चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.
नेटकंच पार पडलेल्या (२०२५) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सेफ हाऊस’ या चित्रपटाची उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली.नॉर्वेजियन एरिक स्वेन्सनने या चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय. चित्रपट युनेस्को आणि आयसीएफटी या दोन संस्थांची निर्मिती आहे.
सेफ हाऊस म्हणजे सुरक्षित घर. सेफ हाऊस या शब्दाना एक विशिष्ट अर्थ आहे.
गुप्तचरांना कोणाला तरी मारायचं असतं, कुठं तरी घातपात घडवायचा असतो. त्यासाठी त्यांना आपली ओळख, नावगाव पुसावं लागतं, लोकांच्या नजरेत भरणं टाळावं लागतं. उघड झाले की मेलेच. अशा गुप्तचरांना एका सेफ हाऊसमधे ठेवलं जातं. सेफ हाऊसमधे कोण रहातं, तिथं काय चालतं, याचा पत्ता त्या गल्लीतल्या लोकांना नसतो, त्या शहरातल्या लोकांना नसतो. फार खटपट करून देश सेफ हाऊस तयार करत असतात.
अमेरिकेच्या सीआयएनं, रशियाच्या सुरक्षा यंत्रणेनं, इस्रायलच्या मोसादनं अशी सेफ हाऊस जगभर तयार करून ठेवली आहेत. सुरक्षित घरं.
यादवी युद्ध, अंतर्गत युद्ध होतात तेव्हां देशातला एक गट दुसऱ्या गटाच्या लोकांना ठार मारायला टपलेला असतो. रवांडात हुटू आणि टुट्सी एकमेकांना मारत होते. भारतात जातीय दंगली होतात तेव्हांही माणसं असहाय्य होतात. अशा वेळी त्या असहाय्य, जखमी लोकांना एक आश्रयस्थान लागतं. त्यालाही सेफ हाऊस म्हणतात. सेंट्रल आफ्रिकेत ख्रिस्ती शेतकरी आणि मुसलमान भटके या दोन गटांत यादवी युद्ध चाललं होतं. त्यावेळी बांगुई या गावाच्या परिघावर असंच एक आश्रयस्थान तयार करण्यात आलं होतं, एक मेडिकल छावणी. त्या छावणीतल्या १५ तासांतल्या घटनांवर प्रस्तुत चित्रपट आधारलाय.
डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या सेवाभावी संस्थेनं ही छावणी उभी केली होती. युएन, चर्च, फ्रेंच सरकार यांचा या छावणीला पाठिंबा होता. सभोवताली ख्रिस्ती ‘सेलेक’ या मुस्लीम गटाचे लोक आणि ‘अँटीबलाका’ या ख्रिस्ती गटाच्या लोकांमधे धुमश्चक्री चाललीय. एक देश, दोन संस्कृती. प्रत्येक गटाला देशावर वर्चस्व हवंय. सतत जखमी माणसं येत असतात, अगदी जेमतेम उपयुक्त अशा साधनं-औषधांचा उपयोग करून डॉक्टर्स जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. सभोवताली बाँब फुटत असतात, गोळीबार होत असतो.
अचानक एक तरूण छावणीत घुसतो. तो सेलिक असतो. म्हणजे मुसलमान. डॉक्टरांना तो सेलिक आहे याच्याशी देणंघेणं नसतं. तो एक जीव वाचवायला आलेला जखमी माणूस आहे येवढंच त्यांना समजतं. डॉक्टर त्याला वाचवायचा प्रयत्न करतात.
सेलिकला छावणीनं आश्रय दिलाय हे कळल्यावर अँटीबलाका ख्रिस्ती दहशतवादी छावणीत घुसतात. त्यांना सेलिकचा ताबा हवा असतो. डॉक्टर्स ताबा द्यायला नकार देतात. प्रत्येकाचा जीव आपल्याला वाचवायचा आहे असं डॉक्टरांचं म्हणणं. अँटीबलाकाचा पुढारी सांगे की तुम्ही पक्षपाती आहात, तुम्ही गोरे आहात, तुम्ही आमच्या आफ्रिकेत घुसून आमच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करताय. छावणी चालवणाऱ्या महिलेनं फ्रेंच सैन्याची मदत मागितली. सैन्याचा अधिकारी म्हणाला की आश्रयाला आलेला माणूस फ्रेंच नागरीक नसल्यानं त्याला वाचवण्याची त्यांची जबाबदारी नाही, मरू दे त्याला.
पेच. छावणीतले डॉक्टर काळेही आहेत आणि गोरेही आहेत. युरोपीय आहेत आणि आफ्रिकीही आहेत. केवळ डॉक्टर या नात्यानं कर्तव्य पार पाडण्यासाठी ते आलेत.
छावणीची प्रमुख संयोजक जीव घोक्यात घालून त्या सेलिकला छावणीच्या बाहेर काढून त्याला सुरक्षित प्रदेशात सोडून देते.
ही झाली चित्रपटाची गोष्ट.
अशी घटना घडलेली होती. नावं बदलून ही गोष्ट चित्रपटात सांगितलीय. कलाकारांना गोळा करून चित्रीकरण केलंय. १५ तासात छावणीत काय घडलं यावर चित्रपट आधारलेला आहे. १५ तासात शेकडो माणसं काहीतरी करत होती, शेकडो गुणिले शेकडो गुणिले शेकडो असे नाट्यमय क्षण त्या काळात घडून गेले. त्यांची बेरीज केली तर लक्षावधी तास तयार होऊ शकतात. पटकथा लिहिणाऱ्या माणसानं त्यातले निवडक क्षण निवडून कथा तयार केली. ९० मिनिटांत त्यानं ही कथा मांडली. लक्षावधी तासाचं सार त्यानं त्याच्या दृष्टीनं ९० मिनिटांत आणलं. माणसांची नावं बदलली, एक गोष्ट तयार केली, एक पटकथा तयार केली. म्हटलं तर माहितीपट, म्हटलं तर फीचर फिल्म, फिक्शन.
चित्रपटाचं प्रत्येक मिनीट नाट्यानं भरलेलं आहे. थरार आहे. उत्कंठा आहे. भीती आहे. चिंता आहे. चिंतन आहे. शिसारी आहे. आनंद आहे. माणसाला घट्ट बांधून ठेवणारं सारं काही चित्रपटात आहे. सारं पटापट घडत जातं. प्रचंड वेग आहे. अभिनय, चित्रीकरण, संकलन ही चित्रपटाची अंगं प्रभावी, प्रत्ययकारी आहेत.
एक जखमी सैनिक येतो. रक्तबंबाळ. पोटात गोळ्या घुसल्यात. डॉक्टर गोळ्या काढण्याच्या प्रयत्नात असतात. तुटपुंज्या साधनांनिशी डॉक्टर खटपट करत असतात.
त्याच वेळी एक स्त्री बाळंत होत असते. मूल बाहेर येत नसतं. आई आणि बाळ मरणाच्या वाटेवर. सीझरीनची आवश्यकता. जखमी सैनिकाला नर्सच्या हाती सोपवून तिथला डॉक्टर बाळंतपण पार पाडण्यासाठी जातो. सैनिक मरतो. बाळ सुखरूप जन्मतं, स्त्री सुखरूप जिवंत रहाते.
अशा नाना प्रसंगांची गुंफण चित्रपटात आहे. दृश्यं बोलत रहातात.
धास्तावलेल्या सेलिक नागरिकाला संयोजक महिला पांढरा एप्रन घालते, तो डॉक्टर वाटावा या साठी. दहशतवादी कार अडवतात. बंदुका रोखून आत डोकावतात. गंडतात. डॉक्टर्स आहेत, जाऊं द्या असं म्हणून कारला जाऊ देतात. सेलिक माणूस सुरक्षीत ठिकाणाकडं रवाना होतो.
सेलिक, यादवी, तो देश, देशातली जनता, छावणी, सेफ हाऊस यांचं पुढं काय होणार? इत्यादी प्रश्न प्रेक्षकांवर सोडून चित्रपट संपतो.
आपण काय पाहिलं? एक सत्य घटना की एक कलाकृती? विषण्ण प्रेक्षक नि:शब्द होऊन बाहेर पडतो.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com वर जावे.