खात रहा, वजन कमी करत रहा.

खात रहा, वजन कमी करत रहा.

।।

कुवैतमधे ४५ टक्के माणसं ‘वजनदार’ आहेत, अमेरिकेत ४२ टक्के आणि भारतात ७ टक्के माणसं वजनदार आहेत.उत्तर कोरियात फक्त १ टक्के वजनदार आहेत. 

भारतात १ लाख माणसांत ३० माणसं लठ्ठपणामुळं मरतात. अमेरिकेत ते प्रमाण १ लाखात ५५ इतकं आहे. सौदी अरेबियात लाखात १५८ लठ्ठ मरतात.

‌।।

जगभर दोन उद्योग जोरात चालतात. अन्नोत्पादक आणि औषधोत्पादक. पहिला उद्योग  लोकांना लठ्ठ करतो दुसरा   लोकांना सडपातळ करतो. दोघांची मिळून एक टोळी होते.

माणसं खातात, पचवतात.  आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जाणारं अन्न शरीरात साठून रहातं. किती वजन योग्य आहे ते स्त्री-पुरुष-मूल-वृद्ध-उंची या कसोट्यांवर ठरतं. कसोटीपेक्षा जास्त वजनवाला माणूस लठ्ठ. जिना चढताना  आपण पन्नास किलो वजन खांद्यावर घेतलं तर आपलं काय होतं?   वजन वागवायचं तर त्याचा हृदयावर ताण पडतो. रक्तदाब वाढतो. डॉक्टर सांगतात की वजन वाढल्यामुळं एक प्रकारचा मधुमेह आणि इतर अनेक त्रास सुरु होतात.  अती लठ्ठपणामुळं माणसं मरतात असंही लठ्ठपणाचे अभ्यासक सांगतात. 

अलीकडच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळं लठ्ठपणा वाढतोय. माणसं फार काळ बसून असतात. चालत नाहीत,पळत नाहीत. अगदी नैसर्गिक हालचालीही करत नाहीत.स्वयंपाकघरात अन्न शिजवत नाहीत, कपडे धुवत नाहीत, कपडे वाळत घालत नाहीत. बागकाम करत नाहीत. घराची साफसफाई करत नाहीत. जिने चढत नाहीत. घरातल्या कामात सहज घडणारी ऊठबस करत नाहीत. काम, काम, काम. तेही बैठं.  शेती आणि उद्योगात काम करणारे हा  अपवाद.  

हल्ली माणसं सतत तणावाखाली असतात. पैसे मिळवण्याचा आणि खर्च करण्याचा तणाव. कितीही पैसे मिळवले तरी पुरत नाहीत.  दिवसाला शंभर रुपये मिळवणारा असो की दिवसाला एक कोटी मिळवणारा,  प्रत्येकाला मिळणारे पैसे कमीच पडतात. पैसे मिळवण्याच्या खटाटोपात  तणाव येतो, तणावात माणूस खात सुटतो, पीत सुटतो. खाणंही चटकदार.  मीठ, साखर आणि तेल. वजन वाढतं. 

  क्रिकेट मॅच.  मॅचमधे खेळ कमी, दिसणं-थरार-नाट्य अधिक.खेळातल्या कौशल्यापेक्षा  चित्रण आणि  साऊंड इफेक्टमुळं खेळ रंजक होतो. खेळात सतत मधे मधे जाहिराती. जाहिराती खेळाडूंच्या शर्टावर असतात. जाहिराती स्टेडियमभर पसरलेल्या असतात. जाहिराती प्रेक्षकांच्या शर्टांवर असतात. करोडो रुपयांचा मेहनताना देऊन खेळाडूना खेळवलं जातं ते त्या निमित्तानं दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी. बैलांच्या शर्यती असतात, बैलांना झुंजवणारा खेळ असतो. बैलांच्या ऐवजी खेळाडू. कपडे. शूज. अन्नपदार्थ. इत्यादी इत्यादींच्या दृश्य जाहिरातींचा इतका मारा की माणसं त्याच वस्तूंची मागणी करतात. तुमचं आमचं जगणं ही मॅच आणि जाहिराती ठरवतात.   

मैदानावर २५ खेळाडू खेळणार. घाम गाळणार. टीव्हीसमोर २५ कोटी प्रेक्षक बसणार, जागचे ढिम्म हलणार नाहीत,  चटकदार पदार्थ खाणार.  

टीव्हीवरच्या मालिका पहा. कौन बनेगा पहा, इंडियन आयडॉल पहा. त्यात किती जाहिराती असतात पहा. असं म्हणतात की पेपरात मुख्य म्हणजे जाहिराती असतात, उरलेल्या जागेत बातम्या असतात. तसंच टीव्ही कार्यक्रमांचं. तेच सेल फोनचं. सतत जाहिराती, तास रील्स, क्लिप्स चालू असतात. सण येऊ द्या, धार्मिक घटना येऊ द्या. चकल्या, लाडू, श्रीखंड, चिवडे, पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, तूप, हलवे, केक, मोदक. जाहिरातींचा मारा. प्रत्येक चॅनेलवर पदार्थ तयार कसे करायचे ते दाखवणारे कार्यक्रम. त्यात पुन्हा जाहिराती.नटनट्या, खेळाडूचा त्या कामी वापर. पदार्थांवर सूट, एक ग्रॅम घ्या, एक ग्रॅम फुकट. घरपोच वस्तू. ऑनलाईन.वस्तू आणण्यासाठीही श्रम नको.

सध्या जगात अन्नपदार्थ  उद्योग सुमारे १० ट्रिलियन डॉलरचा आहे. भारताच्या एकूण उत्पादनाच्या दुप्पट.

वजन वाढवून झालं. आता ते कमी करायसाठी उद्योग.

पोट भरलं की पुरे झालं, सुख लाभलय असं सांगणारा संदेश एक हार्मोन मेंदूस देतो, माणूस खायचं थांबतो.  माणूस आता नैसर्गिक राहिलेला नाही, तणावाली असतो. भूक, पोट भरल्याची भावना या नैसर्गिक गोष्टी एक तर होतच नाहीत किंवा माणूस त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. त्यावर तर अन्नोद्योग चालतो. त्यातून वाट म्हणून खाऊ नका असा संदेश देणारी, भूक कमी करणारी औषधं आलीयत. 

एका  औषधामुळं वजन १० टक्क्यानं कमी होतं. प्रतीस्पर्धी कंपनी  २० टक्के वजन कमी करणारं औषध बाजारात आणते. तिसरी कंपनी तीच कामं करणारं नवं रसायन शोधून तिसरं औषध बाजारात आणते.

माणसाला दररोज औषध घ्यायचा कंटाला येतो. मग  आठवड्यातून एकदाच घ्यायचं औषध. प्रतिस्पर्धी कंपनी महिन्यातून एकदा घ्यायचं औषध काढते. एक औषध इंजेक्शनवाटे घ्यावं लागतं. प्रतिस्पर्धी कंपनी  त्या औषधाच्या गोळ्या काढते.   नवी औषधं म्हणे वजन घटवणाऱ्या औषधामुळं हृदयरोगासह इतर व्याधीही दूर होतात. उद्या वजन घटवण्याबरोबरच कॅन्सर दूर करणारी गोळीही निघेल. रामबाण. सर्व रोगांवर अक्सीर इलाज. प्रत्येक नवं औषध आधीच्या औषधापेक्षा महाग.

अलीकडं सरकारांनी अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित केल्यानं वजन उतरवणारी, तोंडावरच्या पुळकुट्या कमी करणारी इत्यादी औषधं महाग करून कंपन्या नफा वाढवतात.

Ely Lilly या वजन घटवणाऱ्या औषध कंपनीनं यंदा पहिल्या ९ महिन्यात  २५ अब्ज डॉलरची कमाई केलीय, Novo Nordisk या कंपनीनं त्याच काळात २३.५ अब्ज डॉलर कमावले आहेत. Ely Lilly इतक्या जोरात चाललीय की तिची शेअर बाजारातली किमत आता १ ट्रिलियन डॉलर झालीय. पुढल्या पाच वर्षात त्या कंपनीची किमत आजच्या भारताच्या एकूण उत्पन्नाच्या आसपास होईल.

मनुष्यहो.  खात रहा, वजन कमी करत रहा.

।।

Comments are closed.