चित्रकथा.होमलॅंड
चित्रकथा. होमलँड
सीआयएची अनधिकृत गोष्ट
होमलँड या शिर्षकाची एक मालिका नेटफ्लिक्सवर चाललीय. मालिकेचे ८ सीझन आहेत, प्रत्येक सीझनमधे १२ भाग आहेत. प्रत्येक भाग ५५ मिनिटांचा आहे. २०१२ मधे मालिकेची निर्मिती सुरु झाली, २०२० मधे शेवटला भाग प्रदर्शित झाला.
समजा तुम्हाला एक झणझणीत जाम चविष्ट अशी मिसळ खायला दिली. तुम्हाला ती आवडेल. तुम्ही आणखी एक प्लेट मागवाल. तरुण असाल आणि मित्रमैत्रिणींबरोबर स्पर्धा करायची ठरवाल, आणखी एकाद दुसरी प्लेट घ्याल. तुम्हाला ९६ प्लेट खायला दिल्या तर? मिसळ भले ग्रेट असेल. तरी ९६?
तसंच हल्ली मालिकांचं होतंय. चित्रपट कलेची सर्व अंगं मालिकेत असतात. वेग असतो, उत्तम छायाचित्रण असतं, अभिनय आणि संगीत आणि कला दिक्दर्शन छान असतं, पटकथाही कौशल्यानं रचलेली असते. तरी ९६ भाग पहायचे?
होमलँड अमेरिकेच्या सीआयए या इंटेलिजन्स संघटनेवर आधारलेली आहे. सीआयए केवळ माहिती गोळा करत नाही, त्या माहितीच्या आधारे अमेरिकेच्या शत्रूंचा नाश करते. देशोदेशीच्या महत्वाच्या माणसांचा खून करते, स्फोट घडवून आणते.
मालिकेची सुरवात ब्रॉडी या मरीन सार्जंटच्या इराकमधून परतण्यापासून होते. तो अल कायदाला वश झालेला असतो. त्याचा डबल एजंट म्हणून वापर केला जातो, शेवटी त्याला इराणमधे फाशी होते. नंतर सीआयएची माणसं इराणमधे जातात, अफगाणिस्तानात जातात, पाकिस्तानात जातात. वगैरे वगैरे.
खुबी अशी की २०१० पासून ते २०२० पर्यंत अमेरिकेनं घडवलेल्या घटना, अमेरिकेचे प्रेसिडेंट इत्यादींचे नावं खोडून वापर केलेले आहेत. दुसऱ्या महायुद्दानंतर हॉलीवूडमधे अमेरिकन-ब्रिटीश लोकांच्या शौर्याच्या, हुशारीच्या गोष्टींचं पेव फुटलं होतं. जर्मन, रशियन, चिनी इत्यादी लोकांवर मात हा मुख्य विषय असे. जर्मन वगैरेना बावळट ठरवलं जात असे. तसं अलीकडं इस्रायल आणि अमेरिकन हेर कसे ग्रेट असतात याच्या स्टोऱ्या रंगवल्या जातात. फौदा नावाची एक मालिका अजूनही चालू आहे. इराणी,अरब (मुसलमान) यांचं कौर्य, त्यांच्यावर मोसादनं केलेली मात असा विषय.
चित्रीकरण,अभिनय सगळं छान. त्यामुळं मालिका प्रेक्षणीय.
अमेरिका आणि हॉलीवूड समजा श्रीमंत नसते; सौदी,इराण, अफगाण, पाकिस्तानी समजा श्रीमंत आणि समाजमान्य असते; त्यांच्या हातात चित्रपटकला आणि मार्केटिंग असतं तर?
दुसऱ्या महायुद्धावरचे किंवा सध्याचे मोसाद-सीआयएवाले चित्रपट चित्रपट म्हणून चांगले असतात. त्यातून काही संदेश अगदी पुसट पसरतात. ते चित्रपट मुद्दाम काढलेले प्रचारी चित्रपट वाटत नाहीत. चित्रपटाची मुख्य अंगं म्हणजे रंजकता, पहावेसे वाटणं, थरार इत्यादी गोष्टींसाठी महायुद्ध किंवा दहशतवाद इत्यादी गोष्टी निमित्त म्हणून वापरल्या जातात.
अमेरिकन चित्रपटांना सेक्स आणि व्हायोलन्सचं खूप आकर्षण आहे, असतं. सेक्स आणि व्हायोलन्स असला की चित्रपट चालतो असं तिथं मानलं जातं. होमलँडमधे संभोगाचे प्रसंग संख्येनं भरपूर आहेत, मिनिटांच्या हिशोबात भरपूर लांबीचे आहेत. कित्येक वेळा असं वाटतं की साआयएतल्या लोकांना संभोग आणि विवाहबाह्य संबंध सक्तीचे आहेत की काय? ब्रॉडीचे कॅरीशी विवाह बाह्य संबंध. ब्रॉडीच्या पत्नीचे ब्रॉडीच्या मित्राच्या बायकोशी संबंध. ब्रॉडीचे त्याच्या मित्राच्या पत्नीशी संबंध असल्याचे आरोप. सीआयएच्या डायेक्टराच्या पत्नीचे आणखी कोणाशी तरी संबंध. ब्रॉडीच्या कोवळ्या मुलीचे कोणोकाणाशी संबंध. चित्रपटभर हे मुक्तपणे पसरलेलं. यात खर्च झालेली मिनिटं एकत्र केली तर एकादा पूर्ण एपिसोड भरेल अशी अवस्था.
चित्रपटाच्या इतिसाहातलं एक टिपण. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं जपानवर ताबा मिळवला. अमेरिकेनं आपले चित्रपट तिथं लादले. जपानला प्रथम पडद्यावरची चुंबनं दिसली ती हॉलीवूड चित्रपटात. चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे की चुंबनं,सेक्स याचं मार्केटिंग अमेरिकनं केलं, बाजारवाद चुंबनाच्या माध्यमातून अमेरिकेनं युरोपात पेरला. असो.
सीआयए सर्रास खून करत असतं. परदेशात जाऊन स्फोट घडवत असतं. पण या साऱ्या गोष्टी गुप्तपणे होत असल्यानं चित्रपटात दाखवलेले खून आणि स्फोट कल्पित होते असं म्हणायला चित्रपट निर्माते मोकळे असतात. अधिकृतरीत्या अमेरिकन समाज आणि सरकारं हात झटकून आपण काहीच केलं नाही, आपण शांततावादी लोकशाहीवादी मानवतावादी आहोत असं म्हणू शकतात. होमलँडमधे जे दाखवलंय ते सत्य नाही ते फिक्शन आहे असं कायद्याच्या चौकटीत म्हटलं जातं.
व्हेनेझुएलात काय झालं? विमानानी व्हेनेझुएलावर हल्ला केला. स्फोट करत, माणसं मारत अमेरिकन सैनिक अध्यक्षांपर्यंत पोचले, अपहरण करून अध्यक्षाला अमेरिकेत घेऊन गेले. खून, स्फोट, दहशत आणि अपहरण. या गोष्टी ट्रंप यांनी डंकेकी चोटपर करून दाखवल्या. सर्व घटना सरकारनंच चित्रीत करून जगाला दाखवल्या. नेमक्या याच गोष्टी अल कायदा, आयएसाय, आयसिस, हमास करत होतं. अल कायदा त्या गोष्टी इस्लामच्या रक्षणासाठी करत होतं, अमेरिकेनं त्या गोष्टी अमेरिकेच्या हितासाठी केल्या. ओसामा बिन लादेनच्या हाती चित्रपट सृष्टी असती तर त्यानं केलेले स्फोट,खून आणि अपहरणं लोकांना चित्रपटघरात आणि ओटीटीवर दिसली असती; अमेरिकेनं त्यांच्यावर बंदी घातली असती इतकंच.
दुसरं महायुद्द बराच काळ चाललं. त्या काळात अमेरिकेत अमेरिकन सैन्याचं कौतुक करणारे चित्रपट जोरात चालले आणि जर्मनीत हिटलरच कौतुक करणारे चित्रपट चालले.
फौदा, प्रिझनर्स ऑफ वॉर या इस्रायली मालिकांवरच होमलँड बेतलेली आहे.
व्हॉईस ऑफ हिंद रजब हा चित्रपट एका मुलीचं असहाय्य मरण दाखवतो. चित्रपट हमासचं समर्थन करत नाही, गाझातलं वास्तव दाखवतो, युद्धातलं क्रौर्य दाखवतो. Capernaum हा चित्रपट. त्यात बैरुटमधल्या भीषण वास्तवात जगणाऱ्या एका आई-मुलाची कहाणी आहे. बैरूट हा राजकारणाचा विषय आहे. पण चित्रपट त्यातल्या राजकारणात जात नाही. एका मुलाचं जगणं दाखवतो.
निखळ चित्रपट म्हणूनही चित्रपट तयार होतात हेही खरं.
असो.
।।