अरे गाढव गाढव…
जगातली गाढवांची संख्या घटतेय. गेल्या वर्षीपर्यंत जगात ५ कोटी गाढवं होती, आता त्यांची संख्या ४ कोटीवर आलीय. संख्या कमी होतेय आणि त्यांची मागणी वाढतेय. परिणामी गाढवांचा बाजार तेजीत आहे. हा बाजार अर्थातच चीनमुळं आहे. चीननं तयार केलेल्या ‘गाढव अर्थव्यवस्थेत’ गाढवांना मागणी आहे.
चीनमधे गाढवांचा तुटवडा आहे, चीनला गाढवं हवी आहेत. चीनमधे १९९० साली १.१ कोटी गाढवं होती, २०२३ साली ती संख्या फक्त ११ लाखावर आलीय.
काय झालं? चिनी गाढवांनी कुटुंब नियोजन केलं? शक्य आहे. गाढवं हा आपण समजतो तसा बिनडोक प्राणी अजिबात नसतो. तो अत्यंत हुशार असतो. सभोवतालच्या परिस्थितीचं चांगलं आकलन त्याला असतं. मालक कोण आहे, त्याला काय हवं असतं हे त्याला कळतं. त्याची स्मृती पक्की असते. एकदा का तो एका वाटेवरून गेला की ती वाट ते कधीच विसरत नाही. मुख्य म्हणजे गाढव पॅनिकी होत नाही. घोडा संकट आलं की पळ काढतो, चौखुर उधळतो. गाढव शांत रहातं,विचार करतं आणि नंतर संकट कसं टाळायचं ते ठरवतं. तेव्हां गाढवांनी कुटुंब नियोजनाचा काही तरी ‘गाढव मार्ग’ काढला असणं शक्य आहे.
पण तसे पुरावे सापडलेले नाहीत, तसं संशोधन झालेलं नाही. पुरावे सांगतात की फार गाढवं चीनमधे मारली गेल्यानं तुटवडा झालाय.
चीनमधे एक एझियाओ नावाचं देशी औषध आहे. ते घेतलं की माणसाची प्रतिकारशक्ती वाढते, माणसाचे अनेक रोग दूर होतात, त्याचं आयुष्मान वाढतं, असा समज चीनमधे आहे. हा समज अजून तरी वैद्यकीय वा रसायन शास्त्रात सिद्ध झालेला नाही. पण लोकांचा समज असेल तर त्याला काय करणार?
गाढवाच्या कातडीतल्या काही विशिष्ट द्रव्यांपासून एझियाओ तयार करतात. त्यासाठी गाढवं मारली जातात. साधारणपणे एका गाढवाच्या कातडीपासून १.५ किलो एझियाओ होतं. २०१३ साली ३२०० टन एझियाओ चीनमधे तयार झालं. म्हणजे किती लाख गाढवं मारली ते बसा कॅलक्युलेट करत.२०२१ साली १५, ७०० टन एझियाओ तयार झालं. चीन म्हणजे अगदी पद्धतशीर नियोजन करून चालणारा देश असल्यानं (त्याला जगात नंबर एक व्हायचंय)२०२७ साली १८००० टनाचं लक्ष्य चीननं ठरवलंय. पण तितकी गाढवं तर नाहीयेत. म्हटल्यावर चीननं गाढवं आयात करायला सुरवात केलीय. आफ्रिका आणि आशियातून ते गाढवं मिळवत आहेत.
मागणी वाढल्यामुळं भाव आलाय. उदा. पाकिस्तानमधून एक गाढव २ लाख रुपयाला चिनी व्यापारी विकत घेत आहेत.किमत वाढल्यामुळं शेतकरी गाढवाची पिल्लंही विकतात, जखमी, आजारी गाढवंही विकतात. चीनला कातडीशी मतलब आहे. या मागणीमुळं आफ्रिकेतून इतकी गाढवं गेली की त्यांना आता गाढवांचा तुटवडा भासू लागलाय. आफ्रिकेतल्या काही देशांनी आता गाढव निर्यातीवर बंदी घातलीय.
आफ्रिकेतला इथियोपिया असो की भारत असो की पाकिस्तान; गाढव ही शेतकऱ्याची गरज आहे. गाढवाला एकदा मार्ग दाखवला की गाढव अगदी टेसलाच्या ड्रायव्हररहीत वाहनासारखं एकदम करेक्ट सांगितल्या जागेवर जातं. गाढव त्याच्या वजनाच्या २० टक्के इतकं वजन वाहून नेतं. काही गाढवं पन्नास किलो वजनही नेतात.
गाढवं उंच सखल भागातून लीलया जातात. गाढवं टेकड्या चढतात. या अशा जागा आहेत जिथं वाहनं जात नाहीत. अमेरिकेत वगैरे हल्ली अशा जागी जाणारी चार चाकी वाहनं तयार झालीत, सैन्यात त्याचा वापर करतात. पण एक वाहन वीस पंचवीस लाखाला पडतंय आणि भरपूर पेट्रोल डिझेल खातंय. गाढव किती तरी कमी किमतीला पडतंय, साधंसुधं खातंय आणि वीस पंचवीस वर्षं सहज काम देतय. कारला मेटेनन्स असतो, गाढवाला मेंटेनन्स नाही. त्यामुळं शेतकऱ्याला, कुंभारासारख्या व्यावयायिकाला गाढवाचं फार महत्व असतंय.
गाढवाचा आणखी एक उपयोग असतोय. गाढविणीचं दूध औषधी आहे असं म्हणतात. दमा, सर्दी इत्यादी रोग त्या दुधानं बरे होतात असं खेड्यातले लोक म्हणतात. विशेषतः मुलांना ते औषध फार उपयोगी असतं म्हणतात. त्यामुळं गाढविणीच्या एक चमचा दुधाला २०० रुपये मिळतात.
इतका उपयुक्त प्राणी पण त्याला मागणी आल्यावर बेजार झालेला शेतकरी गाढव विकायला उत्सूक होणं समजण्यासारखं आहे. आपल्याकडं जेजुरीला गाढवाचा बाजार भरतो. तिथं मराठवाड्यातून आणि गुजरातेतून गाढवं येतात. मराठवाड्यातल्या गाढवाची किमत ३५ हजार रुपये पडते. काठियावाडचं गाढव ५० हजार किंवा त्याहून जास्त महाग पडतंय. आता गुजरातचं गाढव म्हटल्यावर ते महाग असणारच की नै?
बहुदा महाराष्ट्र किंवा भारतातल्या शेतकऱ्यांना चिनी बाजाराचा पत्ता लागला नसावा. चिनी व्यापाऱ्यांना अजून जेजुरीचा बाजार माहित नसावा. त्यामुळं भारतातून फार गाढवं चीनमधे गेलेलं दिसत नाही.
आता माझा हा ब्लॉग प्रसिद्ध झाल्यानंतर चित्र बदलेल. चिनी लोक मराठी ब्लॉग वाचत नसल्यानं चिनी व्यापारी जेजुरीला येण्याची शक्यता कमी आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि धुळीला मिळालेला शेतकरी हा ब्लॉग वाचेल. शक्यता आहे की लवकरच महाराष्ट्रात एक गाढव महामंडळ तयार होईल.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com या वेबसाईटवर जावं.