सोशल मिडियावर बंदी

सोशल मिडियावर बंदी

सोशल मिडियावर बंदी

ब्रीटननं १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घातली आहे. स्नॅपचार्ट, टिकटॉक, यूट्यूब, इन्स्टाग्रॅम, फेसबुक, एक्स हे फलाट मुलं वापरू शकणार नाहीत. तसंच चॅटजीपीटी इत्यादी चॅटबॉटही मुलांना वापरता येणार नाहीत. व्यक्तिगत मेसेजिंग करणारे व्हॉट्सॲप आणि सिग्नल ही ॲप वापरायला परवानगी आहे.

ऑस्ट्रेलियानं आधीच अशी बंदी घातली आहे.

ब्रीटन आणि ऑस्ट्रेलियातल्या बंदीची मागणी दोन्ही देशातल्या पालकांनी केली होती. ९० टक्के पालकांनी बंदीचं स्वागत केलं आहे.

ब्रीटनमधल्या मुलामुलींमधील मानसिक असंतुलनाची दखल समाजाला घ्यावी लागली कारण मानसीक विकारांवर उपचार घेण्यासाठी इच्छुक मुलांची संख्या लक्षणीय झाली. डॉक्टर्स कमी पडू लागले. अपॉइंटमेंट मागितली तर सहा महिने ते दीड वर्षं इतक्या दूरवरची वेळ मिळू लागली. ज्यांच्यावर उपचारांची अगदी निकड होती अशांनाच उपचार मिळू शकत होते.

सरकार खडबडून जागं झालं. माध्यमांत चर्चा सुरु झाली.

ब्रीटनमधल्या मुलामुलींमधे ( वय ८ ते २५) वीस टक्के मुलांना मानसीक उपचारांची गरज भासतेय. २० ते २५ लाख मुलं. ब्रीटनमधे खाजगी डॉक्टर्स नाहीत, तिथली आरोग्य व्यवस्था सार्वजनिक आहे. उपचाराची जबाबदारी सरकारवर असते.

मुलंच नव्हेत, त्यांच्या पालकांनाही मानसीक उपचारांची गरज आहे.

ब्रिटीश समाजात मानसीक तणाव वाढत आहेत.

मुलांवरचे तणाव, मानसीक असंतुलन, प्रामुख्यानं सोशल मिडियामुळं निर्माण झालंय यावर संशोधकांचं एकमत आहे.

मुलं माणसं दिवसभर पॅड किंवा मोबाईलवर असतात. मोबाईलवर सतत रील्स, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, टिकटॉकवर असतात. माणसं स्क्रीनला खिळलेली असतात. रस्त्यावर चालत असताना स्क्रीन पहाता येत नसला तर कानात बड्स असतात. बसमधे बसलं, ट्रेन किंवा कारमधे बसलं की लगेच स्क्रीन सुरु. डोळे आणि हाताची दोन बोटं सतत गुंतलेली असतात. घरात पाहुणे आलेले नको असतात. कुटुंबातली माणसं एकमेकाला थेट भेटत नाहीत, बोलत नाहीत.सर्व मंडळी स्क्रीनमधे गुंतलेली.

सोशल मिडिया रेलवेचं टाईम टेबल सांगतं. सोशल मिडिया पदार्थ कसे करायचे ते सांगतं. डोकं कां आणि कसं दुखतंय ते सोशल मिडियाला सांगितलं की मिडिया औषध सांगतं आणि मिडिया औषध घरी पोचवतं. प्रेमात पडल्यास प्रेयसी वा प्रियकराला पत्रं कसं पाठवायचं त्याचा ड्राफ्ट सोशल मिडिया देतो. पाठ्यपुस्तकातले धडे, त्यावरचे प्रश्न,त्यावरची उत्तरं, गृहपाठ मिडियात तयार असतो. मास्तर वर्गात नव्हे स्क्रीनवर असतो.

सोशल मिडियाची रचना मादक द्रव्यासारखी आहे. पहाणाऱ्याला व्यसन लागतं. दृश्यांचं रूप, दृश्य दिसण्याचा काळ, दृश्य सरकण्याचा काळ यात माणूस गुंततो, स्क्रीन माणसाला घट्ट धरून ठेवतो. ड्रग किंवा दारू जशी माणसाला ताब्यात घेते तसंच मिडियाचं होतं.

यंत्र हातात घेतलं की सोडवत नाही. जे दिसतं ते चटकदार असतं, पुढला मजकूर तितकाच किवा जास्त चटकदार असणार अशी अपेक्षा निर्माण होते. पहाणारा आंगठ्यानं दृश्यं सरकवत जातो. अधिक आकर्षक दृश्य दिसेपर्यंत आंगठा वेगानं स्क्रीनवर फिरत रहातो. किती वेळ गेलाय ते कळत नाही. डोळे दुखले तरी माणूस थांबत नाही.

दृश्याची पेरणी विचार पूर्वक केलेली असते. सुंदर चेहरा, आकर्षक केस, आकर्षक डोळे, आकर्षक स्तन, आकर्षक मांड्या, डौलदार बांधा, कातडीचा आकर्षक रंग आणि पोत, आकर्षक कपडे, घड्याळं, कार, टीव्ही, बूट चपला.पहाणाऱ्या मुला मुलींना जे स्क्रीनवर दिसतं ते हवं असतं. ते मिळालं नाही तर मुलं निराश होतात, इरिटेट होता, चिडतात, हिंसा करतात, आत्महत्या करतात.

सेक्स,हिंसा आणि वस्तू हे तीन मुख्य मुद्दे असतात. पाठ्यपुस्तकातला धडा असो, रेसिपी असो, कोणतीही वस्तू किंवा औषध असो, वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा आणि दृश्यपट सेक्स, हिंसा, वस्तू यांच्याभोवती फिरतात.

व्यायाम करून शरीर कमवायचं नाही. खेळून आनंद मिळवायचा नाही. कष्ट करून ज्ञान मिळवायचं नाही.

मास्तरनं प्रोजेक्ट सांगितल्यावर तो दोन दिवसात तयार करून सबमिट करायचा. इतिहास, भूगोल, भाषा, विज्ञान इत्यादी काहीही असो, ते सारं चार दोन तासात क्षणभंगूर स्मृतीत रवाना केलं की भागतं.

प्रेंझेटेशन. दिसणं.चार दिवस दहा ताना घोटा, डिझायनर कपडे घाला, प्रकाश झोताची सवय करा, माईक किती अंतरावर ठेवायचं ते तंत्र समजून घ्या, नामांकित गाण्याची नक्कल करण्याचं तंत्र आत्मसात करा. पडद्यावर दिसू लागा. लोकांची संगित, कला,साहित्य इत्यादीबद्दलची समजूत यातून तयार होतेय.

शॉर्ट कट.

शाळा पार पडेस्तोवरच मुलं चार के आणि आठ के च्या गोष्टी करू लागतात; कॉलेज पार पडेस्तोवर तीन बीएचके आणि चार बीएचकेच्या गोष्टी करू लागतात. क्लास लावला, ट्रेनरला पैसे मोजले की नोटा छापणारा खेळाडू वा नट होता येतं अशी समजूत झालीय. सचीन एकादाच होतो, अमिताभही एकादाच होतो. बाकीचे डिप्रेशनमधे जातात.

आपलं नाक चपटं आहे आणि आपण हरिणीसारखं चालत नाही, आपले स्तन आकारानं लहान दिसतात किंवा ते फार मोठे आहेत म्हणूनही मुली आत्महत्या करतात.

सेल फोन प्रत्येकाकडं असणार. सोशल मिडियाला मुलाचं वय कसं कळणार? मिडियावाले हुशार आहेत. नवनवी ॲप शोधत रहातील. कायदा अमलात कसा आणणार?

मुलांना, त्यांच्या आईबापांना, समाजालाच शॉर्ट कट हवा असेल तर काय करायचं?

मिडिया तंत्रज्ञान आणि त्या बरोबरच येणारे समाजातले बदल ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. वस्तू हेच जगणं, वस्तू हीच विचारधारा, वस्तू कशीही मिळवणं हीच नीती. असं समाजानं मान्य केलं असेल तर सोशल मिडिया बंदी कुचकामी ठरेल.

सोशल मिडियावर बंदी जरूर घालावी, ती अमलात आणावी. पण समाज सुधारेल याकडंही लक्ष द्यावं.

।।

Comments are closed.