शहाण्या माणसानं लिहू नये!

शहाण्या माणसानं लिहू नये!

‘शहाणा असशील तर लिहू नकोस.’

लेखक लोकेश शेवडे. 

प्रकाशक राजहंस प्रकाशन.

।।

शहाणा असशील तर लिहू नकोस असं लेखक पुस्तकाच्या शीर्षकातून सांगतो आणि स्वतः मात्र १८६ पानं लिहून काढतो.  इतकी पानं लिहितो त्या अर्थी लेखक शहाणा नाही असा अर्थ निघतो. ते खरंच आहे म्हणा. मराठी समाजाला न रूचणाऱ्या गोष्टी सांगण्याचा मूर्खपणा-शहाणपणा लेखकानं या पुस्तकात केलाय.

अलिकडे सभोवताली भ्रष्टाचार,अनाचार, दादागिरी घडत असताना भारतीय माणसं गपगुमान कां असतात?  माणसाची विचारशक्ती, विवेकी विचार करण्याची शक्ती कमी झालीय कां? माणसाला आपलं हित समजत नाही कां? सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसलेला काहीही बोलतो-करतो, जनता गुमान रहाते.या स्थितीचा   काहीसा उलगडा प्रस्तुक पुस्तक वाचताना होतो.

  एक जिवंत उदाहरण. 

‘नीट’ परिक्षेचा पेपर फुटला. अनेक परिक्षार्थीना परिक्षेच्या आधी प्रश्न पत्रिका मिळाली. अनेक कोचिंग क्लासेसमधल्या मुलांकडून नीट परिक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं क्लासवाल्यांनी घोटून घेतली होती; कोचिंग क्लासवाल्यांना प्रश्न माहीत होते.

पेपर काढणारे लोक पेपरचे तीन सेट तयार करतात. त्यातला एक सेट शेवटी विद्यार्थ्यांसमोर येतो. ही प्रक्रिया गुप्त असते.   रचना अशी असते की अंतिम पेपर जोवर विद्यार्थ्याच्या हातात पडत नाही तोवर नेमका पेपर कोणाला माहीत नसतो.

मग पेपर कसा फुटतो?

 या प्रक्रियेत भाग घेणारेच पेपर फोडतात.

पेपर फोडणं आणि तो पसरवणं यात फार मोठं रॅकेट गुंतलेलं आहे, खूप माणसं आणि पैशाचा व्यवहार गुंतलेला आहे. तो एक उद्योगच आहे.

साऱ्या दुनियेला हे माहीत आहे.

सरकारचा उपाय काय?

भारत सरकार पेपर लष्कराकडं देणार. लष्कर एयरफोर्सला देणार. पेपर हवाई प्रवास करून पुन्हा लष्कराकडं येणार. तिथून तो परीक्षा केंद्रावर जाणार. 

लष्कराच्या हाती? 

 पाकिस्तानी दहशतवादी शेदोनशे मैलाचा प्रवास करून बिनधास्त पठाणकोटच्या हवाई दलाच्या केंद्रात गेले. गोंधळ घातला. एकदा दहशतवादी काश्मिरमधे घुसले आणि भारताच्या निमलष्करी वाहनांवर हल्ला करून जवान मारले. लष्कर स्वतःचं रक्षण कां करू शकलं नाही असा प्रश्न जनतेनं विचारला नाही.

त्या लष्कराच्या हाती पेपर? 

मुळात पेपर काढणाऱ्यांची टोळीच पेपर पसरवत असते हे  जनतेला उत्तम माहित असताना जनता लष्कर वापरण्याच्या कल्पनेची थट्टा कशी करत नाही?

  ।। 

 प्रस्तुत पुस्तकात २० लेख आहेत. विविध दिवाळी अंक आणि दैनिकांच्या रविवार पुरवण्यात ते आधी प्रसिद्ध झाले आहेत. एकेक लेख दिवाळी अंकात किंवा दैनिकात स्वतंत्रपणे वाचून काही एक बोध  होतो. सगळे लेख एकत्र एका पुस्तकात वाचले की त्यातून एक खूप व्यापक पर्सपेक्टिव येतो. 

पुस्तकातल्या लेखांची शैली साधारणपणे अशी. लेखक जगभर कुठं कुठं कसल्या तरी निमित्तानं जात असतो. तिथं तो काही गोष्टी पहातो. त्याचं वर्णन लेखात येतं. तिथं तो लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. ते संवाद लेखात येतात. ते देताना लेखक भाष्य करत जातो. ते भाष्य हा खरा पुस्तकाचा उद्देश आहे. इजिप्त, तुर्कस्तान, राजस्थान यांचा  इतिहास,तिथली ऐतिहासिक स्थळं या गोष्टी तर कळतातच पण त्या निमित्तानं लेखक सामाजिक आणि राजकीय निरीक्षणं मांडतो. तेच खरं या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे.

शहाणा असशील तर लिहू नकोस या शीर्षकाच्या लेखाच्या शेवटाला लेखक म्हणतो –गेल्या अडीच हजार वर्षात विवेक बाळगणारी माणसं होऊन गेली. ही माणसं काळाच्या ओघात घडणाऱ्या घटनांची दखल घेत घेत विवेकी विचार विकसित आणि विस्तारीत करून लिहीत गेली. ही माणसं संख्येनं आणि प्रमाणात थोडीच होती. बहुसंख्य जनतेनं नेहमी विवेक मोडीत काढला, विवेकवाद्यांचा छळ केला. समाजात असंच निरंतर घडत आलं आहे. समाजात हा अंतर्विरोध नेहमीच राहिला आहे, आजही तो आहेच.

या  लेखात लेखक सॉक्रेटिस, गॅलिलियो कडून  निघतो आणि दाभोलकर-कलबुर्गी-गौरी लंकेश यांच्या पर्यंत वाचकांना आणून ठेवतो.

  निषेध-निदर्शनं-निवडणुका या लेखात लेखक नवाल्नीची गोष्ट सांगतो. पुतीन यांचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार नवाल्नीनं उघडा पाडला, नवाल्नी पुतीन यांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहिला. परिणामी त्याला मानसीक आणि शारीरीक छळ सहन करावा लागला, विषप्रयोगानंच त्याचा मृत्यू झाला. लेखक म्हणतो ‘ निवडणुकीत नवाल्नीला १० ते २६ टक्के मतं मिळाली; याचा अर्थ ७४ टक्के लोकांनी नवाल्नीला मतं दिली नाहीत.’

एका लेखात फिलिपिन्समधल्या दोन न्यायाधिशांची गोष्ट आहे. जपान या हुकूमशाही देशानं फिलिपीन्सवर आक्रमण केलं. सँटोस या न्यायाधिशानं जपानसमोर नांगी टाकायला विरोध केला. परिणामी जपान्यांनी त्याला गोळ्या घालून ठार मारलं. त्याचा समकालीन लॉरेल हा न्यायाधीश होता. फौजदारी गुन्हे केलेला न्यायाधीश. खासदार झालेला न्यायाधीश. तो जपान्यांशी जुळवून घेत राहिला. लॉरेल गडगंज श्रीमंतीत जगला.

एका लेखात तुर्कियेचे राष्ट्रपती एर्डोअन यांची गोष्ट येते. कोविडचं थैमान चाललं होतं. एर्डोअन हॉस्पिटलं उभारत नव्हते, धर्मस्थळं उभारत होते. लेखकानं गाईडला विचारलं की लोकांनी एर्डोअनला विरोध कां केला नाही. गाईडनं उत्तर दिलं एर्डोअनच्या धोरणांना विरोध केला की माणसाची देशद्रोही,धर्मद्रोही या आरोपाखाली तुरुंगात रवानगी होते.

 लेखकानं एका लेखात एका वेगळ्या संदर्भात  नरहर कुरुंदकरांचं अवतरण दिलंय. ‘हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलाला कासीम रिझवी  दिसला नाही,निझाम दिसला नाही, जिना दिसले नाहीत. पिस्तुलातली गोळी १९२० नंतर इंग्रजांवरही झाडली गेली नाही, जणू ती गोळी फक्त गांधीजींसाठी होती’.

या अवतरणावरून लेखकाचा रोख कुठं आहे, लेखक कशाबद्दल बोलतोय ते लख्ख लक्षात येतं.  

जगभर हुकूमशहा लोकशाही वाटेनं निवडून येतात, लोकशाहीचं जाकीट घालून सत्ता राबवतात. हे कसं घडतं याचं दर्शन पुस्तकातल्या लेखांतून घडतं.

।।

Comments are closed.