महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

 मेक्सिको नाना तऱ्हेच्या दबाव आणि प्रेरणांना तोंड देतोय.

बाहेरून ट्रंप दम काढत आहेत. अमेरिकेनं मेक्सिकोतून येणाऱ्या जहाजांवर बाँब फेकले. २१ जहाजं. त्यातून म्हणे ड्रग्ज अमेरिकेत येत होती. ८३ माणसं मेली. कित्येक दशकं मेक्सिकोतून माणसं आणि ड्रग्ज अमेरिकेत येतात. मेक्सिकोची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था ड्रग माफिया चालवत असतात. 

एकदा अमेरिकेनं ड्रगवाल्या वनस्पती नष्ट करण्यासाठी मेक्सिकोमधे आपले सैनिक घुसवले. अमेरिकन विमानं हवेतून आग किवा रसायनं फवारून ड्रग देणारी पिकं नष्ट करत असत. आड येणारी माणसंही अमेरिका मारत असे. त्याचा उपयोग होत नसे.

ड्रग अमेरिकेत जातात कारण अमेरिकेत ड्रगना मागणी असते. अमेरिकेत काही राज्यात ड्रगना परवानगी आहे. ड्रग सेवन आणि ड्रग बाळगणं या बाबत फार कडक कायदे अमेरिकेत आहेत. तरीही खुद्द वॉशिंगटनमधे, थेट अमेरिकन अध्यक्षाच्या रहात्या घराच्या आसपास ड्रग मिळतात. प्रेसिडेंट बायडन  यांचा मुलगा व्यसनी होता. तो अगदी सहजपणे व्हाईट हाऊसच्या आसपास ड्रग मिळवत असे. ड्रगना अशी मागणी असल्यानंतर मेक्सिकोतून येणारा ड्रग पुरवठा कसा थांबणार?

अमेरिका मेक्सिकोवर, मेक्सिकोतून येणाऱ्या बोटींवर हल्ला करतं तेव्हां मेक्सिकन लोक म्हणतात, तुमच्याकडं ड्रग सेवन करणाऱ्यांना आधी आवरा, आपोआप मेक्सिकोतली ड्रग निर्मिती आणि वाहतूक थांबेल.

ट्रंप काही दिवसापूर्वी म्हणाले की वेळ पडल्यास अमेरिका मेक्सिकोवर लष्करी कारवाईही  करेल. अमेरिका काहीही करू शकते. महाघातक शस्त्र नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं इराकवर आक्रमण केलं. बिन लादेनचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केला. मग ड्रग नष्ट करण्यासाठी मेक्सिकोवर हल्ला कां करणार नाही? मेक्सिकोच्या प्रेसिडेंट क्लॉडिया शीनबॉम म्हणाल्या की आमच्यावर हल्ला करू नका, ड्रग नष्ट करायची असल्यास जरूर करा आम्ही तुम्हाला मदत करू. पण ट्रंपचं काही सांगता येत नाही. सतत बातमीत रहाण्याची त्यांची आकांक्षा त्यांच्या हातून काय घडवेल सांगता येत नाही.

या ड्रग समस्येच्या अंतर्गत पैलूलाही मेक्सिको तोंड देतेय. गेल्याच आठवड्यात लाखो तरूण देशभर रस्त्यावर उतरले. ड्रग माफिया, ड्रग गुन्हे नष्ट करा अशी तरूणांची मागणी होती.पोलीस आणि तरूण यांच्यात चकमकी उडाल्या, दोन्ही बाजूनी शेकडो माणसं जखमी झाली. एक मोर्चा राष्ट्रपती भवनावर गेला. त्यावेळी पोलिसांनी भवनाच्या भोवतील ढालींची संरक्षक भिंतच उभी केली होती.

मुलं भिंतीला धडकली. मुलांनी प्रेसिडेंटला प्रश्न केला, तुम्ही स्वतःच्या भोवती एक संरक्षक भिंत उभारलीत, तशी भिंत रॉडरिगेझ यांच्याभोवती कां उभारली नाहीत, रॉडरिगेझ यांचा जीव वाचला असता. रॉडरिगेझ हे उरूपन या शहराचे मेयर होते. भर गर्दीत त्यांचा खून झाला होता.

उरूपन ज्या विभागात आहे तो विभाग ड्रगचा मोठ्ठा अड्डा आहे. उरूपनचे नागरीक ड्रगींच्या उपद्रवानं हैराण होते. शहरवासियांना ड्रग गुन्ह्यातून सुटका मिळावी यासाठी कायद्याची कडक अमलबजावणी करण्याच्या घोषणेवर रॉडरिगेझ निवडून आले होते. निवडून आल्या आल्या त्यांना धमक्या येणं सुरु झालं होतं. 

२०२४ साली मेक्सिकोत संसदेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुका झाल्या. ज्यांनी ड्रग माफियांवर कारवाईची मागणी केली होती त्यातल्या पन्नासेक उमेदवारांना माफियानी मोहिमेच्या दरम्यात गोळ्या घातल्या होत्या. रॉडरिगेझ वाचले होते. निवडून आल्यावर त्यांनी सुरक्षेची मागणी केली. रॉडरिगेझना म्युनिसिपल पोलिसांसह १४ सशस्त्र गार्ड देण्यात आले होते. येवढा जामानिमा असतानाही त्याना भीती वाटत होती, त्यांनी अधिक सुरक्षा मागितली. ती व्यवस्था होण्याच्या आधीच सार्वजनिक ठिकाणी फिरत असतांना एका माणसानं त्याला सात गोळ्या घातल्या. मृत्यूपूर्वी काही दिवस मॉरिसियो क्रूझ या पत्रकारानं रॉडरिगेझ याची मुलाखत घेतली होती. त्याचाही खून झाला.

जनतेनं आणि रॉडिरेगेझ यांच्या समर्थकांनी काळे कपडे घालून शहरभर निदर्शनं केली. प्रेसिडेंट शिनबॉम यांचा राजीनामा मागितला.

पाठोपाठ तेकँबेरो या त्याच प्रांतातल्या शहराचा मेयर साल्वाडोर बातस्डास याचा खून झाला. बातस्डासच्या सोबत असलेला त्याचा शरीररक्षकही गोळीबारात ठार झाला.

असुरक्षिततेचा फटका खुद्द प्रेसिडेंट शीनबॉमनाच बसला. त्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम  झाल्यानंतर त्या जमलेल्या लोकांमधे मिसळल्या. आसपासचे लोक म्हणजे  एक गर्दीच होती. एक माणूस त्यांच्या मागे उभा राहिला. त्यानं बाईना पाठून मिठी घातली. नंतर त्यांच्या छातीवरून हात फिरवू लागला. काय होतंय ते त्यांना कळेना.कसं  शक्य आहे. बाजूला त्यांचा अंगरक्षक होता. त्यालाही कळेना. तो माणूस प्रेसिडेंटबाईच्या कानात कुजबुजला, घाबरू नका, काळजी करू नका.

काही सेकंदच हा प्रकार चालला. लक्षात आल्यावर अंगरक्षकांनी त्या माणसाला धरला. त्याला अटक केली. घटनेचं व्हिडियो रेकॉर्डिंग झालं होतं, ते व्हायरल झालं.

स्त्रियांशी अतीप्रसंग करण्याचा दीर्घ इतिहास मेक्सिकोला आहे. एक अभ्यास सांगतो की दर १० स्त्रियांपैकी ७ स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी अतीप्रसंगाचा सामना करावा लागतो. यंदाच्या वर्षी अतीप्रसंगाच्या २५ हजार तक्रारी पोलिसांनी नोदल्या आहेत. अनेक कारणांसाठी स्त्रियांचे खून मेक्सिकोत होतात. दररोज सरासरी १० स्त्रियांचे खून होतात. यंदाच्या वर्षी मेक्सिकोत ५०० स्त्रियांचे खून झालेत.

प्रेसिडेंट बाईनी लपवाछपवी न करता जनतेसमोर त्या प्रश्नावर बोलल्या. त्या माणसावर त्यांनी खटला भरला. प्रेसिडेंटबाईशी असला अतिप्रसंग होत असेल तर सामान्य स्त्रियांची काय अवस्था असेल? स्त्रिया मेक्सिकोत किती असुरक्षित आहेत हे या निमित्तानं जगासमोर आलं.

प्रेसिडेंट बाईनी आता एक मोहिम जाहीर केलीय.  स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची आणि कायद्यातल्या तरतुदींची जाणीव करून दिली जाणार आहे.एक नवा कायदाही केला जातोय,  त्यात स्त्रियांवर अतिप्रसंग-बलात्कार करणाऱ्यांची सजा वाढवण्यात आलीय.

।।

Comments are closed.