिंग्ज, घोडे, बाळगतात. तसं धनिक कबुतरं बाळगतात.
कबूतरांची तस्करी सुरु झाल्यापासून कबूतरं ही बेल्जियन सरकारची डोकेदुखी झालीय. कबूतरांची चोरी होते. चोरलेली कबूतरं गपचूप दूरदेशी नेली जातात. एके दिवशी टॉमच्या कबूतरखान्यात दरोडेखोर घुसले. शेदोनशे कबुतरं त्यांनी पळवली. करोडो डॉलर किमतीची. दरोडेखोरांचा माग घेत घेत पोलीस रोमानियात पोचले. रोमानियात एक माणूस कबूतरांचा धंदा करतो. त्याच्याकडं टॉमची काही कबूतरं सापडली. ही कबूतरं नंतर चीनमधे पोचली असती.
कबूतरं हे चिनी नवश्रीमंतांचं एक वेड झालंय. चीनमधे कबूतरांचा काळाबाजार सुरु झाला. चीनमधे पोलिसांच्या नजरेपासून दूर कबूतरांची घरं उभारण्यात आलीयत. एक कबूतरांचं घर तर बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती आहे. सी जिनपिंग हे अद्यात्मिक गृहस्थ आहेत. त्यांना काळाबाजार पसंत नाही. ते कबूतरवाल्या धनिकांना तुरुंगात धाडताहेत.
सध्या मुंबईतले कबूतर प्रेमी जैन लोक आणि मुंबईकर यांच्यात जुंपलीय. कबूतरं रोगट घाण तयार करतात असं मुंबईकरांना वाटतंय, कबूतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यावर मुंबईकर खसकलेत. जैन मंडळी कबूतरांना दाणे खायला घालून पुण्य मिळवतात. त्यामुळं त्याना काहीही करून मुंबईत चौका चौकात कबूतरांना दाणे घालायचेत.
बेस्ट आयडिया. महाराष्ट्र सरकारनं एक कबूतर विद्यापीठ काढावं. तिथं कबूतर शास्त्राची पदवी द्यावी. मुंबईतली कबूतरं त्या विद्यापीठात पोचवावीत. विद्यार्थ्यांनी त्या कबूतरांची वर्गवारी करून ती किती अंतराची स्पर्धा खेळू शकतात याची चाचणी घ्यावी. वर्गवारीनुसार कबूतरं निर्यात करावीत. बेस्ट कबुतरं चीनमधे पाठवावीत. महाराष्ट्र सरकारला या व्यवहारातून अब्जावधीचं परकीय चलन मिळेल.
।।

Comments are closed.