पेपरची मालकीण बातमीदार असते.

पेपरची मालकीण बातमीदार असते.

लॅली वेमथ या पत्रकार बाईचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. हे निधन जगभरच्या पेपरांच्या बातमीचा विषय झालं. कां बाबा?

कारण लॅली वेमथ या बाई सामान्य पत्रकार नव्हत्या. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूज वीक या पेपरांच्या त्या मालक होत्या.

मालक असूनही त्या आपल्या पेपरासाठी मुलाखती घेत फिरत.

मेनाहेम बेगिन यांच्यापासून तर नेतान्याहूंपर्यंतच्या सर्व इस्रायली पंतप्रधानांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. गद्दाफी, सद्दाम हुसेन, यास्सर अराफत यांच्या मुलाखती मिळणं फार अवघड असे, वेमथनी त्या मुलाखती जमवल्या. सद्दाम हुसेननी मुलाखत दिली तेव्हां त्यांच्या भोवती सशस्त्र सुरक्षा सैनिक बसले होते, खुद्द हुसैन बंदूक टेबलावर ठेवून त्यांच्याशी बोलले. अगदी नुकतीच त्यांनी युक्रेनचे झेलेन्सकी यांची मुलाखत घेतली होती.

बेनझीर भुत्तो मुलाखत देताना म्हणाल्या ‘माझ्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था कशी आहे पहा. माझ्याकडं खात्रीची माहिती आहे की पुढल्या आठ दहा दिवसात माझा खून होणार आहे.’ मुलाखत संपल्यानंतर दोन आठवड्यांनी भुत्तो यांचा खून झाला.

पंतप्रधान, राष्ट्रपती ही माणसं त्यांच्या मुलाखतीचे विषय असत. सामान्यतः अशा बड्या लोकांकडून मुलाखतीची वेळ मिळत नसते, फार मिनतवारीनं समोरा समोर मुलाखतीला देशप्रमुख तयार होतात. बीबीसी, सीएनएन इत्यादी मातबर संस्थांनाही मुलाखत मिळणं अवघड असतं, वेळ मिळाला तर पंधरा वीस मिनिटांचा. वेमथ बाईंना भरपूर वेळ मिळत असे.

समजण्यासारखं आहे. वॉशिंग्टन पोस्टला मुलाखत द्यायचीय आणि तीही वेमथ बाईला हे कळल्यावर कोण वेळ नाकारणार. कित्येक वेळा देशप्रमुखांचे कार्यालय वेमथ बाईंची सोय पाहून मुलाखतीची वेळ देत.

कॅथरीन ग्रॅहॅम, वॉशिंग्टन पोस्टच्या प्रकाशक, वेमथची आई. ग्रॅहॅम यांचा फार मोठा दबदबा होता. वॉटरगेट प्रकरण ग्रॅहॅमच्या काळात घडलं होतं. निक्सन वॉशिंग्टन पोस्ट चिरडायला निघाले होते. पोस्टवर निक्सननी खटला भरला होता, पोस्टची वीज तोडली होती. वुडवर्ड-बर्नस्टिन या बातमीदारांपाठी ग्रॅहॅम खंबीरपणे उभ्या राहिल्या. निक्सन उघडे पडले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. पेंटॅगॉन पेपर्सचं प्रकरणही पत्रकारीच्या इतिहासातला एक मोठा धडा आहे. वियेतनाममधे अमेरिकन लष्कर कसं वागत होतं याची माहिती डॅनियल एल्सबर्गनं गोळा केलेल्या दस्तैवजांवरून पोस्टनं छापली. निक्सन अध्यक्ष होते. त्यांनी मजकूर छापायला बंदी घातली.वृत्तपत्रांना माहिती प्रसिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे, सरकार त्यावर बंधनं आणू शकत नाही असा निकाल न्यायालयानं दिला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या इतिहासातली ही मोठी घटना होती. ग्रॅहॅम त्या काळात ब्रॅडली या संपादकापाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या.पेपर बंद पडला तरी चालेल, बातमी छापा असं त्या म्हणाल्या.

कॅथरीन ग्रॅहॅमची मुलगी म्हटल्यावर कोण मुलाखतीला नाही म्हणणार.

वेमथचं कुटुंब तालेवार होतं. तिच्या आजोबापासूनच अमेरिकेचे प्रेसिडेंट, अमेरिकेतले धनाढ्य लोक, अमेरिकेतले मोठ्ठे कलाकार ग्रॅहॅम कुटुंबाचे व्यक्तिगत दोस्त असत. कॅथरीन ग्रॅहॅम फोन उचलून थेट प्रेसिडेंटशी बोलू शकत होत्या. ग्रॅहॅमच्या घरी पार्ट्या होत तेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट, संरक्षण मंत्री इत्यादी लोक अगदी घरच्यासारखे पार्टीत हजर रहात असत.

वेमथ न्यू यॉर्कमधे आणि वॉशिंग्टनमधे जंगी पार्ट्या देत असे. अमेरिकेतली नामचीन मंडळी, पुढारी या पार्टीत हजर असत. तो एक मोठ्ठा इवेंट असे. अशा ठिकाणी आपण दिसणं प्रत्येक माणसाला भूषण वाटत असे.

नॉर्मन मेलर आणि गोर विदाल हे विख्यात लेखक-इंटलेक्चुअल वेमथच्या पार्टीत पोचले. दोघांनाही दारू चढली. मेलरनी विदालच्या अंगावर दारू फेकली आणि विदालना ठोसे मारले. विदालनी मेलरला ठोसे मारले. गुद्दागुद्दी झाली. वेमथ हैराण झाल्या. ‘अरे कोणी तरी थांबवा ही मारामारी ‘ असं म्हणाल्या. एका उपस्थित नामांकितानं वेमथना सांगितलं ‘काsssही थांबवू नका. अरे हीच तर तुमच्या पार्टीची गंमत आहे, यासाठीच तर लोक पार्टीला येतात.’

२०११ सालची गोष्ट. वेमथच्या घरच्या पार्टीत ओबामा आणि ट्रंप हजर होते. त्या काळात ट्रंपनी ओबामा हे मुसलमान आहेत असं उठवायला सुरवात केली होती. ओबामानी एक छोटंसं भाषण करताना ट्रंप यांच्यावर टीका केली, ट्रंपची टिंगल केली. ट्रंप यांनी टीव्हीवर चालवलेली ॲप्रेंटिस ही मालिका त्या वेळी गाजत होती. तिचा उल्लेख करून ट्रंप हे ॲप्रेंटिस आहेत असा काही तरी टोला ओबामानी मारला. ओबामा त्या वेळी प्रेसिडेंट होते.

ओबामा बोलत होते तेव्हां समोरच्या खुर्चीवर वेमथ यांच्या शेजारच्या खुर्चीवर ट्रंप बसले होते. ट्रंप वेमथच्या कानात पुटपुटले ‘आता मी बघतोच ओबामाला.’ तिथंच प्रेसिडेंट पदाची निवडणुक लढवण्याचं ट्रंपनी ठरवलं असं वेमथचं म्हणणं आहे. पहा. या पार्टीमुळंच ट्रंप अमेरिकेच्या आणि जगाच्या बोडख्यावर बसले.

वेमथ यांच्या मुलाखतीत विशेष काही नसे अशी टीका होत असे. त्यात पत्रकारी जेमतेमच असे असं अनेकांचं म्हणणं आहे. मुलाखतीत नुसती प्रश्नोत्तरं असत, मुलाखतीत नाट्य नसे,थरार नसे, काही विशेष नसे, त्या सपक असत असंही अनेकांचं मत होतं. काही मुलाखतीत मात्र त्यांनी टोकदार प्रश्न विचारून समोरच्याला अडचणीत आणल्याचीही उदाहरणं आहेत. सर्बियाचे स्लोबोदान मिलोसेविक यांच्या कारकीर्दीत वृत्तपत्रांची गळचेपी होत असे हा मुद्दा वेमथनी लावून धरला होता. बेलारूसचे प्रेसिडेंट लुकोशेंका यांच्या मुलाखतीला युरोपातील हुकूमशहा असं शीर्षक वेमथनी दिलं होतं. त्यावर लुकोशेंका खूप चिडले होते.

वेमथ पत्रकारीत आल्या तेव्हां त्याना एकानं विचारलं ‘ श्रीमंत असणं ही तुम्हाला अडचण वाटते?’ वेमथ म्हणाल्या ‘मी श्रीमंत आहे हे खरं आहे. पण ती अडचण आहे की फायद्याचं आहे याचा विचार करण्यापेक्षा जे आहे ते आहे असं म्हणून वाटचाल करणंच योग्य आहे असं मला वाटतं.’

।।

निळू दामले यांचे इतर ब्लॅाग वाचण्यासाठी niludamle.com वर क्लिक करावे.

Comments are closed.