सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

  भारतीय फौजा हैदराबाद संस्थानात घुसल्या, हैदराबाद मुक्त झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम दाखवायचा झाला तर या घटनेच्या भवती चित्रपट-माहितीपट करता येतो. 

भारतीय सेना संस्थानात घुसल्याची बातमी कुरुंदा या गावात पोचली. तिकडं भारतीय सेनेची कारवाई सुरु होती इकडे नांदेडमधल्या कुरुंदा गावात आनंदोत्सव साजरा झाला. तो दिवस नरहर कुरुंदकर यांनी एका लेखात चितारलाय. त्या दिवसावर एक चित्रपट होऊ शकतो. कुरुंदा गावातलं एकादं कुटुंब, त्या कुटुंबात घडणाऱ्या घटना चित्रपटात दिसतील. कुरुंदा गावातली घरं दिसतील, त्यांचं जगणं दिसेल. त्यात ना भारतीय सेना दिसेल, ना निझाम दिसेल. त्यातून निझामशाही काय होती याची कल्पना प्रेक्षकाला येईल.

चित्रपटाची ही एक शैली आहे. 

गोवा महोत्सवात दाखवला गेलेला ‘प्रेसिडेंट्स केक’ हा चित्रपट या शैलीत होता. इराकचा प्रेसिडेंट सद्दाम हुसेन याचा वाढदिवस इराक साजरं करत असतं. सद्दामशी थेट संबंधित नसलेल्या घटनांभोवती चित्रपट विणला आहे. सद्दाम वाढदिवस साजरा करण्यासाठी लामिया नावाची एक दहाएक  वर्षांची मुलगी केक तयार करणार असते. त्यासाठी तिनं केलेली खटपट चित्रपटात आहे.

लामिया बगदादच्या काठावरच्या दलदलीत रहाते. अत्यंत कठीण परिस्थिती. आईबाप नाहीत, आजी तिची काळजी घेत असते. म्हाताऱ्या आजीला लामियाचं लोढणं दूर सारायचं असतं, कोणा तरी कुटुंबाला ती देऊन टाकणार असते. लामियाला परक्याकडं जायचं नसतं. 

याच वेळी  लामियाच्या शाळामास्तरनं लामियाला प्रेसिडेंट सद्दाम हुसेन यांच्या सन्मानार्थ केक करायची कामगिरी करायला सांगितलेली असते. खरं म्हणजे मास्तरलाच केक खायचा असतो. केक करण्याची विनंती नसते. हुकूम असतो. तिनं केक केला नाही तर तिला तुरुंगात जावं लागणार असतं. शाळेत काय घडतं याची माहिती पोलिसांकडं असते. गावातल्या प्रत्येक माणसाची खबर पोलिसांना असते. सद्दामच्या विरोधात ब्र जरी उच्चारला तरी माणूस तुरुंगात किंवा फासावर जात असे. लामियानं केक केला नाही तर ती खबर पोलिसांकडं जाणार असते.

केकची रेसिपी आजी सांगते. पीठ, साखर, तीन अंडी. या तीनही गोष्टी विकत आणायची ऐपत आजीजवळ नसते. आजी वस्तू गोळा करण्यासाठी घराबाहेर पडते. लामियाही बाहेर पडते,वस्तू गोळा करण्याच्या सबबीखाली तिला पळून जायचं असतं.

 सईद हा लामियाचा सवंगडी तिच्या मदतीला येतो. वस्तू खरेदीसाठी लामियाकडं पैसे नसतात. तिच्या वडिलांचं एक जुनं घड्याळ विकून पैसे उभे करायचा प्रयत्न ती करते. बरीच घासाघीस झाल्यावर पैसे मिळतात. पण विकणारा माणूस खोट्या नोटा देतो. आता काय करायचं? दोघं जण चोरी करायचं ठरवतात. पीठ, साखर चोरण्यासाठी बरेच उद्योग करतात.  

या खटाटोपात आजी आजारी पडते. हॉस्पिटलात दाखल होते. लामियाचा दिसत नाही म्हणून तिच्या शोधासाठी पोलिसांत जाते.

पीठ मिळतं. केक होतो. पण त्या केकचं पुढं काय होतं ते चित्रपट सांगत नाही.

दिक्दर्शक लामियाचं निमित्त करतो, बगदाद शहर आपल्याला दाखवतो, इराकी माणसांचं जगणं आपल्याला दाखवतो. 

 धूळ, गर्दी, प्रदूषण, आवाज, घाण, बकाली आपल्याला दिसते. माणसांचे नमुने दिसतात. छोट्या लामियाला फूस लावून वाममार्गाला लावायला निघालेला माणूस आपल्याला दिसतो. एका दुकानात एक गर्भवती स्त्री वस्तू विकत घ्यायला आलेली असते. दुकानदार तिला सांगतो की वस्तू नाहीयेत. ती स्त्री गयावया करू लागते, काहीही करून वस्तू दे असं म्हणू लागते. दुकानदार म्हणतो की दुकानाच्या मागल्या बाजुला ये, मी सांगतो ते कर, तरच तुला वस्तू मिळतील. ती स्त्री चमकते. म्हणते की अरे निदान माझं मोठं झालेलं पोट तरी बघ, मी बरेच महिन्यांचा गर्भ पोटात बाळगतेय, माझ्याशी तरी संग करण्याचा विचार करू नकोस. तो चळलेला दुकानदार म्हणतो अरे तू गरोदर आहेस हे तर बरंच झालं.  माझ्यापासून तुला गर्भ रहाण्याचा धोका नाही.

 सईद आणि लामिया हे सवंगडी असतात. सईदला घरून फळं आणायला सांगितलेलं असतं. वस्तू जमवण्याच्या नादात त्यांच्यात प्रेम जुळतं आणि भांडणही होतं.

 एकेक नग आपल्याला पहायला मिळतात. सतत करवादणारी भांडकुदळ आजी आपल्याला दिसते. मुलीला विकायची पाळी तिच्यावर आलीय हे आपण पहातो. पोलिस स्टेशन आपल्याला दिसतं, पोलिसांचा भ्रष्टाचार आणि दंडेली आपल्याला दिसते. हे सारं घडत असताना रस्त्यावर सद्दाम यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुका  आणि परेड आपण पहातो. सद्दाम हुसेनची भव्य पोस्टर शहरभर लागलेली दिसतात. मिरवणुका, परेड, बघ्ये, सद्दामचा जयजयकार करताना दिसतात. आकाशात अमेरिकेची विमानं फिरताना दिसतात. अमेरिकन विमानं, त्यांना तोंड देणारी इराकी विमानं. 

 चित्रपट पहाताना डोळे मिटले तरी कानाला तो चित्रपट समजावा असा ध्वनी वापर आहे, साऊंड इंजिनियरिंग छान आहे. बगदादमधली गजबज, गलबला, भांडणं, बाँबिंगचे आवाज इत्यादी आपल्याला कानानं दिसतं.

कला दिक्दर्शन प्रत्ययकारी आहे. नदीच्या किनाऱ्यावरची दलदल. पाण्यात वस्तू तरंगत असतात. माणसं तराफ्यावर रहातात. लामिया शाळेत जाते ती एका अरूंद अशा होडक्यातून.  लामिया अभ्यास करत असते, लामिया जेवत असते, तिची आजी स्वयंपाक करत असते, जमीन वरखाली होत असते, कारण त्यांचं घर तरंगणाऱ्या लाकडी फळ्यांवर उभं असतं.चित्रीकरण पूर्णपणे बगदादच्या परिसरात झालेलं आहे.

२०२५ च्या कान्स महोत्सवात पोचलेला हा पहिला इराकी चित्रपट होता. हसन हादी हा इराकी दिक्दर्शक अमेरिकेत वाढला, चित्रपट कलेचं शिक्षण त्यानं अमेरिकेत घेतलं. तो न्यू यॉर्मधेच चित्रपट हा विषय शिकवतो. 

हादीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

इराक म्हणजे क्रूर हुकूमशाही. दिक्दर्शकाला ती दाखवावीशी वाटते, खुबीनं बटबटीत भाषणबाजी न करता दिक्दर्शक ती दाखवतो. 

।।

निळू दामले यांचे ब्लॉग niludamle.com

Comments are closed.