दारोदार डिलिव्हरी आणि लेखन

दारोदार डिलिव्हरी आणि लेखन

 हु अन्याननं IDeliver Parcels in Beijing हे पुस्तक २०२३साली लिहिलं. दोन वर्षात त्या पुस्तकाच्या २० लाख प्रती संपल्या. त्या वर्षीचं  सर्वोत्कृष्ट लेखक पारितोषिक त्याला मिळालं. हुचं ते पहिलंच पुस्तक. 

हु लेखक नाही. पुस्तक लिहिल्यामुळं तो लेखक झालाय. हु बीजिंगमधे वस्तू पोचवणारा डिलिवरीवाला आहे. नागरीक वस्तू मागवतात. गोदामातून वस्तू गोळा करणं आणि गिऱ्हाईकांकडं पोचवणं हे त्याचं काम. एक वस्तू पोचवण्याचे २५ रुपये त्याला मिळतात. जगण्यासाठी त्याला दिवसाचे ११ तास काम करावं लागतं.

सोपं काम नव्हे. खाद्य वस्तू असेल तर ती काही मिनिटात पोचवावी लागते. उशीर झाला तर आईसक्रीम वितळतं, तळलेल्या वस्तू चामट होतात. असं काही झालं की त्याचा दंड पोचवणाऱ्यावरही बसतो. पत्ते चुकीचे असतात. दिलेल्या पत्त्यापर्यंत पोचायचे रस्ते चुकीचे निघतात. जवळचा म्हणून दाखवलेल्या रस्त्यावर वहातूक तुंबलेली असते. तिथं जास्त वेळ गेला की दिवसात मारायच्या फेऱ्या कमी होतात आणि त्याचाही भुर्दंड पडतो. कारण दिवसात अमूक इतक्या फेऱ्या झाल्या नाहीत तर आवश्यक पैसे मिळत नाहीत.

खाण्यावर फार वेळ घालवता येत नाही. प्रत्येक गोष्टीला किती मिनिटं लागतात याचा हिशोब करून वेळ वाचवावा लागतो. प्रत्येक मिनिटाची रुपयात काही एक किमत होत असते. परिणामी खाण्यापिण्याची आबाळ होते. स्वस्त अन्न खावं लागतं, स्वस्त दारू प्यावी लागते. त्यातून प्रकृतीचे तीन तेरा वाजतात. पोट बिघडून खाडा पडला की तेवढे एका दिवसाचे पैसे बुडाले. रात्री कशीबशी पाठ टेकते न टेकतो तोच उठून कामाला लागायची वेळ येते.

एक क्रेन चालवणारा माणूस होता. दिवसभर तो क्रेनवर असे, क्रेन आकाशातच असे. त्याला जेवण हवं असे. तो ऑन लाईन जेवण मागवायचा, जेवण घ्यायला, खायला, तो खाली येत नसे. हू अन्यान दिवसातून दोन तीन वेळा त्या क्रेनवाल्याकडं जात असे. वर जाऊन त्याला जेवण द्यावं लागे मिळाल्याच्या पावतीवर सही घ्यावी लागत असे.

अन्यानला धकाधकीमुळं निद्रानाशाची व्याधी जडली. झोप येण्यासाठी तो काय वाट्टेल ते करत असे. डार्क चॉकलेट आणि स्वस्त दारू. झोप लागेलागेतोवर उठावं लागे. दारू आणि चॉकलेटवर जगणं यानं त्याची प्रकृती ढासळत असे.

आपली ही अवस्था लिहून काढावी असं त्याला  वाटलं. लिहायचं कुठं? गावात एक मॉल होता. तिथं मोफत वायफाय मिळत असे, दुपारी दीडनंतर तिथं गर्दी नसे, बुफे स्वस्तात मिळत असे. तिथं त्यानं लिहिलं.

चीनमधे श्रीमंत आणि मध्यम वर्गीय लोक खूप आहेत. ते लोक ऑनलाईन खरेदीला चटावले आहेत. घरी अन्न शिजवत नाहीत की साधा चहासुद्धा करत नाहीत. ऑन लाईन.एकूणातच दुकानात जाऊन काही विकत घेण्यापेक्षा घरबसल्या वस्तू मिळत असल्यानं माणसं ऑन लाईन खरेदीत गुंतलेली आहेत. चीनची लोकसंख्या आहे १.४ अब्ज. ही लोकं वर्षाला सरासरी १२४ पार्सलं घरी मागवतात. कमी लोकसंख्येच्या गावात कमी, शहरात दिवसात सहज चार पाच तरी डिलिव्हऱ्या येतात. गेल्या वर्षी चीनमधे १७५ अब्ज पार्सलं खरोघरी पोचवली गेली. गेल्या वर्षी चीनमधे पोचवल्या गेलेल्या वस्तूंची किमत सुमारे २.२ ट्रिलियन डॉलर्स होईल. म्हणजे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या अर्धा भाग झाला.

चीनची अर्थव्यवस्था संक्रमण अवस्थेत आहे. नवी तंत्रज्ञानं येत आहेत. नव्या उत्पादन व्यवस्था, नवी कारभार व्यवस्था, नवी यंत्रं येत आहेत. जुन्या व्यवस्थेतले रोजगार नाहिसे होत आहेत पण नव्या व्यवस्थेत रोजगात तयार होत आहेत. रोजगाराचं गणित अजून बसलेलं नाही. रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या तरुणांमधे सुमारे १८ टक्के तरूण बेरोजगार आहेत.वस्तू पोचवणं हा एक नवा रोजगार तयार झाला आहे. शिक्षण, काम करण्याचं कौशल्य इत्यादी कमी पडत असल्यानं बेकार तरूण वस्तू पोचवण्याच्या कामात पोचतात. गेल्या वर्षी सुमारे साडेआठ कोटी तरूण डिलिव्हरीचं काम करत होते.या तरुणांना हुचं पुस्तक वाचावंसं वाटलं, कारण त्यात त्यांना त्यांचं जीवन दिसलं. 

हा एक नवाच कामगार वर्ग जगभर तयार होतोय, विशेषतः श्रीमंत देशांमधे. दुबाई, अबू धाबी सारख्या शहरात हा वर्ग सर्वात मोठा कामगार वर्ग झाला आहे. हे कामगार जगात कुठंही अजून संघटित झालेले नाहीत.

हे काम करणाऱ्याकडं  बाईक असावी लागते. पेट्रोल यांचंच. पेट्रोलचे ठरावीक पैसे कंपनी देणार. पेट्रोलचे दर वाढले की या तरुणांच्या खिशाला चाट बसते. चोविस तास बारा महिने काम करावं लागतं. आरोग्य, रहाती घरं, पुरेसं अन्न पाणी इत्यादींची तरतूद नसते. पोरांची लग्न होणार. त्यांनी संसार कसा करायचा? अनेक मुद्दे आहेत. कामगारांना, कर्मचाऱ्यांना, लागू होणारे कायदे यांना लागू व्हायला हवेत. 

कंपन्याना नफा कळतो. येवढे पैसे देणार, नको असतील तर कामावर येऊ नका. तुम्ही गेलात तर दुसरे बेकार रांगेत उभे आहेत असं कंपनीवाल्याचं म्हणणं असतं. कंपन्या मातबर असतात. अलीकडल्या काळात त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारं वागत असतात. कंपनीवाल्यांनी दिलेल्या उघड व छुप्या पैशावर निवडणुका लढवल्या जातात. त्यामुळं कंपन्यांना दुखवायला कोणीही पुढारी, लोकनियुक्त पुढारी तयार नसतो. ट्रेड युनियन हा शब्द आता शिवी झालाय.

या पुस्तकानंतर हू डिलिवरी बॉय राहिलेला नाही. आता तो आणखी एक पुस्तक लिहायचं  म्हणतोय. 

||

निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर क्लिक करा.

Comments are closed.