भारत पाकिस्तान अफगाणिस्तान त्रांगडं

भारत पाकिस्तान अफगाणिस्तान त्रांगडं

 अफगाणिस्तानचे परदेश मंत्री मुत्तकी भारताच्या परदेश मंत्री जयशंकर यांच्याशी बोलत असताना पाकिस्तानी लढाऊ विमानं काबूल आणि कंदाहारवर बाँब फेकत होती. 

।।

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे एक त्रांगडं आहे. अफगाणिस्तानातलं तालीबानचं सरकार भारतानं मान्य केलं नव्हतं, अफगाणिस्तानशी संबंध ठेवले नव्हते. तालिबान सरकार गेल्यानंतर हमीझ करझाई यांचं सरकार आलं. करझाईंचं शिक्षण भारतात झालं होतं. भारतानं करझाई सरकारला मान्यता दिली. नंतर पुन्हा एकदा सध्याचं तालीबान सरकार आलं.   आता भारतानं पुन्हा संबंध प्रस्थापित करायचं ठरवलंय. तालीबान संस्कृती भीषण आहे. तालिबान दहशतवादी आहे. बामियानमधल्या बुद्ध मूर्त्या तालिबाननं उध्वस्थ केल्या होत्या. तालिबान स्त्रियांना माणुसकीनं वागवत नाही. हे सारं माहीत असताना भारतानं तालिबानशी नातं जोडलंय.

याचं उघड कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले आहेत. तालिबान पाकिस्तानला छळणार असेल तर भारताला बरंच झालं. पाहुण्याच्या काठीनं साप मरेल. इतका उघड मामला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आता धुमश्चक्री चाललीय. गेले पंधरा दिवस दोन्ही देश एकमेकाच्या हद्दीत जाऊन माणसं मारत आहेत. सध्या मारामारी स्थगित आहे, कारण कतारनं दोघांच्यात समझौता घडवून आणला आहे. हा समझौता खोटा आहे. तो कधीही मोडेल.   पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं भांडण खूप जुनं आहे. अफगाणिस्तानला पाकिस्तान-अफगाणिस्तान ही विभागणीच मंजूर नाहीये. कधी काळी ड्युरंड  या ब्रिटीश माणसानं ही रेघ आखून ही विभागणी केली. अफगाणिस्तान प्रामुख्यानं पश्तून आहे. विभागणीनंतर बराच पश्तून विभाग पाकिस्तानात गेला. पश्तून लोकांचं म्हणणं आहे की तो विभाग अफगाण असल्यानं अफगाणिस्तानात असायला हवा होता. आजही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातली सरहद्द दोन्ही बाजूचे पश्तून मानत नाहीत. ते त्याना हवीतशी येजा बिनधास्त करत असतात.

फाळणीनंतर पाकिस्ताननं पहिल्या दिवसापासून भारताला शत्रू मानलं, भारत आपल्यावर स्वारी करणार असं पाकिस्तानी लष्कराचं मत पहिल्यापासून आहे. भारतानं स्वारी केली तर आपल्याला पळायला जागा हवी अशा विचारानं पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा वापर केला, अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवले. ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’ कायम रहावी यासाठी अफगाणिस्तानातलं सरकार पाकिस्तान धार्जिणं रहावं अशी खटपट पाकिस्ताननं केली, अफगाणिस्तान दुय्यम मानलं. अफगाणांना ते कधीच आवडलं नाही.

अफगाणिस्तानवर रशियानं ताबा बसवला तेव्हां देव न मानणाऱ्या कम्युनिष्टांना अफगाणिस्तानातून घालवायचं पाकचं धोरण होतं. अमेरिकेनं रशियाला घालवण्यासाठी अफगाणिस्तानात घुसायचं ठरवलं तेव्हां त्यांना आपसूकच पाकिस्तानची साथ मिळाली. रशियन लोकांविरोधात एकूणच सर्व अफगाण होते पण शेवटी सर्वाना दूर सारून तालिबाननंच पुढाकार घेतला. तालिबानला लागणारी सर्व मदत अमेरिकेनं व्हाया पाकिस्तान दिली. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानात तयार केलं, तिथं जिहादी तयार करून अफगाणिस्तानात पाठवले. त्यांच्या हाती कुराण आणि बंदूक अमेरिकेनं सोपवली, ती प्रक्रिया पाकिस्ताननं पार पाडली.

यथावकाश रशियाला पळ काढावा लागला. तालिबानचं सरकार तयार झालं. आपल्या मदतीवर शक्तीमान झालेलं तालिबान आपल्या टोपलीतला कोंबडा रहावा असा प्रयत्न पाकिस्ताननं केला. तो जमला नाही. तालिबाननं अल कायदाची मदत घेतली. अतीशुद्ध इस्लामचा मक्ता तालिबाननं अल कायदाच्या सहकार्यानं आपल्याकडं घेतला. 

अमेरिकेनं बिन लादेन आणि तालिबान विरोधात युद्ध पुकारलं, बिन लादेन पाकिस्तानात लपला. हाही उद्योग आपल्यामुळंच घडला असं पाकिस्तानचं म्हणणं होतं.

पण आतल्या आत तालिबानला पाकिस्तानची दादागिरी मान्य नव्हती. पाकिस्तानी सरकार पुरेसं इस्लामी नाही अशी अल कायदाची भूमिका होती. त्यामुळं आतल्या आत तालिबान आणि अल कायदा पाकिस्तानच्या विरोधात होते.

 तालिबानची सत्ता गेल्यानंतर करझाई यांचं सरकार होतं तेव्हांही ते सतत पाकिस्तानबद्दल तक्रारी करत असत. पाकिस्तानचं आयएसआय आमचं राज्य चालवू पहातंय अशी त्यांची टीका होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सतत भांडणं चालत असत.

एका क्षणी तालिबाननं पाकिस्तानावर चांगलाच सूड घेतला. पाकिस्तानात तालिबान निर्माण केलं. संघटनेचं नाव होतं तहरीके तालिबान. पण लोक त्याला तहरीके तालिबान पाकिस्तान याच नावानं ओळखतात. तालिबानचा कडवटपणा आणि अफगाणिस्तानची मदत या जोरावर ततापा फोफावलं, पश्चिम पाकिस्तानात एक शक्तीवान गट म्हणून आकाराला आलं. नवाज शरीफ असोत की इमरान खान, ततापाशी जुळवून घेऊ लागले. ततापा हा पाकिस्तान सरकारशी पंगा घेणारा एक शक्तशाली पक्ष झाला.

भस्मासूर. पाकिस्ताननं  तालिबान हा भस्मासूर तयार केला. या भस्मासुराचा चिरंजीव भस्मासूर आता पाकिस्तान नष्ट करायला निघाला आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातली मारामारी राजकीय वाटते, पण ती सांस्कृतीक आहे. तालिबान हा पश्तून गट एक स्वतंत्र सांस्कृतीक गट आहे. अफगाणिस्तानात ताजीक आहेत, हजारा आहेत,उझबेक आहेत, नूरिस्तानी आहेत. ते लोक पश्तून नाहीत. त्यांची संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळ्या आहेत. पण बहुसंख्य असल्यानं तालिबानची दादागिरी चालते.

पाकिस्तानात बलुच आहेत, सिंधी आहेत, पंजाबी आहेत आणि पश्तूनही आहेत. पण पाकिस्तान स्वतःला बहुसांस्कृतीक मानत नाही. पाकिस्तान पंजाबी वळणानंच जात असतो. पश्तून लोकांना वाटतं की त्यांना दूर ठेवलं जातं. पाकिस्तानची भाषाही उर्दू आहे. पश्तून लोक उर्दू बोलत नाहीत. पश्तून लोकांची रहन सहन,जगण्याची रीत पश्तूनवाली या नावानं ओळखली जाते. ती अगदी वेगळी आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात दुरावा आणि तणाव आहे. दीर्घ काळ तो चालत आला आहे. पाकिस्तानच्या दादागिरीमुळं तो दुरावा आता उचल खात आहे.

आपली सोडता इतर संस्कृत्या कमी प्रतीच्या असतात असं मानलं जातं. आपणच श्रेष्ठ असल्यानं इतरांनी आपल्याशी जुळवून घ्यायचं, इतरांनी दुय्यम स्थान स्विकारायचं असं प्रत्येक संस्कृतीला वाटत असतं.जगातली आजची सारी दुखणी त्यातूनच जन्मलेली आहेत.

।।

निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com  या वेबसाईटवर जावे.

Comments are closed.